(साभार : साप्ताहिक साधना)
– संजय देशपांडे
अण्णा भाऊंचं जन्मशताब्दी वर्षं साजरं करायचं, असं महाराष्ट्र सरकारने मागील वर्षी घोषित केलं होतं. आमच्या मुंबई विद्यापीठानेही त्यानिमित्ताने अण्णा भाऊंना आदरांजली वाहावी, असा निर्णय घेतला. माझे वडील कम्युनिस्ट असल्यामुळे अण्णा भाऊंच्या कादंबऱ्या आणि इतर साहित्याकडे कळत्या वयापासून मीही आकर्षित झालो होतो. पुढे माझ्या सासूबाईंनी अण्णा भाऊंचं जीवन आणि साहित्यावर नागपूर विद्यापीठातून पीएच.डी. केलेली होती. त्यामुळे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अण्णा भाऊंशी संबंध येतच होता. अण्णा भाऊंनी १९६१ मध्ये रशियाला भेट दिली होती आणि तिथे ते ४० दिवस राहिले होते. रशियातल्या त्यांच्या वास्तव्यावर आधारित ‘माझा रशियाचा प्रवास’ हे त्यांचं पुस्तक मी लहान वयातच वाचलेलं होतं. युरेशियन अभ्यास केंद्राचा संचालक आणि मुंबई विद्यापीठाच्या रशियन भाषा विभागाचा प्रमुख म्हणून मी गेली काही वर्षं काम पाहतो आहे. त्यामुळे मराठीतल्या साहित्यसृष्टीशी थेट संबंध कमी असला तरी सोव्हिएत जीवनाचं, रशियन समाजाचं टिपलं गेलेलं चित्रण म्हणूनही अण्णा भाऊंच्या या पुस्तकाचं महत्त्व मला वाटत होतं.
मातंग समाजाचे काही कार्यकर्ते २०१७ मध्ये मला भेटले. त्यांनी अण्णा भाऊंवर एखादा सेमिनार घेण्याविषयी सुचवलं होतं. मातंग ग्रुप डेव्हलपमेंट (एमजीडी) या त्यांच्या संघटनेमध्ये बरेच प्राध्यापक, इंटेलेक्च्युअल्स, उच्च पदस्थ सरकारी अधिकारी, समाजसेवक आहेत- होते. त्या सर्वांनी सेमिनारचा हा प्रस्ताव आमच्यापुढे ठेवला होता. त्या दृष्टीने मी चाचपणी सुरू केली आणि २०१७ च्या ऑक्टोबर महिन्यात मुंबईतील रशियन दूतावासामध्ये अण्णा भाऊंच्या कार्यावर एक मोठा सेमिनार आयोजित केला. त्या एकदिवसीय सेमिनारसाठी अडीचशे लोक उपस्थित होते.

सातत्यपूर्ण प्रयत्नाची फळे. अभिनंदन