एक चौरस मैल असे या किल्ल्याचे क्षेत्रफळ आहे. किल्ल्याचे बांधकाम गोलाकार आहे. डोंगराच्या चारही बाजूने खोल दरी आहे. गडावर फिरल्यानंतर दगडांमध्ये भुयारासारख्या खोल्या असल्याचे दिसते. खोल्यांमधील भिंती व खांब हे दगडांचेच आहेत. सध्या खोल्यांमध्ये माती व कचरा साचला असल्यामुळे आत जाता येत नाही. उंच डोंगरावरही पाणी उपलब्ध आहे. आम्ही यापूर्वी एप्रिल महिन्याच्या अखेरीस उन्हाळयात किल्ल्यावर गेलो होतो, तेव्हाही तेथे पाणी होते. येथे एक सासू-सुनेचे पाणी म्हणून प्रसिद्ध असलेले एक जलकुंभ आहे. दगडांमध्ये कोरुन हे जलकुंभ बांधण्यात आले आहे. येथे एका कपारीतील पाणी गरम तर दुस-या कपारीतील पाणी थंड असते, असे पायथ्याशी राहणारे आदिवासी सांगतात. आता मात्र, दोन खोल्यांमधील भिंत पडल्यामुळे पाणी थंड आहे. तसेच येथील पाण्याचा एक उपसर्गही आहे. गडावरुन १४ ते १५ किमी असलेल्या मोहिदपूर गावात या गडावरील पााण्याचा आउटलेट आहे. वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी येथे लिंबू टाकले तर मोहिदपूर येथे निघत होते, असे नागरिक सांगतात. सध्याही येथे पाण्यात निळ टाकली तर मोहिदपूर येथे निळे पाणी निघते. डोंगराच्या कडा समोरील बाजूने दगडांनी बांधल्या आहेत. मध्यप्रदेशच्या बाजूने डोंगरावर एक बुरुज आहे. हा बुरुज खालून दिसतो. सर्व बांधकाम हे दगडांमध्येच आहे. याचे बांधकाम दगडांमध्ये असून, शत्रूवर नजर ठेवण्यासाठी छिद्र आहेत. किल्ल्याच्या पायथ्याशी उत्तरेकडून एक अष्टकोनी विहीर व मंदिर आहे.
किल्ल्याचे फार थोडे अवशेष आता शिल्लक आहेत. किल्ल्याचा भाग वनविभागाच्या अखत्यारीत येतो. शासनाने याकडे लक्ष दिले नाही तर ते अवशेषही नष्ट होतील, अशी स्थिती आहे . सातपुडा पर्वतरांगेत असे अनेक किल्ले आहेत, ज्याची माहिती अजूनही कुणाला नाही. कालांतराने ते नामशेष होतील. इ. स. १८०१ च्या सुमारास व-हाडात गाजीखान नावाच्या व्यक्तीने सैन्य जमवून लुटालूट चालविली होती. त्यामुळे व्दितीय रघुजी भोसले यांनी यशवंतराव भवानीशंकर काळू यांना पाच हजार सैन्य देवून पाठविले होते. गाजीखान हा मैलगड किल्ल्यात बसला होता. काळू यांनी या किल्ल्यावर तोफांनी मारा सुरु केला. किल्ल्यावर सैनिकांच्या हल्ल्यानंतर गाजीखानला पराभवाचे लक्षण दिसताच तो लष्करी साहित्य सोडून पळून गेला.
मंगळवारी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मराठवाडा संघटक किशोर वाघ, चिखली येथील इतिहास संशोधक डॉ. शाम देवकर सर,सवडतकर सर आम्ही मैलगड व अशीरगड किल्ला बघायला गेलो.हिरव्यागार पर्वतावर असलेल्या मैलगडवर जाताना मनोहारी निसर्गरम्य वातावरणात फिरण्याचा आनंद मिळाला. मैलगडावरून खाली नजर टाकल्यास सर्वत्र हिरवळ दिसते. हिरवेगार जंगल पाहून डोळ्याचे पारणे फिटले. मैलगडावर मी यापूर्वीही गेलो आहे. मात्र प्रत्येकवेळी एक नवा अनुभव या किल्ल्यावर जाताना येतो. त्यातच सवडतकर सरांनी दिलेली सप्तरूषींची नवीन माहिती मिळाली. सर्वांशी चर्चा करताना अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या.