मेड इन जपान: ‘सोनी’ च्या संस्थापकाची वाचायलाच हवी अशी कहाणी

-माणिक बालाजी मुंढे

‘मेड इन जपान’ वाचताना मी इंडिया हा शब्द शोधत राहीलो. आठवड्याभरात वर्क फ्रॉम होम करत असताना ३४३ पानं संपली पण आपल्या देशाचा उल्लेख मला कुठेही आढळला नाही. पुस्तक अमेरिकन वाचक डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं आहे. पण पुस्तकात चीनवर लिहिलंय, यूरोप आहे, कोरियन आहेत पण आपण कुठेच नाहीत. पुस्तक १९८६ साली प्रकाशित झालंय. हे अकिओ मोरीटा, सोनी कंपनीचे सहसंस्थापक होते. त्यांचं हे आत्मचरित्र आहे. कदाचित १९९१ पर्यंत म्हणजे उदारीकरणाचे दरवाजे जोपर्यंत उघडलेले नव्हते तोपर्यंत आपण कमीत कमी जपानच्या तरी खिसगिणतीत कुठेच नव्हतोत, हे पुस्तक वाचतांना निश्चित लक्षात येतं.

‘मेड इन जपान’ प्रत्येकानं वाचायलाच हवं. मी तर म्हणेन, अशी पुस्तकं आपल्याकडे अभ्यासक्रमात का असू नयेत? मेड इन जपान फक्त मोरिटांची गोष्ट नाही सांगत, दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झाल्यानंतर जपान अक्षरश: राखेतून कसा उभा राहीला त्याचं मूर्तिमंत चित्र हे पुस्तकं उभ करतं. ७ मे १९४६ रोजी २० लोक एका युद्धानं उद्धवस्त झालेल्या इमारतीत जमतात. टोकियो टेलिकम्युनिकेशन इंजनिअरिंग कार्पोरेशन नावाची कंपनी स्थापन करतात. त्यात दोन जण महत्वाचे- ३८ वर्षाचे मसारु इबूका आणि २५ वर्षाचे अकिओ मोरिटा. संस्थापक आणि सहसंस्थापक. पुढे तीच कंपनी सोनी कार्पोरेशन म्हणून जगभर पसरली. एक छोटसं रोपटं वटवृक्ष कसं झालं हे वाचनं झपाटून टाकणारं आहे.

एखादी कंपनी मोठी होते, ती यशस्वी होते तर तिच्या पाठीमागे एक क्रिटीकल विचार असतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक मोकळपणा लागतो. उदारपणे टीका स्वीकारता येण्याचा उमदेपणा हवा. अडचणीतून मार्ग काढता यायला हवा. नोरीओ ओहगाची गोष्ट जबराट आहे. नोरीओ हा संगीताचा विद्यार्थी असतो. तो कॉलेजात असतानाच सोनीच्या म्यूझिक प्रोडक्टसवर अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित करतो. सोनीच्या इंजिनिअर्सना भंडाऊन सोडतो. शेवटी नोरीओला घेऊन मंडळी कंपनीत येतात. तिथं आल्यानंतर तो मोरीटाशी वाद घालत असतो. तो विद्यार्थी असूनही आपण सोनीच्या कंपनीच्या मालकाशी वाद घालतोय याचीही तो फिकीर करत नाही. मोरीटा त्याला सोनी जॉईन करायला सांगतात. तो ती ऑफर धूडकावतो. नंतर तो पुढच्या संगीत शिक्षणासाठी जर्मनीला जातो. मोरीटा त्याला तिकडच्या इलेक्ट्रॉनिक्सबद्दल लिहायला सांगतात. हा प्रसंग आहे १९४७ चा. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावर्षीचा. तो ते करतो.

दरम्यान दशकभराचा काळ निघून जातो. मोरीटा सोनीचे म्युझिक प्रोडक्ट आणि त्याबद्दलचं नोरीओचं मत कंपनी आवर्जून घेत रहाते. नोरीओ संगीताचं शिक्षण घेऊन जपानला परततो. लग्न करतो. लवकरच मोठा संगीतकार म्हणून त्याची ख्याती होते . त्याचे कॉन्सर्ट होत रहातात. मोरीटा त्याला घेऊन युरोपाच्या टूरवर जातात. कारण त्यांना तो ‘सोनी’ त हवाच असतो. त्याच्यासोबत अनेक विषयावर चर्चा होते.  शेवटी  अमेरिकेच्या टूरमध्ये मोरीटा त्याला सोनीसाठी व्यवस्थापक म्हणून रूजू होण्याची  ऑफर देतात. तो ती तेव्हाही उडवून लावतो. म्हणतो,  सोनी ही इंजनिअर्स लोकांची कंपनी आहे आणि खूप जुनाट पद्धतीनं तिचं कामकाज चालते.

नंतर दोघेही जपानला परत येतात. मोरीटांनी आता नोरीओला ‘सोनी त आणण्यासाठी चंगच बांधलेला असतो. ते त्याच्या बायकोला भेटतात आणि नोरीओची ऑफर सांगतात. पण तरीही नोरीओ काही मानायला तयार नसतोच. विशेष म्हणजे बायको नोरीओच्याच बाजूनं असते. मात्र काही दिवसानंतर मोरीटांच्या प्रयत्नाला यश येते.

नोरीओ ‘सोनी’ त जॉईन होतो. पद असतं-जनरल मॅनेजर प्रोफेशनल प्रोडक्टस. अवघ्या दीड वर्षात त्याच्याकडे टेप रेकॉर्डरच्या सगळ्या ऑपरेशनची जबाबदारी येते. त्यानंतर अवघ्या पाच वर्षात तो सोनीचा बोर्ड मेंबर होतो. तेव्हा त्याचं वयं असतं केवळ 35. त्यानंतर तो जापनीज कंपन्यांमध्ये सहसा न घेतले जाणारे निर्णय घेण्यास सुरुवात . कंपनीला त्याचा फायदा होतो.

नोरीओची गोष्ट एक उदाहरण आहे. एक टीका करणारा कॉलेजवयीन मुलगा ते कंपनीचा बोर्ड मेंबर. मला नोरीओपेक्षाही त्याला ग्रुम करणारा, त्याच्यावर विश्वास टाकणारा, त्याची टीका सकारात्मक घेणारा मोरीटा मोठा वाटला. फरफेक्ट लीडर. सोनी मोठी झाली ते कदाचित अशा लहान लहान प्रसंगातून. असे किती तरी प्रसंग मेड इन जपानमध्ये आहेत. मी सुरुवातीलाच म्हटलंय मेड इन जपान हा एक दीर्घ अनुभव आहे आणि वाचणाऱ्याला तो नवी दृष्टी देऊन जातो. डोकं, मेंदू स्कॅन करतो.

पुस्तक ऑनलाईनही विक्रीसाठी आहे. पण महाग आहे. जिथं कुठं फुटपाथवर पुस्तकं विक्रीला असतात. तिथंही सेकंडहँड पण ओरिजनल कॉपी सहज मिळेल. माझ्याकडची कॉपीही तशीच आहे. हा पर्याय अधिक चांगला.

(तुम्ही जर एखादं पुस्तक लिहिलं असेल तर मला पाठवा, त्यावर लिहायला मला नक्की आवडेल. कथा, कादंबरी, वैचारीक, ललित, शैक्षणिक काहीही चालेल.)

-(लेखक ‘टीव्ही ९  मराठी’ चे कार्यकारी संपादक आहेत.)

9833926704

माझा पत्ता-
माणिक बालाजी मुंढे,
भूमीसागर सोसायटी, बी विंग,
फ्लॅट नंबर-305, प्लॉट नंबर- 112, 113,
सेक्टर-22, कामोठे, नवी मुंबई )

Previous articleअकलेचे फटाके वाजवलेत ना?आता जनतेचे फटके अनुभवा!
Next articleपाणबुडीमध्ये लढाऊ विमाने
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

  1. मेड इन जापान वाचून छान वाटले…अशी प्रेरणादायी पुस्तकं उपलब्ध व्हायला हवीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here