मामासाहेबांशी झालेल्या ओळखीचं वय आता प्रौढ वयात पोहोचलं आहे , म्हणजे पत्रकारितेच्या अगदी सुरुवातीच्या काळातच मामा भेटले . गुरु आणि शिक्षक या अर्थानं विचार करायचा झाला तर , मामांनी थेट मुळाक्षरं कधी गिरवून घेतली नाहीत किंवा वर्गात पत्रकारिताही शिकवली नाही ; पण सहवास सुरु झाल्यावर त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं , हेही तेवढंच खरं . ते त्यांनी जाणीवपूर्वक दिलं आणि ते जाणीवपूर्वकच स्वीकारलं गेलं, असंही घडलं नाही. त्यांच्या लेखनाचा , त्यांच्या कामाच्या शैलीचा, वर्तनाचा कळत नकळत संस्कार होत गेला . खरं तर , सर्वच ज्येष्ठांनी भरभरून दिलं; पण आम्हालाच ते पूर्ण घेता आलं नाही . जेवढं काही घेता आलं त्यामुळेच जाणिवा समृद्ध , विकसित आणि संवेदनशीलही झाल्या . जर त्यांनी शिकवलेलं सगळंच आकलनाच्या कवेत घेता आलं असतं तर, कुठल्या कुठं पोहोचता आलं असतं याची रुखरुख कायम आहे .
संपादक म्हणून निवृत्त झाल्यावर ज्या पद्धतीनं मामांनी अयोध्येतील त्या जागेच्या संदर्भात सुरु असलेल्या कामात स्वतःला झोकून दिलं ते त्यांच्या टोकदार सामाजिक जाणिवेचा एक जिता जागता अनुभव होता कारण , काही तरी भयावह घडणार या संकेतानं अस्वस्थ असलेले मामासाहेब घुमरे तेव्हा बघायला मिळालेले आहेत. बाबरी मस्जिदीच्या संदर्भात आमच्या नावानं ती जी काही घटना घडली त्याच्या किती तरी दिवस आधी या देशात काही तरी विलक्षण अशी उलथापालथ घडणार आहे आणि जनजीवनात महाभयंकर लाटा उसळणार आहेत , असं अधेमधे भेट झाली की मामासाहेब कातर होऊन सांगत असत . तेव्हा मामा द्रष्टेपणानं काय सांगत आहेत हे लक्षात येत नसे . नंतर हे लक्षात आलं तेव्हा खूप उशीर झालेला होता . शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या कामातही मामांनी स्वतःला असंच झोकून दिलं मात्र , हे करताना त्यांची भूमिका त्यांनी कार्यकर्त्याचीच ठेवली. वयाच्या साठीनंतर, इतक्या मोठ्या पदावरुन निवृत्त झाल्यावरही मामा सदैव एक साधा माणूस म्हणून कार्यरत असतात हे लक्षात येतं आणि मामांचं माणूसपण अधिक भावतच जातं . मोठ्या पदावरून निवृत्त झाल्यावर आणि वय वाढत गेल्यावर हेकट आणि हट्टी न होता अधिक समंजस होत जाणंही सहज घडणारी प्रक्रिया नाही . त्यासाठी हवी असते सात्त्विकता, तीही जन्मजात आणि ती नेमकी तशीच मामासाहेबांजवळ आहे .