डरना जरुरी है!

-डॉ.साधना पवार

खरंतर कोरोनावर लिहायचं जाणूनबाजून टाळत होते गेले काही दिवस,सतत याबद्दलच्या माहितीचा,बातम्यांचा भडिमार पाहून जनता अगदी भांबावून गेली होती. म्हणून सर्वांचं मन प्रसन्न होईल असेच लिहिण्याचा प्रयत्न करीत होते.

पण पावसाळा आणि आगामी
सणउत्सव आणि आपली उत्सवप्रियता पाहता थोडी धडकीच भरायला लागली आहे म्हणून हे लिहितेय.
शिवाय ‘आता काय लस आलीय’ असा लोकांना उगाचच दिलासा आलाय, त्यामुळे लोक काहीसे बेफिकीर वाटताहेत म्हणूनही…

संकटं कधीच सांगून येत नसतात,अचानक येतं म्हणूनच ते संकट असतं.
त्याला आपल्याला सामोरं जावंच लागतं…
म्हणतात ना,
‘आलिया भोगासी असावे सादर’..
पण हे ‘सादर’ हात पाय गाळून व्हायचं की शांतपणे परिस्थिती समजून घेऊन,तोडग्यांचा विचार करून,आणि त्यांची अंमलबजावणी करून व्हायचं आहे हे आपलं आपणच ठरवायचं आहे.
जरी खूप जण कोरोनाला हरवून बरे झालेले असले तरीही,
आजअखेर *47 हजार मृत्यू* झालेत देशात कोरोनामुळे…
त्यामुळे डरना जरूरी हैं।
लस आपल्यापर्यंत पोचायला आणि तिचा परिणाम सुरू व्हायला अजून वेळ आहे.
त्यामुळे डरना जरुरी हैं।
उत्सवांच्या गर्दीत लग्गेच पसरतो हा विषाणू,
म्हणून डरना जरुरी हैं।

कोणी जर तुम्हाला कोरोना षडयंत्र आहे,काही घाबरू नका असे मेसेज पाठवत असेल तर ते अज्ञानी आहेत असं समजा आणि सरळ दुर्लक्ष करा.
या लोकांना सायटोकाईन स्टॉर्म माहीत नसतो, कोरोनामुळे फुफ्फुसांची होणारी अवस्था माहीत नसते,ना त्यांना हा व्हायरसची भयंकर इन्फेक्टिव्हिटी माहीत असते.

कोणतंही संकट आल्यानंतरच्या आपल्या मानसिक स्थितीच्या काही स्टेजेस,अवस्था असतात,shock denial, anger,acceptance..

Denial च्या स्टेज मध्ये आपण संकट आहे हेच नाकारत राहतो.आपल्याला असं कोणीतरी सांगितलेलं ‘बरं’ वाटणारं खोटं ‘खरं’ वाटतं.

साथ जगभर धुमाकूळ घालतेय.
शंभरेक वर्षातून कधीतरी अशी साथ येते की त्यावर उपचार सापडायला वेळ लागतो.
हा जो व्हायरस आहे तो प्रचंड आगाऊ आहे,सतत बदलतोय स्वतःला,वेगवेगळ्या अवयवसंस्थांवर हल्ला करतोय.
लहान, मोठे, तरुण ,ज्येष्ठ, फिट वगैरे सर्वांना बाधतोय.
कितीतरी पोलीस ,डॉक्टर,स्वच्छता कर्मचारी मृत्युमुखी पडलेत.
सरकार कानीकपाळी सतत ओरडतेय,काळजी घ्या,मास्क लावा,गरजेशीवाय बाहेर पडू नका.
पण छे,
अशी सरळपणे ऐकेल ती कसली आपली जनता?
जागतिक साथ म्हणजे काय हे आपल्या भेज्यामध्ये का घुसत नाहीये?
अनावश्यक गर्दी दिसते आहे,
लोक लग्नं करताहेत चक्क या साथीत..
लक्षात घ्या,
यावर्षी गणपतीत,दसऱ्यात,दिवाळीत,आणि सर्वधर्मीय सणांमध्ये आपल्याला गर्दी टाळायची आहे. आपल्याला खूप जबाबदारपणे वागावं लागणार आहे.

सरकारी मदतीला मर्यादा आहेत,
आर्थिक घडी विस्कटते आहे हे माहीत असूनही
लॉकडाउन करणं ही सरकारची मजबुरी आहे.
एकूणएक हॉस्पिटल भरून गेल्यावर सरकार अजून दुसरं काय करणार?
हॉस्पिटलमध्ये रोबोट्स नाही तर जिवंत माणसं काम करताहेत.
त्यांच्यावरती गेले कित्येक महिने प्रचंड ताण आहे.
जीव मुठीत घेऊन डॉक्टर्स ,नर्सेस ,पोलीस, सामाजिक कार्यकर्ते काम करतच आहेत .
कमीत कमी त्यांचा विचार ,त्यांच्या कुटुंबीयांचा विचार आपण करायलाच हवा.
कोणाचंही मानसिक खच्चीकरण करण्याचा हेतू नाही पण सावध करत राहणं हे कर्तव्य वाटतं, एक डॉक्टर आणि एक जागरूक नागरिक म्हणून…
साथीला सावधपणे सामोरे जाऊया ना..
तुमचं इतर काही गोष्टींपेक्षा आरोग्याला महत्व देणं इथे मॅटर करतंय.
घरात स्वच्छता ,आणि खेळती हवा ठेवणं.

घरचं ताजं साधं पचेल असं अन्न खाणं.
व्यायाम ,प्राणायाम, योग करणं.
वजन नियंत्रणात ठेवणं.
मधुमेह होऊ न देणं,
नियंत्रणात ठेवणं.

ठीक आहे प्रॉब्लेम आहे,
व्यायामाला बाहेर पडता येत नाहीये प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे,
यूट्यूबवर हजारो व्हिडीओज आहेत,त्यात बघूनही बरेचसे ,घरच्याघरी स्ट्रेचिंगसारखे
व्यायाम करता येतील.

घरात खूप बोअर होतंय?
खूप दिवस बघायचे राहून गेलेले सिनेमे पाहू,घरच्यांना वेळ देऊ,मुलांचा अभ्यास घेऊ,बागकाम करू,वाचन करू.

एकदा ही साथ ओसरली की फारतर डबल धमाल करू प्रत्येक सणात,उत्सवात,लग्नात..

पण तोपर्यंत या साथीला, या विषाणूला डरना जरुरी है!

(लेखिका पलूस येथील डॉ पवार हॉस्पिटल येथे स्त्रीरोग व प्रसुतीतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत)

[email protected]

 

Previous articleअण्णाभाऊंचा पुतळा रशियात उभारला जातोय त्याची गोष्ट
Next articleराजस्थानातल्या फसलेल्या बंडानंतर…  
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here