चित्तोडगड: महाराणा प्रतापसिंहाची कर्मभूमी

-राकेश साळुंखे

दोन वर्षांपूर्वी जयपूर येथे एका कार्यक्रमानिमित्त गेलो होतो. त्यावेळी आकस्मिक चितोडगड, हल्दीघाटी येथे जाण्याची संधी मिळाली. त्यावेळी आम्ही  चौघे मित्र पुण्यातून ट्रेनने जयपूरला जाण्यास निघालो. आमच्यापैकी एक मित्र जयपूर कार्यक्रमाच्या संयोजन समितीचा सदस्य होता. मात्र जयपूरमधील कार्यक्रमाला अजून दोन दिवस बाकी होते. त्यामुळे जसजसे कोटा जवळ येऊ लागले तसतसे आम्हा मित्रांच्या मनात चितोडगड पाहण्याची इच्छा निर्माण होऊ लागली. त्यामुळे संयोजक मित्र सोडून बाकी आम्ही तिघे चितोडगडला जायचे पक्के करून कोटाला उतरलो.

कोटा येथे पहाटे पोहोचलो, तेथून बस पकडून १७० किमीवरील चितोडच्या दिशेने निघालो. चितोडमधील  गाइड सलामभाई जो फेसबुकच्या माध्यमातून मित्र झाला होता. त्याला फोन करून आम्ही चितोडला येत असल्याचे सांगितले असल्याने तो तेथे आमची वाट बघत होता. सकाळी ११ च्या दरम्यान चितोडला पोहोचलो. हॉटेलवर सामान ठेऊन फ्रेश झालो. प्रथम राजस्थानी जेवणाचा आस्वाद घेतला. नंतर मस्त ताजे-तवाने होऊन दुपारी चितोडगडावर जाण्यास निघालो.

राजस्थान हे तेथील सुस्थितीत असलेले किल्ले, भव्य राजवाडे, खाद्यसंस्कृती यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. भव्य-दिव्य राजवाडे, विस्तीर्ण वाळवंट, रंगीबेरंगी निरनिराळे उत्सव हे पर्यटकांना आकर्षित करत असतात.  राजस्थान हे शूर राजपूतांचा इतिहास तसेच अनेक घनघोर लढाया, यासाठीही ओळखले जाते.

मेवाडची राजधानी असणारे चितोड त्याच्या पूर्वीच्या वैभवांची साक्ष देत अजूनही दिमाखात उभे आहे, मात्र राजस्थानातील इतर किल्ल्यांच्या तुलनेत येथील किल्ल्याची अवस्था काहीशी खंडहर स्वरूपातील आहे. चितोड म्हटले की मेवाडचा राजा महाराणा प्रतापसिंह आठवतो. तसेच संत मीराबाई , राणी पद्मिनी, राजा रतनसिंह व अल्लाउद्दीन खिल्जी यांच्यातील लढाई, तसेच त्यावेळी तेथे शूर राजपूत स्त्रियांनी केलेला जोहारही आठवतो . हा किल्ला पाहताना एकेकाळच्या त्याच्या  वैभवाची जाणीव पदोपदी होते.

युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा या किल्ल्याला दिला आहे. हा किल्ला सातव्या शतकात मौयानी  बांधला. या किल्ल्याबरोबर अनेक शूर योद्ध्यांचे नाव जोडले गेलेले आहे. किल्ल्याची तटबंदी अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. आत गेल्यावर प्रथम कालिकामाता देवीचे मंदिर लागते. आठव्या शतकापासून अस्तित्वात असलेले ही मंदिर अजूनही चांगल्या स्थितीत आहे, नवरात्रीला या मंदिरात उत्सव असतो. यानंतर विजायस्तंभ दिमाखात उभा असलेला दिसतो . तसा तो पायथ्याशी असलेल्या चितोड गावांतूनही दिसतो, पण जवळून पाहताना त्याची भव्यता लक्षात येते. उंच चबुताऱ्यावर आकाशाशी स्पर्धा करणारा हा विजायस्तंभ महाराणा कुंभ यांनी १४४० मध्ये मालवा व गुजरात यांवर विजय मिळवल्याचे प्रतीक म्हणून बांधला होता. त्याच्या बाहेरील भागावर अतिशय सुंदर नक्षीकाम व मूर्तिकाम पाहायला मिळते. या स्तंभाच्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. आतून वरपर्यंत जाता येते परंतु सध्या हा मार्ग बंद केला आहे त्यामुळे हा स्तंभ बाहेरूनच पाहावा लागतो.

कृष्णभक्त मीरा हे नाव जवळपास प्रत्येक भारतीयाला माहीत आहे. मीरा ही राजपूत राजकन्या असूनही आपले ऐषोआरामाचे राहणीमान सोडून तिने जीवनभर कृष्णाची भक्ती केली. ती एक संत व कवी म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या सन्मानार्थ येथे भव्य मीरामंदिर बांधलेले आहे. विजयस्तंभाच्या जवळच राणा कुंभाचा महाल पाहायला मिळतो. अवशेषरूपी या महालाच्या जवळच राणी पद्मिनी व इतर राजपूत स्त्रियांनी जोहर केला ते ठिकाण आहे. नंतर आम्ही राणी पद्मिनीचा महाल पाहायला गेलो. या महालाच्या काही भागात सध्या भारतीय पुरातत्व खात्याचे वस्तुसंग्रहालय असून त्याचा काही भाग पाण्यात आहे. येथेच अल्लाउद्दीन खिल्जीने राणी पद्मिनीचे प्रतिबिंब पाण्यात पाहिल्याचे सांगितले जाते. हा महाल अजूनही बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत इतिहासाची साक्ष देत उभा आहे. जवळपास ३ किलोमीटर क्षेत्रात बांधलेल्या या किल्ल्यामध्ये अनेक इमारती आढळतात. त्यातील काही सुस्थितीत तर काही भग्न स्थितीत पाहायला मिळतात. काही मंदिरेही येथे आहेत. या किल्ल्यात फिरताना आपल्या डोळ्यासमोर येथे घडलेला इतिहास उभा राहतो. किल्ला बघून बाहेर पडायला संध्याकाळ झाली. रात्री चितोडलाच मुक्काम करून दुसऱ्या दिवशी हल्दीघाट पाहायला निघालो.  निघताना सलीमभाईस त्यांची गाईड व वाहनाची  फी विचारली तर तो म्हणाला, ‘आप दोस्त हो तो आपसे क्या लेना’, तरीपण त्यांना योग्य रक्कम देऊन आम्ही निघालो .

चितोडपासून ११० किमी अंतरावर असणारे हल्दीघाट येथे महाराणा प्रतापसिंग व अकबरचा सरदार मानसिंग यांच्यात घनघोर लढाई झाली होती. या युद्धात अकबर सेना जिंकली तरी आजही हल्दीघाटीतील लढाई ही महाराणा प्रतापसिंह व त्यांच्या चेतक नावाच्या घोड्याच्या पराक्रमासाठीच ओळखली जाते. हल्दीघाट हा भाग नावाप्रमाणेच पिवळी माती असलेला आहे. या पिवळ्या मातीवरूनच हल्दीघाट हे नाव पडले आहे. अरवली पर्वतरांगांमध्ये असलेली ही खिंड राजसमंद व पाली या जिल्ह्यांना जोडते. हल्दीघाटीकडे जेव्हा आम्ही निघालो होतो त्यादिवशी त्या भागात नुकत्याच झालेल्या एका आंतरधर्मीय विवाहामुळे त्या जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. इंटरनेटही बंद होते. जागोजागी बंदच्या खुणा दिसत होत्या. अशा परिस्थितीत परराज्यात असल्याने आम्हाला थोडा ताण आला होता. पण येथे आल्यावर या पावनभूमी च्या स्पर्शाने तो नाहीसा झाला .

या भूमीवर कित्येक वीरांनी आपले रक्त मायभूमीच्या रक्षणासाठी सांडले आहे. असे म्हणतात की हल्दीघाटीतील लढाईच्यावेळी तेथील माती लाल रंगात न्हाऊन निघाली होती. हल्दीघाटीतील ऐतिहासिक लढाई जेथे  झाली ते स्थान रक्ततलाई खाम्नोर गावामध्ये आहे. या ठिकाणी युद्धात मरण पावलेल्यांची स्मृतिरूप चिन्हे  म्हणून छत्र्या आहेत.तसेच  महाराणा प्रताप यांच्या लाडक्या निष्ठावान घोड्याचे स्मारक आहे . हे स्मारक संगमरवरी आहे. महाराणा  प्रताप यांच्या पराक्रमाच्या कथा येतात तेव्हा  चेतक ची कथा येतेच .  चेतक स्मारकाजवळ महाराणा प्रताप संग्रहालय असून त्यामध्ये अनेक ब्रॉन्झ धातुतील पुतळे पाहावयास मिळतात. याठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा पाहून ऊर अभिमानाने भरून येतो . या संग्रहालयात महाराणा प्रतापसिंग यांच्यावरील शॉर्ट फिल्म दाखवतात. संग्रहलयाची प्रवेश फी जास्त असली तरी आत गेल्यानंतर जो काही इतिहास आपल्यासमोर जिवंत होतो, ते पाहता ती फी वाजवी वाटते.  हल्दीघाटीचा इतिहास अनुभवून पुढे कुंभलगडला निघालो.

(लेखक ‘लोकायत’ प्रकाशनाचे संचालक आहेत)

84849 77899

Chittorgarh Fort for Your Rajasthan Trip

Comments are closed.