आजच्या हिंदुस्थानची घडण

साभार: साप्ताहिक साधना

-प्रभाकर देवधर

गेली काही वर्षे मला प्रश्न पडत असे- आपल्या देशाची सीमा कोणी ठरवली? केव्हा आणि कशी? हिंदुस्थानच्या इतिहासात चार मोठी साम्राज्ये होती. इसवी सनपूर्व २५० मध्ये मौर्य साम्राज्य होते. त्याचा आकार होता ५० लाख चौरस किलोमीटर. सध्याच्या देशाबाहेरच्या उत्तरेतील मुलखात मौर्य साम्राज्य पसरलेले होते. नंतर आले गुप्त साम्राज्य. त्याचा आकार ३५ लाख चौरस किलोमीटर. पुढे अंदाजे ३०० वर्षे होते मोघल साम्राज्य. त्याचा आकार होता ४० लाख चौरस किलोमीटर. शेवटी अंदाजे ६० वर्षांसाठी आले मराठा साम्राज्य. त्याचा आकार होता २३ लाख चौरस किलोमीटर. पाकिस्तान बाहेर काढल्यावर आजच्या हिंदुस्थानचा आकार आहे ३३ लाख चौरस किलोमीटर. पण या सर्व साम्राज्यांच्या नकाशावरील सीमा जुजबी होत्या, इतिहासकारांनी अंदाजाने ठरवलेल्या!

त्यांचे मोजमाप झाले नव्हते. भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे, अनेक साम्राज्ये या भूमीत विकसित पावली व लयाला गेली. पण मुख्य म्हणजे, या कुठल्याही सम्राटाने आपल्या साम्राज्याला ‘हिंदुस्थानी साम्राज्य’ म्हटले नव्हते. देशातील शेवटचे १५० वर्षे टिकलेले साम्राज्य होते ब्रिटिश साम्राज्य. त्याचा आकार होता ४५ लाख चौरस किलोमीटर. पाकिस्तान बाहेर काढल्यावर हिंदुस्थान उरला ३३ लाख चौरस किलोमीटर. दक्षिण हिंदुस्थान बऱ्याच वेळा डावलला जातो; पण तेथेही विजयनगर, चोला, पांड्य ही मोठी साम्राज्ये होती. पण नकाशा बनवला तो ब्रिटिशांनी. आपला जम बसल्यावर, १७७६ मध्ये शास्त्रीय पद्धतीने हिंदुस्थानचा नकाशा बनवला. ब्रिटिश साम्राज्याच्या सीमा निश्चित केल्या. कुठल्याही हिंदू व मुस्लिम सम्राटाने ते पूर्वी केले नव्हते. देशाची सरहद्द ठरली ती १७७६ मध्ये!

हिंदुस्थानच्या नैसर्गिक सीमा उघड आहेत- आसेतु हिमाचल, दक्षिणेत दक्षिण भारतीय द्वीपकल्प, पश्चिमेकडे हिंदी महासागर आणि पूर्वेकडे बंगालची सामुद्रधुनी. उत्तर सीमेवर हिमालयाच्या रांगा आणि पाकिस्तान. पूर्वेकडे आहेत निसर्गाने मुक्त हस्ताने सजवलेल्या ‘सात बहिणी!’ काँग्रेस सरकारने त्यांच्याकडे ६० वर्षे जवळजवळ दुर्लक्ष केले. सारे व्यवहार ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या ताब्यात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक स्वयंसेवकांनी विना प्रौढी मिरवता ४० वर्षे काम करून तेथील परिस्थिती आमूलाग्र सुधारली. फुटीर भावना निपटून काढली. त्याचा फायदा घेत भाजपने तिथे आपले पाय भक्कम रोवले.

अजूनही इतर प्रांतीयांची मने मात्र त्यांच्याशी जुळली नाहीत. तिकडील तरुण-तरुणींना देशात इतरत्र आपल्यातले मानले जात नाही. त्यांची भूमी देशाला हवी, पण लोकांशी दुरावा. अलग दिसतात म्हणून त्यांना त्रास! सुरुवातीला मुस्लिमांनी साम्राज्य प्रस्थापित केले नाही. १२ व्या ते १५ व्या शतकाच्या १५० वर्षांच्या काळात उत्तरेकडून देशात घुसलेल्या मुसलमानांनी समृद्ध हिंदुस्थानवर हल्ले केले ते केवळ लुटालूट करण्यासाठी, हिंदू देवालये उद्‌ध्वस्त करण्यासाठी आणि हिंदूंचे जबरीने धर्म- परिवर्तन करण्यासाठी. त्यांना हिंदू राजांनी विरोध जरूर केला, पण एकजुटीने नाही. घुसखोरांना हरवल्यानंतर आपल्या उदार सम्राटांनी जणू काही पुन्हा हल्ला करण्यासाठी त्यांना सोडून दिले!

पुढे देशात मोगल स्थायिक झाले. दिल्ली राजधानी करून अनेक शतके सत्ता गाजवली. अकबर बादशहाने समाजात थोडीफार समानता आणली. बिचारा औरंगझेब मात्र सतत युद्धात अडकला. मराठ्यांनी त्याला सळो का पळो करून सोडले. शेवटी महाराष्ट्रातच त्याचा मृत्यू झाला. दु:खाची गोष्ट अशी की, इतर सर्व हिंदुस्थानातील जनतेला मराठे हे मोगलांइतकेच बाहेरचे होते, कारण तेही अनेक वेळा लूटमार करत. बंगालमध्ये तर मराठ्यांना लुटालुटीमुळे लोक घाबरत!

मला वाटते, सारे हिंदुस्थानी लोक आपलेच आहेत, ही भावनाच त्या काळात नसावी. अखंड भारत इंग्रजांमुळे एकत्र आला, नाही तर पूर्वीच्या काळात हिंदुस्थानातील राजे एकमेकांशी सर्रास युद्धे करीत! हिंदुस्थान किंवा त्याची सरहद्द ही सामाजिक जाणीवच नव्हती!

दक्षिण हिंदुस्थानाला एक अतिशय रोमांचकारी इतिहास आहे. आमच्या शाळेत मोगलांचा आणि मराठ्याचा इतिहास सविस्तर होता, पण दक्षिण हिंदुस्थानचा इतिहास अर्ध्या पानात संपे. दक्षिण हिंदुस्थानात बौद्ध धर्माच्या कालावधीत बऱ्याच आश्चर्यकारक घटना घडल्या. चीनला बौद्ध धर्माची ओळख करून दिली ती दक्षिणेतून चीनमध्ये गेलेल्या बोधिधर्माने. आजही त्याला चीनमध्ये देव मानले जाते. पुढे ११ व्या शतकात दम्पा सांगयेने चीनला जाऊन सांस्कृतिक शिक्षण दिले. तो सारा इतिहास रोमांचकारी आहे. चीनवरील माझ्या पुस्तकात त्याविषयी मी सविस्तर लिहिले आहे. आपल्या पाठ्यपुस्तकात मोगलांना जागा आहे, पण त्यांना नाही.

ब्रिटिश साम्राज्याची देशावरील सत्ता अपौचारिकपणे १८५७ च्या युद्धानंतर स्थापित झाली. तोपर्यंत देशावर ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य होते. व्यापारासाठी आलेली कंपनी देश जिंकून गेली! स्वतःच्या राज्यकारभाराच्या सोईसाठी ब्रिटिशांनी हिंदुस्थानात बारमाही रस्ते केले, असंख्य पूल बांधले, धरणे बांधली आणि राज्यकारभाराला आवश्यक अशी ब्राऊनसाहेबांची फौज निर्माण केली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या ब्राऊनसाहेबांची श्रेणी आय.सी.एस. बदलून आय.ए.एस. केली, पण त्यांचे जनतेशी असलेले संबंध जेते-जनता असेच राहिले!

ब्रिटिशांनीसुद्धा हिंदुस्थानला प्रचंड लुटले. आपला उच्च दर्जाच्या कापडाचा धंदा बुडवला आणि ब्रिटनमधील मिलमध्ये बनवलेले कापड प्रस्थापित केले. अतिशय किंमतवान भारतीय बनावटीच्या अगणित वस्तू लुटून नेल्या. अमूल्य कोहिनूर हिरा स्वतःच्या राणीच्या मुकुटावर बसवला. आजही तो परत करण्याची गोष्ट इंग्लंड करत नाही! इंग्रजी भाषा सुरुवातीला मेकॉलेने स्वतःच्या फायद्यासाठी देशात आणली, पण आता २०० वर्षांनंतर हिंदुस्थानी लेखक ती इंग्लंडला शिकवत आहेत! ब्रिटिशांनी १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर अतिशय हुशारीने देशातील छोटीछोटी पण असंख्य राज्ये मांडलिक केली, पण तरीही जिवंत ठेवली; आपल्या साम्राज्यात खालसा केली नाहीत. त्यांनी एकत्र येऊन गडबड करू नये, यासाठी ही हुशार नीती!

एक गोष्ट मात्र निश्चित- ब्रिटिशांनी कारटोग्राफीच्या नियमानुसार हिंदुस्थानचा सखोल नकाशा बनवला. त्याच्या सीमा ठरवल्या. लक्षात घ्या- तोपर्यंत हिंदुस्थानच्या सीमा केव्हाही ठरवल्या गेल्या नव्हत्या! ब्रिटिशांची अडचण होती पूर्वोत्तर भागातील हिंदुस्थान आणि तिबेटमधील सीमा. त्या बर्फाच्छादित प्रदेशात तिबेट व चीनच्या सहकार्याशिवाय ते काम शक्य नव्हते. त्या काळात हेन्री मॅकमहोन हे ब्रिटिश इंडियाचे सेक्रेटरी होते. त्यांनी त्याच्या विचाराने १९१४ मध्ये एक सीमारेषा निश्चित केली. तिबेटची त्याला संमती होती, पण त्रिपक्षीय बैठकीत चीनने त्याला सख्त विरोध केला. हीच ती गाजलेली मॅकमहोन रेषा!

हे झाले त्या वेळी स्वतंत्र हिंदुस्थान आणि स्वतंत्र कम्युनिस्ट चीन हे अस्तित्वातच नव्हते! दोन्ही देश अनुक्रमे १९४७आणि १९४९ मध्ये स्वतंत्र झाल्यावर १९५५ पासून चीन सीमेविषयी पुन्हा सतर्क झाला. चीनचे पंतप्रधान चाऊ एन लाय हिंदुस्थानात १९५२ मध्ये आले. अक्साई चीन चीनमध्ये आणि अरुणाचल प्रदेश हिंदुस्थानात- असा त्यांचा प्रस्ताव होता. नेहरू सरकारने तो साफ नाकारला. पुन्हा एकदा तोच प्रस्ताव १९६१ मध्ये केला गेला, चीनमध्ये माओत्सेतुंग सर्वोसर्वा होता. हिंदुस्थानने विरोध करताच त्याने तो भाग बळाने चीनमध्ये आणण्याचे ठरवले आणि १९६२ मध्ये त्या भागात आपले मोठे सैन्य पाठवले. नेहरू आणि त्यांचे संरक्षणमंत्री कृष्ण मेनन आपल्याच मग्रुरीत होते. युद्ध अपेक्षित असूनही हिमाच्छादित भागात युद्ध करण्याची कोणतीही तयारी करण्याची तसदी त्यांनी घेतलेली नव्हती.

नेहरूंनी त्यांचा पेट असलेल्या जनरल कौलला चीनला मागे हटवण्यासाठी नेमला. बर्फात युद्ध करण्याची कुठलीही तयारी न करता हिंदुस्थानच्या योग्य कपडे नसलेल्या सैनिकांना हेलिकॉप्टरने बर्फाळ भागात या मग्रूर शहाण्याने उतरवले. अपेक्षित तेच घडले. हिंदुस्थानचे १३८३ सैनिक मारले गेले, १०४७ जबर जखमी झाले, १६९६ मिळालेच नाहीत आणि ३९६८सैनिक बंदिवासात गेले. हा १९६२ च्या युद्धाचा लांच्छनापद इतिहास आहे. असे म्हणतात की, त्यामुळे नेहरूंनी हाय खाल्ली आणि त्यातच त्यांचा दु:खद मृत्यू झाला. हिंदुस्थान १९६२ चे सीमायुद्ध आजवर विसरू शकलेला नाही. तो १९६२ चा पराभव ही काँग्रेस सरकारची एक देन आहे.

सीमावादाचे मूळ आहे मॅकमहोन रेषा. चीनने ती कधीही मान्य केलेली नाही. ब्रिटिशांनी निर्माण केलेला हा वाद मिटवण्यासाठी देवघेव करावी लागेल, त्याशिवाय तो कधीही सुटणार नाही. हिंदुस्थान आणि चीनदरम्यान आज कुठलाही दुसरा प्रश्न नाही. अमेरिकेच्या नादी लागून हिंदुस्थानाने चीनशी वैर घेऊ नये. आपल्या सीमा समर्थपणे राखण्याचे काम करण्यास आपली सेना सक्षम आहे. सीमेवरचे झगडे चालू राहणार, पण युद्धाची शक्यता अतिशय कमी आहे. दोघांनाही ते परवडणार नाही, हे दोघेही जाणतात. नाक खुपसणाऱ्या अमेरिकेपासून मात्र आपण सावध राहिले पाहिजे, कारण त्याचे चीनशी होणारे संभाव्य युद्ध त्यांना भारतात खेळण्याची इच्छा आहे.

वल्लभभाई पटेल हे हिंदुस्थानला योग्य वेळी मिळालेले नररत्न होते. ब्रिटिशांनी हिंदुस्थानला विभागून अतिशय हुशारीने स्वातंत्र्य दिले, पण ते साऱ्या ५६५ संस्थानांनाही दिले. असा शेकडो तुकड्यांत विभागलेला हिंदुस्थान स्वतंत्र झाला. वल्लभभाईंनी दूरदर्शीपणाने आणि तत्परतेने साम- दाम-दंड वापरून ही सारी संस्थाने बरखास्त करून एकसंध हिंदुस्थान उभा केला. त्यासाठी आपण त्यांचे कायमचे ऋणी राहिले पाहिजे.

केम्ब्रिजमध्ये १८८० मध्ये बोलताना ब्रिटिशांचे त्या काळचे उच्च अधिकारी सर जॉन स्ट्राचे म्हणाले, ‘‘मूलतः हिंदुस्थानच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, एकसंध हिंदुस्थान अशी चीज कधीच नव्हती. पंजाब, बंगाल, उत्तर-पश्चिम प्रांत आणि मद्रासमधील लोक हिंदुस्थान हा एकसंध देश आहे, हेच मान्य करणार नाहीत! सर्वमान्य अशी एक स्वतंत्र नीती अशा हिंदुस्थानात सफल होणे शक्य नाही. असंख्य जाती, अनेक धर्म आणि विविध भाषा असलेला हा देश देशासाठी एक राजनीती मान्य करणार नाही!’’

हिंदुस्थानचे द्वेष्टे विन्स्टन चर्चिल अधिक हुशार! ते म्हणाले, ‘‘काही थोड्या काळात हिंदुस्थान झपाट्याने मागे पडेल. तिथे लवकरच बेबंदशाही नांदेल.’’ दोन्ही बिचारे त्यांच्या स्वतःच्या भ्रमात होते. ब्रिटिशांना म्हणावे, आता बघा हिंदुस्थान कुठे आणि ब्रिटन कुठे! काही विद्वान मंडळी म्हणाली होती, हिंदुस्थान हा एक ‘अनैसर्गिक’ देश आहे. तो फार काल एकत्र टिकणार नाही. एक प्रकारे हिंदुस्थान एक अनैसर्गिक देश असेल, परंतु आज तिथे ७३ वर्षे मजबूत होत गेलेली सबळ लोकशाही आहे.

जेव्हा देशातील पहिली सार्वजनिक निवडणूक १९५२  मध्ये जाहीर झाली, त्या वेळी देशातील ८५ टक्के मतदार अशिक्षित होते! देशातील जनतेला सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा हक्क आपल्या संविधानाने दिला. अनेक विद्वान म्हणाले, ‘यात देशाला अपयश येणार!’ ते म्हणाले, ‘अहो, युरोपातही बायकांना व अशिक्षितांना मतदानाचा हक्क नाही.’ स्वित्झर्लंडमध्ये १९७४ पर्यंत तो नव्हता! ॲल्डस हक्स्लेने भाकीत केले की- नेहरूंच्या नंतर हिंदुस्थानात लष्करी सत्ता येईल, कारण अतिशय संघटित असलेली सेना ही एकच देशव्यापी संघटना आहे. त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माहीत नसावा. पण ही सारी हुशार मंडळी सपशेल चुकली. आजवर हिंदुस्थानात देशव्यापी सार्वजनिक निवडणुका अनेक झाल्या, निरनिराळ्या पक्षांचे पंतप्रधान झाले.

१९६७ च्या निवडणुकांपूर्वी लंडन टाइम्स मथळ्यात लिहितो, ‘हिंदुस्थानातील कोलमडणारी लोकशाही- आता ब्रिटिशांची मग्रुरी उतरली आहे.’ हिंदुस्थानच्या पूर्वी निर्माण झालेले देश एकधर्मीय होते, एकभाषीय होते किंवा शेजाऱ्याच्या शत्रुत्वातून उभे राहिले होते. त्याविरुद्ध आज हिंदुस्थानात विविध धार्मिकांची प्रचंड संख्या आहे. इथे ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त कॅथॉलिक लोक राहतात. पाकिस्तानपेक्षा जास्त मुसलमान आहेत. या देशात असंख्य भाषा बोलल्या जातात. अनेक लिप्यांत लिहिले जाते. अनेक भाषा, प्रांत, रीती-रिवाज आहेत. परंतु या विविधतेत असलेली एकता हे या देशाचे वैशिष्ट्य आहे.

बहुसंख्य हिंदूंचा हा एकमेव देश आहे. असंख्य गरीब आणि अशिक्षित लोकांची वस्ती असलेला जगात दुसरा देश नाही. भारतीय लोकशाही आदर्श आहे, असे कोणीही म्हणणार नाही; पण इथे सातत्याने विनाविकल्प देशव्यापी सार्वजनिक निवडणुका गेली ७३ वर्षे होत आहेत. असा दुसरा देश नाही. देशातील गरिबी निश्चितपणे हळूहळू कमी होत आहे. शेती उत्पादनात देश स्वयंपूर्ण आहे. देशात राजकीय स्तरावर आणि सरकारी कामात २०१४ पर्यंत प्रचंड भ्रष्टाचार होता. पण नव्या सरकारने नव्या तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून तो बराचसा कमी केला आहे. तरी आजही अनेक राजकीय विरोधी पक्ष एका कुटुंबाशी निगडित आहेत. गरीब-श्रीमंत विरोधाभास खूप मोठा आहे. सामाजिक शांतता आहे. देश संघटित आहे आणि लोकशाही स्थिर आहे. अशा ह्या बहुधर्मी आणि बहुभाषी, जागरूक लोकशाही असणाऱ्या हिंदुस्थानला सांधणारे दुवे कुठले?

प्रथमतः या बहुसंख्य हिंदू असलेल्या या बहुधर्मीय देशाला समुद्र आणि हिमालयाने या भूमीत एकत्र बांधून ठेवलेले आहे. हिंदुस्थानी असल्याचा प्रत्येकाला अभिमान आहे. दुसरे कारण आहे डॉ.आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली अतिशय विचारपूर्वक व सखोलपणे लिहिलेली आणि देशाला धर्मनिरपेक्ष करणारी आपल्या देशाची अपूर्व घटना. तिसरे कारण आहे- हिंदू-मुस्लिम धर्मीयांचे बहुतांशी कलहविरहित एकत्र नांदणे. मुस्लिम धर्मगुरूंनी त्यांच्या समाजाला शिक्षित केले असते तर असलेले ताणही खूप कमी झाले असते. चौथे कारण आहे ब्रिटिशांनी पाया घातलेले देशव्यापी प्रशासन. आयसीएसचे नाव बदलून आय.ए.एस. केले, आणि त्याच पद्धतीची ठेवलेली नोकरशाही आणि देशातील सर्व प्रांतीय समाजाला जोडणारी इंग्रजी भाषा. पाचवे कारण आहे- देशातील सर्वांचे समान असलेले शत्रू : पाकिस्तान आणि चीन. सहावे कारण आहे- भारतीय क्रिकेट आणि सिनेमा.

विविध भाषा असल्या तरी देशातील सांस्कृतिक एकता आपल्याला एकत्र बांधून ठेवते. मला काळजी आहे ती फक्त देशात बखेडे निर्माण करणाऱ्या जातव्यवस्थेची. हे जातींचे भूत मला अस्वस्थ करते. आजही रोजच्या सार्वजनिक जीवनात खोडा घालतात जाती. एके काळी ब्राह्मणांचे वर्चस्व होते, पण आता ब्राह्मणांनी आपले अंग त्यातून बाहेर काढलेले आहे. जाती-जातीत तंटे आजही होतात. आंतरजातीय विवाह आज होतात, पण त्याला आजही विरोधही आहे. धर्म, भाषा, प्रदेश आणि जाती हे आजही अनेक तंटे असण्याचे कारण असते. उच्च आणि कनिष्ठ जातींतील रीती-रिवाजही आज अलग आहेत. शहरातील जातीय सहिष्णुता आता लक्षणीय आहे, पण खेड्यात नाही.

ग्रामीण भागात तेथील समाजावर लक्ष ठेवते पंचायत. राजीव गांधी यांनी १९८९ मध्ये पंचायतराज कायदेशीर केले. बऱ्याच गावांत जातीचे लोक आपल्या जातीतील गुन्ह्यासाठी दंड ठोठावतात किंवा वाळीत टाकतात. आज देशात माणूस कुठल्याही जातीचा असला तरी स्वकर्तृत्वावर मोठा होऊ शकतो. देशवासीय त्याला मान देतात, कौतुक करतात. आपले खेळाडू, लेखक, शिक्षक, डॉक्टर बघा, लोकिहिताला वाहून घेतलेली माणसे बघा. त्यांची जात कोणीही बघत नाही. चांगल्या कामासाठी कुणाचेही कौतुक होते. माध्यमे आज अतिशय विस्तरित झाल्याने अशांना प्रसिद्धी भरपूर मिळते- मान मिळतो. मला वाटते समाज जसा शिक्षित होईल, वाचन करू लागेल तशी जातव्यवस्था कमकुवत होईल. आणखी एखादी पिढी लागेल. सामाजिक माध्यमे झपाट्याने सामाजिक दुरावे कमी करतील.

मुस्लिम समाजामध्येही जाती आहेत आणि उच्च- नीचता आहे. असे भेद त्यांचा धर्म मानत नसला तरी ते आजही प्रखर आहेत. शिया आणि सुन्नी पंथीयांमध्ये त्यांच्यातील धार्मिक फरकामुळे कायमची तेढ आहे. ऐतिहासिक काळात मुस्लिमांनी बाटवलेले हिंदू आपली जात आपल्याबरोबर घेऊन मुसलमान झाले. त्यांची संख्या प्रचंड आहे. त्यांच्यात जातिवाद आहे, तणाव आहे. आजही शरीफ मुसलमान हे अज्लाफ मुसलमानांना कनिष्ठ मानतात.

कुटुंबव्यवस्था आजही पुरुषप्रधान आहे. कुटुंबातील पुरुष- विशेषतः ज्येष्ठ पुरुष व्यक्ती- कुटुंब आपल्या दराऱ्यात ठेवते. कायदा येण्यापूर्वी घरातील संपत्तीत मुलींना वाटा मिळत नसे. स्त्रीशिक्षण सर्व समाजात पसरल्यानंतर आता पुरुषमंडळींचे वर्चस्व जवळजवळ नाहीसे होत आहे. स्त्री-पुरुष समानता हे आज सर्वमान्य होत आहे. शिक्षणात मुली तरुणांच्या खूप पुढे गेल्या आहेत. कुठल्याही परीक्षांचे निकाल बघा. केरळमधील नायर समाज स्त्रीप्रधान आहे, पण आजही केरळच्या बाहेर केरळचे पुरुष आपली सत्ता वापरताना मी पाहिलेले आहे. मुलींना आणि बायकोला आजही आपल्या कुटुंबात कमी महत्त्व दिले जाते. पण काळ झपाट्याने बदलत आहे. सत्तेसाठी जीवघेणी स्पर्धा, पैशाची न संपणारी हाव, गरीब आणि मध्यमवर्गीयांना असलेल्या आर्थिक अडचणी, ठप्प झालेली सांस्कृतिक प्रगती या गोष्टी समाजाच्या मानसिकतेवर अनिष्ट परिणाम करत आहेत. विशेषतः अनेक नवश्रीमंत कुटुंबांना असलेली पैशाची मग्रुरी त्यांच्या सांस्कृतिक अशिक्षितपणाचे लक्षण आहे. हे त्यांच्यासाठी धोकादायक आहे, हे त्यांना उमजत नाही.

काही श्रीमंत आपली श्रीमंती किती संयमाने, सौम्यतेने आणि समजुतीने वापरतात; आपल्या दिलदार वागणुकीने आकर्षित करतात, हे या नवश्रीमंतांनी सुखी व्हायचे असेल तर शिकले पाहिजे. पैशांची हाव एका मर्यादेपलीकडे अनिष्ट ठरते. भ्रष्टाचार करून श्रीमंत झालेले असंख्य सरकारी नोकरांच्या कुटुंबांकडे पाहा. पैसे मिळवले, पण श्रीमंती पचवायची कशी ते माहिती नाही. त्यांची मुले बिघडतात यात आश्चर्य नाही. आजच्या समाजात वैयक्तिक प्रामाणिकपणा आणि नीतिमत्ता ओसरत चालली आहे, हे निश्चित. साहजिकच मतलबी राजकारणी, नवश्रीमंत, भ्रष्टाचारी सरकारी नोकर यांना अनिष्ट सवयींनी आणि व्यभिचारी वृत्तींनी ग्रासले तर आश्चर्य नको. नशिबाने आजही बहुसंख्य समाज आपली संस्कृती सांभाळत आहे. आदर, दिलदारपणा आणि सहिष्णुता जागृत आहे. वैयक्तिक प्रामाणिकपणा आणि नीतिमत्ता बऱ्याच प्रमाणात समाजात दिसते. लहानपणीचे ते संस्कार आहेत. मला वाटते, या बाबतीत हिंदुस्थान जगाच्या खूप पुढे आहे.

Previous articleकोरोना… साथ कमी होण्याच्या मार्गावर!
Next articleविस्मरणात गेलेले शिवशाहिर बाबासाहेब देशमुख
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here