विस्मरणात गेलेले शिवशाहिर बाबासाहेब देशमुख

-संपत लक्ष्मण मोरे

सायंकाळचे सात वाजलेले आहेत.आम्ही आहोत महाराष्ट्र कर्नाटक सिमाभागातील कानडी खेड्यात.गाव आल्यानंतर गाडीचा वेग कमी केलाय.त्याचवेळी स्पीकरचा  कानावर आवाज आला,

ओम नमो जगदंबे

नमन तुझं अंबे

करून प्रारंभे

डफावर थाप तुणतुण्याला

शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण

गातो बंधूप्रेमाचं गुणगान

पहिले नमन नामांनदाला गुरुमाऊलीला

दुसरे  सुभद्रा मातेला सोनामातेला

पांडुरंगाला ज्ञानेश्वरला,एकनाथाला,रामदासाला

तुकाराम गाडगेबाबाला जी जी

सांगली जिल्हा वाळवे तालुका

मुक्काम मालेवाडीला

शाहिरी साज चढवला

शाहीर देशमुख गातो पोवाड्याला

जी जी

हा बुलंद आवाज ऐकायला येतो.ज्या गावातील बोर्ड कन्नड होते त्याच गावात शाहीर बाबासाहेब देशमुख मराठी भाषेतून कराडजवळच्या तांबवे गावच्या विष्णू बाळा पाटलाची गोष्ट सांगत होते.गावात शांतता होती. लोक घोळक्याने बसलेले आणि शाहीराचा आवाज तापलेला.शाहीर गात होता.बेळगाव निपाणीच्या आसपास हा पोवाडा ऐकला आणि भरून आलं.गाडी मराठी मुलुखाच्या दिशेनं येत होती.आणि गावाच्या बाहेर आल्यावरही तो आवाज कानावर पडत होता.कर्नाटकच ते शिवार आणि गोष्ट चाललीय मराठीत.अगदी वीरश्री संचारावी असा आवाज.

“कोण करेल हा आवाज बंद ?आहे का कोणाची हिंमत? हा पोवाडा बंद करण्याची.”भाषणात बोलावं अस वाक्य सुचलं.सोबतच्या मित्राला सांगितलं.तोही भारावला आणि मग आम्ही सीमाप्रश्नांची चर्चा करत यायला लागलो.पल्ला लांबचा होता,खरंतर आज मुक्काम करायला हवा होता.पण जोडीदार म्हणाला,’संपतराव, मला थांबणं शक्य नाही.’मग आम्ही निघालेलो. वाटेत शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचा पोवाडा ऐकला आणि थकवा निघून गेला.

वाळवा तालुक्यातील मालेवाडी गाव.याच गावचे शाहिर देशमुख.एका गरीब कुटुंबात जन्माला आलेला हा माणूस.कळत झाला आणि सूर आणि स्वराची गोडी लागली,नाद लागला.पण त्या गावात कधीतरी बारीकसारीक भजन ऐकायला मिळायचं.पण या गड्याला मात्र वेगळेच सूर ऐकायला मिळायचे.मग एक दिवस त्याचाच शोध घ्यायला मालेवाडी सोडली.कुठं जायचं माहिती नव्हतं पण कशासाठी जायच हे माहिती होतं…

मजल दरमजल करत गावं धुंडाळली. याचदरम्यान किर्तन ऐकण्याची गोडी लागली.एकपाठी माणूस.अभंग लगेच पाठ व्हायचे.त्या काळातील मोठे कीर्तनकार या तरुणांवर खुश झाले.मग हळूहळू किर्तन शिकले.कीर्तनातून समाजप्रबोधन करायचं हा हेतूने हा तरुण गावोगावी जाऊ लागला.घर सोडलं होतं.आता हे विश्वची माझे घर झाले होते.

लोक म्हणू लागले. आज पश्चिमनाथ बाबांचे किर्तन आहे.सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागातून आलेले हे पश्चिमनाथ बाबा.सांगली जिल्ह्यात कीर्तन सुरू होती. पण वाटलं आपण दूर जावं किर्तन करावीत.लोकांना सांगावं.याचदरम्यान ते कुंडलजवळ असलेल्या रामापूर गावात आले.तिथं महादेव यादव, राजाराम कुंभार,परशुराम माळी या तरुणांचा भजनी मंडळाचा ग्रुप होता.याच गावात राहून महाराष्ट्र किर्तन दौऱ्याचा प्लॅन तयार झाला.पश्चिमनाथ किर्तन सांगायचे आणि या भजनी मंडळांनी साथ द्यायची.अगदी खानदेश,बुलढाणापर्यंत हा दौरा गेला.अगदी आडवळणी खेड्यात सुद्धा किर्तन झाली.

मालेवाडीचा एक तरुण आता कीर्तनकार झाला होता.पश्चिमनाथ बाबा म्हणून लोक ओळखत होते.याचदरम्यान त्यांना त्यांचे गुरू पंढरपूरचे नामानंद बाबांनी सांगितले,”तुझा आवाज खूप ताकदीचा आहे. तू पोवाडे म्हण.तुला उदंड यश मिळेल.’मग कीर्तनाची वाट सोडून पश्चिमनाथ बाबा शाहीर बाबासाहेब देशमुख झाले.पोवाडे गाऊ लागले. तोवर महाराष्ट्रात शाहिरी सुरू होती. पोवाडे गायले जात होते पण त्या पोवाड्याला असा बुलंद आवाज नव्हता.जेव्हा बाबासाहेब देशमुख गायला लागले तेव्हा मात्र महाराष्ट्रात चैतन्य निर्माण झाले. पहाडी आवाजातील पोवाडा ऐकायला गर्दी व्हायला लागली.गावोगावी निमंत्रण यायला लागली.महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा हा हजारो लोकांनी ऐकला. त्यांनी उभा केलेला शिवकाळ लोकांना भावला. लोक शाहिरांच्यावर वेड्यासारखे प्रेम करू लागले.मग लोकांनीच बाबासाहेब देशमुख यांना शिवशाहीर ही पदवी दिली.

शाहिरी साज चढवून या शहिरांची घौडदौड सुरू झाली.छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, आद्यक्रांतिविर उमाजीराजे नाईक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे,क्रांतिसिंह नाना पाटील, या पोवाडयासह वेगवेगळे ऐतिहासिक प्रसंग पावनखिंडीतली लढाई,गड आला पण सिंह गेला असे अनेक पोवाडे बाबासाहेबांनी लिहिले.गायले.गावोगावी त्यांच्या पोवाड्याची कॅसेट गेली.एका ध्येयाने बाहेर पडलेला मालेवाडीचा पोरगा शिवशाहीर -राष्ट्रशाहीर झाला होता.

शाहिरांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ,बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तान्हाजी मालुसरे यांचे पोवाडे गायले.या पोवाड्यातुन त्यांनी शिवकालीन वातावरण उभा केले.महाराष्ट्रातील जनतेला शिवकाळात नेले आणि आपल्या पहाडी आवाजाने इतिहास सांगितला.जेव्हा पोवाड्याची कॅसेट गावात सुरू व्हायची तेव्हा वातावरणात चैतन्य निर्माण होत होते.अंगात वीरश्री  संचारत होती.त्यांचा तो पहाडी आवाज गावाच्या सीमा ओलांडून शिवारात जायचा.प्रत्येकाला तो आवाज साद घालत होता.

अनेक वर्षे या शाहिराने महाराष्ट्राची सेवा केली. पोवाड्याच्या माध्यमातून जनतेचे प्रबोधन केले. असं एकही गाव किंवा शहर राहील नाही जिथं

सांगली जिल्हा वाळवे तालुका,

मुक्कामी मालेवाडीला,

शाहिरी साज चढवला,

शाहीर देशमुख गातो पोवाड्याला

हा आवाज घुमला नाही.पोवाडा आणि बाबासाहेब देशमुख हे समानार्थी शब्द झाले होते.शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना उदंड कीर्ती मिळाली.अनेकांनी त्यांचे कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या जिवंत शैलीने पोहोचवणारा हा शाहीर,लोकांना इतिहास सांगणारा हा शाहिर, देशभक्ती शिकवणारा हा शाहीर. पण शेवटी मात्र खूप उपेक्षा झाली. आजारपण मागे लागले. कौटुंबिक अडचणी निर्माण झाल्या.वय झालं आणि मग शाहिरांच्या शाहिरीला उतरती कळा लागली. बुलंद आवाज क्षीण झाला. शाहिरी थांबली,तो जोश संपला. शाहिरी बंद झाली.पैशासाठी सहकारी सोडून गेले. मग या महाराष्ट्राच्या शाहिराने डफ खाली ठेवला. आपला मुक्काम पंढरपूर वरून गावी हलवला.पुन्हा एकदा हा शाहिर आपल्या गावातील वस्तीवर राहू लागला.आजारी अवस्थेत दिवस काढू लागला.अधून मधून बातम्या येत राहील्या पण बातम्या येऊनही फारसे कोणी फिरकले नाही.उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी माणसं या मावळतीकडे झुकलेल्या शाहीरकडे फिरकली नाहीत.त्याच्यासाठी अनेक पुढारी ताटकळत असायचे पण तेही आता आले नाहीत.सतत किर्तीवलयात असलेला शाहिर एकाकी दिवस काढू लागला.त्यातच एक दिवस शाहिर गेले.तेव्हा सगकीकडे ऑल एडिशनला बातम्या आल्या.शोकसंदेश आले.श्रद्धांजली अर्पण झाली. पुन्हा रहाटगाडग सुरू राहिले. समाज आपापल्या परीने वाट चालु राहिला..

शिवशाहीर बाबासाहेब देशमुख ज्या मालेवाडीचे. त्या गावाला एक दिवस गेलो.वाट विचारत गेलो.जुन्याना हा माणूस माहिती आहे पण नवी पोर मात्र नाव विचारलं की नुसतं तोंडाकडे बघत होती. कच्च्या रस्त्याने त्या वस्तीवर गेलो.त्यांचं घर पाहिलं.एक मोठी खोली.तीच बेडरूम आणि तीच किचनरूम आणि तीच बैठक खोली.एका खोलीचं घर.त्यांच्या मुलाने बऱ्याच आठवणी सांगितल्या. बोलताना तो गहिवरून जात होता.एवढा मोठा शाहिर पण त्याच्या घरावर अवकळा आलेली.”अनेकांनी आश्वासन दिले पण शब्द कोणीही पाळला नाही.”असं ते म्हणाले.

शाहिर देशमुख यांनी पोवाडा बंद केला.त्यांना पक्षाघात झाला.पायाला गँगरीन झालं. उपचारासाठी पैसे गोळा करता करता नाकीनऊ आले.तीन वर्षे ते गावात राहिले पण कोणीही त्यांची दखल घेतली नाही.मी त्यांची उपेक्षा पाहत होतो.सरकार आली आणि गेली पण कोणत्याही सरकारने आमच्या कुटुंबासाठी काहीही केले नाही.आम्हाला एक एकर जमीन आहे. ती चार ठिकाणी आहे. आमचा उदरनिर्वाह त्यावर चालतो.अनेकदा आमच्याकडे खर्चालाही पैसे नसतात.घर फिरले आणि घराचे वासे फिरले.आमच्या बापावर आणि आमच्यावर खूप वाईट वेळ आली.”जयवंत सांगत होते.

घराजवळ शाहिर देशमुखांची समाधी आहे. दर्शन घेतलं.निघून आलो.हेच मालेवाडी गाव शाहिर देशमुखांनी पोवाड्यातून अमर केलं पण या गावात मात्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांची एकही ठळक निशाणी दिसत नव्हती.असं का झालं असेल?परशुराम माळी यांना विचारलं. ते म्हणाले,”निसर्गाचा नियम आहे. पिकत तिथं विकत नाही..”

एवढा मोठा बुलंद आवाजाचा शिवशाहिर बाबासाहेब देशमुख पण बदलत्या काळानुसार विस्मरणात निघाला आहे.खरा शाहीर उपेक्षित असताना नसणारे शाहिर मात्र झोतात आहेत असं का झालं असेल?

आज सकाळी गड आला पण सिंह गेला हा पोवाडा ऐकला आणि या शाहिरांची पुन्हा आठवण झाली..

(लेखक दैनिक ‘सकाळ’ चे बातमीदार आहेत.)

9422742925

Previous articleआजच्या हिंदुस्थानची घडण
Next articleही तर भयकंपाची नांदी…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.