पत्रकारितेतं मी आकंठ अशी मुशाफिरी केली . मुंबई , पुणे , नागपूर , दिल्ली या ठिकाणी पत्रकारिता केली . काही वर्ष मी औरंगाबादला होतो . एक पत्रकार म्हणून अनेक परदेशांमध्ये दौरे करता आले . खूप मोठ्या-मोठ्या इव्हेंट कव्हर करता आल्या .
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की , आपल्याला प्रश्न विचारताही आले पाहिजेत . विशेषत: पत्रकार , लेखक , कलाकार , कलावंत . पत्रकारांना तर प्रश्न विचारताच आले पाहिजे . लेखक , कलावंत , चित्रकार वगैरे वगैरे त्यांच्या अभिव्यक्तीतून , कलेतून काही प्रश्न मांडत असतो . मग ती कविता असेल , कथा असेल , कांदबरी , समीक्षा , चित्र किंवा संगीत असेल या माध्यमांचा तो प्रश्न मांडण्यासाठी वापर करत असतो . पत्रकार आणि तरुण व विद्यार्थी , विशेषत: पदवी आणि त्याच्या पुढच्या तरुणांच्या मनात प्रश्न विचारण्याची एक ऊर्मी निर्माण झाली पाहिजे . स्वत:ला पडलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं सापडतील असं नसतं . मी अनेक ठिकाणी शिकवायला जातो ; असं लक्षात येतं की , आपलं लेक्चर संपल्यानंतर मुलं प्रश्नच विचारत नाहीत . म्हणजे आपण जे सांगितलं आहे ते सर्व त्यांना मान्य आहे असा त्यांचा समज झाला आहे का ? समाजामध्ये जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत त्याच्या संदर्भात लोकप्रतिनिधींना , आपल्या शिक्षकांना , एखाद्या लेखकाला , एखाद्या कलावंताला , प्रशासकीय अधिका-याला प्रश्न विचारतो आहे का ? प्रश्न विचारण्यातून सुद्धा अनेक गोष्टी माहीत होत असतात . थोडक्यात ही जी प्रक्रिया आहे ती आपल्या घडण्याची जी प्रक्रिया आहे .