-अविनाश दुधे
पिठोरी चांदण्यातलं घराचं अंगण, ज्वारीच्या ओल्या धांड्यांनी तिथे उभारलेला मांडव (खोपडी). त्या मांडवात भुलोबा-भुलाबाईची स्थापना केल्यानंतर त्यांना पाना-फुलांनी सजविण्याची घरातील लेकी- बाळींची धडपड. ती गडबड आटोपल्यानंतर भुलाबाईच्या भोवती फेर धरून नाचण्यातील गंमत आणि त्यानंतर उमटणारे सुरेल स्वर..
पहिली गं भुलाबाई देवा देवा साजे
द्या तिला मंडोबा खेळी खेळी खंडोबा
दसरा आटोपल्यानंतर विदर्भातील खेड्यापाड्यात सध्या भुलाबाईच्या माहेरपणाचा उत्सव रंगला आहे. खेड्यापाड्यात असे यासाठी म्हटलंय की, मोठ्या शहरात हा उत्सव आता जवळपास इतिहासजमा झालाय. आज तारुण्यात पदार्पण करणाऱ्या युवतींना याबाबत फारच थोडी माहिती आहे. पन्नाशी- साठीत असणाऱ्या त्यांच्या आयांची पिढी मात्र भुलाबाईच्या आठवणीने अजूनही कातर होते.
२०-२५ वर्षापूर्वी भाद्रपद पौर्णिमेपासून आश्विनातील पौर्णिमेपर्यंत महिनाभर भुलाईचं माहेरपण साजर केलं जायचं. रोज सायंकाळी महिला-मुली खेळ गाण्यांचा जल्लोष करायच्या. नंतरच्या काळात अनेक कारणांमुळे या उत्सवाला कात्री लागून तो पाच दिवसांवर आला. आता महानगरात तर एका दिवसात हा उत्सव आटोपता घेतला जातोय.
आज महिलाच्या व्यस्ततेमुळे पूर्वीच्या उत्साहात भुलाबाईचं माहेरपण साजर होतं नसलं तरी त्या काळातील आठवणीनींनी महिला अजूनही मोहरून जातात. पूर्वी भुलाबाईच्या आगमनाचे वेध लागले की, परोपरी अनोखा उत्साह संचारत असे. भुलाबाई म्हणजे पार्वती आणि भुलोबा म्हणजे शंकर या दोघांच्या मातीच्या प्रतिमा गावातील कुंभाराकडून विकत आणल्या जात. ज्वारीच्या खोपडीत मखरातल्या पाटावर त्या मूर्तींची स्थापना केली जात असे. त्यापूर्वी त्या पाटावर गहू तांदळाचं आसन तयार केलं जात असे. शेजारी पानाफुलांनी सजवलेला नारळ तांब्यावर ठेवला जाई. नारळाच्या भोवती पाच पाने खोवले जायची. या कळसाच्या शेजारी दोन पानं ठेवून त्यावर सुपारी ठेवली जायची. या कळसाची व सुपारीची आधी पूजा व्हायची , त्यानंतर भुलाबाईचे पूजन व्हायचे .पूजेच्या वेळी भूलोबा -भुलाबईला पिवळी नेसवायची. हा कुळाचार असायचा. पूजा आटोपल्यानंतर गाण्यांचा फेर सुरू व्हायचा, ‘पहिली गं भुलाबाई देवा देवा साजे… हे नमन झाल्यानंतर आठवतील तेवढी गाणी म्हटली जायची.
आपे दूध तापे
त्यावर पिवळी साय
लेकी भुलाबाई
पाटल्या लेवून जाय
असं भुलाबाईला सांगितलं जायचं . त्यावर दुसरी लगेच म्हणायची ,
पाटल्यातला जोड घेत नाही
तुमच्या बरोबर येत नाही
मुलीकडून भुलाबाईच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक सुरू असताना तिच्या बाळाचे कवतिक सुरू होत. असे-
अडकीत जाऊ खिडकीत जाऊ
खिडकीत होता दाणा
भुलोजीला लेक झाला
नाव ठेवा नाना
भुलोजीच्या मुला-मुलींची असंख्य नाव घेऊन
एक लिंबू झेलू बाई…
दोन लिंबू झेलू..
असं मजेशीर गाणं कोणीतरी म्हणत असे. त्याचदरम्यान भुलाईची माहेरी जाण्याची तगमग व्यक्त होणारं गाणं कोणाच्या तरी तोंडून बाहेर पडे. मुलींच्या तोडून भुलाबाई म्हणे….
सासू आत्याबाई ऐकावं जी
पाठवा मला माहेराsss माहेरा
भुलाबाईच्या या विनवणीवर सासूबाई म्हणे-
कारल्याची बी पेर गं सुनबाई
मग जा आपल्या माहेराsss माहेरा
कारल्याची भाजी झाली. भांडीही पासून झाली. त्यानंतरही सुनेला माहेरी पाठविण्यास काचकूच करणारी सासू नवीन पवित्रा घ्यायची
अगं अगं सुनबाई
मला काय पुसती
पूस जा आपल्या
सासऱ्यालाssसासऱ्याला
सासू-सासरे, नणंद, नवरा असे सर्वांना विचारून शेवटी भुलाबाई माहेराला येई. भुलाबाईची ही गाणी तिच्या जीवनातील कित्येक मजेदार गोष्टी सांगून जातात. सासर-माहेरची तुलना करणारी ही गाणी वातावरणात रंग भरत असे.
सासूरवासी सून रुसून बसली कैसी
यादवराया राणी रुसून बसली कैसी…
आक्कण माती चिक्कण माती
असा ओटा बांधावा
अस्सा ओटा सुरेख बाई
त्यावर जातं ठेवावंsss ठेवावं..
ही गाणी या उत्सवात हमखास म्हटली जायची. अनेक गीतांना विनोदाची झालर असायची. शेवटी खिरापतीचं (प्रसाद) वाटप व्हायचं . दूध, हलवा गूळ वा फुटाणे, पुऱ्या, करंजी असं घरात जे काय असेल त्याची खिरापत केली जायची. ‘खिरापत ओळखा’ प्रकार अतिशय मनोरंजक असायचा. मुली आणि लहान मुलेही यात खूप रमायची.
कोजागिरीच्या रात्री माडीपौर्णिमेच्या मुहूर्तावर भुलाबाई सासरी जायला निघायची, त्यावेळी हार, भावल्या, पूजापत्रीची शिदोरी बांधून विहीर किंवा नदीवर तिचं विसर्जन केलं जायचं. जातानाही तिला गाणे गाऊनच निरोप दिला जायचा,
भुलाबाई जाते सासरी
जाते तशी जाऊ या
ताम्हणभर पाण्यात न्हाऊ द्या
बोटभर कुंकू लेवू द्या
चीर चोळी लेवू द्या
खीर पोळी खाऊ या
…………………………………..
(लेखक ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक आहेत )
8888744796
अविनाश दुधे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –अविनाश दुधे– type करा आणि Search वर क्लिक करा.
………………,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
भुलाबाईची ही गाणी नक्कीच तुम्हाला त्या काळात घेऊन जातील
पहिली गं पुजाबाई देवा देवा सा देव
साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा
खंडोबाच्या नारी बाई वर्षा वर्षा आवसनी
आवसनीच पाणी जस गंगेच पाणी
गंगेच्या पाण्याला ठेविला कंठ
ठेविला कंठ राणा भुलाबाईची
ठोकिला राळा हनुमंत बाळा
हनुमंत बाळाचे लांब लांब डोळे
टीकाळीचे डोळे हात पाय गोरे
भाऊ भाऊ एकसनी
माता पुढ टेकसनी
टेकसनीच एकच पान
दुरून भुलाबाई नमस्कार
एवढीशी गंगा झुळूझुळू वाहे
तांब्या पितळी न्हाय गं
हिरवी टोपी बाय गं
हिरवी टोपी हारपली
सरपा आड लपली
सरप दादा हेकोडा
जाई आंबा पिकला
जाई नव्हे जुई नव्हे
चिंचाखालची रानोबाय
चिंचा वेचत जाय गं
शंभर पान खाय गं
खाता खाता रंगली
तळ्यात घागर बुडाली
तळ्या तळ्या साखळ्या
भुलाबाई जाते माहेरा
जाते तशी जाऊ द्या
थालीभर पाण्याने न्हाऊ द्या
बोटभर मेण लाऊ द्या
बोटभर कुंकू लाऊ द्या
जांभळ्या घोड्यावर बसु द्या
जांभळ्या घोड्याचे उलटे पाय
आऊल पाऊल अमरावती गाव
अमरावती गावचे ठासे ठुसे
दुरून भुलाबाई चे माहेर दिसे
२….
आपे दूssध तापे
त्यावर पिवळी साय
लेकी भुssलाबाई
साखळ्यांचा जोड
कशी लेऊ दादा
घरी नंदा जावा
करतील माझा हेवा
हेवा कssरपली
नंदा गं लपली
नंदाचा बैल
डोलत येईल
सोन्याच कारलं
झेलत येईल
३….
घरावर घर बत्तीस घर
इतका कारागीर कोणाचा
भुलोजी च्या राणीचा
भूलोजीची राणी
भरत होती पाणी
धावा धावा कोणी
धावतील तिचे दोनी
दोनी गेले ताकाला
विंचू चावला नाकाला
४….
नंदा भावजया दोघी जणी
दोघी जणी
घरात नाही तिसर कोणी
तिसर कोणी
शिक्यातल लोणी खाल्ल कोणी
तेच खाल्लं वहिनीनी वहिनीनी
आता माझे दादा येतील गं येतील गं
दादाच्या मांडी वर बसील गं बसील गं
दादाची बायको चोट्टी चोट्टी
असू दे माझी चोट्टी चोट्टी
घे काठी लगाव काठी
घरा घराची लक्ष्मी मोठी
५….
काळा कोळसा झुकझुक पाना
पालखीत बसला भुलोजी राणा
भुलोजी राण्याचे कायकाय (आ)ले
सारे पिंपळ एक पान
एक पान दरबारी
दुसर पान शेजारी
शेजाऱ्याचा डामा डुमा
वाजतो तसा वाजू द्या
आम्हाला खेळ मांडू द्या
खेळात सापडली लगोरी
लगोरी गेली वाण्याला
वाण्या वाण्या सोपा दे
सोपा माझ्या गाईला
गाई गाई दुध दे
दुध माझ्या बगळ्याला
बगळ्या बगळ्या गोंडे दे
(गोंडे माझ्या राज्याला)
तेच गोंडे लेऊ सासर जाऊ
सासरच्या वाटे कुचू कुचू दाटे
पंढरीच्या वाटे नारळ फुटे
६….
नदीच्या काठी राळा पेरला
बाई राळा पेरला
एके दिवशी काऊ आला
बाई काऊ आला
एकच कणीस तोडून नेल
बाई तोडून नेल
सईच्या अंगणात टाकून दिल
बाई टाकून दिल
सईन उचलून घरात नेल
बाई घरात नेल
कांडून कुंडून राळा केला
बाई राळा केला
राळा घेऊन बाजारात गेली
बाई बाजारात गेली
चार पैशाची घागर आणली
बाई घागर आणली
घागर घेऊन पाण्याला गेली
बाई पाण्याला गेली
मधल्या बोटाला विंचू चावला
बाई विंचू चावला
७….
आला गं सासरचा वैद्दय
हातात काठी जळक लाकूड
पायात जोडा फाटका तुटका
नेसायचं धोतर फाटक तुटक
अंगात सदरा मळलेला
डोक्यात टोपी फाटकी तुटकी
तोंडात विडा शेणाचा
कसा गं दिसतो बाई म्हायरावाणी
गं बाई म्हायरावाणी
आला गं माहेरचा वैद्दय
हातात काठी पंचरंगी
पायात जोडा पुण्यशाई
नेसायचं धोतर जरीकाठी
अंगात सदरा मलमलचा
डोक्यात टोपी भरजरी
तोंडात विडा लालेला
कसा गं दिसतो बाई राजावाणी
गं बाई राजावाणी
८….
सा बाई सू sss सा बाई सू sss
बेलाच्या झाडाखाली महादेवा तूsss महादेवा तू
कृष्ण पंजरीsss कृष्ण पंजरी
खुंटी वरचा हार माझा श्याम पदरीss श्याम पदरी
काय करू माय कृष्णानी हार माझा नेलास कि काय ss नेलास कि काय
कृष्ण करे मोssर कृष्ण करे मोर चंदनाच्या झाडाखाली पाणी पितो मोर
डाव रंगीलाss डाव रंगीला गुलाबाचे फुल माझ्या पार्वतीलाss पार्वतीला
९….
काळी चंद्रकला नेसू कशी नेसू कssशी
जाईच तेल आणू कशी आणू कss शी
जाईच तेल आणल आणल
सासूबाईच न्हाण झाल
वन्साबाईची वेणी झाली
मामाजीची शेंडी झाली
उरलेलं तेल झाकून ठेवलं
रानोबाचा पाय पडला
सासूबाई सासूबाई अन्न द्या
दुधभात जेवायला द्या
आमच उष्ट तुम्ही खा
विडा घेऊन खेळायला जा
१०….
आमचे मामा व्यापारी व्यापारी
तोंडात चिक्कण सुपारी सुपारी
सुपारी काही फुटेना फुटेना
मामा काही उठेना उठेना
सुपारी गेले गडगडत गडगडत
मामा आले बडबडत बडबडत
सुपारी गेली फुटून फुटून
मामा आले उठून उठून
११….
अक्कण माती चिक्कण माती अशी माती सुरेख बाई
जातss ते टाकाव अस जात सुरेख बाई
गहू ते वल्वावे असे गहू सुरेख बाई
रवा तो पाडावा असा रवा सुरेख बाई
करंज्या भराव्या अशा करंज्या सुरेख बाई
तबकात ठेवाव्या अस तबक सुरेख बाई
शालुनी झाकाव असा शालू सुरेख बाई
खेळायला सापडते अस सासर द्वाड बाई
कोंडू कोंडू मारीते …
१२….
कारल्याची बी पेर ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याची बी पेरली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याला कोंब येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याला कोंब आल हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याला वेल येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याला वेल आला हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याला फुल येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याला फुल आले हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याला कारले लागू दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याला कारले लागले हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याची भाजी कर ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजी केली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याची भाजी खा ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याचा गंज घास ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याचा गंज घासला हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या सासऱ्याला सासऱ्याला
मामंजी मामंजी मला मूड आल पाठवता की नाही नाही
मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या भासऱ्याला भासऱ्याला
दादाजी दादाजी मला मूड आल पाठवता की नाही नाही
मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या जावेला जावेला
जाऊबाई जाऊबाई मला मूड आल पाठवता की नाही नाही
मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या नन्देला नन्देला
वन्स वन्स मला मूड आल पाठवता की नाही नाही
मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या दीराला दीराला
भाऊजी भाऊजी मला मूड आल पाठवता की नाही नाही
मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या नवऱ्याला नवऱ्याला
पतीराज पतीराज मला मूड आल पाठवता की नाही नाही
आन फणी घाल वेणी मग जा अपूल्या माहेरा माहेरा
आणली फणी घातली वेणी भुलाबाई गेल्या माहेरा
१३….
यादवरा या राणी रुसून बैसली कैसी
सासूरवाशीण सून घरात येना कैसी
सासू गेली समजावयाला
चला चला सुनबाई अपुल्या घराला
मी नाही यायची तुमच्या घराला
माझा पाटल्यांचा जोड देते तुम्हाला
तुमचा पाटल्यांचा जोड नको मजला
मी नाही यायची तुमच्या घराला
यादवरा या राणी रुसून बैसली कैसी
सासरे गेले समजावयाला
चला चला सुनबाई अपुल्या घराला
मी नाही यायची तुमच्या घराला
माझी घोडागाडी देतो तुम्हाला
तुमची घोडागाडी नको मजला
मी नाही यायची तुमच्या घराला
यादवरा या राणी रुसून बैसली कैसी
सासूरवाशीण सून घरात येना कैसी
खूप सुंदर !
खान्देशात सुद्धा भुलाबाई चे आगमन होत असे आणि जवळपास हीच भुलाबाई ची गाणी मुली म्हणायच्या .
मुलीबाळींच्याच नव्हे तर आमच्याही बालपणीच्या आठवणी या उत्सवाशी जुळलेल्या आहेत.