या पुलाजवळ उतरून थोडा वेळ तेथील निसर्गाचा आनंद घेण्याची संधी आम्ही सोडली नाही . आमची गाडी पारोच्या दिशेने धावू लागली . आता मात्र हिरवाई सोबत नव्हती. उघडे बोडके डोंगर दिसत होते . एका बाजूला उंच डोंगर शिखर तर दुसऱ्या बाजूला खळखळत वाहणारी स्वच्छ पारो नदी . घाट संपून खाली दरीत उतरल्यावर मात्र पुन्हा परिसर हिरवागार दिसू लागला . पारो हे दरीत वसलेलं , सपाट भागात पसरलेलं शहर आहे . घाट उतरून शहरात येईपर्यंत व नंतर शहरातही पारो नदी आपली साथ सोडत नाही . रेखीव रस्ते, शांतपणे चाललेली वाहने, एकसारख्या रंगरूपाच्या इमारती, एका बाजूला खळाळणारी पारो… सगळेच विलक्षण . भात शेतीसाठी प्रसिद्ध असणारा हा भाग आहे . मे महिना असल्याने भात खाचरे रिकामी दिसत होती . मात्र काही ठिकाणी हिरवे पट्टे लक्ष वेधून घेत होते . पारो मध्ये भूतानचा एकमेव International विमानतळ आहे . १८,००० हजार फूट उंचीवर असलेला, टोकदार पर्वत शिखरांनी वेढलेला व आखूड धावपट्टी असणारा असा हा विमानतळ जगातील सर्वात धोकादायक विमानतळ आहे . काही कुशल पायलट्सनाच इथे विमान उतरविण्याची परवानगी आहे . आपल्याला तो रस्त्यावरूनच दिसतो .
येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी आपल्याला झेपेल, त्या वेगानेच आपण चालावे . कोणाशीही स्पर्धा करू नये . आम्हीही थोडे थांबत,बसत , थोडे फोटो सेशन करत , पाण्याचे घोट घेत , एकमेकांना प्रोत्साहित करत चाललो होतो . तीन चार तासानंतर मात्र चांगलेच दमायला झाले . आता थोडी विश्रांती घेण्यासाठी अक्षरशः बसलोच . त्यावेळी जवळ असलेली सफरचंद सर्वांनी वाटून खाल्ली . रसाळ सफरचंद खाऊन चांगलीच तरतरी वाटू लागली . त्यावेळी सफरचंद ही खूप मधुर , रसाळ असते, हे प्रथमच जाणवले . त्यावेळची ती मधुर फळाची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे . आपल्या शारीरिक क्षमतेची पुरेपुर परीक्षा घेणारा हा ट्रेक आहे . एक मोठा पर्वत चढायचा मग दरीत उतरायचे नंतर पुन्हा दुसरा पर्वत चढायचा . त्याच्या टोकावर दरीकडे तोंड करून ते मंदिर आहे . आम्ही पहिला पर्वत चढल्यावर पुढे जावं की नको या विचारात पडलो होतो . तेवढ्यात मंदिरापर्यंत जाऊन आलेल्या एका मराठी भावाने पुढे जाण्यासाठी आम्हाला दिलेला सल्ला मानून पुढे निघालो . आणखी तासभर चालल्यावर आम्ही इच्छित स्थळी पोहोचलो . मंदिरात खूपच गर्दी होती . स्थानिक भाविक तसेच पर्यटक यांनी परिसर गजबजून गेला होता . खूप दमल्याने अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या . भूतानमध्ये गेल्यापासून प्रथमच घाम आला होता . मधूनच येणारी थंड हवेची झुळूक झालेले श्रम विसरायला लावत होती . मंदिरात वेगवेगळ्या मूर्त्या होत्या. त्यापुढे भाविक नतमस्तक होत होते. कोणी डोळे मिटून जपमाळ ओढत होते . मात्र नेहमी मंदिरात असणारी शांतता इथे नव्हती . पर्यटकांची संख्या जास्त असल्याने त्यांचाच दंगा सुरु होता . या मंदिराच्या वरच्या मजल्यावरून पारो व्हॅलीचे दृश्य फारच अप्रतिम दिसते . येथून खाली पाहिल्यावर आपण किती चाललो, याचा अंदाज येतो . मग मनात आले की ही मॉनेस्ट्री कशी बांधली गेली असेल? किती कष्ट पडले असतील ती बांधताना . ज्यांनी कुणी ती बांधली त्यांना मनोमन हात जोडले . भूतानला गेल्यावर टायगर्स नेस्टला भेट दिलीच पाहिजे .
क्षणभर असं वाटलं की मी भूतान मध्येच फिरतं आहे. खूप खूप छान. अधिकाधिक हुर हूर वाटते जाणून घेण्याची !!!