डोचुला पास: अप्रतिम निसर्गसौंदयाचा नजराणा

भूतान सहल – भाग २

-राकेश साळुंखे

कागदावर रेखाटल्याप्रमाणे दिसणाऱ्या थिंपू या शहराला अलविदा करून आम्ही पुनाखाच्या दिशेने निघालो . थिंपू ते पुनाखाच्या वाटेवर निसर्गाने मानवाला बहाल केलेला अप्रतिम निसर्गसौंदयाचा नजराणा आहे. तो म्हणजे, ‘डोचुला पास’  अतिशय सुंदर असे हे ठिकाण आहे . समुद्र सपाटी पासून ३१०० मीटर उंचावर असलेली व जगात ज्या काही सुंदर खिंडी ( pass ) आहेत त्यापैकी ही एक खिंड होय . थिंपू पासून ३० किमी अंतरावर असलेल्या या ठिकाणी पोहचायला साधारण पाऊण ते एक तास लागतो . गच्च हिरवाईने नटलेल्या , हिमालयीन पर्वतानी वेढलेला येथील निसर्ग आयुष्यात एकदा तरी अनुभवला पाहिजे .

  हे ठिकाण अतिशय उंचावर असल्याने हिमालयीन थंडगार वाऱ्याने चांगलीच हुडहुडी भरते . येथे हिमालयातील लहरी हवामानाचा अनुभव येतो . एका क्षणात दाट धुके तर दुसऱ्या क्षणी लख्ख प्रकाश. मधेच अचानक पावसाला सुरुवात होते , असा निसर्गाचा खेळ सतत सुरू असतो . येथून आपल्याला हिमालयीन पर्वतरांगांचा ३६० डिग्री अंशातून नजारा बघायला मिळतो . हिवाळ्यात हा परिसर बर्फाने आच्छादलेला असतो . Dochula Pass प्रतिबंधित भाग असल्याने येथे येण्यापूर्वी थिंपूमध्ये परमीट घ्यावे लागते . या ठिकाणी भुतानी सैनिकांच्या स्मरणार्थ (२००३ साली ईशान्य भारतातील अतिरेक्यांना हुसकावून लावताना ते शहीद झाले होते ) १०८ स्मारके बांधली आहेत .त्यांना’ Druk Wangyal Chortens ‘ म्हणतात . या स्मारकाच्या समोरच आकाशात गेल्याप्रमाणे भासणाऱ्या पायऱ्या आहेत . त्या चढून वर गेल्यावर एक सुंदर बौद्ध मंदिर पहायला मिळते . फुललेल्या Rhododendrons ( एक प्रकारचे फुल ) च्या झाडामध्ये फ्रेम केल्याप्रमाणे ते दिसत होते . सोन्याच्या पत्र्याचे आच्छादन असल्याने बहुदा तेथील गार्ड हातात बंदूक घेतलेल्या स्थितीत आपले स्वागत करतो . मंदिराच्या भिंतीवर पारंपरिक तसेच आधुनिक पेंटिंग्ज व कोरीवकाम केले आहे . मंदिरात फोटोग्राफीस मनाई आहे . आत मध्यभागी गुरू रिंपोचे यांचा पुतळा आणि बाजूला आणखी काही पुतळे आहेत .

डोचुला पास स्थानिक तसेच पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन आहे . त्यामुळे तेथे बऱ्यापैकी माणसांची वर्दळ असते . सर्वजण आपल्याला परीने निसर्गाचा आनंद लुटत असतात. येथे अचानक सगळा निसर्ग  दाट धुक्यात हरवून जातो अगदी शेजारचा माणूस दिसत नाही. काही क्षणातच एकदम सगळे लख्ख प्रकाशात न्हाऊन निघते . निसर्गाची ही किमया अनुभवायला एकदा तरी येथे यायला हवं . पुनाखा हे आमचे पुढचे डेस्टिनेशन होते .  पुनाखा हे भूतानच्या जुन्या राजधानीचे ठिकाण आहे . दरीत वसलेले असल्याने तेथील हवा तुलनेने उबदार असते. आमचे हॉटेल नदीकिनारी व लाकडी बांधकाम असलेलं होते . हसतमुख रिसेप्शनिस्टला Hello करून आम्ही रूम गाठली .जाता जाता टेबलालकडे लक्ष गेले तर तेथे भूतानच्या सम्राटाच्या लग्नाचा Album पर्यटकांना बघण्यासाठी ठेवलेला होता . त्यांचे फोटो तर सगळीकडे असतातच , पण इथे Album ही दिसला .

पुनाखा हे १७ व्या शतकातील Dzong साठी ओळखले जाते . जवळजवळ ३०० वर्षांचा इतिहास असलेला , खूप मोठा व खूप जुना असा हा Dzong आहे . Mo chu आणि Pho chu या नद्यांच्या संगमावर हा Dzong बांधलेला आहे . गंमत म्हणजे या दोन नद्यांना नर – मादी ची उपमा दिली आहे . यातील Pho chu ही नर ( male ) तर Mo chu ही मादी ( female ) आहे . एक छोटासा लाकडी पूल ओलांडून Dzong मध्ये जावे लागते . Dzong च्या बाहेर च्या भिंती पांढऱ्याशुभ्र आहेत . Jakeranda नावाच्या जांभळी फुले असलेल्या झाडांनी वेढलेला Dzong खूपच आकर्षक दिसत होता . तेथे Entry fee ५०० रुपये होती . तसेच आतमधे फुल स्लीव्ज असलेला ड्रेस व फुल पॅट आवश्यक आहे . हा Dzong भूतान मधील सर्वात सुंदर, प्रेक्षणीय आहे .Dzong भूतानी वास्तुकलेचा एक उत्तम नमुना असून चांगल्या प्रकारे देखभाल केल्याने सुस्थितीत आहे . आतमध्ये अनेक मंदिरे व प्रार्थना गृह आहेत . आतल्या बाजूला भिंतीवर बुध्दकथा तसेच लोककथा यांची चित्रे पहायला मिळतात . प्रार्थनागृह सोडून इतर ठिकाणी फोटोग्राफीला परवानगी आहे . या Dzong मधे आतापर्यंतच्या सर्व भूतानी राजांचा राज्याभिषेक झालेला आहे ,त्यामुळे या Dzong ला तेथे खूप महत्त्वाचे व आदराचे स्थान आहे . आत्ताच्या राजाचा विवाह सोहळा येथेच झाला आहे . आकाराने खूप मोठा असल्याने आपल्याला खूपच चालावं लागतं .

Pho chu नदीवरील झुलता पूल हे एक आकर्षण आहे . या पुलावर जाण्यासाठी आपले वाहन थोडे लांब थांबवून दोन किमी पायी चालत जावं लागतं. लोखंडी साखळ्यानी बनवलेला हा पूल चांगलाच मजबूत आहे . पुलाची उंची जास्त असल्याने खाली नदीकडे पाहताना गरगरायला होते . माझे सहप्रवासी काहीसे दबकत दबकत एकमेकांना धीर देत चालले होते . मी मात्र मजेत आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य कॅमेरात टिपत चाललो होतो . अचानक पूल जरा जोराने vibrate व्हायला लागला . पाहतो तर पुढून काही छोटी भूतानी मुलं धावत आमच्या दिशेने येत होती . त्यामुळे त्या पुलाचे हेलकावे वाढले होते . माझ्या बरोबरच्यांची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडाली होती . हा पूल विविधरंगी प्रार्थना ध्वजांनी ( Prayer flag ) नी सजलेला होता . या पुलाच्या जवळ एक सुंदर इमारत होती, बाहेरची पाटी भूतानी लिपीत असल्याने कसली इमारत आहे हे लक्षात येईना . सगळे पर्यटक इमारतीपुढे चर्चा करत उभे होते , बघायचे काही रहायला नको असा त्या सर्वांचा विचार चालला होता . तेवढ्यात काही स्थानिक आत गेले. मग मात्र काही भारतीय पर्यटक गेटकडे गेलेच. पण वॉचमन काही त्यांना आत सोडेना . आता माझीही उत्सुकता वाढली . मग मी आमच्या ड्रायव्हरला विचारले, तर त्याने ती स्मशानभूमी असल्याचे सांगितले . स्मशान भूमी ही इतकी सुंदर असते हे मी प्रथमच पहात होतो .

पुनाखापासून जवळच Chimhi Lhakhang नावाचे मंदिर आहे . Fertility Temple म्हणून ते प्रसिद्ध आहे . तेथे जाण्यासाठी प्रथम Sopsakha ला जावं लागतं . आपल्या वाहनाने येथे जाऊन नंतर एक छोटासा ट्रेक करून मंदिर गाठता येते . विस्तीर्ण पसरलेल्या भातशेती मधून चालावे लागते . थंडगार वारे , पायातून वाहणारे छोटे छोटे पाण्याचे प्रवाह , नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली हिरवीगार भात खाचरे आणि यामधून जाणारी पायवाट . हा अनुभव भलताच रोमांचकारी होता . Chimi Lhakhang चे मंदिर तुलनेने लहान आहे . परंतु तिथली शांतता व साधेपणा मनाला भुरळ पाडते . ज्यांना मुलबाळ नाहीत अशी जोडपी या ठिकाणी नवस बोलण्यासाठी येत असतात . हा त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे . पण मला भावला तो इथला निसर्ग. 

क्रमश:- भूतान सहलीचा तिसरा भाग पुढील आठवड्यात

पहिला भाग वाचण्यासाठी क्लिक कराhttps://bit.ly/2FosnGT

Bhutan Trip- Video by Rakesh Salunkhe

(लेखक ‘लोकायत’ प्रकाशनाचे संचालक आहेत)

84849 77899