-राकेश साळुंखे
पावसाळ्यात वर्षासहलीसाठी बहुतेकांचे आवडते ठिकाण असते ते म्हणजे एखादा धबधबा . कोणाला त्यात भिजायला आवडते तर कोणाला लांबून बघायला आवडतो . स्वतः च्या सुरक्षिततेची काळजी घेऊन धबधब्याचा किंबहुना निसर्गाचा आस्वाद घेणे यासारखी आनंददायी गोष्ट नाही.
कर्नाटकातील गोकाकचा धबधबा हा देशभर प्रसिद्ध आहे . घटप्रभा नदीवर बेळगाव पासून ६० किमी तर सांगली,कोल्हापूरपासून सुमारे १०० किमी अंतरावर आहे . घटप्रभा नदी ही कृष्णा नदीची एक उपनदी आहे. गोकाक या ठिकाणी ही नदी ५२ मीटर उंच सॅंड स्टोनवरून खाली दरीत झेपावते . पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरून वाहणारी घटप्रभा जेव्हा दरीत कोसळते त्यावेळी दिसणारे दृश्य केवळ अप्रतिम असते . लालसर रंगाचा पाण्याचा मोठा प्रवाह आणि खाली पडताना येणारा आवाज अंगावर शहारे उभे करतो . या धबधब्याचा आकार घोड्याच्या नालेसारखा असल्याने याला जगप्रसिध्द नायगाराची छोटी प्रतिकृती म्हटले जाते . या ठिकाणी नदी ओलांडण्यासाठी ब्रिटिश काळातील १२० वर्ष जुना झुलता पूल आहे .
साधारणपणे २०० मी.लांब व ४६ फूट उंच असलेल्या या पुलावरून चालताना जो अनुभव येतो तो खूपच थरारक असतो . रुंदी कमी असल्याने एकावेळी थोड्या थोड्या लोकांना त्या वरून सोडले जाते . खाली प्रचंड वेगाने वाहणारा पाण्याचा मोठा प्रवाह तसेच त्याचा मोठ्या आवाजातील खळखळाट छातीत धडकी भरवतो . त्या वरून चालताना पुलाच्या हेलकाव्यांनी काळजात चर्रर्र होते. पण त्या पुलावरुन चालण्याचा थरार हा अनुभवलाच पाहिजे . धबधब्याच्या पायथ्याशी एक जुना हायड्रो इलेक्ट्रिक प्लान्ट ( जल विद्युत निर्मिती केंद्र ) आहे . येथे १८८७ मध्ये पहिल्यांदा वीज निर्मिती केली गेली . येथे जाण्यासाठी रोपवेची सोय आहे . पूर्वी या केंद्रात जाण्याची परवानगी होती. तसेच तेथे वीज निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखवले जायचे . आता मात्र तेथे जाण्यास मनाई आहे . या फॉल चया समोर १८८७ मध्ये ब्रिटिश काळात सुरू केलेली Forbs Gokak नावाची सूतगिरणी आहे आणि ती तेव्हापासून आजतागायत सुरू आहे . या मिलमुळे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
माझे कॉलेज सांगलीला होते . तेथे असताना गोकाकचा धबधबा हे आम्हा मुलांचे मुख्य आकर्षण असायचे . ऑगस्ट महिन्यात भरभरून कोसळणारा धबधबा पाहणे, हा दरवर्षीचा एक सोहळाच असे . कॉलेज जीवनानंतर ही अनेक पावसाळे गोकाकला घालवले . सुरुवातीला फक्त धबधबा हेच आकर्षण असायचे . पण नंतर त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या रंजक तसेच ऐतिहासिक वास्तूंची भुरळ पडू लागली .
गोकाक धबधब्याच्याच्या हँगिंग ब्रिजवरून पलिकडे गेल्यावर तेथे प्राचीनकालीन मंदिरे आहेत. लोलासूर हे त्या गावचे नाव. लोला नावाची असुर माता होती. तिला मधू नावाचा मुलगा होता. खरं तर तो यादव राजा होता. तरी त्याला रामायणात दैत्य मानले आहे. तो खूप मोठा शिवभक्त होता. अशी आख्यायिका आहे की, त्याला शिवाने त्रिशूल दिले होते व ते जोपर्यंत त्याच्याकडे आहे तोपर्यंत तो अजेय राहील, असा वर त्याला दिला होता.त्याचाच पुत्र लवण होय .लवणच्या मृत्यूनंतर ते राज्य भीम नावाच्या यादव राजाकडे गेले. या गावात गोकाक मिलमधून जाण्यासाठी जो ब्रिज बांधण्यात आला त्याचे एक नाव लोलासूर ब्रिज असे आहे.
या ठिकाणी धबधब्याच्या आसपास चालुक्य राजघराण्याच्या साम्राज्याच्याही खुणा आढळतात . नदीकाठी ११ व्या शतकातील शंकराचे एक जुने मंदिर आहे. जे महालिंगेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे . त्याचे बांधकाम चालुक्य पद्धतीचे आहे . मंदिराभोवती असणारे मोठे आवार मनाला भावते . मंदिरावर केलेले कोरीव काम खूप सुंदर आहे. आवर्जून भेट द्यावी असे हे मंदिर आहे .
येथून जवळच मार्कंडेय नदीवर एक धबधबा आहे . मार्कंडेय हे पुरातन काळातील व्यक्ती व कुळाचे एक प्रसिद्ध नाव . त्यांचा उल्लेख रामायण , महाभारत व वराह पुराण या संदर्भाने येतो. ते असुरांचे ऋषी शुक्र यांच्या वंशातील होत. दंडकारण्य समजले जाणाऱ्या दांडेली – खानापूर भागात उगम पावणाऱ्या या नदीला त्यांचे नाव देण्यात आले आहे . गोकाक पासून १५ किमीवर हा गोडचिनामलाकी धबधबा आहे. कन्नड मध्ये गोडे म्हणजे भिंत . दाट झाडीत जास्त उंची नसलेल्या टप्प्याटप्प्यांच्या ह्या धबधब्यात उतरून पाण्यात मनसोक्त चिम्ब होण्याचा मोह आपण टाळू शकत नाही. जास्त गर्दी नसलेले हे ठिकाण बऱ्याच चित्रपटातून चित्रबद्ध झाले आहे. गोकाकला गेल्यावर हे ठिकाण चुकवू नये.
जवळचे अजून एक आकर्षण म्हणजे हिडकल डॅम. गोकाक धबधब्यापासून २१ किमी आहे. त्याचे दुसरे नाव राजा लखमगौडा डॅम . त्याभागातील स्थानिक उदार राजा व कर्नाटक राज्यातील पहिले बॅरिस्टर यांचे नाव त्याला देण्यात आले आहे. या धरणाच्या भिंतीवर आधी जाऊ देत होते आता मात्र जेथून धरणाचे पाणी दरवाज्यातून सोडले जाते, तेथपर्यंतच जाता येते.
गोकाक ची करदंटही मिठाई खूप प्रसिद्ध आहे . घरी परतताना अवश्य खरेदी करावी . ती बरेच दिवस गोकाकची आठवण ताजी ठेवते .पावसाळ्यात वन डे ट्रीप साठी गोकाक हा एक चांगला पर्याय आहे .
(लेखक सातारा येथील ‘लोकायत’ प्रकाशनचे संचालक आहेत)
84849 77899
Must Watch- Gokak Waterfall