बाबरी मशीद पाडण्याची घटना घडली त्या काळात प्रस्तुत पत्रकार तेव्हाच्या अत्यंत प्रतिष्ठाप्राप्त आणि तेव्हा मराठीत सर्वाधिक खप असलेल्या ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राचा नागपूर येथील मुख्य वार्ताहर म्हणून कार्यरत होता . हिंदुत्ववादी संघटना आणि राजकीय पक्ष हेही त्याच्या वृत्त संकलनाचं कार्यक्षेत्र होतं . ‘महाराष्ट्र टाइम्स’ या दैनिकाचे नागपूरचे तत्कालीन प्रतिनिधी धनंजय गोडबोले आणि प्रस्तुत पत्रकारानं राम मंदिर उभारणीचे आंदोलन , मंदिर उभारणीची तयारी , कारसेवा आणि कारसेवक यांच्या संदर्भात अनेक बातम्या त्या काळात दिल्या आहेत . बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा प्रस्तुत पत्रकाराचे पत्रकारितेतील एक ज्येष्ठ सहकारी आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’चे प्रतिनिधी प्रताप आसबे तसंच दैनिक ‘पुढारी’चे प्रतिनिधी उदय तानपाठक घटनास्थळी हजर होते . आसबे आणि तानपाठक यांनी अनुभवलेला वृत्तांत आणि सीबीआयला दिलेली साक्ष वाचून जरी तपास झाला असता तरी सीबीआयच्या हाती पुरावा म्हणून बरंच काही लागलं असतं ! धनंजय गोडबोले यानं तर हा कट कसा रचला गेला होता या संदर्भातच लिहिलेलं होतं . बाबरी मशीद पाडली जाण्याच्या संदर्भात पत्रकार जे पाहतात , त्यावर आधारित जे लिहितात , त्याचा इन्कार संबंधित कुणाकडूनही कधीच केला जात नाही , तरी अशा माहितीवर आधारितही ठोस पुरावे शोधण्यात अपयश येतं , यावरुन ही तपास यंत्रणा कुचकामी तरी आहे किंवा कुणाच्या तरी हातचं बाहुलं बनलेली आहे , असा जर निष्कर्ष कुणी काढला तर त्याबद्दल दोष देता येणार नाही .
सीबीआयच्या पुरावे शोधण्याच्या नाकर्तेपणामुळे या देशाच्या सर्व धर्मसमभावाच्या चौकटीलाही तडे जाऊ लागले असल्याचे अशुभ संकेत दिसत आहेत . हा देश एका विशिष्ट धर्माची जहांगीर आहे आणि अन्य धर्मीयांनी त्यांचं बटिक म्हणून राहावं , असं जे या निकालानंतर निर्माण झालेल्या उन्मादात दडलेलं दिसत होतं , ते तर या देशाच्या निकोप सामाजिक स्वास्थ्यासाठी अतिशय घातक आहे .