डॉली, किट्टी और वो… बाईच्या सेक्शुअल डिझायर दाखविणारा चित्रपट

सानिया भालेराव

आपल्याला बदल हवा असतो आणि एका झटक्यात हवा असतो. तोही आपल्याला हवा अगदी तस्साच! कलाकृतींच्या बाबतीत तर हे फार होत असतं. सतत अमुक दाखवत राहातात चित्रपटांमध्ये. असं फार सहजपणे बोलल्या जातं किंवा कोणी काही वेगळ्या धाटणीचं करू पाहत असेल तर त्यामध्ये काय बोगस आहे किंवा हे असं नको दाखवायला वगैरे सुद्धा बोललं जातं. बदल घडतो आहे.. हळूहळू का होईना… निदान वेगळी वाट घेऊ पाहतं आहे कोणीतरी. हे महत्वाचं नाही का? आणि म्हणून अलंक्रीता श्रीवास्तव दिग्दर्शित ‘डॉली, किट्टी और वो चमकते सितारे’ हा चित्रपट महत्वाचा आहे. परवाच हा चित्रपट पाहिला नेटफ्लिक्सवर. खरं तर चित्रपटाचा विषय अत्यंत चांगला असूनही खूप साऱ्या गोष्टी एकमेकांत मिसळण्याच्या नादात मूळ चित्रपटाची काहीशी खिचडी झाली आहे. पण म्हणून चित्रपटाला सरसकट बोगस ठरवता येणार नाही.

या चित्रपटाच्या निमित्ताने एरवी लक्ष दिलं जात नाही तो विषय निदान पडद्यावर आला आणि म्हणून यावर लिहिणं, बोलणं गरजेचं आणि या विषयवार चित्रपट काढण्याबद्दल या बाईचं कौतुक करणं महत्वाचं. चित्रपटाची गोष्ट डॉली आणि किट्टी या चुलत बहिणींची आहे. बाईला सेक्शुअल डिझायर असतात. तिला वाटतं, हे वाटणं नैसर्गिक आहे. हे तिला स्वतःला पटणं.. ही या चित्रपटाची गोष्ट आहे. पण ही गोष्ट सांगताना नको तिथे मुद्दामून बोल्डनेस ऍड करणं किंवा काही अत्यंत क्लिशेड क्लृप्त्या वापरून मुद्दा भडक करण्यासाठी काही प्रसंग घुसवणं, हे जर दिग्दर्शिकेला टाळता आलं असतं तर फार बेहतरीन पिक्चर झाला असता. हे लिहिते आहे कारण खूपदा होतं काय की क्रिटिसाईज करण्याच्या नादात आपण काही चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. चित्रपटाचा हा एक भाग वगळला तर एक स्टोरी म्हणून आणि विषय म्हणून मला हा चित्रपट आवडला.

या चित्रपटातल्या नायिका कन्फ्युज्ड आहेत. त्यांना काय हवं आहे, ते माहित नाहीये. डॉली- कोंकोना सेन शर्मा. गरज नाहीये मला नोकरीची असं म्हणून काम करते ऑफिसमध्ये.. पैसे जोडते आहे एका चांगल्या ठिकाणी घर घेण्यासाठी. मुलगा आहे , नवरा आहे. तिला लागेल ते तिच्या पैशातून तिला घेता येतं आहे. बघायला गेलं तर ठीकच आहे. नवरा- बायको दोघं आहेत एकत्र; पण शरीरातून मनात उतरणं केव्हाचंच बंद झालं आहे. किंवा तसं कधी झालेलं सुद्धा नाहीये. डॉलीला काही फील होत नाही, अशी तिच्या नवऱ्याची तक्रार. औषधं, गोळ्या, मलम.. सगळं करून झालं आहे. पण डॉली थंड. नवरा करतो आहे सहन असं साधारण आपल्याला दिसतं आहे. आणि डॉली… तिचं काय? तिच्यात फॉल्ट आहे, असं तिच्या नवऱ्याने गृहीत धरलं आहे आणि डॉलीने सुद्धा ते कदाचित मान्य केलं आहे, त्याचा गिल्ट तिच्या मनात आहे आणि तो इथून तिथून निघताना आपल्याला दिसतो आहे. तिची बहीण किट्टी… भूमी पेडणेकर.. तिच्या शहरात येते..आपल्या पायावर उभं राहण्यासाठी…  तिचा स्वतःचा एक प्रवास.. लवकर पैसा मिळावा, सहज प्रेम मिळावं.. काहीसा चुकलेला प्रवास.. किट्टीची गोष्टी फार तकलादू वाटते आणि म्हणून त्यावर विशेष लिहिण्यासारखं नाहीये.

या पिक्चरच्या सुरवातीच्या सीनमध्ये किट्टी डॉलीला सांगते की, जिजाजी माझ्याशी लगट करत आहेत. यावर कोंकोनांने जी रिऍक्शन दिली आहे नं.. तो एक शॉट… ती सिच्युएशन… एक स्त्री म्हणून ते पाहतांना जे वाटलं.. ते कै च्या कै लाजवाब. तो एक सिन कायम लक्षात राहील असा आहे. आपला नवरा आपल्याबरोबर खुश नाहीये, म्हणजे आपण त्याला सुखी ठेवू शकत नाही..त्याला असं दुसरीकडे वास घेतांना बघणं, त्याबद्दल अपराधी वाटणं, स्वतःला कोसणं, त्याचा राग येणं पण त्याहून जास्तं स्वतःचा राग येणं, आपल्यात काहीतरी कमी आहे याची जाणीव होणं आणि हे सगळं नाहीच काही असं, तुलाच वाटतंय असं, तुलाच वाटतंय माझ्या नवऱ्याबद्दल आकर्षण. हे सगळं कोंकोनाने एका नजरेत दाखवून दिलं आहे. कमाल काम केलं आहे तिने. हा रोल इतका डिसफंक्शनल होता पण तिने तो तिच्या अभिनयाने फार उत्तम पेलला आहे.

या चित्रपटातल्या बायका फार काळ अपराधी वाटून घेत नाहीत. त्या आपापल्या परीने त्यातून बाहेर येण्याचे मार्ग काढतात . डॉलीच्या आयुष्यात येतो एक पुरुष..तिच्या आतलं आसुसलेपण जागे करतो तो. आपल्याला असं काही वाटू शकतं, हे तिला माहितीच नसतं. माझ्यात दोष आहे हे पक्क असावं कदाचित तिच्या डोक्यात. तिला काही गोष्टी उमजतात. साक्षात्कार वगैरे नसतो तो.. फार साध्या सोप्या गोष्टी. तिच्या आईच निघून जाणं.. तिच्या एका मुलाला मुलीसारखं राहावं असं वाटणं, कदाचित नवऱ्याचं एकाकाकीपण तेही समजतं तिला. आपल्याला काय नको आहे हे समजतं. खूपदा काय नको आहे, हे माहीत असणं पण गजरेचं असतं. कारण प्रत्येक वेळी आपल्याला काय हवंय हे नक्की माहीत नसतं नं. किट्टीची गोष्ट फार टिपिकली संपते आणि या चित्रपटाला ती खाली खेचते पण कोंकोनाची डॉली, किट्टीचा बॉयफ्रेंड हॉटम हॉट विक्रांत मेसी. याचं काम जबरदस्त आहे.

कोल्ड इन बेड… हे जे होतं बाईचं. त्यांनंतर येणारं अपराधीपण.. ते कोणाला वाटायला हवं नक्की? मला काहीही फील होत नाही, असं वाटणाऱ्या तिला की तिला फुलवता न येणाऱ्या त्याला. स्त्रीला खुलवून तिच्याशी संग करणं… ही इतकी साधी गोष्ट नाहीये. तिच्या आत्म्यावर रुंजी घालून, तिला आपलंस करून तिला स्वतःपर्यंत पोहोचवणं, हे प्रत्येक पुरुषाला जमेल असं नाही आणि प्रत्येक स्त्रीलासुद्धा आपल्याला हे हवं आहे, हे माहिती असतंच असं नाही. स्त्रिया आजही स्वतःला सेक्शुअली एक्स्प्लोअर करत नाहीत. लग्नानंतरचे शारीरिक संबंध म्हणजे काम उरकणं असं खूप साऱ्या स्रियांच्या बाबतीत होतं. मुलं होऊन गेली, लग्नाचं लोणचं पडलं तरीही नवरा बायकोमधली सेक्शुअल कम्पॅटिबिलिटी ही अत्यंत महत्वाची गोष्ट दुर्लक्षित राहते. मिळालं नाही, तर बाहेर शोधा ही प्रवृत्ती जशी वाईट तशीच नाही मिळते.. धकवून घ्या, किंवा स्वतःला दोष देत बसा हे सुद्धा वाईटच..

आजचा प्रॉब्लेम हा आहे की बाई म्हणायला मॉडर्न आणि मोकळी आहे. पण ती तशी खरंच आहे का? चौकटीत बसून गप्पा मारणं कदाचित आवडतं आहे तिला.. जी चौकटीबाहेर जाऊ इच्छिते तिला घालून पाडून बोलायचं, स्वतःला जायची इच्छा तर आहे पण चौकट सोडायची नाहीये. मग दिखावा करत बसायचा.. खुश असण्याचा.. जसं डॉली करत असते. ते सोपं असावं कदाचित.. स्वतःला उल्लू बनवणं.. सगळं आलबेल आहे असं भासवणं.. पण ते सोपं नसतं.. आतून खंगत जाते ती.. कोणाकोणाला दिसत नाही. पण ती तुटत जाते. मग हे सगळं अंगवळणी पडतं आणि चक्र सुरु राहतं..

क्वचितच एखादी डॉली या चौकटीतून बाहेर पडू पाहते.. म्हणजे तिला जमणार असतं असं नाही.. कारण वाट लागणार असते बाहेर. सोपं काहीच नसतं. स्वतःच्या मनाचं ऐकायचं ठरवलं नं की जाम वाट लागते आयुष्यात. पण यार अशा डॉली पाहिजेत. मॅड बायका. ज्यांना माहितीच नाहीये आपल्याला काय हवंय. ज्या चाचपडत आहेत. खाच खळगे… झेलतील. जमेल… नाही जमणार.. पण त्यांनी ट्राय केला आहे, बाहेर पडण्याचा.. गट्स आहेत बॉस. तेवढं क्रेडिट दिलं पाहिजे बाकीच्या बायकांनी त्यांना. सगळ्यांना नाही आपल्याला हवं ते करता येत. सगळ्यांमध्ये नसते जिगर.. ज्या बायकांमध्ये आहे, त्यांना शाब्बास असं तर म्हणूच शकतो की आपण. कदाचित त्यांना सितारे गवसतील. गवसणार नाहीही. पण त्यांनी हा प्रवास करण्यासाठी पाऊल उचललं आहे. ते महत्वाचं.. बदलाची सुरवात झालीये. कशीही असू दे. पण झालीये.. तूर्तास यात खुश राहूया.. Cheers to Dolly..Cheers to the Spirit of reaching out to stars..

(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही त्यांची आवड आहे )

[email protected]

Previous articleमाणसाने पृथ्वीपासून सर्वात दूरवर पाठवलेले यान कोणते?
Next articleप्रेमचंद के फटे जूते…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.