सातपाटील कुलवृत्तांत: माणूस नावाच्या प्रजातीची लोकविलक्षण गोष्ट

– संजय आवटे

इतिहासात आणि परंपरेत एवढे रमणारे आपण. पण, आपल्या पणजोबांच्या आधीचा इतिहासही आपल्याला ठाऊक नसतो. ना तशी काही उत्सुकता दिसते. पित्रं जेवायला घालतो आपण, पण ताटावर बसणारी ही पित्रं नेमकी आहेत कोणती, याच्याविषयी काही खास कुतुहल नसते.

‘मी कोण?’, ‘मी कुठून आलोय?’ हा आदिम शोध घेतच माणूस पुढे झेपावला आणि इथवर येऊन पोहोचला.

पण, असा शोध घेण्याची इच्छा आपल्याकडं अभावानेच दिसते. एक तर, ‘डॉक्युमेंटेशन’ आणि आपलं वाकडं. एका मोठ्या समूहाला पिढ्यानपिढ्या अक्षरशत्रू ठेवलं गेलेलं. पुढं तो समूहही शिकला, सवरला; पण वर्तमानातल्या लढाईत एवढा गुंतला की मागं जायला अवकाश कुठे? जरी गेला, तरी ते नोंदवायची संधी कुठे! जाती-पातीचा आणि गोत्राचा कोण अभिमान? पण, तुमचे गोत्र कोणते हे ठाऊक कुठे? गोत्र नाही सापडलं की, ‘कश्यप’ बिचारा आहेच मदतीला. सगळ्या कर्मकांडांमध्ये बुडालेली माणसंही त्यातल्या आशयाबद्दल अनभिज्ञ. अर्थात, फार चौकस नसणं, हेही त्यांच्या चिवट अस्तित्वाचं कारण असू शकतं. नस्त्या उठाठेवी करण्यापेक्षा ‘ठेविले अनंते तसेचि राहावे’ हाच त्यांच्या प्रवासाचा राजमार्ग त्यांना सापडलेला असू शकतो. आपण कोण- कुठचे, याची काहीच खात्री नसण्याच्या गंडातून कदाचित हा जातीय अहंकार येत असेल. किंवा, मग इतिहासाचा अभिमान हे त्याच न्यूनगंडाचे राजकारण असेल.

कारण काहीही असो, पण आपल्या मुळांपर्यंत जाण्याचा, दूर कशाला, आपली स्वतःची गोष्टही नीट मांडण्याचा प्रयत्न आपल्याकडे होताना दिसत नाही. आपली आत्मचरित्रंही गोष्ट सांगण्यापेक्षा स्वतःचा बचाव करण्यासाठी उभी राहिलेली. त्यात पुन्हा पुस्तक लिहिणं म्हणजे ‘साहित्यिक’ अशी भानगड झाल्यामुळे, लिहिणा-यांचा वर्गच तयार झाला. म्हणजे, जगणार एक आणि लिहिणार भलताच. जो लिहिणार, तो ते जगेल असेही नाही. कालांतराने एक मोठा वर्ग लिहू लागला हे खरे, पण त्याचेही विद्यापीठीकरण झाले. म्हणजे, जातसमूह वेगळे, पण विद्यापीठीय प्राध्यापकांनीच लिहायचे असते, असे जणू नियमासारखे होत गेले. इतरांना तेवढा वेळही नव्हता आणि हौसही नव्हती. त्यामुळं अपवाद वगळता जगणा-यांच्या गोष्टी आल्याच नाहीत. युरोप वा अमेरिकेत राजकारणीही लिहित असतात. उद्योजक लिहित असतात. अगदी जन्मठेपेचे कैदी लिहितात किंवा आयटीतले चकचकीत सीईओही लिहित असतात. आपल्याकडे ही सवय नाही. शिवाय, त्यावर तसे अर्थकारणही उभे राहिलेले नाही. त्यामुळे आपल्या गोष्टीच लिहिल्या गेल्या नाहीत.

इथं ज्ञानेश्वर जेव्हा ‘ज्ञानेश्वरी’ सांगत होता, तेव्हा माझेही बापजादे कोणीतरी असतीलच की तिथं. शिवाजी लढत असताना, कुठेतरी तेही असणारच. काय करत होते ते, काय चालले होते नक्की तेव्हा? असे अनेक प्रश्न. पण, ते आपल्याला भेडसावत नाहीत.

नव्या पिढीला तर असे प्रश्न अपवादानेच पडतात. मानवी समुदाय जेवढा अधिक उन्नत होतो, प्रगल्भ होतो, तेवढे त्याला मुळांकडे जाण्याची अधिक प्रेरणा मिळते. कदाचित आपल्या रोजच्या रणांगणात गुंतलेल्यांना ती प्रेरणा मिळत नसावी.

नव्या पोरांना विचारून बघा. ‘मूळ गाव कोणतं?’ तो अगदी झुरळासारखा प्रश्न झटकून टाकत म्हणेल, “ते सोलापूर जिल्ह्यात आहे. सांगोला तालुक्यात. पण, आता आम्ही पुण्यातच असतो. तिकडं कुणी नसतं.” जरा तपशीलात विचारावं, तर “नाही, नाही. काही संबंध नाही आता”, म्हणून विषय तोडला जातो. आपण पुणेकर कसे, हेच सिद्ध करण्यात या पोरा-पोरींना कौतुक वाटत असते. गावाचा वगैरे संबंध सांगणे मागासलेपणाचे वाटते. अशावेळी कोण कशाला आणि किती मागं जाईल?

असा शोध घ्यावा, असं देवनाथ सातपाटील या लेखकाला वाटतं. आणि, त्या शोधात तो जे मागे जात राहातो, त्यातनं मानवी आयुष्याचीच गोष्ट समोर येते. आठ शतकांचा, आठशे पानांचा हा दस्तावेज म्हणजे विलक्षण कहाणी आहे. ही माणसाची कहाणी आहे. काही झालं तरी चिवटपणे उभं राहाणा-या माणूस नावाच्या विलक्षण प्रजातीची ही कहाणी आहे.

ही कहाणी वाचली असती, तर ‘तनिष्क’च्या जाहिरातीवर कोणी आक्षेप घेतला नसता. कारण, वंशशुद्धी वगैरे सगळे भ्रम आहेत, हे मग लक्षात आले असते. कोणत्या डोंगरकिणीचा श्रीपती, त्याच्या वंशात अफगाण स्त्री येते, मुस्लिम पुरुष येतो, कोल्हाटीण येते, इंग्रज येतात. कसला वंश, कसली जात, कसला धर्म आणि कसले भूमिपुत्र! आम्ही इथले आणि ते बाहेरचे, हे किती निखालस खोटं आहे! ‘स्थलांतर हे ज्ञानापेक्षा अधिक महत्त्वाचे’, असे आल्बर्ट आइनस्टाइनसारख्या भौतिकशास्त्रज्ञाने म्हणावे आणि हा शोध त्यालाच लागावा, हा योगायोग नाही.

माणूस जगत राहातो. पुढं पुढं जात राहातो. स्त्री आणि पुरुष एकत्र येतात. वंश विस्तारत जातो. लढाई खरी जगण्याची, अस्तित्व टिकवण्याची आणि पुढं पुढं जाण्याची. मग, स्त्री आणि पुरुष यातलं नातंही बदलत जातं. उलट स्त्री अधिक सक्षम आणि पुरुष तिच्या पदराआड वाढत गेलेला. स्त्रीनंच तिच्या सोईनं पुरुषांना सोबत घेत, मानवी जगण्याचा विस्तार केलेला.

सगळेच भेद, वृथा अभिमान गळून जात, या जगण्याच्या गोष्टी आपण वाचत जातो आणि त्यात एवढे गुंतून पडतो की आठशे वर्षांचं संचित आपल्या सोबतीला असल्यासारखं वाटू लागतं. आपण किती प्राचीन आहोत, याची खात्री पटू लागते. कुठून आलो आहोत, हे समजू लागलं की, इथल्या प्रत्येक माणसाशी आपलं काहीतरी अद्भुत नातं आहे, असं वाटू लागतं.

जगात आठशे कोटी माणसं. त्यातलं कोणीच एकसारखं नाही. एवढे जेनेटिक नकाशे कसे तयार होत जातात! आणि, तरीही माणसं एकमेकांसारखी आहेत. म्हणून त्यांचं काही शास्त्र तयार होऊ शकतं. ती एकमेकांची आहेत. एकमेकांचा हात धरून जगली आहेत. पुढं पुढं निघाली आहेत.

हे सगळं विलक्षण आहे.

या कादंबरीतला महाकाय पट आपल्याला खिळवून टाकतो. खेळवून टाकतो. आठशे पानांच्या कादंबरीचं ओझं संपल्यानंतर आपल्याला हलकं वाटू लागतं आणि जडही.

आठशे वर्षांच्या इतिहासातले एकेक नायक त्यांची गोष्ट घेऊन येतात. या नायकांच्या शब्दकळेवर तर स्वतंत्रपणेच सांगायला हवे. हे कथानायक ठळकपणे नजरेसमोर उभे राहातात. आणि, त्याचवेळी गूढ मागे सोडून धूसरपणे निघून जातात. प्रत्येक नायकाची काहीतरी लोकविलक्षण गोष्ट आहे. म्हटलं तर चारचौघांसारखीच. पण, प्रत्येकाचीच गोष्ट मुळात लोकविलक्षण असते.

त्या गोष्टीतून आपण शांत- समंजस होत असताना, मुळात हा शोध घेणारा देवनाथ समारोपाला भेटतो. त्याचं निवेदन आत्यंतिक उंची गाठणार, असं वाटत असताना, ते मात्र अनपेक्षितरित्या सामान्य भासू लागतं. उत्तुंगतेची संधी लेखकानं गमावली, असं वाटत राहातं.

पण, तरीही ही कादंबरी तुम्हाला खोदते, शोधते. तुमचं वय वाढवते आणि तुम्हाला नवजातही करते, एवढं नक्की.

अरूण साधू, नंतरच्या पिढीतला कमलेश वालावलकर आणि त्या नंतरचा श्रीरंजन आवटे यांच्या शोधयात्रेची आठवण यावी, अशी ही कादंबरी. विज्ञानात गती असणारे लेखक आंतरशाखीय आकलनाचे असतात, तेव्हा असे विश्वात्म भान येते. तेव्हा जगण्या-मरण्याची मानवी गोष्ट फार वेगळे आयाम घेऊन येते, असे माझे निरीक्षण आहे.

‘सातपाटील कुलवृत्तांत’ म्हणून आवडली. झपाटल्यासारखं खूप दिवसांनी काही वाचलं. सविस्तर लिहायला हवं. पण, ते होईल की नाही, माहीत नाही.

लेखक रंगनाथ पठारे आणि शब्दालय प्रकाशन यांनी एक महत्त्वाची कादंबरी आपल्याला दिलीय, एवढंच घाईघाईत नोंदवून ठेवतो!

(लेखक ‘दिव्य मराठी’ चे राज्य संपादक आहेत)

9881256009

Comments are closed.