प्रेरणेचा प्रवास – प्रश्नातून पुढच्या प्रश्नाकडे हवा

( ‘युवा मन्वंतर’ आणि ‘कल्पक विद्यार्थी समूह’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रेरणेचा प्रवास’ या विषयावरील व्याख्यानाचा हा संपादित अंश .

-प्रवीण बर्दापूरकर

‘प्रेरणेचा प्रवास’  असा विषय मला देण्यात आलेला आहे.  या विषयासाठी मला संयोजकांनी योग्य का ठरवलं , त्यांचे याबाबतचे काय निकष होते , हे काही माहीत   नाही . पण , बहुधा एकेकाळच्या अतिशय आघाडीच्या आणि अजूनही अतिशय प्रतिष्ठाप्राप्त असलेल्या ‘लोकसत्ता’ या दैनिकात विविध पदांवर काम केलं.  या वृत्तपत्राच्या एका आवृत्तीचा संपादक म्हणून मी निवृत्त झालो. ‘लोकमत’ या वृत्तपत्र समुहाचा राजकीय संपादक म्हणून मी दिल्लीत काम केलं.  पत्रकारितेतील अनुभव तसंच व्यक्तीचित्र आणि ललित लेखन अशा वेगवेगळ्या विषयांवर मी भरपूर लेखन   केलं .  त्या लेखनाची १८-२० पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत . आता ब्लॉगर म्हणून आणि राजकीय विश्लेषक म्हणून माझं नाव घेतलं जातं . बहुधा या निकषावर भाळून संयोजकांनी माझी या विषयासाठी निवड केली असावी .  शिवाय आणखी एक बाब म्हणजे संयोजकांना बहुधा वाचनात किंवा माझ्या भाषणात अभावग्रस्त लहानपणाचा उल्लेख आलेला आहे आणि आजपर्यंत मी जिथंपर्यंत पोहोचलेलो आहे , त्यामुळेही कदाचित त्यांनी निवड केली असावी . एक गोष्ट लक्षात घ्या की , मी काही स्वत:ला यशस्वी संपादक, खूप मोठा लेखक किंवा ब्लॉगर वगैरे समजत नाही . तसा उल्लेखही स्वत:चा   कधी करत नाही . वाचक, लोक , विविध चर्चा , परिसंवादात असा उल्लेख केला जातो . माझा मात्र अजिबात तसा दावा नाही .

हे खरं आहे , माझं बालपण अतिशय अभावग्रस्त परिस्थितीमध्ये गेलं .  ६० ते ७०-८० चा तो काळ होता .  माझे वडील अकाली वारले . आई नर्स होती . नकाशावर कदाचित नसणा-या अनेक खेडयांमध्ये ती नोकरी करायची . पदरी चार मुलं होती तिच्या . अतिशय अपुरा पगार . त्यामुळेच सातवी–आठवीपासूनच आम्हाला एक सवय लागून गेली की , आपण उन्हाळयात काहीतरी कामं करावी आणि आपल्या पुढच्या शिक्षणाची सोय करावी . कारण शिक्षणाची आस लागलेली होती . शिवाय माझ्या आईचा दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार म्हणजे वाचनाचा . तर , या वाचन आणि शिक्षणाच्या ओढीमुळे मग आपल्याला पुढे  काही करायचं असेल तर शिकण्यासाठी काहीतरी काम केलं पाहिजे अशी  एक धारणा पक्की होत गेली .  ठिकठिकाणी मी काम करत असे . डॉक्टरांकडे हंगामी कंपाउंडरपासून ते रोजगार हमी योजनेपर्यंत अशी कामे मी केली आणि शिकत गेलो .  सततच्या वाचनामुळे मला कथा लेखनाची ओढ वाटली . आपण एक चांगल्यापैकी कथा लेखक म्हणून प्रस्थापित व्हावं अशी माझी इच्छा होती . त्या दरम्यान मला तेव्हाच्या बी अँड सी म्हणजे , आताच्या सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये हंगामी नोकरी मिळालेली होती .  पण माझा कल लेखनाकडे होता आणि या लेखनाला पूरक ठरेल असं वाटून मी पत्रकारितेत आलो . पहिली संधी औरंगाबादच्या आकाशवाणी केंद्राचे तत्कालीन वृत्त विभाग प्रमुख वसंतराव देशपांडे यांनी दिली . त्यांनीच मला ‘गोमंतक’चे तेव्हाचे  संपादक माधव गडकरी यांच्याकडे पाठवलं आणि तिथून माझ्या पत्रकारितेची सुरुवात झाली.

पत्रकारितेतं मी आकंठ अशी मुशाफिरी केली .  मुंबई , पुणे , नागपूर , दिल्ली या ठिकाणी पत्रकारिता केली .  काही वर्ष मी औरंगाबादला होतो .  एक पत्रकार म्हणून अनेक परदेशांमध्ये दौरे करता आले . खूप मोठ्या-मोठ्या इव्हेंट कव्हर करता आल्या .

माझ्यातला राजकीय विश्लेषक माधव गडकरी यांनी घडवला . मग पुढे माझं कथालेखन बाजूला पडलं आणि एक राजकीय विश्लेषक अशी एक माझी प्रतिमा तयार झाली तरी माझ्यामध्ये अंगामध्ये एक ललित वाचक होता , ललित लेखनाचं काही एक अंग माझ्यामध्ये होतंच त्यामुळे लेखनामध्ये एक शुष्कपणा येण्याच्या ऐवजी लालित्य यायला लागलं आणि अनेकांना आवडायला लागलं तर , काही लोकांना आवडत नाही . हा जो प्रवास आहे तो  एका अविश्रांत श्रमाचा आहे . एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ,  नियती , भाग्य असं काही नसतं . आपल्यावर नेहमी असा एक संस्कार होतो की , तळहातावर ज्या रेषा आहेत , त्या रेषा भवितव्य घडवणार आहेत . पण , ते काही खरं नसतं . एक शेर पेश करतो-

हाथों की लकीरों पे गुमान न करना, 

किस्मत तो उनकी भी अच्छी होती है , जिनके हाथ नहीं होते

सांगायचं तात्पर्य हे की , यात किस्मत शब्द असला तरी ही किस्मत म्हणजे अविश्रांत श्रम असा घ्यायचा . आपण ज्ञानी आहोत की नाहीत हे मला माहीत नाही पण , आपल्याला खूप विषयांची माहिती असली पाहिजे . इथं आणखी एक उपमुद्दा असा की , कधीही ,  कुठेही काम करताना गटातटाच्या राजकारणात मी कधी फसलो नाही आणि सत्तेच्या वर्तुळात ( Corridorr of Power ) इतका प्रदीर्घ काळ वावरुनही मी कधीच कुणाकडून काही मागितलं नाही . याच्यापुढेही मागण्याची शक्यता आता मावळलेलीच आहे .  याच्यातला आणखी एक उपभाग असा आहे की , पत्रकारिता करत असताना मी बातमीशी अतिशय प्रामाणिक राहिलो . माझी वैयक्तिक धारणा गांधीवादी आहे , समाजवादी आहे पण , ती धारणा  बातमीत कधी उमटू दिली नाही . वाटयाला जी असाइनमेंट आली त्याची बातमी मी व्यवस्थित दिली . कमेंट करताना मात्र मी कोणालाच सोडलं नाही . कुणाचं कौतुक करायचं असेल तर हात कधी आखडता नाही राहिला आणि कुणावर  टीका करायची असेल तर हात कधी थरथरलासुद्धा नाही . सध्या उच्च पदस्थ असणारे राजकारणातले अनेकजण माझे वैयक्तिक आणि कौटुंबिक मित्र आहेत . अनेकांशी ‘अरे-तुरे’ चे संबंध आहेत पण , कधी कुणाकडून सवलतीच्या दरात सदनिका घ्यावी किंवा अन्य काही मिळवावं अशी इच्छा झाली नाही . हे भान कटाक्षानं पाळत असल्यामुळे माझी पत्रकारिता स्चच्छ राहिली .  दुसरा एक भाग असा आहे की , बातमी मी विकली नाही . बातमीच्या संदर्भात कुठलीही तडजोड कधीच केली  नाही . अमुक एक बाब ही बातमी आहे का नाही , हे ठरवण्याची किंमत मी कधीच कुठे वसूल केली नाही . थोडक्यात मी पत्रकारितेच्या संदर्भात कधीही आणि कोणताही व्यभिचार केलेला नाही . पण , ते असो कारण सध्याच्या पत्रकारितेतली तडजोड आणि व्यभिचार हा कांही आपल्या या प्रतिपादनाचा विषय नाही . कोरोनाचं जे अदभूतपूर्व जे संकट उभं राहिलं आहे त्यामुळे ही जी  ‘प्रेरणेचा प्रवास’ नावाची मालिका सुरु करण्यात आलेली आहे , तो आपला मुख्य विषय आहे.

प्रत्येक आपत्ती , प्रत्येक संकट ही एक संधी असते . आपण त्याकडे कसे बघतो हे महत्त्वाचं आहे . संकट आलं म्हणून निराश व्हायचं , असं जर असतं तर तेव्हाच मी कुठेतरी सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये नोकरी करत करत निवृत्त झालो असतो . नोकरी करतांना प्रशासकीय व्यवस्थेला शरण जाऊन चिरीमिरी घेतली असती . कुठेतरी एखाद्या तालुक्याच्या गावी एखादं छोटसं घर बांधलं असत . मातृछाया , पितृछाया असं नाव देऊन एक मध्यमवर्गीय कौटुंबिक आयुष्य मला जगता आलं असत ;  परंतु मला तसं जगायचं नव्हतं , हे आधीच ठरवलेलं होतं .  हे असं ठरवलं आणि हे का करु शकलो या संदर्भात दोन-तीन ठळक मुद्दे तुम्हाला सांगतो . परिस्थितीला एकदा आपण शरण  गेलो  की आपल्यातली ती उमेद हरवून जाते आणि ती उमेद कुणीच कधीच हरवायची नसते . माझी एक धारणा आहे की , आपण स्वत:च स्वत:ला घडवायचं    असतं . आपल्याला इतर कुणी घडवत नसतं  . आपल्या प्रेरणा आपणच  शोधायच्या असतात . मग प्रेरणा ती देणारी माणसं असतील की , पुस्तकं , काही प्रसंग , काही गावं असतील , हे सर्व आपल्याला शोधायचं असतं आणि हे शोधून त्यातून आपण      शिकत-शिकत पुढे जायचं असतं . शिकण्याची ही प्रक्रिया अव्याहत असते . मी जसा वाचत होतो , लिहित होतो तसाच मला माणसांना भेटण्याचा खूप नाद होता . सक्रिय पत्रकारितेत असताना मी किमान दोन-चार तरी नवीन माणसांना भेटत असे . त्यांच्याशी सुसंवाद साधत असे . आलेल्या अनोळखी किंवा आगंतुक अशा व्हिजिटर्संना मी कधीही हाकलून दिलं नाही . आपला समोरच्याकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो सकारात्मक ठेवून त्याचं काय म्हणणं आहे हे आपण ऐकलं पाहिजे , हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो आणि याच्यातून आपली घडण्याची प्रक्रिया सतत सुरु असते .

प्रेरणा जशा शोधायच्या असतात तसंच आपल्याला संधीसुद्धा वाट बघत बसणं यावर माझा विश्वास नाही . अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की , ‘लोकसत्ता‘चा साधा रिपोर्टर होण्याचं कधी माझं स्वप्न नव्हतं . ‘लोकसत्ता’चा नागपूरचा प्रतिनिधी म्हणून मंगलच्या म्हणजे मी माझ्या पत्नीच्या नावाने काम करत असे . तेव्हा मी नागपूरच्या एका दैनिकामध्ये वार्ताहर म्हणून रीतसर नोकरी करत होतो . पुढे संधी मिळाली . ‘लोकसत्ता’नं स्वत:हून बोलावून घेतलं . ही संधी मिळत आहे असं म्हटल्याच्यानंतर घाबरलो नाही . माधव गडकरींनी राजकीय वृत्त संकलनाच्या क्षेत्रात ढकललं तेव्हा राजकारणाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन  फारसा चांगला नव्हता . ज्या अर्थी आपले सीनिअर सांगतात , गडकरी साहेब सांगताहेत तर राजकारणात जाऊन बघू तर माणसं कशी आहेत, काय आहेत म्हणून मी ती संधी उचलली .  त्या संधीकडे एक सोनं म्हणून बघितलं . संधी आपल्याला मिळेल असे म्हणून जे लोक वाट बघत बसतील ते तिथेच राहतील .  ‘लोकसत्ता’मध्येमला पूर्णवेळ कामाची संधी मिळाली आणि पुढे वरची पदं आपोआप चालत आली . तुमचं नाणं जर एकदम खणखणीत असेल तर तुम्हाला कुणाच्या शिफारशीची वशिल्याची वगैरे गरज भासते , असं मला कधीच वाटत नाही ‘ तो माझा अनुभवही नाही . लोकसत्ता काय किंवा लोकमत वृत्तपत्र समूह काय , मी कधीही नोकरीसाठी अर्ज केलेला नाही . तत्पूर्वीच्या ज्या वृत्तपत्रामध्ये काम केलं त्या नागपूर पत्रिका असेल किंवा दैनिक सागर असेल वगैरे  ,कधीही कुठल्याही वृत्तपत्रामध्ये नोकरीसाठी अर्ज केलेला नाही , याचं कारण माझं नाणं . सुरुवातीपासून जे श्रम घेत होतो त्याच्यामुळे माझं नाणं खणखणीतपणे वाजायला सुरुवात झालेली होती . खणखणीत नाणं वाजण्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे माझी कामावर प्रचंड निष्ठा होती , अव्यभिचारी निष्ठा होती .  मी सतत वाचत होतो , सतत स्वत:ला अपडेट ठेवत होतो , सतत लिहित होतो आणि लिहितांना माझा आविर्भाव मी काही अक्षर साहित्य किंवा काहीतरी क्रांतीकारी साहित्य निर्माण्  करतोय किंवा माझ्या लेखनानं , त्या बातम्यांनी समाजामध्ये फार मोठा बदल घडणार , असे भ्रम मी कधीच बाळगलेले नव्हते . आपलं लेखन शुद्ध असावं , चांगलं असावं ,  छान असावं , सोपं असावं आणि आपल्याला जे काही सांगायचं आहे समोरच्या माणसांना नीट समजावं , त्यांच्या मनाला भिडावं एवढा प्रामाणिक दृष्टीकोण त्यामागे होता .

प्रश्न  काय आहे की , आपल्याला स्वत:च्या संदर्भात असलेले गैरसमज आधी दूर करायला पाहिजे आणि ते आपण करत नाही . आपण थोडसं लिहायला लागलो की , स्वत:ला ज्ञानेश्वर , तुकारामांच्या तोडीचे साहित्यिक समजतो . चार-पाच-सात बायलाइन आल्या की आपण स्वत:ला खुशवंतसिंग किंवा कुलदीप नय्यर किंवा माधव गडकरी किंवा कुमार केतकर यांच्या तोडीचे पत्रकार समजायला लागतो . आपल्या पत्रकारितेतल्या लेखनामध्ये थोडीशी ललित शैली आली किंवा तुकाराम  ज्ञानेश्वरीतले संदर्भ यायला लागले तर आपण स्वत:ला अनंतराव भालेराव , गोविंदराव तळवळकर समजायला लागतो . एक लक्षात घ्या की , आपलं लेखन हे अक्षर साहित्य नाहीये , ही माझी सुरुवातीपासूनची भूमिका होती . आपण जे काही ज्या भूमीमध्ये राहून लिहितो त्या भूमीमध्ये तुकाराम-ज्ञानेश्वरांसारखे मोठे साहित्यिक होऊन गेले , फुले-आंबेडकर होऊन गेले . त्यांच्या लेखनाने क्रांती घडली . त्यांच्या तुलनेत आपलं लेखन काय आहे ? हं , एक गोष्ट मात्र खरी की , सातत्याने लिहिता राहिलो . त्याच्यामागे सुद्धा माझी एक विशिष्ट दृष्टी अशी  होती की , लेखन हा एक रियाज आहे . एखादा राग एखादा गायक ज्या पद्धतीने सतत रियाज करुन बांधतो आणि जेव्हा सादर करतो तेव्हा तो अत्यंत श्रवणीय असतो , अत्यंत मधुर असतो . त्याच्या गायनाने आपण लुब्ध होतो त्याच्यासमोर  नतमस्तक होतो . मी या भावनेनं सतत लिहिण्याचा रियाज करत होतो   की , आपलं लेखन फक्त लोकांना पटावं , त्यांच्या मनाला भिडावं .

आपला दुसरा एक गैरसमज असा आहे की , आपल्याला जे काही लिहिता येतं ते अंतिम आहे , तसं नाहीये . आपल्याला लिहिता येणारी भाषा ही कधीच अंतिम नसते . विद्यमान परिस्थितीत तर बहुसंख्य पत्रकार आणि लेखक यांचे भाषा विषयक अतिशय मोठे गैरसमज आहेत . काहीतरी दोन-चार-पाच अक्षरं जुळवले की ,  शब्द झाला . असे  शब्दांचे पुंजके म्हणजे लेखन असतं , साहित्य असतं ,असा काहीसा गैरसमज बहुसंख्य लेखक आणि पत्रकारांचा झालेला असल्यालचं दिसून येतं .  पण , तसं नसतं . भाषा ही एक संस्कृती असते . भाषा आपलं संचित असतं .  भाषेला जीव असतो , भावार्थ असतो . हे पुन्हा त्या गायकाच्या रियाझाशी तिथं जोडल्या जातं . याच्यासाठी वाचत राहाणं , सतत मूलभूत असं वाचत राहाणं , ही प्रक्रिया जेव्हा तुमच्या मनामध्ये जेव्हा सतत सतत सुरु असते .  जेव्हा हे सतत सुरु राहातं तेव्हा लिखाणामध्ये आपल्याला ‘ब-यापैकी लिहिता येतं आहे’ अशी भावना निर्माण करणारं समाधान मिळायला लागतं . विद्यमान विशेषतः  तरुण पिढी आपलं नाण खणखणीत ठेवण्यासाथी भाषेकडे लक्ष द्यायला तयार नाहीत . त्यासाठी ते अविश्रांत धडपड करायला तयार नाहीत . इथे भाषा म्हणजे मूलभूत गोष्टी आहेत त्या म्हणजे तुमच्या प्रोफेशनच्या बाबतीतल्या ज्या असतील त्या मूलभूत बाबी आहेत .

यामध्ये अजून एक दुसरा मुद्दा असा आहे की , आपल्याला प्रश्न  पडायला पाहिजेत . आपलं काय झालयं की , साधारणपणे जागतिकीकरण् झाल्यानंतर खुली अर्थव्यवस्था आपल्या देशामध्ये आल्याच्या नंतर मध्यमवर्गीयांची उत्पन्नाची क्षमता वाढली . त्यांची जीवनशैली बदलली , त्यांचा जगण्याचा स्तर थोडासा उंचावला आणि ते खूपसे आत्ममग्न झाले आणि त्यांनी स्वत:ला प्रश्न विचारणं बंद करुन टाकलेलं आहे , असं माझं मत आहे अर्थात हे सरसकट विधान नाही आहे बहुसंख्यांना लागू आहे . आपण नको त्या गोष्टींच्या जास्त आहारी गेलेलो आहे . मग ते टी.व्ही. असेल किंवा इंटरनेट असेल किंवा जीवनशैलीशी संबंधित अन्य काही शॉपिंग असेल , फॅशन असेल… वगैरे वगैरे . त्याच्याऐवजी आपण वाचनाकडे लक्ष दिलं , आपल्या क्षेत्राशी संबंधित जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न केले , अपडेट मिळवण्याचे प्रयत्न केले असं साधारणपणे घडताना दिसत नाही .

आपल्याला एकदा प्रश्न  पडला की , त्यातून त्या प्रश्नाचं उत्तर  शोधण्याची जिज्ञासा मनामध्ये निर्माण होते आणि ही जिज्ञासा आकलनाच्या कक्षा व्यापक करत असते ,  हे आपण लक्षात घेतलं पाहिजे . जोपर्यंत आपल्या आकलनाच्या कक्षा व्यापक होणार नाहीत तोपर्यंत आपल्या जगण्याच्या पोतडीमध्ये फार काही साठलेलंच नसेल . एकदा आपण आपल्याला पडणा-या प्रश्नांचं उत्तर शोधायला सुरुवात केली की , एका मागून एक,  अशा अनेक गोष्टी आपल्याला समजत राहतात . आपण असं समजतो की , जगण्याच्या या प्रक्रियेमध्ये एक प्रश्न सोडवला की बस्स , सगळं संपलेलं आहे . आपल्याला एकदा नोकरी लागण्याचा एक प्रश्न  निर्माण झाला , त्यासाठी एक रिझयूमे पाठवला आणि एक नोकरीही लागली की  प्रश्न संपला असं आपण मानतो . जगणं आणि करिअर यात दोन्हींमध्ये , प्रत्येक प्रश्नामध्ये आणखी एक प्रश्न दडलेला  असतो .  म्हणजे प्नश्न पडण्याची प्रक्रिया जशी अव्याहत असते तशी त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची प्रक्रिया सुद्धा अव्याहत असते , हे आपण लक्षात घेत नाही .  हे जोपर्यंत आपल्याला लक्षात येणार नाही तोपर्यंत आपल्या जगण्याला एक संपन्नता येणार नाही .

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की , आपल्याला प्रश्न विचारताही आले पाहिजेत .  विशेषत: पत्रकार ,  लेखक ,  कलाकार , कलावंत . पत्रकारांना तर प्रश्न विचारताच आले पाहिजे .  लेखक ,  कलावंत ,  चित्रकार वगैरे वगैरे त्यांच्या अभिव्यक्तीतून , कलेतून काही प्रश्न मांडत असतो . मग ती कविता असेल , कथा  असेल , कांदबरी , समीक्षा , चित्र किंवा संगीत असेल या माध्यमांचा तो प्रश्न मांडण्यासाठी वापर करत असतो . पत्रकार आणि तरुण व विद्यार्थी , विशेषत: पदवी आणि त्याच्या पुढच्या तरुणांच्या मनात प्रश्न विचारण्याची एक ऊर्मी निर्माण झाली पाहिजे . स्वत:ला पडलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं सापडतील असं नसतं . मी अनेक ठिकाणी शिकवायला जातो ; असं लक्षात येतं की , आपलं लेक्चर संपल्यानंतर मुलं प्रश्नच विचारत नाहीत .  म्हणजे आपण जे सांगितलं आहे ते सर्व त्यांना मान्य आहे असा त्यांचा समज झाला आहे का ? समाजामध्ये जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत त्याच्या संदर्भात लोकप्रतिनिधींना , आपल्या शिक्षकांना , एखाद्या लेखकाला , एखाद्या कलावंताला , प्रशासकीय अधिका-याला प्रश्न विचारतो आहे का ?  प्रश्न विचारण्यातून सुद्धा अनेक गोष्टी माहीत होत असतात . थोडक्यात ही जी प्रक्रिया आहे ती आपल्या घडण्याची जी प्रक्रिया आहे .

प्रेरणेचा प्रवास म्हणताना ती प्रक्रिया अशा अनेक मुद्द्यांशी निगडित आहे . हे अनेक मुद्दे लक्षात घेऊन त्या प्रक्रियेमध्ये आपण जोपर्यंत शिरणार नाही , तोपर्यंत आपल्या आकलनाच्या कक्षा व्यापक होणार नाहीत .  तुम्ही पत्रकार असाल , लेखक असाल तर तुमच्या लेखनामध्ये सतत रियाज नाही केला तर नाही तर त्याच्यामध्ये एक सफाई येणार नाही . व्यावसायिक असाल तर तुमच्या व्यवसायामधील नैपुण्य तुम्हाला प्राप्त होणार नाही . थोडक्यात ही जी प्रक्रिया ‘थांबला तो संपला’ अशा पद्धतीची आहे . प्रेरणेचा प्रवास असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती प्रेरणा म्हणजे अविश्रांत धडपड असते , हे लक्षात घेतलं पाहिजे . चौकस बुद्धीनं वावरणं एक रियाज असतो . संधीवर झडप घालायची असते , ती वृत्ती मनात असायला हवी असते . या अशा विविध प्रकारे आपण आपल्या करिअरकडे बघायला सुरुवात करतो तेव्हा तो प्रेरणेचा प्रवास सुरु होतो . प्रत्येकाला चित्रकार रझा व्हायचं नसतं , प्रत्येकालाच गायक म्हणून काही किशोर कुमार व्हायची गरज नसते .  प्रत्येक पत्रकाराला अनंत भालेराव , माधव गडकरी , कुमार केतकर किंवा गोविंदराव तळवळकर व्हायची गरज नसते तरी पण त्याला जे काही आऊटपूट द्यायचं आहे , ते अतिशय प्रामाणिकपणे आणि उत्कृष्ट  देण्याचा प्रयत्न केला पाहिजे .  आपण जे काही दिलं त्यांच्या संदर्भात स्वत:ला समाधानी समजतो , जेव्हा आपण चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करतोय याची भावना निर्माण होते तेथे माणसाच्या प्रेरणा मृत होण्याची सुरुवात होते आणि करिअरचा पुढचा टप्पा गाठू शकत नाही . मला असं नेहमी वाटतं की आपण या सगळयाकडे बघण्याचा दृष्टिकोन वर उल्लेख केलेल्या सर्व निकषावर ठरवला तर ते अधिक चांगलं होऊ शकेल . त्यातून आपल्याला जे काही साध्य करायचं आहे ते आपण ठरवून घेतलं तर ते करण्यासाठी आपण पूर्ण तयारी झोकून देण्याची तयारी जर आपण केली आणि त्याच्यामध्ये कुठलीही लाज-लज्जा शरम बाळगली नाही , तर प्रत्येक तरुणाचं आयुष्यसुद्धा एक प्रेरणेचा प्रवास बनू शकतं . सर्वांना ते यश मिळावं अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो .

(ज्यांना मूळ व्याख्यान ऐकायचे असेल त्यांच्यासाठी यूट्यूबवरील या व्याख्यानाची लिंक  https://youtu.be/u0vfirP0eQI अशी आहे .)

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
   ९८२२० ५५७९९

 

Previous articleसंजय वानखडे: सार्वजनिक जीवनातल्या आदर्शाचा नवीन अध्याय
Next articleडोचुला पास: अप्रतिम निसर्गसौंदयाचा नजराणा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.