अकलेचे फटाके वाजवलेत ना?आता जनतेचे फटके अनुभवा!

■  ज्ञानेश महाराव

     ———————–

‘शिवसेना’च्या स्थापनेपासूनच मुंबईतला शिवाजी पार्कवरील ‘दसरा मेळावा’ गाजत-वाजत असतो. त्याला सुवर्ण महोत्सवी परंपरा आहे. यंदाच्या मेळाव्यात ‘शिवसेना पक्ष अध्यक्ष’ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून प्रथमच उपस्थित राहणार असल्याने त्याला विशेष महत्त्व आहेच. यंदाचा मेळावा ‘सोशल मीडिया’च्याद्वारे होत आहे. त्यात ते आपली भूमिका मांडतील, सरकारची बाजू सांगतील. परंतु, आज  ‘शिवसेनाप्रमुख’ बाळासाहेब ठाकरे असते तर, त्यांनी महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणाचा  जमाखर्च कसा मांडला असता? राज्यातील जनतेला ‘कोरोना’ संकटाविरोधात लढण्याची हिंमत कशी दिली असती? ‘महाआघाडी सरकार’चे समर्थन कसे केले असते? या प्रश्नांची उत्तरं  देणारं काल्पनिक; तरीही वर्तमानाला भिडणारं हे ‘ठाकरे शैली’तील खास भाषण!

————————————

      जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो- माता- भगिनींनो…  (बराच वेळ टाळ्या )… येहे… ! अजून कडक आवाज हवा! तुमच्या टाळ्यांच्या आवाजाने मलबार हिलवरचे धोतर फडफडले पाहिजे! (प्रचंड टाळ्या…गर्दीतून ‘कोश्या’ ‘कोश्या’ असा आवाज ) हां… असा  कडकडाट हवा… ओ कॅमेरावाले, तुमच्या लेन्स तिकडे वळवा ! कडकडाट करणारे हात ‘ओरिजनल’च आहेत, हे दाखवा जरा! हे काही बिन गर्दीचे ‘आयपीएल’ नाही. हा ‘शिवसेने’चा दसरा मेळावा आहे आणि ही टाळ्यांची सलामी आहे. ( पुन्हा टाळ्या )

     हे जे टाळ्यांचा कडकडाट करणारे हात आहेत ना…त्यांच्या मागची जी मनगटं आणि खांदे आहेत ना… तोच या शिवरायांच्या भूमीचा आणि देशाचा आधार आहे! (टाळ्या)…तुमच्या या शक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे. तुमच्यात आणि माझ्यात जे विश्वासाचे नाते आहे, त्यामुळेच पन्नास वर्षे उलटून गेली तरी आपण भेटतोय! पिढ्यानपिढ्या भेटत राहू ! (टाळ्या)

    गेल्या वर्षीचा दसरा आणि या वर्षीचा दसरा, यात बराच फरक आहे. गेल्या वर्षी तुम्ही एकमेकाला खेटून बसला होता. या वर्षी काय ते…. ‘सोशल डिस्टन्स’ ! एकमेकांपासून (अमिताभ बच्चनच्या आवाजात) छह  गज की दूरी ! (टाळ्या)… परिस्थितीच अशी आलीय की, आपल्याला हे अंतर पाळावेच लागत आहे. कारण ही महामारी आहेच अशी ! संपर्कामुळे पसरते! तुम्ही-आम्ही हे शारीरिक अंतर पाळत असलो तरी, एकमेकांमधला जिव्हाळा आणि प्रेमाचे अंतर मात्र वाढू द्यायचे नाही! महामारी येईल आणि जाईल, माणुसकी टिकली पाहिजे!

    नवे रोग येतात, तसे नवे शब्दही येतात. काय तर म्हणे ‘चायनीज ताप’, ‘कोविड’, ‘कोरोना’, ‘पॉझिटिव्ह- निगेटिव्ह’ ! सध्या जाईल तिकडे हे शब्द ऐकायला मिळतात. मुंबई- ठाण्यात तर या महामारीने धुमाकूळ घातला होता. हे संकट विमानाने आले होते. मुंबईत सर्वात जास्त विमानं उतरली. त्यामुळेच या ‘कोरोना’ महामारीने मुंबईत मुक्काम ठोकला. या ‘कोरोना’विरुद्ध तुम्ही सगळे जोरदार लढलात. लढाईच ती! (मागे वळून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहत -) या लढाईत मुख्यमंत्रीपदाची सूत्रे उद्धवकडे होती. त्याला राज्यातल्या जनतेची काळजी आणि मला बाप म्हणून त्याची काळजी ! पण त्याला  सगळ्यांनी साथ दिली, म्हणूनच ही लढाई आपण समर्थपणे लढत आहोत; लढणार आहोत आणि जिंकणारही आहोत ! (प्रचंड टाळ्या) आज तुम्ही या शिवतीर्थापासून सुरक्षित अंतरावर बसलाय. पुढच्या विजयादशमीला आपण प्रचंड गर्दीत शिवतीर्थावर भेटणार आहोत! (टाळ्या)

      तसे आपण गेल्या वर्षीही भेटलो होतो. विधानसभा निवडणुकीचा माहोल होता तेव्हा! यावेळी फक्त ‘कोरोना’मुळेच नाही ;  तर एकूणच गेल्या वेळची विजयादशमी आणि या वर्षीची विजयादशमी, यात बराच फरक आहे. गेल्या वर्षी आपण ‘मास्क’ न लावता एकमेकांशी बोललो. यावर्षी सगळ्यांच्या तोंडाला ‘मास्क’ आहे. पण बोलायला थोडीच मनाई आहे? त्यात आज जरा खुलासेवार बोललेच पाहिजे, असं भरपूर काही आहे. मघाशी मी तुम्हाला म्हणत होतो, वर्षभरात खूप काही घडलं! एक तर ही महामारी आली. पण खरी महामारी त्या आधीच आपल्याकडे आली होती. उद्धवने त्या महामारीतून ‘शिवसेना’ आणि शिवरायांचा महाराष्ट्र वाचविला! (टाळ्या)  राजकीय महामारीपासून महाराष्ट्र वाचविला गेला, हे उद्याच्या इतिहासात भगव्या अक्षरांनी लिहून ठेवले जाणार आहे! ( प्रचंड टाळ्या )

    च्या मायला! एकेकाळी लुगड्याला महाग असणारी ही कमळाबाई! (हंशा)  आम्हाला आहेर, पोशाख करायला निघाली होती ! आता अशी ढुंगणावर आपटलीय की (प्रचंड हंशा, शिट्ट्या) काय म्हणून सांगू! काय करणार ?  इलाज नव्हता ! कमळाबाईनं सत्तेसाठी जे जे म्हणून निसरडं करून ठेवलंय, त्यावरून तुम्ही असेच घसरून पडणार होता ! मला हे आमच्या संजय आणि इतर मंडळींनी सगळं तपशीलवार सांगितलं ! कमळाबाईचा उद्योग आणि त्यांचे ते कोण….? कडमडणीस की फडफडणीस… (पब्लिकमधून आवाज…. ‘टरबूज…टरबूज’ ) अरे, कशाला त्या टरबुजाचे नाव बदनाम करता? (टाळ्या) एवढे ते कडू नसते!(हंशा)

     तर मी सांगत होतो, कमळाबाई आणि फडफडणीस यांचे उद्योग! युती असताना ते मधून मधून ‘शत-प्रतिशत’ असे काहीतरी रेकायचे! चिरकायचे!! ती जुनीच खोड. आम्ही ती मोडायचो. त्यासाठी कधीतरी ‘सामना’तून  झोपडायचो. तेव्हा कुठे ते गप्प व्हायचे. पण ‘शत-प्रतिशत’ची त्यांची तडफड कधी थांबली नसावी.

     आम्हाला वाटले होते, गुजरातचे  नरेंद्रभाई प्रधानमंत्री झाल्यावर असं काही होणार नाही. ‘भारतीय जनता पक्षा’चा सर्वात जुना मित्र असणाऱ्या ‘शिवसेने’शी दगाफटका होणार नाही. पण २०१४ नंतर घात झाला! ‘शिवसेने’शी विश्वासघात झाला!! अहो, कधी नव्हे ते २०१४ च्या लोकसभा निवडणुकांत महाराष्ट्रात ‘शिवसेना-भाजप’ युतीचे ४२ खासदार निवडून आले आणि कमळाबाईच्या मनात अमावास्या आली.

    विधानसभेच्या निवडणुकीत काहीही कारण नसताना २५ वर्षांची जुनी मैत्री-युती मोडण्याचे पाप यांनी केले. कोरोना-बिरोना काय घेऊन बसला. खरी महामारी २०१४ सालीच आली!… ही युती मोडण्यासाठी पुढे कोणाला केले, तर जळगावच्या बिचाऱ्या खडसेला ! तोही काय करणार ?  तो बिचारा हुकुमाचा ताबेदार ! त्याला तरी काय माहिती ही ‘पार्टी यूज अँड थ्रो वाली’ आहे ती ! (हशा)… सांगायचा मुद्दा, २०१४  साली कमळाबाई विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढली आणि बहुमताच्या आत धपकन पडली! मग त्या नरेंद्रभाईंचे कोण ते लाडके आणि अमितभाईंचे दोडके (हंशा)…. फडफडणीस मुख्यमंत्री झाले ! काही दिवस गेले…त्यांना नाही (प्रचंड हंशा)… सत्तेला! आणि कोल्ह्याला कशी द्राक्ष आंबट वाटतात, तसे हे पाठिंब्यासाठी ‘मातोश्री’च्या दारात आले!…  उद्धवने, ही कमळाबाईची *महामारी जवळ घेतली. कारण  ‘व्हायरस’ जवळ घेतल्याशिवाय त्याच्यावर इलाज शोधता येत नाही ना!* (प्रचंड टाळ्या) उद्धवने पाच वर्षे कमळाबाईच्या या ‘व्हायरस’चा अभ्यास केला. ‘व्हायरस’ उलटा केला. पालटा केला. जरा जड होता. (हंशा आणि टाळ्या) ‘पुन्हा येईन! पुन्हा येईन!’ ओरडत होता. (हंशा) पण उचलून आपटलाच! (टाळ्या)

      या महामारीच्या ‘व्हायरस’वर लस शोधणारे काम उद्धव आणि त्याचे सहकारी करत होते ! फॉर्म्युला सापडला होता…मग झालं !…गेल्या दसऱ्याला तुम्ही या शिवतीर्थावरून जो संदेश घेऊन गेलात. त्याप्रमाणे बॅलेटचं बटन दाबलंत. तेव्हाच या राजकीय महामारीवरची पहिली लस टोचली गेली. गेले वर्ष झालं, ती टोचल्यापासून कमळाबाई नावाची महामारी आटोक्यात यायला सुरुवात झालीय! (टाळ्या)

     सांगा, कमळाबाईची महामारी आता राहिलीय का ? (पब्लिक : नाही!) राहणार आहे का ? ( ‘नाही-नाही’च्या घोषणा ) अरे, कुणाचा नाद करताय ?  लक्षात ठेवा, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे! मावळ्यांचा आहे ! त्यांना आराध्य दैवत मानणाऱ्या ‘शिवसेने’चा आहे! मराठी माणूस म्हणजे  असा-तसा वाटला की काय ? मराठी माणूस बोलण्या-वागण्यात गोड नसेल. पण मराठी आणि महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो येईल, त्याला आडवा करून शेवट गोड करणारा नक्कीच आहे! (जोरात चहूबाजूंनी घोषणा… ‘कोण आला रे, कोण आला?… शिवसेनेचा वाघ आला!’ …’एकच साहेब… बाळासाहेब !’)

    …अरे, तुम्हाला काय आम्ही आज ओळखतो की काय ? तुमची ती पणती… कमळाबाईचे ते पहिले निवडणूक चिन्ह होते!… ती पणती सारखी फडफडायची… तेव्हापासून तुम्हाला ओळखतो आहे!… ‘शिवसेने’च्या पन्नास- पंचावन्न वर्षांच्या आयुष्यात अशा पणत्या, दिवे, दिवटे, काजवे खूप बघितले ! (टाळ्या)… पण ते चमकले कधी आणि विझले कधी, हे त्यांनाही कळले नाही!… हेच ‘भाजप’वाले, ‘जनसंघ’वाले अनेकदा ‘शिवसेना भवन’, ‘मातोश्री’वर चकरा मारायचे. ‘युती करायचीय… आघाडी करायचीय,’ म्हणून गळ्यात पडायचे. वाकायचे. तरी एक बरे होते. आत्ताच्यापेक्षा त्या वेळची माणसं जर खरीही होती आणि बरीही होती! (टाळ्या) मग ते वाजपेयी असू देत नाही तर अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ….. ही माणसं जे ठरलंय ते पाळायची! आम्हीपण शब्दाला पक्केच होतो. शब्द पाळायचो. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही या ‘भाजप’वाल्यांना बोटाला धरले! आमच्याबरोबर यांना पळायला जमत नाही म्हटल्यावर, त्यांना काखोटीत, कडेवर घेतले! आम्ही महाराष्ट्राच्या, देशाच्या हिताचे जे काही बघतोय, ते यांना पण दिसावे, म्हणून खांद्यावर घेतले! तर यांनी काय करावे?… कानातच धार मारावी! (प्रचंड टाळ्या )

     अहो, आमच्या चांगुलपणाचा किती गैरफायदा घ्याल? आम्ही जर तुम्हाला मुंबई आणि महाराष्ट्र दाखविला नसता, तर दिसली असती का दिल्ली ? (टाळ्या) आम्ही मैत्री केली नसती तर, अजूनही तुम्ही रेशीम बागेत-नातू बागेत लंगडी-कांदाचिरी, समोसा-जिलेबी, विष-अमृत, वाघ-बकरी असले खेळ खेळत, शिकवीत बसला असता!…दिल्ली विसरा हो, यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी बाकावरही  बसायला नसते मिळाले! (टाळ्या)

     शरद पवार यांच्या ‘पुलोआ’च्या प्रयोगात (पुरोगामी लोकशाही आघाडी :१९८० ते ८८) कमळाबाईच्या १२-१३ आमदारांच्या पोळ्या कशाबशा भाजल्या जायच्या.  १९८६च्या विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणुकीत ‘शिवसेने’नी ‘हिंदुत्व’ची भूमिका घेतली. आमचे डॉ. रमेश प्रभू जिंकले. पण त्यांना ‘हिंदुत्व’च्या मुद्यावर कोर्ट खटल्यात अडकवले. या निवडणुकीत ‘भाजप’ आणि परिवार ‘शिवसेने’च्या, हिन्दुत्वाच्या विरोधात होता, हे ‘भाजप परिवार’ विकावू पोस्टमन आणि टुकार  ट्रोलर्सनी समजून घ्यावं. तेव्हा ‘काँग्रेस’चे प्रमुख आणि प्रधानमंत्री असलेल्या राजीव गांधी यांनी; ‘तलाक’पीडित शाहबानूच्या पोटगी-दाव्याच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालात आणि अयोध्येतल्या मंदिर-मशीद वादात हस्तक्षेप केला नसता ; जे कोर्ट निकालानुसार होईल, ते होऊ दिले असते तर ‘भाजप’च्या सत्येची कमळं कधी उगवलीच नसती. बसले असते बुडाला लागलेला चिखल चिवडीत. ‘बाबरी’ पडली! ती कोणी, कशी पाडली, ती लाखो रामसेवकांनी पाहिले. पण प्रकरण अंगाशी येईल, हे लक्षात येताच, ‘बाबरी’ पाडण्याची पावती ‘शिवसेने’च्या नावाने फाडून ‘भाजप’चे नेते हात झटकून मोकळे! मी तेव्हा ठणकावून सांगितलं,’ते जर शिवसैनिक असतील, तर मला त्यांचा अभिमान आहे!’

      ‘शिवसेने’चे हिंदुत्व हे असं ज्वलंत आहे. ते आगीत तावून सुलाखून निघालेल्या सोन्यासारखं आहे. (टाळ्या) ते शेंडी- जानव्यात अडकलेलं नाही, हे आम्ही अनेकदा सांगितलंय. तरीही तुम्ही मंदिरं खुली करण्यासाठी घंटानाद आंदोलन करून ‘शिवसेने’चं हिंदुत्व तपासता? त्यासाठी राज्यपालांमार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवता? तुमच्याच पक्षाचे प्रधानमंत्री सांगतात, ‘लॉकडाऊन संपला, पण कोरोनाचा धोका संपलेला नाही !’ आणि तुम्ही इकडे राज्याची सत्ता हातात नाही, म्हणून हिंदूंच्या जिवाशी खेळता? माझं उद्धवला… माफ करा…(हशा) मुख्यमंत्र्याकडे विनंती नाही, मागणी आहे… ‘कोरोना प्रतिबंधक लस’ येईल, तेव्हा ती या ‘घंटा’वाल्यांना अजिबात देऊ नका! त्याऐवजी घंटा द्या! (टाळ्या)… घ्या घंटा आणि बसा हलवीत! (हंशा, शिट्ट्या)…अहो, घंटाच ती!  हलवली नाही, तर वाजणार कशी? (प्रचंड हंशा)

     काय, मी खरं तेच बोलतोय ना? (जमावातून आवाज.. ‘हो!हो!’ )  यांच्या अशा वागण्याला युती म्हणतात की मैत्री?… छी…! मैत्रीच्या नात्याला ‘भाजप’ने बट्टा लावला ! म्हणून तर महाराष्ट्र आणि हिंदुस्तानच्या भल्यासाठी  उद्धवला इथे वेगळे समीकरण आणि नवीनच पट ‘शिवसेने’ला, मांडावा  लागला.

    गेल्या वर्षी विधानसभेचे निकाल लागल्यावर संजय मला विचारायला आला. ‘काय करायचं साहेब ?’ मी म्हटलं, ‘उद्धव आणि तुमचं जे ठरलंय तेच करा! बिनधास्त करा!’

     मग झालं! महाराष्ट्राच्या हृदयात आणि देशाच्या मनात जे आहे, ते ‘शिवसेने’ने केले. म्हणून उद्धव आज तुमच्यापुढे मुख्यमंत्री म्हणून उभा आहे. ( उद्धव ठाकरे उभे राहतात. समोर येतात. सभेला दोन्ही हात जोडून नमस्कार करतात. टाळ्यांचा कडकडाट. शिट्ट्या . ‘आवाज कोणाचा?….शिवसेनेचा!’ अशा घोषणांनी मैदान दुमदुमून जाते.)…  उद्धवनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर अनेक जणांनी मला भेटून सांगितले, ‘बालासाब, आपकी शिवसेनाने हमारा दिल जीत लिया. बहुत अच्छा डिसिजन किया!’ आज मी शिवतीर्थाला साक्ष ठेऊन जाहीर करतोय की, ‘शिवसेने’च्या या निर्णयामुळेच महाराष्ट्र वाचला! लोकशाही वाचली! (प्रचंड टाळ्या ) ‘शिवसेना’ आणि उद्धवच्या या निर्णयाचा शिवसेनाप्रमुख म्हणून मला स्वतःला अभिमान आहे!(टाळ्या)

      काडीकाम करणारे काही ‘मोबाइल’ पत्रकार आणि ‘सोशल मीडिया’तून  राजकीय विश्लेषक म्हणून मिरवणारे, ‘बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धवची शिवसेना’, असा भेद करणारी पोपटपंची करतात. पण या अतिशहाण्यांना कुठे ठाऊक, ‘शिवसेना’ ही माझी नाही, की उद्धवची नाही. ती शिवसैनिकांची आहे !  (प्रचंड टाळ्या)आणि ती तशीच राहाणार!

        माझ्या शिवसैनिकांना आणि मराठी माणसाला सुद्धा राज्यात आलेली ‘महाविकास आघाडी’ मनापासून पटलेली आहे, आवडलेली आहे. (बराच वेळ टाळ्यांच्या कडकडाट) काही इलाजच नव्हता हो, ही कमळाबाईची महामारी रोखण्याचा! बरं, आपण आघाडी कोणाशी केली? ‘काँग्रेस’ आणि ‘राष्ट्रवादी काँग्रेस’शीच ना? पाकिस्तान आणि चायनाबरोबर तर नाही ना? पण ही आघाडी केल्यानं कमळाबाईच्या बुडाला चांगल्या मिरच्या झोंबल्यात! तेव्हापासून तिच्या तोंडाचा पट्टा सुरू आहे.  बरं, हे असं कधी पहिल्यांदाच आपण केलंय का? तर अजिबात नाही! पूर्वीही आपण ‘काँग्रेस’ला आणि ‘काँग्रेस’ने आपल्याला सहकार्य केलंय! बरं, ‘भाजप’ने जसे त्या मुफ्ती, मौलाना, ओवेसी यांचे  मुके घेतले, तसे काही ‘शिवसेने’ने केले का ? तर बिलकूल नाही! आपण या मातीतल्या या देशातल्या ‘काँग्रेस’ आणि ‘राष्ट्रवादी काँग्रेस’बरोबरच आघाडी केलीय! मागे खूप वर्षांपूर्वी ‘मुंबई कॉर्पोरेशन’मध्ये आपली आणि ‘इंदिरा काँग्रेस’ची मैत्री होती. एकदा तर मॅडम इंदिरा गांधी यांनी  मुंबईत येऊन ‘शिवसेने’चा पाठिंबा मागितला होता. आपण तो दिलदारपणे दिला होता. एवढेच काय, अलीकडे मराठी मातीतल्या आपल्या कर्तृत्ववान भगिनी प्रतिभाताई पाटील यांनी हिंदुस्थानच्या प्रथम महिला ‘राष्ट्रपती’ होण्यासाठी ‘शिवसेने’ला पाठिंबा मागितला होता. तोही आपण दिलदारपणे दिला होता. जे जे योग्य आणि महाराष्ट्राच्या, देशाच्या हिताचे, सन्मानाचे असेल त्याला आपल्या ‘शिवसेने’ची पसंती दिलीय !

      नंतर आमचे शरद पवार प्रणव मुखर्जींना ‘मातोश्री’वर घेऊन आले. म्हणाले, ‘हे आमच्या काँग्रेस-डाव्या आघाडीचे ‘राष्ट्रपती’ पदाचे उमेदवार आहेत. त्यांना ‘शिवसेना’ आमदार- खासदारांचा पाठिंबा द्या!’ प्रणवबाबू  उच्चशिक्षित माणूस. विद्वान. राजकारणात राहून, सत्तापदं भोगूनही  कुठल्याही वादात न अडकलेला. म्हटलं, ‘दिला पाठिंबा!’ अशावेळी आम्ही एनडीए- बिनडीएची पर्वा नाही केली.

     काही वर्षांपूर्वी शरदबाबूंची कन्या- सुप्रिया आली. एक वर्षाची होती. तेव्हापासून सुप्रियाला पाहतोय. म्हणाली, ‘मी राज्यसभेला उभी राहतेय!’  म्हटलं, ‘मित्राची मुलगी आहेस. तू बिनविरोध निवडून गेले पाहिजेस!’ तसा शब्द आम्ही जाहीरपणे दिला आणि तो पाळला. (टाळ्या) त्यात लपवाछपवी नाही.

     आता पण उद्धवनी जी काही राजकीय मांडणी केली, ती दिवसाढवळ्या आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात !  मुळात आमची राजकीय युती असो नाहीतर आघाडी; ती तात्पुरती नव्हे तर पाच-पंचवीस वर्षांसाठी असते! आता बसा पंचवीस वर्षं आमच्या नावाने बोंबलत! (टाळ्या) अगदी मूळव्याध झाल्यासारखे दोन्ही हातांनी ठोकत बसला तरी हरकत नाही. (जोरदार टाळ्या)

     पण ही वेळ कमळाबाईवर का आली? …खोटा शब्द कधी द्यायचा नाही; आणि दिलेला शब्द कोणी मोडला तर, त्याची उधारी वेळ आल्यावर चुकवायची! हा मराठी माणसाचा आणि ‘शिवसेने’चा बाणा आहे. शब्दाशी प्रामाणिक राहायचे. काहीही करून दिलेला शब्द पाळायचा. हीच ठाकरे नावाची ओळख आहे.(टाळ्या) आम्ही बोलतो ते करून दाखवतोच म्हणजे दाखवतो! उगाच शब्दाचे खेळ करत नाही. जुमलेबाजी तर अजिबातच नाही. (हंशा)

     पंचवीस वर्षांपूर्वी मी तुम्हाला शब्द दिला होता. ‘मुंबई-पुणे प्रवास दोन तासांत होईल, असा रस्ता बांधतो!’ बांधला की नाही ? (पब्लिक : होss)  ‘झोपडपट्टीवासीयांना मोफत घरे देतो,’ म्हणालो! द्यायला सुरुवात झालीय की नाही ? (पब्लिक : होss)… अजून सगळ्यांना नसतील मिळाली घरं, पण सुरुवात तर झालीय ना! आमच्या दादांनी म्हणजे प्रबोधनकारांनी मला समाजकारणात येतानाच कडक सूचना दिली होती! ‘एक तर कुणाला कसलाही शब्द देऊ नको ! आणि दिलास तर तो शब्द पाळण्यासाठी वाट्टेल ते कर! आकाश-पाताळ एक कर !’ (टाळ्या)…

 

      हे दादांचे शब्द मी एखाद्या ब्रीदवाक्याप्रमाणे जपलेत. उद्धव पण तेच करतो. आदित्यने त्याची सुरुवात केलीय. त्याने गेल्या वर्षी शब्द दिला होता. ”गोरेगाव-आरे’चे जे जंगल, फडणवीस सरकारच्‍या अतिरेकी कुर्‍हाडीने रातोरात नष्ट झालेय, ते पुन्हा उभे करीन!’ हा शब्द पाळला की नाही ? ( ‘हो हो’च्या आरोळ्या )…  आम्ही ठाकरे आहोत! जमेल तेच बोलतो आणि जे बोललो तेच करतो! उगाच लंब्याचवड्या गप्पा मारत नाही.  ‘तुमच्या बँक खात्यात पंधरा लाख रुपये जमा करू …. तुम्हाला अच्छे दिन देऊ…. असं काही म्हणालो होतो का?  ( ‘नाही नाही’ असा आवाज आणि ‘फेकू फेकू’ अशा घोषणा)

     आदित्य चांगले काम करतोय! पण ते काही करंट्यांना, करकोच्यांना बघवत नाही. त्यांनीच… मध्ये कोण तो गांजाडू, चरशी नट मेला! त्याच्या नावाने ऊर बडवणाऱ्यांनी आदित्यच्या नावाने हवेत झुरके मारले आणि संशयाचे धुरकट वातावरण तयार केले. त्यात कोण तो… बंडल गोस्वामी आणि कोण ती हिमाचल प्रदेशची गांजाडू बांगडीवाली नटवी…(पब्लिक : कंगना, कंगना) यांनी मोकळ्याच ओकाऱ्या द्यायला सुरुवात केली. त्यांच्या सोबतीला कोण तो चेंबूरचा… ( पब्लिक : कोंबडीचोर… कोंबडीचोर)… मुलुंडचा चोचरा नळ तो कोण… (पब्लिक : किलीट थोमय्या ) आणि ते मराठी भय्ये… (पब्लिक : शेलार, दरेकर ) आणि  फडफडणीस हे एकासुरात असे बोंबलायला लागले की, ‘आता ठाकऱ्यांचा नातू अडकलाच!’ … अरे, असा अडकायला ती तुमच्या बापाची पेंड आहे काय रे पादऱ्या पावट्यांनोs. (प्रचंड हंशा- टाळ्या)…. अरे, आम्ही जे करतच नाही, त्याला डरत नाही! आणि जे करतो ते जाहीरपणेच! त्यासाठी कुणाची परवानगी घेत नाही.

    हरामखोर साले, किती म्हणून खालची पातळी गाठाल! ‘ईडी’ काय आणता! ‘सीबीआय’, ‘एनसीबी’ काय! सगळी एबीसीडी आणा!(शिट्ट्या,टाळ्या)…आमची काय धसकटायची ती धसकटा. पण आमचा एक केसही तुम्ही वाकडा करू शकत नाहीत! करू शकला नाहीत!  कारण मुळात आहोतच आम्ही सरळ! (हंशा)….तुमच्या बापाला नमलो नाही ! तुम तो किस झाड की पत्ती हो!…किस खेत की मुली हो!…( बराच वेळ प्रचंड टाळ्या )

     तुम्ही जे-जे करताय ना… ते-ते तुम्हाला भरावे लागेल ! तुम्ही जे पेरलंय ना, तेच पीक तुम्हाला स्वतःला कापावे लागेल! बाभळी लावल्यात ना, मग तुम्ही आंब्याची अपेक्षा धरूच नका! (टाळ्या) प्रत्येकाची वेळ येत असते. आम्ही तर वाघ आहोत! (टाळ्या, शिट्ट्या, घोषणा… ‘कोण आला रे कोण आला?….’) आता दिवस- रात्र, उन्हाळा-पावसाळा आणि  हिवाळाही आमचाच आहे ! (टाळ्या) कारण राज्य महायुतीचं आहे! नीतीचं आहे! (प्रचंड टाळ्या)

     ‘कोरोना- लॉकडाऊन’ काळात हलकट राजकारण खेळलेल्या चार पायांच्या प्राण्यांना, आज या शिवतीर्थाच्या साक्षीने जाहीरपणे सांगतोय, सबका हिसाब होगा! (जोरदार आणि बर्‍याच वेळपर्यंत टाळ्या)… हा हिशोब होणार म्हणजे होणारच! ‘कोरोना’ गेला तरी यांना तोंडाला ‘मास्क’ बांधून फिरावे लागणार! याला दिल्लीपतीही अपवाद नाही. अरे, टाळ्या वाजवा काय! दिवे लावा काय!…आतापर्यंत अतिशहाणपणाचे फटाके वाजवलेत ना! मग आता जनता जनार्दनाचे फटके अनुभवा! दिवाळीची होळी केली हो यांनी! (पब्लिक : शेम शेम)

      ही अकलेची महामारी आपल्याला संपवायची आहे आणि ती आपण संपवणारच! आई भवानी, छत्रपती शिवराय यांचा आपणाला आशीर्वाद आहे‌. महाराष्ट्र ज्यांनी ज्यांनी उभा केला, त्या सगळ्या महापुरुषांचे आशीर्वाद आपल्याला आहेत. त्यांचा हा आशीर्वाद घेऊनच आपणाला पुढे जायचे आहे. महाराष्ट्राला पुढे न्यायचे आहे. जे महाराष्ट्रात होते, तेच पुढे देशात होत असते. (टाळ्या)

    माय-बाप, बंधू-भगिनींनो, आताचे हे कठीण दिवस संपणार आहेत. ‘कोरोना’ महामारीचा बंदोबस्त करणारी लस येणार आहे‌‌. पुण्यात लस तयार करण्याचं काम सुरू आहे. लस नसताना आपण ‘कोरोना’ महामारीला थोपवून धरले. लस आली की, ‘कोरोना’ला निरोप देऊ. नक्की देऊ….(टाळ्या) एकदा का त्याला निरोप दिला की, आपण जगापुढे ताठ मानेने उभे राहू! साऱ्या देशाला अभिमान आणि आशा वाटेल, असे काम आपण सगळे मिळून राज्यात उभे करू! थांबलेली ही गाडी वेगाने पळवू. महाराष्ट्रातला शेतकरी असेल, कामगार- कष्टकरी असेल, गरीब असेल, त्या साऱ्यांना पहिल्यासारखे गुण्यागोविंदाचे दिवस आपण दाखवून देऊ. या मातीचे ऋण आपण सगळे मिळून फेडू. पुढच्या वर्षीच्या विजयादशमीला याच शिवतीर्थावर वाजत-गाजत येऊन विचारांचे सोने लुटू. एकमेकांना देऊ!

   जय हिंद! जय महाराष्ट्र!* ( टाळ्या…घोषणा )

(लेखक साप्ताहिक ‘चित्रलेखा’ चे संपादक आहेत.)

9322222145