गोष्ट मनोविकासच्या जन्माची आणि अरविंद पाटकरांच्या प्रकाशक होण्याची!

‘चांगलं पेरलं तर चांगलंच उगवणार’ ही धारणा मनात जपत गेली पस्तीस वर्षे मनोविकास प्रकाशन दर्जेदार पुस्तकांची निर्मिती करत आहे. ती करताना नवा समाज घडवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पुरोगामी विचारांचा वसा घेऊन नाविन्यपूर्ण विषयांची निवड करत आणि वैशिष्ट्यपूर्ण मांडणीचा आग्रह धरत दर्जेदार पुस्तकं वाचकांच्या हाती देण्याचं काम मनोविकास प्रकाशनाने आजवर प्रयत्नपूर्वक केलेलं आहे. या भूमिकेची पायाभरणी मनोविकास प्रकाशनाला जन्माला घालणाऱ्या “शाहीर” या अण्णा भाऊ साठे यांच्या पुस्तकाने घातली आहे. नुकतीच अण्णा भाऊ साठे यांचा जयंती पार पडली . त्यानिमित्ताने मनोविकास प्रकाशनाच्या पहिल्या पुस्तकाची आणि या प्रकाशनाचे संस्थापक संचालक अरविंद पाटकर प्रकाशक कसे झालेत त्याची गोष्ट  … त्यांच्याच शब्दात…

अरविंद पाटकर

इंदिरा गांधी यांनी १९७५ साली लागू केलेल्या आणीबाणीला समर्थन देण्याचा निर्णय भारतीय कम्युनिस्ट पक्षाने घेतला. परंतु आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या पक्षाचा जेव्हा दारुण पराभव झाला तेव्हा मात्र भाकपमध्ये मोठी घुसळण सुरू झाली.  पक्षाच्या राष्ट्रीय मंडळात घेण्यात आलेला समर्थनाचा निर्णय कसा चुकीचा ठरला यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. या दरम्यानच डॉ. दत्ता सामंत यांनी गिरणी कामगारांचा संप पुकारला. त्यावेळी भाकपच्या मुंबई गिरणी कामगार युनियनने या संपाला सक्रीय पाठिंबा दिला होता. १९८१ सालचा हा संप अभूतपूर्व ठरला. एक तर या संपात कामगारांनी कडकडीत बंद पाळला आणि दुसरं हा संप दीर्घकाळ चालला. त्यामुळे एकूणच कामगारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या आयुष्यात आर्थिक आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. त्यातूनच वेगळं काही करण्याची, नवी वाट शोधण्याची गरज निर्माण झाली. त्या गरजेतून पुढे आलेला पर्याय होता पुस्तकं विक्रीचा. तो स्वीकारला आणि पुस्तकं विकता विकता प्रकाशक बनलो. विशेष म्हणजे कामगार चळवळीतल्या एका पूर्णवेळ कार्यकर्त्याला प्रकाशक म्हणून ओळख देणारं पहिलं पुस्तक होतं अण्णा भाऊ साठे यांचं ‘शाहीर’

माझ्या या वेगळ्या प्रवासाला कारण ठरला युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय. या काळात भाकपच्या मुंबई गिरणी कामगार युनियनमध्ये २३ पूर्णवेळ कार्यकर्ते होते. त्यातला मी एक होतो. गिरण्या बंद पडल्याने एकूणच आर्थिक उलाढाल थांबली होती. त्याची झळ आम्हा पूर्णवेळ कार्यकर्त्यांनाही बसली होती. अशा पार्श्वभूमीवर आम्ही पक्षाच्या मुंबई शाखेचे सेक्रेटरी कॉ. बी. एस. धुमे यांच्याकडे मानधन वाढवण्याची मागणी केली. त्यावेळी आम्हाला महिन्याला १५० रुपये मानधन दिलं जायचं. एकूण परिस्थितीचा विचार पक्षाकडून होईल असं वाटलं होतं. परंतु झालं उलटंच. सेक्रेटरी म्हणाले, ‘मानधन वाढवायचं की नाही हे तुमचं काम बघून ठरवलं जाईल. तेव्हा कामाला लागा.’

याचा अर्थ अकरा वर्षे चळवळीत काम केल्यानंतरही मानधन वाढ मिळवण्यासाठी शिकाऊ कार्यकर्ता म्हणून उमेदवारी करावी लागणार होती. ही भूमिका आम्हाला कोणालाच पटली नाही. त्याचा निषेध व्यक्त करत आम्ही तीन-चार कार्यकर्ते त्या बैठकीतून उठलो आणि यापुढे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करणार नाही असं म्हणत बाहेर पडलो.

आता पुढे काय? हा प्रश्न  आम्हा सर्वच कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाला.अभिनव प्रकाशनाचे वा. वि. भट हे आमच्या पक्षाचे एक मोठे कार्यकर्ते होते. त्यांच्याकडे माझं जाणं-येणं असायचं. त्यांनी माझ्या मनातली घालमेल नेमकेपणाने जाणली. ते म्हणाले, ‘युनियनमधून बाहेर पडलाच आहेस, तर पुस्तकं विक्रीचा व्यवसाय का सुरू करत नाहीस? तुझ्याकडे अनुभव आहे. तू हे काम चांगल्या प्रकारे करू शकशील.’

त्यांनी मला एक दिशा दाखवली. कॉ. डांगे यांच्या अनेक सभांमधून तसेच पक्षाच्या विविध कार्यक्रमांमधून लोकवाङ्मय गृहाची तसेच पीपल्स बुक्स हाऊसची आणि पक्षाकडून प्रसिद्ध केली जाणारी अनेक पुस्तकं मी विकली होती. विशेष करून रशियन पुस्तकं मोठ्या प्रमाणात विकली होती. त्यामुळे वा. वि. भट यांनी सुचवलेला पुस्तक विक्रीचा मार्ग मलाही जवळचा वाटला. मी तो स्वीकारला आणि काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन १९८३च्या गणेश उत्सव काळात पुस्तकविक्रीला सुरूवात केली. लालबागच्या तेजूकाया मॅन्शनच्या फूटपाथवर उभं राहून केलेल्या या पुस्तक विक्रीला खूप चांगला आणि आम्हा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी चळवळीच्या संदर्भातली रशियन पुस्तकं जशी मोठ्या प्रमाणात मराठी आणली जात होती तशीच काही तांत्रिक विषयावरची रशियन पुस्तकंही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असायची. त्यांना विद्यार्थ्यांकडून मोठी मागणी होती. हीच बाब हेरून गणेश उत्सवानंतर मी माटुंग्यातल्या व्हीजेटीआय कॉलेजच्या गेटसमोरील फुटपाथावर पुस्तकं मांडली. त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ४० टक्के कमिशन आणि वर इन्सेन्टिव्ह असे मिळून दिवसाला ३०० ते ४०० रुपये मिळू लागले. दीडशे रुपये मानधन घेणारा पूर्णवेळ कार्यकर्ता असलेला मी. आता दिवसाला एवढी मोठी रक्कम मिळू लागल्याने उत्साह वाढला.

अर्थात लालबाग-परळ भागात कामगार युनियनचा कार्यकर्ता म्हणून माझी एक वेगळी प्रतिमा लोकांमध्ये निर्माण झाली होती. गॅस कंपनीच्या प्रदूषणाच्या विरोधात आम्ही केलेलं आंदोलन त्यावेळी खूप गाजलं होतं. शासनाला त्याची दखल घेऊन कंपनी विरोधात कारवाई करावी लागली होती. त्यातूनही चांगल्या अर्थाने माझा एक दबदबा या परिसरात निर्माण झाला होता. तो लक्षात घेऊन काही कार्यकर्ते म्हणू लागले, ‘पुढारी, तुम्ही असं रस्त्यावर पुस्तकांची विक्री करणं बरोबर दिसत नाही.’कार्यकर्त्यांच्या या भावना अगदी योग्य होत्या. पण करायचं काय?

अशा विवंचनेत असतानाच माझ्या एका सहानुभूतीदाराने मला विचारले, ‘नायर हॉस्पिटलमध्ये शिकावू डॉक्टरांचा युवा महोत्सव आहे. तुम्ही तिथं पुस्तक विक्री कराल का?’  ही चांगली संधी होती. मी तयारी केली आणि विविध विषयांवरची दर्जेदार पुस्तकं घेऊन तिथं प्रदर्शन भरवलं. त्यात रशियन पुस्तकांच्या बरोबरीनेच विविध विषयांवरची मराठी पुस्तकं होती. काही अनुवादित पुस्तकं होती. साडेतीन दिवस चाललेल्या या मेळाव्यात १६ हजार रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली. काही पुस्तकं तर तिथल्या डॉक्टर्सनी रांग लावून विकत घेतली. ( त्यावेळी अनेक चांगली रशियन पुस्तकं अत्यंत स्वस्त किमतीत उपलब्ध होती.)

या प्रदर्शनामुळे रस्त्यावरच्या पुस्तक विक्रीला एक चांगला सशक्त आणि सन्मान वाढवणारा पर्याय मिळाला. मग मात्र मी मागे वळून पाहिलंच नाही. नायर नंतर जे. जे., केईएम, सायन  या हॉस्पिटल्समध्ये पुस्तकांची प्रदर्शनं भरवली. या सर्वच ठिकाणी वाचकांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला. त्यातून पुस्तक प्रदर्शनाची एक चटक लागली आणि मग आझाद मैदानातील मुंबई कॉर्पोरेशन जिमखाना, महापालिका कार्यालय, विविध सरकारी कार्यालये अशा ठिकाणी मी प्रदर्शनं भरवू लागलो. कामगार युनियनमधल्या कामामुळे ठिकठिकाणच्या कामगार युनियनशी संपर्क होता. त्यामुळे प्रदर्शनासाठी अनेक ठिकाणी सहकार्य मिळत गेलं.

प्रदर्शनातून पुस्तकांची होणारी मोठी विक्री आणि या वेगळ्या कामातून मिळणारं मानसिक समाधान यामुळे अनेक नवनव्या कल्पना डोक्यात यायच्या. त्या प्रत्यक्षात आणत नवी संकल्पना घेऊन प्रदर्शन भरवायचो. १९८४ मध्ये कार्ल मार्क्स यांची स्मृतीशताब्दी झाली. त्यानिमित्ताने मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवासात पुस्तक प्रदर्शन भरवण्याची कल्पना सूचली. त्यावेळी सुदामकाका देशमुख आणि बाबासाहेब ठुबे हे भाकपचे आमदार होते. त्यांनी ही कल्पना उचलून धरली आणि शिफारस पत्र दिलं. त्यावेळी आमदार निवासाचं व्यवस्थापन कार्यकारी अभियंता  प्रधान यांच्याकडे होतं. त्यांनीही या शिफारस पत्राची तात्काळ दखल घेऊन आमदार निवासाच्या आवारातला एक कोपरा मला पुस्तक प्रदर्शनासाठी उपलब्ध करून दिला. २५ पैसे प्रती चौरस फूट या दराने भाडं देऊन मी तिथे ४ ते ९ एप्रिल १९८४ या कालावधीसाठी प्रदर्शन लावलं. संपूर्ण राज्यातून अनेक लोक मंत्रालयात कामानिमित्ताने येतात. त्यात सामान्य लोकांसह लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे कार्यकर्ते  तसेच अधिकारी आणि कर्मचारी असतात. त्यामुळे या प्रदर्शनाला अगदी सुरूवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळू लागला. दोन दिवसांनंतर प्रधानांनी मला विचारलं,

‘प्रतिसाद कसा आहे?’ मी म्हणालो चांगला आहे. त्यावर ते म्हणाले, ‘मुदत वाढवून पाहिजे असेल, तर सांगा.’ मी म्हणालो, मिळाली तर चांगलंच होईल. त्यावर प्रधानांनी, ‘पाऊस सुरू होत नाही, तोवर चालू राहू दे हे प्रदर्शन’ असं सांगितलं. शिवाय जागाही वाढवून दिली. चार दिवसांसाठी लावलेलं हे प्रदर्शन तब्बल दोन महिने राहिलं. अनेकांना त्याची सवय झाली. पुस्तक विक्रीसाठी करावी लागणारी भटकंती थांबली. आयुष्याला काहीशी स्थिरता आली. मलाही स्थिरता मिळाली. त्यातूनच हे प्रदर्शन पुढे कायम सुरू राहील यासाठी मी प्रयत्न करू लागलो. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून विविध प्रकाशनाची अनेकविध विषयांवरची पुस्तकं वाढवण्यावर भर दिला. या माझ्या प्रयत्नांची दखल घेत ना. धो. महानोर, अरुण साधू, कुमार केतकर, रा. सू. गवई, माधव गडकरी या मान्यवरांनी मोलाची मदत केली. त्यातूनच आकाशवाणी आमदार निवास आवारात मनोविकास बुक सेंटर उभं राहिलं. इतकंच नाही, तर गेली ३६ वर्षे अव्याहतपणे ते सुरू आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या चोखंदळ वाचकांचं एक हक्काचं ठिकाण म्हणून मनोविकास बुक सेंटरला आता मान्यता मिळाली आहे.

आकाशवाणी आमदार निवासाच्या आवारातील या मनोविकास बुक सेंटरने आपली एक ओळख निर्माण केल्यानंतर पुन्हा एकदा वा. वि भट म्हणाले, ‘अरे, दुसऱ्यांची पुस्तकं अशी किती दिवस विकत बसणार? या विक्रीच्या बरोबरीने स्वतःची प्रकाशन संस्था का सुरू करत नाहीस?’

खरं म्हणजे त्यांनी योग्य वेळी योग्य सल्ला दिला होता. परंतु प्रकाशन व्यवसायातलं मला काहीही माहिती नव्हती. त्यांनी माझी अडचण जाणली. ते म्हणाले, ‘घाबरू नकोस, मी मदत करतो.’ …आणि त्यांनी चक्क त्यांच्याकडे आलेली एक चांगली संहिता मला दिली. एका प्रकाशकाकडून अशी मदत मिळणं ही मोठी गोष्ट होती. आणि वा. वि. भट हे त्यावेळी प्रकाशन व्यवसायातलं मोठं नाव होतं. अण्णा भाऊ साठे, नारायण सुर्वे, व्यंकटेश माडगुळकर, बाबुराव बागूल अशा अनेक मान्यवरांची पहिली पुस्तकं त्यांनी काढली होती. चळवळीच्या अनेक कार्यकर्त्यांना लिहितं केलं होतं. त्यांची पुस्तकं प्रकाशित केरून लेखक म्हणून त्यांना मान्यता मिळवून दिली होती. ते उत्तम गायक होते, अमर शेख कलापथकातही त्यांनी काम केले होते. मुख्य म्हणजे ते पक्षाचे सदस्य होते. कॉ. डांगेच्या बारा भाषणांचं पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं आहे.

अर्थात आपला हा व्यवसाय पुढे चालवणारं कोणी नसल्याने त्यावेळी त्यांनी प्रकाशन व्यवसाय आटोपता घ्यायला सुरूवात केली होती. अशा पार्श्वभूमीवर त्यांनी सांगितलं, माझ्याकडे एक हस्तलिखित आहे. ते मी तुला देतो. ते होतं अण्णाभाऊ साठे यांचं लावणी, गाणी, पोवाडे, यांचं एकत्रित संकलन असणारं”शाहीर” नावाचं पुस्तक. त्याला कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांची प्रस्तावना होती. ते पुस्तक त्यांनी मला दिलं. इतकंच नाही, तर या पुस्तकाचा आकार, कागद, छापाई, बांधणी आणि प्रूफरिडींग असं सर्व बाळांतपण त्यांनी केलं. बाळ ठाकूर यांना मुखपृष्ठ करायला सांगितलं. आणि महाराष्ट्र राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते त्यांच्या दालनात या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ घडवून आणला. त्या समारंभात डॉ.सदा कऱ्हाडे, अण्णा भाऊ साठे यांची मुलगी आवर्जून उपस्थित होते. विशेष योगायोगाचा भाग म्हणजे १९८५ च्या ऑगस्ट महिन्यामध्ये हा समारंभ झाला. अण्णा भाऊंचा जन्म याच महिन्यातला. वा. वि. भट यांनी खूप मोठ्या माणसाचं पुस्तक माझ्या हातात दिलं आणि मनोविकास प्रकाशन जन्माला घातलं. तिथून सुरू झालेला मनोविकास प्रकाशनाचा प्रवास गेली ३५ वर्षे अखंड सुरू आहे. विशेष म्हणजे अण्णा भाऊ साठे यांच्या या ‘शाहीर’ पुस्तकानं मनोविकासची जी वैचारिक पायाभरणी केली आहे, तिला कुठेही तडा न जाऊ देता हा प्रवास सुरू आहे याचं आज मागे वळू बघताना मोठं समाधान आहे.

शब्दांकन – विलास पाटील

-अरविंद पाटकर यांचा मोबाईल क्रमांक-99225 56663

 

Previous articleदांडेली अभयारण्य : एक अद्भुत अनुभव
Next articleअण्णाभाऊंचा पुतळा रशियात उभारला जातोय त्याची गोष्ट
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here