माझ्या एका इतिहासप्रेमी मित्राला बदामी – हंपी आदी दक्षिणेची ठिकाणे पहायची खूप दिवसांपासून इच्छा होती. डिसेंबर २०१८ ला आम्ही बदामीला जायला निघालो तेव्हा बदामीसोबत पुढे सन्नती, गुलबर्गामार्गे श्रीशैलम करायचे व येताना हंपीमार्गे येऊ असे ठरवले. यापूर्वी एकदा हैदराबादला जोडून श्रीशैलमचे नियोजन केले होते. पण प्रचंड उष्णतेच्या लाटेमुळे हैदराबादेतूनच परत आलो होतो. यावेळी मात्र ठरवल्यानुसार बदामी व सन्नती पाहून रात्री गुलबर्गाला पोहोचलो. सकाळी गुलबर्गा फोर्ट व आशियातील दोन नंबरचा मोठा घुमट पहिला . पुढे ५०० किमी जायचे असल्याने तेथील प्रसिद्ध विहार वेळेअभावी पुढच्या वेळी पाहू असा विचार करून आम्ही मालखेडमार्गे श्रीशैलमला निघालो.
मालखेड म्हणजेच पूर्वीचे मान्यखेट होय . ९ व्या व १० व्या शतकात राष्ट्रकुटांची राजधानी येथे होती . बदामी चालुक्यांच्या नंतर राष्ट्रकूटांचे वर्चस्व दक्षिण भारतात निर्माण झाले होते . दोन – तीन शतके प्रचंड वैभवाची साक्षीदार असेलल्या मालखेडात आता केवळ भग्नावशेष तेवढे शिल्लक आहेत . आताचे मालखेड हे छोटे गाव आहे. गल्ली बोळातून वाट काढत मालखेडच्या किल्ल्यात जावे लागते. प्रवेशद्वारातील बुरुज सुस्थितीत आहे. आत मात्र सर्व भग्न झालेले आहे. पुरातत्व विभाग तेथील काही इमारतींच्या पुनर्बांधणीचे काम करत आहे. सगळीकडे पांढरीच्या मातीचे ढिगारे दिसत होते . किल्ल्याच्या मागील बाजूस कागिनी नदीचे मोठे पात्र दिसते . काही ठिकाणी वीरगळ, सतीशीळा अस्ताव्यस्त पडलेल्या पाहून मन विषण्ण झाले . प्रचंड पराक्रम करून मृत्यूमुखी पडलेल्यांची स्मृतीचिन्हे अशा वाईट अवस्थेत आहेत, हे खरंच दुर्दैव. अशा विरगळी भारतात सर्वत्र आहेत . अपवाद वगळता त्यावर नाव व इतिहास काहीच नाही. पाय निघत नव्हता पण पुढे जाणे भाग होते. मालखेडमध्ये एक प्राचीन जैन मंदिर आहे . अमोघवर्षं याने मालखेडला राजधानी आणली होती . तो जैन अनुयायी होता. त्याने बांधकामाची सुरवात केलेले हे १२०० वर्ष जुने मंदिर आजही सुस्थितीत आहे. या मंदिरात पुरातन मूर्तींबरोबरच खांबावर प्राचीन कथा कोरलेल्या आहेत .आज त्या रंगवलेल्या स्थितीत असल्याने त्यांचा नैसर्गिकपणा हरवला आहे.
मालखेडमधून पुढे निघालो. दुपारचे १२ वाजून गेले होते . अजून चारशे- सव्वाचारशे किमी अंतर जायचे होते. ड्राइविंग मला एकट्यालाच करायचे होते . दहा तासांचा प्रवास होता .पुढे रात्री प्रचंड मोठा घाट व तोही जंगलातून लागणार होता, हे GPS मुळे समजले होते. त्यामुळे वेळ दवडून चालणार नव्हते. तसेच श्रीशैलम व छत्रपती शिवरायांची तेथील भेट याविषयी जाणून घ्यायची खूप उत्सुकता होती .संपूर्ण रस्ता अनोळखी होता.पहिल्यांदाच या भागात जात होतो.रस्ते मोठे होते. पण कुठे चांगला, कुठे खराब अशी रस्त्याची स्थिती होती. वाटेत यादगीरला जेवण उरकले आणि पुढे मार्गस्थ झालो. मेहबूबनगरला पोहोचायला सहा साडेसहा झाले. डिसेंबरमधील संध्याकाळ असल्याने लवकर अंधारून आले होते . इथे मुक्काम करावा की पुढे जावे असा विचार चालू होता.रात्रीच्या वेळी जंगलातला रस्ता चालू आहे की नाही, हे माहीत नव्हते. पण श्रीशैलमची ओढ एवढी होती की जोखीम घेऊन जायचे ठरवले. पुढे रस्त्यात दोन- तीन ठिकाणी आंध्रप्रदेश पोलीस गाड्या चेक करत होते. नंतर मेन फॉरेस्ट चेकपोस्ट लागले.
नोंद करून व फी भरून गाडीत बसणार एवढ्यात तेथील एका शिपायाने गाडीचा नंबर पाहून मराठीत विचारले, ‘सातारचे काय?’ एवढया दूर मराठी ऐकून खूप छान वाटले. त्याला विचारले, रात्री पुढे जाणे सुरक्षित आहे का? तो काही प्रॉब्लेम नाही जावा म्हंटला. मग मात्र आम्ही बिनधास्त झालो . आता दोन तासातच आम्ही पोहोचणार होतो. पण तेव्हा आनंदात पुढच्या थराराची पुसटशीही कल्पना आली नाही . जंगल सुरू झाले . गर्द काळोख , सुनसान रस्ता , गाडीच्या आत ऐकू येणारा रातकिड्यांचा किर्रर्र आवाज हे सर्वच एखाद्या हॉरर चित्रपटातील दृश्य असावे असे वाटत होते . हळू हळू एक एक प्राणी दिसू लागले . मोठया रानडुकरापासून हरीण , लांडगे, अस्वल ,भेकरपर्यंत विविध प्राणी थोड्या थोड्या अंतरावर दिसू लागले. गाडीच्या लाईटमध्ये दूरवर प्रथम डोळे चमकलेले दिसायचे व नंतर प्राणी दिसायचा.शूटिंगसाठी गो प्रो ,वाय आय कॅमेरा सोबत आणला नसल्याचे दुःख मात्र यावेळी जाणवले . मोबाइलला GPS ला लावलेला . कॅमेरात नीट शूटिंग होईना. पुढे कधीतरी हत्तीचा कळप किंवा वाघ दिसतोय का ,याची उत्सुकता तसेच भीतीही होतीच . नल्लमला जंगल हे व्याघ्र अभयारण्य असल्याने वाघ दिसेल ही अपेक्षा होती. पण हत्ती किंवा वाघ प्रत्यक्ष गाडी पुढे आला तर काय होईल, ही भितीही मनात होतीच .
जंगलातून जात असताना क्वचितच एखादे वाहन दिसायचे. गाडीच्या काचा बंद असूनही गाडीत जंगली प्राण्यांचे आवाज ऐकू येत होते . आता मात्र मोठा घाट जवळ आल्याचे GPS वर दिसू लागले . पुढे तीव्र उताराचा व अनेक हेअर पिन बेंड असलेला घाट सुरू झाला. रस्त्याचा काहीच अंदाज नव्हता. GPS मुळे खूप मदत झाली . पुढे पुढे जंगल कमी होवू लागले . तेवढ्यात एका वळणावर खाली खोल दरीमध्ये लाईट दिसले. अचानक एवढे लाईट्स पाहून आश्चर्य वाटले. पण मग लक्षात आले की तो पाताळगंगा हायड्रोइलेक्ट्रीक प्लांट असणार. खोल घाट उतरू लागलो होतो . कृष्णा नदीला या भागात पाताळगंगा का म्हणतात याची प्रचिती येऊ लागली. रस्त्याने गाडी खाली खाली जात होती तेव्हा खरोखरच पाताळात चाललोय असे वाटत होते. कृष्णा नदीचे पाताळगंगा नाव हे खरंच खूप समर्पक वाटत होते . जसजसा प्रोजेक्ट जवळ येऊ लागला तसतशी मानवी हालचाल दिसू लागली.रात्रीच्या अंधारात जंगलातून जात असताना माणसे पाहून खरंच बरं वाटत होतं.
तेथून पुढे घाट चढून श्रीशैलमला रात्री साडे नऊच्या दरम्यान पोहोचलो. थोडी हॉटेलची शोधाशोध केली. रूम बुक करून प्रथम जेवण केले. त्यानंतर रूमवर सामान नेऊन ठेवले आणि मंदिर पाहायला बाहेर पडलो. एक चक्कर मारून आलो . उद्याचा दिवस आम्हाला महत्वाचा होता कारण आम्हाला खूप पहायचे व जाणून घ्यायचे होते. रात्री झोपताना शिवाजी महाराज त्यावेळी या जंगलातून तसेच कृष्णा नदी पार करून श्रीशैलमला कसे आले असतील, याचा विचार करू लागलो . झोप लागणे शक्य नव्हते तरी मध्यरात्र झाली होती व पहाटे लवकर उठायचे होते . त्यामुळे झोपी गेलो .
पहाटे लवकर काकड आरतीच्या आवाजाने जाग आली .पटकन आवरून बाहेर पडलो. श्रीशैलमचे मल्लिकार्जुन मंदिर हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे .पाच एकर क्षेत्रात पसरलेल्या या मंदिर समूहात मल्लिकार्जुन म्हणजे शिव व ब्रह्मरंभा म्हणजे पार्वती यांची प्रमुख मंदिरे आहेत. १२ ज्योतिर्लिंगापैकी एक व १८ शक्तीपीठांपैकी एक असे दोन्हींचे एकत्रित हे स्थान आहे . ज्योतिर्लिंग व शक्तीपीठ एकत्र एका समूहातच असणे हे दुर्मिळ असून भारतातील अशा तीन स्थानांपैकी हे एक स्थान आहे. त्यामुळे त्याला धार्मिक दृष्टीने खूप महत्व आहे. ईसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील सात वाहन राजवटीपासून याचा उल्लेख आढळतो . सात वाहन, ईक्ष्वाकू , चालुक्य, कदंब , पल्लव यांनी या मंदिर उभारणीसाठी व देखभालीसाठी हातभार लावला आहे. विजयनगरच्या पाडावानंतर याचे वैभव कमी झाले होते .त्यानंतर १६७४ मध्ये शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्याच्या वेळी येथे भेट दिली होती . महाराजांनी या मंदिरातील उत्सव पुन्हा चालू केला व उत्तर गोपुरही बांधला. या मंदिरामध्ये सद्यस्थितीत चार गोपुर आहेत. उत्तर गोपुराच्या आत शिवरायांचे स्मारक आहे. मात्र आम्ही गेलो तेव्हा मंदिरातून स्मारकाकडे जाण्याचा रस्ता बंद होता . बाहेरून उत्तर गोपुरमधून आत जाऊन मगच येथे जाता येत होते . मंदिराला वळसा घालून आम्ही या श्रद्धास्थानी गेलो .
मंदिराच्या बाहेरच काही अंतरावर एक नवीन स्मारक बांधलेले आहे. श्रीशैलम हे प्राचीन काळापासून महत्व असलेले ठिकाण असल्याने येथे जुनी व नवी बरीच मंदिरे आहेत. काही सुस्थितीत तर काही मोडकळीस आलेली आहेत. येथे मुक्कामासाठी वेगवेगळ्या प्रकारची भक्तनिवासही आहेत. आंध्रप्रदेश टुरिझमचे ही मोठे हॉटेल आहे. रात्रीच्या नैसर्गिक जंगल सफारीचा थरार अनुभवण्यासाठी या मार्गे गेलेच पाहिजे . मी खूपदा जंगल सफारी केली आहे. परंतु या प्रवासात अनुभवले तसे नैसर्गिक जंगल कधीच अनुभवले नव्हते.