कहा गये वो लोग…

(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२४)

-अमोल उदगीरकर

एका सिनेमातून  प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर लगेच विजेसारखी निमिषार्धात गायब होणारी माणसं जणू नियतीने एकच विशिष्ट कामगिरी बजावण्यासाठीच त्यांना पृथ्वीवर पाठवलेलं असतं.आयुष्याच्या एका टप्प्यावर लाइमलाईट मध्ये असणाऱ्या आणि नंतर लाइमलाईटमधून बाहेर फेकली गेलेली माणसं या परिस्थितीशी कस डील करत असतील? पहिल्या सिनेमात नेत्रदीपक यश मिळविल्यानंतर पुढील काळात अडथळ्यांची शर्यत वाट्याला आलेल्या कलाकारांची चटका लावणारी कहाणी… 

…………………………………….

आमचा एक बॉस सातत्याने  खूप चांगलं परफॉर्म करणारा ऑफिसमधला एखादा सहकारी कार्यक्षमतेच्या आघाडीवर काही कारणांनी  ढासळू लागला की प्रेमाने कोपच्यात घेऊन सांगायचा , “क्या कर रहा है ?क्यूँ चंद्रचूड बन रहा है ?” त्याने अशा एकेकाळच्या प्रॉमिसिंग पण आपल्यातल्या शक्यतांना  न जागणाऱ्या लोकांना ‘चंद्रचूड सिंड्रोम ‘ याचं श्रेणीत टाकलं होतं .हा माझा माजी बॉस म्हणजे मानसशास्त्रज्ञ बनण्याच्या लायकीचा माणूस . तो एकेकाळी चंद्रचूड सिंग या ऍक्टरचा तुफान फॅन होता आणि चंद्रचूड सिंगने सिनेमातून जी अकस्मात कल्टी मारली ,त्यामुळे त्याने आपल्या आवडत्या हिरोला कधीच माफ केलं नव्हतं . चंद्रचूड सिंग आवडण्याचा पण एक काळ होता . चंद्रचूड सिंग हा अल्पकाळ का होईना इंडस्ट्रीमधल्या सगळ्यात महत्वाच्या माणसांपैकी एक होता . चक्क अमिताभ बच्चनने त्याला (आणि अर्शद वारसीला ) ‘तेरे मेरे सपने ‘ मध्ये लॉन्च केलं होतं . मग गुलजारच्या  ‘माचीस ‘ मधल्या रोलमधून पण त्याला creative acclaim मिळालं .मन्सूर खानच्या ‘जोश ‘ च्या वेळेस शाहरुखच्या बरोबरीने प्रमोशनमध्ये त्याचं नाव घेतलं जायचं. चंद्रचूडकडे सगळं होतं . पैसा , स्टारडम , प्रसिद्धी . पण आता आपलं सगळं भारी चालू आहे आणि आता काहीच वाईट होऊ शकत नाही, असं वाटतं असतानाच पुढच्या टप्प्यावर काही तरी फुग्याला टोचणी लावणारं तुमची वाट बघतं असतं .

‘जोश’ चं  शूटिंग संपवून चंद्रचूड मित्रांसोबत गोव्याला सुट्टीवर गेला असताना राफ्टिंग करताना त्याचा मोठा अपघात झाला .त्याचा खांदा खिळखिळा झाला .या अपघातामुळे होणाऱ्या वेदना असह्य होत्या.औषधोपचारांनी फारसा फरक पडत नव्हता.या वेदनांमुळे त्याला काम करणंच जमेना.मग त्याने हातातले सिनेमे कसेबसे संपवले. या अपघातानंतर त्याला अनेक शारीरिक मर्यादा आल्या.चंद्रचूडचं वजन झपाट्याने वाढू लागलं. शारीरिक वेदनांमुळे त्याने काम करणं थांबवलं की वजन वाढल्याने त्याला रोल मिळेनात हे चंद्रचूडच सांगू शकतो.चंद्रचूड बाहेर फेकला गेला.काही वर्षानंतर वेदना थांबल्या .पण तो कमबॅक करू शकत नव्हता.कारण त्याच्यावर त्याच्या मुलाची जबाबदारी होती.चंद्रचूड एकल पालक असल्याने त्याच्यावर मुलाची जबाबदारी होती. फिल्म इंडस्ट्रीमध्ये आलो तर आपण मुलाला वेळ देऊ शकणार नाही, हे त्याला माहित होतं. मग त्याने ग्लॅमरच्या जगात येण्याची दुसरी  संधी पण नाकारली. स्वतःचा बिझनेस सांभाळत लाईम लाईटच्या बाहेर निवांत जगला. मी अलीकडे  ‘आर्या’ सिरीज बघितली, त्यात चंद्रचूड दिसला आणि मनापासून आनंद झाला.

काही दिवसांपूर्वी काही मित्रांशी गप्पा मारताना  डिस्कशन्स करताना चंद्रचूड सिंगचा  विषय निघाला आणि एका सिनेमातून  प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर लगेच विजेसारखी निमिषार्धात गायब होणारी माणसं हा विषय डोक्यात घोळायला लागला.  जणू नियतीने एकच विशिष्ट कामगिरी बजावण्यासाठीच त्यांना पृथ्वीवर पाठवलेलं असतं . वेस्ट इंडीजसारख्या संघाविरुद्ध एकाच टेस्ट सामन्यात सोळा विकेट काढणारा नरेंद्र हिरवाणी आणि पाकिस्तानविरुद्ध चुरशीच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये फोर मारून जिंकून देणारा हृषीकेश कानेटकर ही अशी काही उदाहरण . त्या एका सामन्यातल्या कामगिरीमुळे त्यांचं नाव इतिहासामध्ये ध्रुवताऱ्यासारखं अढळ झालं. त्यांनी अगोदर काय केलं आणि नंतर काय केलं याच्याशी कुणालाच देणं घेणं नाही. ते एक सामने हीच त्यांची ओळख. अशी उदाहरणं जवळपास प्रत्येक क्षेत्रात सापडतील. ‘इंडियन आयडॉल’ चे अभिजित सावंत सारखे त्याकाळी भूतो न भविष्यती लोकप्रियता पाहिलेले विजेते आता एकदमच दुर्लक्षित असण्याच्या फेजला कस डील करत असतील ? किंवा सोशल मीडियावर काही काळापुरतं ट्रेंड होऊन पुन्हा नेहमीच्या आयुष्याच्या घाण्यात शिरणारी लोक तरी काय वेगळी असतात . शाळा -कॉलेजमध्ये आपल्यासोबत असणारे काही त्याकाळी नेक्स्ट बिग थिंग म्हणून गणले जाणारे आणि आपल्याला त्या वयात कायम न्यूनगंड  देणारे क्लासमेट्स -मित्र नंतर आयुष्यात काही तरी सर्वसामान्य करताना दिसतात तेंव्हा पण आश्चर्य वाटतं .

खोटं कशाला बोला मनात आनंद पण होतोच . आपल्यामुळेपण अनेकजणांना असा आनंद मिळाला असणारच ही एक नाण्याची दुसरी बाजू झालीच . पण मला उत्सुकता आहे ती अशा आयुष्याच्या एका टप्प्यावर लाइमलाईट मध्ये असणाऱ्या आणि नंतर लाइमलाईटमधून बाहेर फेकली गेलेली माणसं या परिस्थितीशी कस डील करत असतील याची. मला एका शोबिझ मधल्या अशाच लाइमलाईटमधून बाहेर फेकल्या गेलेल्या फिल्म डायरेक्टने एक फार कटू सत्य सांगितलं होत . तो म्हणाला होता की , आयुष्यात यशाची आणि प्रसिद्धीची प्रचंड आस ठेवणे  पण ती न मिळणं हे दुःख माणूस एकवेळ सहन करू शकतो पण काही काळापुरत्या या गोष्टी मिळाल्यावर त्या हातातून कायमच्या निसटून जाण हे दुःख सहन करण्याच्या पलीकडचे असते .आपले सुगीचा काळ आता मागं पडला  आहे आणि आता आयुष्यातला कधीही न संपणारा उतार सुरु झाला आहे, ही वस्तुस्थिती स्वीकारणं ही एक खूप अवघड गोष्ट असावी . शाहरुख खान एका मुलाखतीमध्ये म्हणाला होता की , ‘उद्या माझ्याभोवती गर्दी नाही जमली किंवा मन्नतसमोर कुणीच आलं नाही तर मला वेड लागेल.’ यशस्वी माणसाला असं कन्फेशन देणं सोपं असतं . प्रसिद्धीच्या झोताबाहेर फेकल्या गेलेल्या माणसाला हे नेहमीच शक्य होईल असं नाही .

आपल्या सिनेमा क्षेत्राला ‘फिल्म इंडस्ट्री ‘ असं म्हणून ओळखलं जातं असलं तरी  हे क्षेत्र अतिशय बेभरवशाचं अस्थिर मानलं जातं . प्रत्येक शुक्रवारी इथं नवीन राजा उदयाला येतो आणि प्रत्येक शनिवारी कुणाचीतरी धूळधाण उडते . या प्रचंड अस्थिरतेचा फटका बॅकग्राउंडला नाचणारे लोक , कॅमेरा डिपार्टमेंटमध्ये काम करणारे लोक, फाईट मास्टर या सगळ्यांनाच बसत असतो . ‘लक बाय चान्स’ या चित्रपटात एक सुंदर सीन आहे. अभिनय क्षेत्रात स्ट्रगल करणारा विक्रम (फरहान) त्याच्यासारखाच स्ट्रगल करणाऱ्या सोनाच्या (कोंकणा सेन)  घरी आलेला असतो. सोना बाहेर जाऊन कुठूनतरी दूध घेऊन येते. ‘इतका वेळ तू कुठे गायब होतीस?’ अशी विक्रम तिला विचारणा करतो. त्याच्या या साध्या प्रश्नाला सोना जे उत्तर देते, ते बॉलिवुडच्या महत्त्वाच्या पण दुर्लक्षित पेशाकडे आपलं लक्ष वेधतं. सोना विक्रमला सांगते की, तिचा फ्रिज बिघडला असल्यामुळे ती शेजारच्या वर्मा आंटीच्या फ्रिजमध्ये दूध ठेवते, ते दूध घ्यायला ती गेली होती.  इतकी चांगली शेजारीण सोनाला मिळाली आहे याबद्दल विक्रमला कौतुक वाटतं. पण लगेच सोना त्याला अपडेट करते, वर्मा आंटी याचे तिच्याकडून पैसे घेत असतात. थोडक्यात फ्रिज भाड्यानं देत असतात.

वर्मा आंटीची असं करण्यामागे काही कारणं असतात. त्यांचे पती एकेकाळी स्टंटमास्टर असतात. एका अवघड स्टंटचं शूटिंग करताना त्यांना मोठा अपघात होतो आणि ते अपंग होऊन अंथरुणाला खिळतात. “वर्मा आंटी को भी अपना घर चलाना है,” असं सोना वर्मा आंटीच्या वागण्याचं स्पष्टीकरण देते. ‘लक बाय चान्स’मधला हा सीन इंडस्ट्रीमधल्या  काम करणाऱ्या शेकडो लोकांच्या अवस्थेवर भाष्य करतो. साठ आणि सत्तरच्या दशकांमधल्या अभिनेत्यांच्या आणि अभिनेत्रींच्या धुळधाणीचे अनेक किस्से आहेत. असाच एक धूळधाण झालेला अभिनेता सिग्नलवर भीक मागायला लागला होता. दिलीप कुमारची गाडी जेव्हा जेव्हा सिग्नलवरून जायची तेव्हा दिलीपकुमार त्याला शंभरची नोट द्यायचा. एकेकाळी अतिशय वैभवाचे दिवस पाहिलेला भारतभूषणसारखा अभिनेता नंतर नंतर काम मागण्यासाठी निर्मात्यांच्या घराच्या बाहेर लाचारपणे उभा असायचा . इंडस्ट्रीमधल्या एका सक्सेस स्टोरीमागे अशा अनेक दुर्दैवी कथा पण असतात . कारकिर्दीच्या सुरुवातीला मोठं यश बघणारे अनेक अभिनेते अचानक कुठे गायब होतात ? त्यांच्या व्यावसायिक अधःपतनाची कारण काय असतात ? त्यांचं पुढं काय होतं ? कहा गये वो लोग ? या काही प्रश्नांची उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न .

मंदाकिनी उर्फ यास्मिन जोसेफ म्हटलं की, लोकांना ‘राम ‘तेरी गंगा मैली’ आठवतो आणि दाऊद इब्राहिम. त्यात काही चूकही नाही. तिला काही सिनेमांमधून क्रांती करायची नव्हती की, तिला काही सामाजिक जाणीव नव्हती. सिनेमात पैसे मिळतात म्हणून दिसायला सुंदर असणारी ही मुलगी या क्षेत्रात आली. राज कपूरसारख्या शोमॅनने तिला पहिली संधी दिली, पण मंदाकिनीच्या करिअरने कधी उड्डाण घेतलंच नाही. त्यावेळेस बॉलिवुडभोवती अंडरवर्ल्डचा घट्ट विळखा होता. अंडरवर्ल्ड डॉन अनेक निर्मात्यांना पैसे पुरवत असत. सर्वसामान्य लोकांप्रमाणेच हे डॉन बॉलिवुडच्या ग्लॅमरकडे आकर्षित झाले होते. एखादी पडद्यावरची हजारो लोकांची दिलो की धडकन असणारी नायिका आपल्या आयुष्यात यावी अशी त्यांचीही ‘फँटसी’ होती. दाऊद इब्राहिम आणि मंदाकिनी एका पार्टीमध्ये भेटले आणि दाऊद तिच्याकडे आकर्षित झाला अशी वंदता आहे, नंतर शारजाहला क्रिकेट पाहतानाचे दोघांचे एकत्र फोटो झळकले. आणि लोकांमध्ये दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. दोघांनी कधीही आपल्या प्रेमप्रकरणाची जाहीर कबुली दिली नाही हे विशेष. पण मंदाकिनीला या चर्चांचा फटका बसला. तिला मिळणार काम कमी होत गेलं. नंतर तर ती मुख्य प्रवाहाच्या बाहेरच फेकली  गेली. तिने काही म्युझिक अल्बम केले, पण ते कधी येऊन गेले ते कळलंही नाही.

आयुष्यात मर्यादित पर्याय उरल्यावर बहुतेक नट्या जो पर्याय निवडतात तोच मंदाकिनीने निवडला. तिने लग्न केलं. तिचा नवरा एकेकाळी प्रचंड लोकप्रिय होता आणि घराघरांत त्याचा चेहरा पोहोचलेला होता, हे सांगितलं तर अनेकांना आश्चर्य वाटेल. ते म्हणजे डॉ. रिंपोचे ठाकूर. रिंपोचे ठाकूर म्हणजेचं सत्तरच्या दशकात गाजलेला मर्फी बॉय. त्यावेळेस रेडिओ कॅम्पेनमध्ये गाजलेला गोंडस मुलगा. रणबीर कपूरच्या ‘बर्फी’ चित्रपटात त्याचे संदर्भ येतात. माजी बौद्ध भिक्षु असलेले रिंपोचे ठाकूर सध्या मुंबईत हर्बल सेंटर चालवतात. आदर्श बायकोप्रमाणे मंदाकिनी त्यांची मदत करते. एकेकाळची ग्लॅमरस अभिनेत्री आता पूर्णपणे गृहिणी बनली आहे. काही दिवसांपूर्वी काही न्यूज चॅनलवाले तिच्या घरी कुठलीही वर्दी न देता धडकले, त्यावेळेस ती चक्क कपडे धूत होती. तिला तिच्या वादग्रस्त भूतकाळातून बाहेर यायचंय. त्यामुळे ती माध्यमांमध्ये फारशी दिसत नाही. आयुष्याच्या सेकंड इनिंगमध्ये ती समाधानी आहे!

कधी कधी दोष तुम्हाला मिळालेल्या आभाळाएवढ्या लेगसीचा असतो. आमिर खानचा भाऊ फैसल खान आणि पुतण्या इम्रान खान हे याचं आदर्श उदाहरण. घरात एखादा  उत्तुंग , प्रचंड कर्तबगार पुरुष /स्त्री असण्याचे जितके फायदे असतील ,त्याच्यापेक्षा जास्त तोटे असण्याचीच जास्त शक्यता असते . सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे त्या कर्तबगार माणसाच्या छायेत त्याच्या परिवारातले  इतर सदस्य खुरटून जातात . आणि  वटवृक्षाच्या पारंब्यांना लटकत राहण्याचं भागधेय त्या कर्तबगार माणसाच्या पुढच्या पिढ्यांच्या नशिबी येतं .कानेटकरांच्या याच विषयावर असणाऱ्या नाटकाचं नावं ‘सूर्याची पिल्लं’ असं समर्पक होतं . देशात किंवा महाराष्ट्रात सामाजिक ,राजकीय , खेळाच्या किंवा मनोरंजनाच्या क्षेत्रात असणाऱ्या तालेवार घराण्यांची यादी काढून बघा . सूर्याची पिल्लंच जास्त दिसतील . दोष त्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा नसतो आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांचा पण नसतो .नियतीच्या कुठल्याश्या फटकाऱ्यानी (Strange stroke of luck ) ही लोक एका छताखाली येतात . पुरात वाहत जाणारी भांडी एकमेकांवर आपटतात . मातीची भांडी फुटतात आणि लोखंडाची भांडी टिकतात . दुर्दैव हे की तुम्ही कुठल्या प्रकारचं भांड असावं हे तुमच्या हातात नसतं .अभिनेता  इम्रान खानसंबंधीची एक बातमी वाचून आमिर खानच्या घरातल्या  वेगवेगळ्या पिढ्यांमधल्या पुरुषांची शोकांतिका पुन्हा याच नियमावर गडद ठप्पा मारते.

आमिरचा सख्खा भाऊ फैसल . आमिरने आपल्या भावासाठी काय नाही केलं ? त्याच्यासाठी सिनेमे काढले , वैयक्तिक आयुष्यात त्याच्यासाठी खस्ता खाल्ल्या ,आर्थिक मदत केली आणि बरंच काही केलं . पण फैसलमध्ये आमिरच्या दहा टक्के पण कुवत नव्हती . ‘सिबलिंग रायव्हलरी ‘ कुठंतरी असतेच .आपल्या अपयशाला आमिरचं कारणीभूत आहे असा फैसलचा समज झाला . दुर्दैवाचा शेवटचा घाव म्हणजे फैसलला स्किझोफ्रेनिया झाला .मानसिक संतुलन ढासळलं .त्याने जाहीर पत्रकार परिषद घेऊन आमिरवर नाही नाही ते आरोप केले . शेवटी त्याला मानसिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं . आमिरनेच ती जबाबदारी उचलली . तो बरा होऊन बाहेर आला . अजूनही संबंधामध्ये ताणतणाव आहेतच . पण किमान आघाडीवर शांतता आहे . आता फैसल खान सोशल मीडियावर अतिशय क्रिन्ज व्हिडीओ बनवत असतो आणि आपण लवकरच नवीन पिक्चर सेटवर नेणार आहोत,अशा घोषणा करत असतो . हे पिक्चर कधीच सेटवर जात नाहीत हे वेगळं  सांगायची गरज नाहीच.

इम्रान खानचा  ‘जाने तू या जाने ना ‘ आणि रणबीरचा ‘सांवरिया ‘ एकाच वर्षी प्रदर्शित झाले . ‘जाने तू या जाने ना ‘  हिट झाला आणि ‘सावरिया ‘ फ्लॉप . एकेकाळी रणबीरचा तुल्यबळ प्रतिस्पर्धी असणारा इम्रान नंतर मात्र झपाट्याने मागे पडत गेला . त्याने जे मोजके दोन हिट दिले त्यातले दोन (‘जाने तू या जाने ना ‘  आणि डेली बेली ) आमीरनेच प्रोड्युस केले होते . पण आमीरशी सातत्याने होणारी तुलना इम्रानला झेपणं शक्य नव्हतं . ‘कट्टी बट्टी ‘ सिनेमा (साल २०१५) करून इम्रान खान घरी बसला . त्याने काहीही करायचं नाकारलं . किती भयंकर डिप्रेशन असेल ? त्याची बायको म्हणजे त्याची पहिली जुनी प्रेयसी . इम्रानचं काहीच न करता घरी बसणं तिच्या अंगावर यायला लागलं. काही काळानंतर सगळं असह्य झाल्यानंतर आपल्या छोट्या मुलीला घेऊन तिने घरं सोडलं . आता त्या मोठ्या घरात इम्रान एकटाच राहतोय . याबाबतीत इम्रानचं काहीसं साम्य त्याचा काका आणि आमिरचा भाऊ मन्सूर खानशी आहे . एकूणच रॅट रेसला कंटाळलेल्या  मन्सूरने  मुंबईच सोडली आणि एका शांत हिलस्टेशनवर स्थायिक झाला . सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर लोकांना पुन्हा इम्रान आठवला .त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर त्याची वास्तपुस्त करणारे , काळजी घे असं सांगणारे मेसेज लोक टाकू लागले .इम्रानचा सुशांत सिंग राजपूत होऊ शकतो, ही  कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे.

दोन पुरुषांच्या दोन शोकांतिका . यांना आमिर कितपत जबाबदार आहे किंवा तो या टाळू शकला असता का ? त्याने प्रयत्न नक्कीच केले असणार . पण त्याच्या आजूबाजूच्या लोकांवर पडणारी त्याची भली मोठी सावली तो कशी थांबवणार होता ? वर लिहिल्याप्रमाणे लोहाची भांडी टिकणार आणि मातीची भांडी फुटणार. हेच तर विधिलिखित आहे . जयवंत दळवींची ‘धर्मानंद ‘ ही माझी आवडती कादंबरी . कोकणातल्या एका तालेवार जमीनदार घराण्याची वाताहत सांगणारी ही कादंबरी . कादंबरीचा नायक असणाऱ्या धर्मानंदचे आजोबा धर्मानंदच्या पूर्ण घराण्यावर पकड ठेवून असतात . एकाकाका, धर्माचे वडील , धर्माची आजी , धर्माची विधवा आत्या  ही सगळी हाडामांसाची माणसं हळूहळू उध्वस्त होत जातात . धर्माचे कर्तबगार, दरारा असणारे आजोबा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या या वाताहतीला कारणीभूत असतात . यामुळे धर्माचा आजोबांवर प्रचंड राग असतो . पण बरीच उलथापालथ झाल्यावर धर्माला एक चिरंतन सत्य कळतं  . शेवटी ही ताकदीची ,वर्चस्वाची लढाई आहे .ती सगळ्याच परिवारामध्ये चालू असते .ती वर्चस्वाची लढाई खेळावीच लागते . मग तुम्ही जिंकता कसे हे महत्वाचं नाही . जो टिकून राहिला तो जिंकला . एकदा हे कळल्यावर धर्मानंदला आजोबांबद्दल पण आपुलकी वाटते . सूर्याच्या पिल्लांना सहानुभूती दाखवताना सूर्याकडे एकदमच दुर्लक्ष करायला नको. सूर्य नेहमीच खलनायक असतो असं नाही .नाही का ?

असाच अजून एक झाकोळून गेलेला दुसरा अभिनेता म्हणजे संजय कपूर. एक ‘सिल्व्हर मेडल सिंड्रोम’ नावाचा फेनॉमेन आहे . एका संशोधनात  असं आढळलं की ऑलम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्यांपैकी सगळ्यात दुःखी असतात ते सिल्व्हर मेडल मिळवणारे . आपण आपल्याकडचं सगळं देऊन पण आपल्याला गोल्ड मेडल मिळालं नाही याची खंत सिल्व्हर मेडलवाल्याना आतून खात राहते . स्पर्धा खूपच टाईट असल्यामुळे थोडक्यात हुकलेलं सुवर्ण पदक त्यांना टोचण्या देत राहतं . याचाच व्यत्यास असा की सगळ्यात आनंदी असतात ब्रॉंझ पदक मिळवणारे. आपण पोडियमवर उभे आहोत हेच खूप आहे ह्याची त्यांना जाणीव असते . सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणाशीही तुलना न करता त्यांना आपलं यश उपभोगण्याची मुभा असते . हा फेनॉमेन बाकीच्या क्षेत्रात पण लागू होत असणार . मला शर्यतीत तिसऱ्या चौथ्या येणाऱ्या लोकांचं आकर्षण बहुतेक इथूनच आलं असणार . कारण एक मोठा समूह या फार जिनियस नसणाऱ्या आणि आपण अजून शर्यतीमध्ये टिकून आहोत यातच खुश असतो . ब्रॉंझ मेडल सिंड्रोमचे हे सगळे लाभार्थी . शर्यत जिंकायला पाहिजे , wining is everything हे सगळं ठीक . पण विजेता हा एकच असतो आणि त्याच्या मागे उभी असते न जिंकलेल्या लोकांची मोठी खानेसुमारी. मला दिनेश मोंगिया , रिमी सेन , शेतकरी कामगार पक्ष आणि तत्सम लोक-संस्थांबद्दल त्यामुळेच आकर्षण वाटतं.

अजून एक म्हणजे संजय कपूरकडे बघितलं की हा ब्रॉंझ मेडल मिळवणारा आनंदी माणूस आठवतो . संजय कपूरचे दोन्ही भाऊ लौकिकार्थाने यशस्वी वगैरे असणारे . संजय कपूरची गणित पदार्पणापासूनच चुकत गेली . त्याचा पहिला पिक्चर ‘प्रेम ‘ इतका रखडला की जेव्हा तो एकदाचा रिलीज झाला तेंव्हा संजयचं  वय होतं ३३ वर्ष . तो रखडलेला पिक्चर फ्लॉप गेला. पण नंतरही सलग फ्लॉपची लाईन . एखादा ‘राजा ‘ सारखा हिट मिळाला पण त्याचंही श्रेय माधुरी दीक्षितला मिळालं . मला घराणेशाहीचे लाभार्थी असणाऱ्या किशन कुमार आणि संजय कपूरबद्दल उगीचंच आपुलकीची भावना होती . त्याचं कारण अजूनही माहित नाही . पण संजय कपूर रखडला रखडला आणि बाजूला गेला . देवगण ,सनी देओल , शेट्टीच्या सिनेमात दुय्यम  भूमिका करायला लागला . तो तसा वाईट अभिनेता नव्हता, असं एक अलोकप्रिय मत होतंच .

 पण एक संधी कुणाचंही नशीब पालटवू शकते . झोया अखतरने ‘लक बाय चान्स ‘ मध्ये संजय कपूरला एक छोटी पण काहीच्या काहीच झकास भूमिका दिली आणि संजय कपूर पण अभिनय करू शकतो हे पब्लिकला कळलं . संजय कपूरने यात रणजित रॉली नावाच्या अयशस्वी अभिनेता कम नवोदित दिग्दर्शकाची भूमिका केली होती. रणजित रॉली आणि संजय कपूरमध्ये अनेक साम्य होती . दोघंही घराणेशाहीचं प्रॉडक्ट असतात . संजय कपूरसारखाच रणजित पण आपल्या मोठ्या भावाच्या छायेखाली झाकोळून गेलेला असतो. आपण अपयशी अभिनेते आहोत ही भावना रणजित रॉलीच्या डोक्यातून जात नसते . या भावनेतून त्याच्यात एक कडवटपणा आलेला असतो. त्यातून तो जफरखान (हृतिक रोशन ) बद्दल एक खुन्नस बाळगून असतो . जफरने दिलेले इनपुट्स त्याला आवडत नसतात . ‘हम भी ऍक्टर रह चुके है ‘ हे पालुपद तो सतत आळवत असतो . त्याची ती ‘थिंकिंग कॅप ‘ तर अफाट . ‘सीन मे मैने इमोशन को निचोड के रख दिया है ‘ असली स्पष्टीकरण ओल्ड स्कूल ऍक्टर आणि डायरेक्टरचं देऊ शकतो . फिल्म रिलीज होते त्यादिवशी आनंदाने येऊन सांगतो , ‘जबलपूर मे तिकीट की लाईन मे चक्कू चल गये .’ आज ‘लक बाय चान्स ‘ पुन्हा बघताना आपण कोंकणा सेन शर्मा इतकंच संजय कपूरसाठी पण हा सिनेमा बघतो, हे पुन्हा जाणवलं . रणजित रॉली हा संजय कपूर होता आणि संजय कपूर हाच रणजित रॉली होता .  दोघांना वेगळं बघणं शक्य नाही . ‘लक बाय चान्स ‘ नंतर पहिल्यांदाच संजय कपूरला प्रेक्षक आणि फिल्म फ्रॅटर्निटीमध्ये मान मिळायला लागला . संजय कपूरला नंतर चांगल्या भूमिका मिळाल्या लागल्या . ‘द फेम गेम ‘ या सीरिजमध्ये तर त्याने माधुरी दीक्षितपेक्षा पण चांगलं काम केलं होतं . संजय कपूर अनिल कपूरसारखा गोल्ड मेडलिस्ट नाहीच . तो पोडियमवर उभा आहे हेच खूप आहे . आणि तेच महत्वाचं आहे .

‘आशिकी’ आला होता तेव्हा मी शाळकरी होतो. त्यातलं नदीम-श्रवणचं संगीत किती गाजलं, याची उजळणी करण्याची गरज नाही. अगदी साठी-सत्तरीच्या नॉस्टाॅलजियातून बाहेर पडायला तयार नसलेलं पब्लिकसुद्धा ‘आशिकी’मधल्या गाण्यांच्या प्रेमात आहे आणि सध्याच्या ‘यो जनरेशन’च्या ओठीही ‘आशिकी’ची गाणी रेंगाळतात. या दरम्यान लटकलेली आमची पिढी तर अजूनही ‘आशिकी’च्या हँगओव्हरमधून बाहेर यायला तयार नाही. या सिनेमातून पदार्पण करणाऱ्या राहुल रॉय आणि अनु अगरवाल या नवीन जोडीचं पदार्पण चित्रपटाच्या संगीताने झाकोळून टाकलं. पण गाड्यासोबत नळ्याची यात्रा, या न्यायाने त्यांच्या अभिनय कारकिर्दीला दणकून सुरुवात झाली.बॉलीवूडमध्ये दरवर्षी अनेक नवोदित कलाकार पदार्पण करत असतात. त्यातले बहुतेक जण ‘वन फिल्म वंडर’ असतात. पहिला चित्रपट दणकून आपटल्यावर त्यांचा दुसरा चित्रपट पडद्यावर येतही नाही. पण काही दुर्दैवी लोक असतात की, ज्यांचा पहिला चित्रपट सुपरहिट असतो. घराघरात त्यांचं नावं पोहोचतं. अनेक नवीन प्रोजेक्टही मिळतात. तरीही त्यांचं करियर अपेक्षित वळणं घेत नाही. एखादं पाणी आणि प्रकाश न मिळालेलं झाडं जसं सुकत जातं, तसं त्यांचं करिअर हळूहळू संपत जातं. राहुल रॉय आणि अनु अगरवाल यांचंही तेच झालं. अनु अगरवालने नंतर मणिरत्नमचा ‘थिरुडा थिरुडा’, राकेश रोशनचा ‘किंग अंकल’ आणि सावनकुमार टाकचा ‘खलनायिका’ असे मोठे सिनेमे केले. पण तिचं करिअर पुन्हा कधीच ‘आशिकी’ची उंची गाठू शकलं नाही. मणी कौलसारख्या प्रख्यात दिग्दर्शकाच्या चित्रपटात तिने बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडणारी भूमिका साकारली. पण फारसा उपयोग नाही झाला. अनु अगरवाल नावाची नायिका हळूहळू प्रेक्षकांच्या स्मृतीमधून धूसर झाली. आणि एका क्षणी ती गायबच झाली. माध्यमांमधून आणि तिला ओळखणाऱ्या लोकांमधूनही…

तिच्या या अचानक अदृश्य होण्यामुळे निरनिराळ्या अफवा उठल्या, नंतर विरल्याही. या मायानगरीत कुणाकडे वेळ आहे, कुठल्या एका नटीचा पाठपुरावा करण्याइतका? अनु अगरवालसोबत जे घडलं, त्याला ‘ट्रॅजेडी’ हा शब्द कमी पडावा. एका काळरात्री पार्टीहून परतताना दक्षिण मुंबईत अनु अगरवालला भीषण अपघात झाला. तिची मर्सिडिज उलटीपालटी होत समुद्रात गेली. योगायोगाने घटनास्थळी हजर असणाऱ्या पोलिसांनी गाडीचालकाला वाचवलं, ती अनु अगरवाल होती. पोलिसांनीच जखमी अनुला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं. अपघातात ती इतकी जबर जखमी झाली होती, की ती महिनाभर कोमात गेली. डॉक्टरांना ती वाचेल असं वाटतं नव्हतं. पण अनुची इच्छाशक्ती जबर होती. ती कोमातून बाहेर आली. पण तिच्या शरीरावर आणि मेंदूवर अपघाताचे व्रण शिल्लक होते. अनु तिच्या पूर्वायुष्यातल्या अनेक गोष्टी विसरून गेली होती. जवळच्या लोकांना ओळखायला तिला त्रास होत होता. चेहरा, हात, पाय आदींवर गंभीर परिणाम झाला होता. तिची तुटलेली हाडं सांधण्यासाठी डॉक्टरांनी तिचं शरीर धातूंनी भरून टाकलं होतं. चेहऱ्यासकट शरीराच्या अर्ध्या भागाला अर्धांगवायू झाला होता. तिचा चेहरा तर इतका बदलला होता, की पूर्वाश्रमीची सौंदर्यवती अनु अगरवाल ती हीच, हे सांगितल्यावर त्रयस्थाला ते पटलं नसतं.

शरीर हे अभिनेत्याचं शस्त्र असतं, अशी एक थिअरी नसिरुद्दीन शाह कायम मांडत असतात. अनु अगरवालचे हे शस्त्र तोडूनमोडून गेलं होतं. पण एक गोष्ट तो भीषण अपघात मोडू शकत नव्हता, अनुचा आत्मविश्वास! आपण आता पूर्वीसारख्या सुंदर दिसू शकत नाहीत, हे सत्य तिने स्वीकारलं होतं. ती अध्यात्म आणि योगशास्त्राकडे ओढली गेली होती. उत्तराखंडात जाऊन तिने अनेकदा विपश्यना केली. भूतकाळाची भयाण भूतं गाडून टाकण्यासाठी तिला याचा उपयोग झाला. शो-बिझनेसकडे आपल्याला परत जायचं नाही, हे तिने पक्कं ठरवलं होतंच, पण आयुष्य विधायक कामांना वाहून घ्यायचं, हेही तिने निश्चित केलं होतं. सध्या ती मुंबईमधल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांना योगासने शिकवते. धारावीमध्ये काम करणाऱ्या ‘जरुरत’ या स्वयंसेवी संस्थेशी तिने स्वतःला जोडून घेतले आहे. तिचा अट्टाहास हा प्रसिद्धीसाठी नाही. पण, मध्यंतरी एका पत्रकाराने तिचा पाठलाग करून अनु अगरवालचं हे नवीन आयुष्य जनतेसमोर आणलं.

आपला पुनर्जन्म कसा झाला, याबद्दल सांगणारं तिचं ‘Anusual : Memoir of a Girl Who Came Back from the Dead’ प्रकाशित झालं आहे. त्यात अनु लिहिते की, मी वर्तमान क्षणात राहण्याचा प्रयत्न करते. मी माझ्यासोबत जे झालं किंवा भविष्यकाळात काय होईल, याचा यत्किंचितही विचार करत नाही. एक गोष्ट मात्र नक्की. कितीही मोठी ऑफर आली तरी ती बॉलीवूडमध्ये परतणार नाही. तो विचार आता बदलणं शक्य नाही. आपल्या मसाला फिल्म्सला आपण गंभीरतेने घेत नसलो, तरी त्यातले काही संवाद आयुष्याला खूपदा लागू पडतात. ‘ओम शांती ओम’ चित्रपटातला असाच एक संवाद अनुच्या आणि तुमच्या-माझ्या आयुष्याला लागू पडतो. ‘हमारी फिल्मों की तरह हमारी जिंदगी में भी एन्ड में सब ठीक हो ही जाता है. और अगर सब ठीक ना हो तो, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त…’

राहुल रॉय पण पदार्पणानंतर काहीच वर्षांनी इंडस्ट्रीच्या बाहेर फेकला गेला . लोकांच्या दीर्घकाळ लक्षात राहील असं त्याच्याकडे काही नव्हतंच . भारतीय ‘बिग बॉस ‘ च्या पहिल्या संस्करणात तो होता आणि चक्क त्या सीझनचा तो विजेता पण होता . नंतर राहुल रॉय कुठल्यातरी बिझनेसमध्ये प्रस्थापित झाला होता . पण व्यवसायिक कारणांमुळेच तो कुठल्यातरी कोर्टाच्या प्रकरणात अडकला होता . आता नुकत्याच आलेल्या कानू बहेलच्या ‘आग्रा ‘ सिनेमात पण तो आहे .

एक मात्र आहे . नव्वदच्या दशकात आलेले अभिनेते हे तसे व्यवसायिकदृष्ट्या स्मार्ट आहे . घरदार विकून वणवण फिरायची वेळ त्यांच्यावर सहसा येत नाही . जागतिकीकरण भारतात आल्यावर गुंतवणुकीच्या अनेक नवनवीन संधी भारतात उपलब्ध व्हायला लागल्या. यातल्या अनेक अभिनेत्यांनी रियल इस्टेट ,म्युचल फंड , शेअर मार्केट इथं कारकिर्दीच्या सुरुवातीलाच गुंतवणूक केल्या . त्याची रसभरीत फळ त्यांना त्यांच्या पडत्या काळात मिळाली . त्यांना रोटी ,कपडा आणि मकानसाठी इतर कुणावर अवलंबून राहावं लागलं नाही . कुणाच्या पुढे हात पसरायची वेळ आली नाही . टीव्हीच्या आगमनानंतर आणि आता ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या सुगीच्या काळात त्यांना कामाच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत .

कधी कधी अभिनेत्यांना फिल्म्समधल्या बदलत जाणाऱ्या ट्रेंड्सचा जोरदार फटका बसतो . ‘तुम बिन ‘ मधला अभिनेता प्रियांशु हे याचं उदाहरण . प्रियांशु हा एक रोचक केस स्टडी आहे . कसं ?

२००१ मध्ये आलेल्या ‘दिल चाहता है ‘ आणि ‘लगान ‘ ने भारतीय सिनेमाच्या इतिहासातलं नवीन युग सुरु केलं असं मानलं जातं . हे मान्य असेल तर २००१ सालीचं  आलेला ‘तुम बिन ‘ ही सरत्या युगाची शेवटची हाळी मानायला पाहिजे . नव्वदच्या दशकातला सिनेमा म्हणल्यावर जे जे डोळ्यासमोर येतं ते सगळं ‘तुम बिन ‘ मध्ये होतं . प्रेमाचा त्रिकोण , हिट्ट गाणी , हॅपी एंडिंग ,कथानकातल्या  अतार्किक घटना सगळं होत ‘तुम बिन ‘ मध्ये . त्या अर्थाने ‘तुम बिन ‘ हा शेवटचा मालुसरा . ‘तुम बिन ‘ हा गुलजारच्या ‘किनारा ‘ चीच थोडी बदललेली आवृत्ती होता . मिलेनियल्स च्या नॉस्टेल्जीयातला फार महत्वाचा टप्पा आहे ही फिल्म . या फिल्ममध्ये पदार्पण केल्या चारही नवोदितांच पुढं काय झालं हे बघणं फार रोचक आहे . कुणीतरी त्यांच्याबद्दल ‘तुम बिन कर्स ‘ ही कल्पना वापरली होती . म्हणजे आश्वासक सुरुवात मिळून पण संदली सिन्हा , आपला राकेश बापट ,हिमांशू मलिक यांना त्याचा फारसा फायदा झाला नाही . याला मुख्य नायक प्रियांशु चॅटर्जी पण अपवाद ठरला नाही .

प्रियांशुची बस दुर्दैवाने फारच थोडक्यात सुटली होती . त्याने जो धीरगंभीर ओल्ड स्कुल नायक सिनेमात साकारला होता तोच आऊटडेटेड होण्याची प्रक्रिया नेमकी २००१ लाच सुरु झाली . पांढऱ्या शुभ्र बर्फातून पळणारा हिमांशू आणि पार्श्वभूमीला आर्त आवाजात ‘जागते जागते इक उम्र कटी हो जैसे ‘ (कोई फरियाद मेरे दिल मे ) जगजीत ही प्रतिमा जवळपास प्रत्येक ९०s  किडच्या मनात सुपर इंपोज होऊन बसली आहे . ‘तुम बिन ‘ मधली सगळयात भावखाऊ भूमिका प्रियांशुला या फिल्मचा सगळ्यात जास्त फायदा होईल अशी अपेक्षा होती . तसा तो झाला पण . त्याने अनेक फिल्म्स साईन केल्या . मोठ्या बॅनरच्या फिल्म . पण त्याचं दुर्दैव असं की त्यातली एक पण चालली नाही . चंद्रप्रकाश द्विवेदीची ‘पिंजर ‘ मनोज वाजपेयीची इंप्रिंट असणाऱ्या फिल्ममध्ये पण प्रियांशूने ठसा उमटवला होता . गांधीवादी असणारा एक तरुण दंगलीत झालेल्या वैयक्तिक जखमेनंतर आमूलाग्र बदलतो , त्याची भूमिका प्रियांशुने चांगली केली होती . ऐश्वर्या रायने जेंव्हा ‘दिल का रिश्ता ‘ सिनेमातून प्रोडक्शनमध्ये पदार्पण केलं तेंव्हा तिने प्रियांशूला सिनेमात घेतलं होतं . ‘भूतनाथ ‘ मध्ये पण तो होता . पण ‘तुम बिन ‘ हीच त्याची ओळख होती आणि राहिली . त्या तोडीचं दुसरं काम त्याला कधीच मिळालं नाही . अर्थातच तो ठीकठाक अभिनेता होता . तो काही मनोज वाजपेयी नव्हता . पण काही फ्लॉप सिनेमा देऊन तो जवळपास जनतेच्या विस्मृतीमध्ये जायला लागला . Not a big deal . असे बरेच अभिनेते येतात आणि जातात . पण प्रियांशूच्या कथेत एक ट्विस्ट येणार होता .

प्रियांशूच्या वैयक्तिक आयुष्यात पण एक मोठा योगायोग होता . प्रियांशुने मालिनी शर्मा या अभिनेत्रीशी लग्न केलं होतं . कोण मालिनी शर्मा ? बिपाशा बसूचा ‘राज ‘ सिनेमा आठवतोय ? ‘आपके प्यार मे हम संवरने लगे ‘ हे नदीम श्रवण आणि अलका याज्ञीकचं अजरामर गाणं सिनेमात जिच्यावर चित्रित झालं होत ती म्हणजे म्हणजे मालिनी शर्मा . सध्याच्या मिम्सच्या प्रेमात असलेल्या पिढीला अजून सांगायचं तर  ‘मेरे पास मत आओ , मै तुम्हे बर्बाद कर दूंगी  -मै बर्बाद होना चाहता हू ‘ मिम टेम्प्लेटमध्ये दिनो मोरीओ सोबत दिसते ती मालिनी शर्मा . ही एक फिल्म करून गायब झालेली मालिनी शर्मा पॉप कल्चरमध्ये अजरामर झाली . प्रियांशु जसा ‘तुम बिन ‘ मुळे झाला होता तसंच . लग्नानंतर काही वर्षांनी दोघांनीही डिव्होर्स घेतला . वैयक्तिक आयुष्यात फार काही घडत नसताना प्रोफेशनल आयुष्याने पण तळ गाठला . बंगाली सिनेमात आणि हिंदी सिनेमात फुटकळ भूमिका करत प्रियांशु आयुष्य कंठायला लागला .

माझा एक मित्र इगतपुरीला विपश्यना करायला गेला होता . विपश्यना संपल्यावर त्याने घरच्यांना फोन करण्याऐवजी पहिला फोन मला केला . त्याने शपथेवर सांगितलं की ‘तुम बिन ‘ चा हिरो त्याच्यासोबत होता विपश्यनेला . विपश्यना संपल्यावर कुणाशी काहीच न बोलता प्रियांशु गायब झाला . लोकांच्या स्मृतीतून गायब झाला होता तसा . प्रियांशु नावाचा अजून एक नट आला आणि गेला अशीचं त्याची नोंद राहिली असती . ‘१२th  फेल ‘ आला नसता तर . या सिनेमाने विधू विनोद चोप्रा या संपलेल्या दिग्दर्शकाला वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी यश दिलं . दुय्य्म भूमिका करण्यात करियर जाईल असं ज्याच्याबद्दल वाटतं होतं त्या विक्रांत मासीला मेनस्ट्रीम सिनेमाच्या नकाशावर आणलं . या सिनेमाचा तिसरा लाभार्थी म्हणजे प्रियांशु . सिनेमात तसे त्याचे तीनचारच सीन होते . एक प्रामाणिक पोलीस अधिकारी जो नायकाला ‘चिटिंग ‘ सोडण्याचा सल्ला देतो . हिरो ‘चिटिंग ‘ सोडतो आणि आयपीएस झाल्यावर पहिले पाया पडतो तो या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या . नायकाने ओळख दिल्यावर प्रियांशु कडकडीत सॅल्यूट ठोकतो त्याला . काय अप्रतिम सीन आहे . सिनेमाचा हाय पॉईंट . सिनेमा आश्चर्यकारकपणे हिट झाला . विस्मृतीत गेलेला प्रियांशु पुन्हा लोकांना आठवला . प्रियांशूच्या करियरला नवसंजीवनी मिळाली . आता प्रियांशु पुन्हा सिनेमे साईन करतोय.

  तुम्ही एखाद्या लिजंडचा /कल्टचा / पॉप कल्चरचा भाग होण्यासाठी आणि पुढच्या कित्येक पिढयांना तुमचं नाव कळत राहण्याची सोय होण्यासाठी तुम्ही फार गुणवत्तावान असण्याची गरज असतेच असं नाही . गुणवत्ता नसून पण कल्टचा भाग बनलेली माणसं हा रोचक विषय आहे  . काहीही भरीव सहभाग नसताना ,किंवा प्रतिभा -कुवत नसताना कल्टचा आणि पॉप कल्चरचा भाग होणं याला जोरदार नशीब लागतं . याला ‘रिमी सेन सिंड्रोम’ असं नाव द्यायला पाहिजे  . रिमी सेन . २००० च्या दशकातल्या फिल्मोग्राफीचा अविभाज्य भाग . रिमी सेन दोन हजारच्या दशकात आलेल्या  जॉनी गद्दार , फिर हेराफेरी , गोलमाल ,धूम , दिवाने हुए पागल , गरम मसाला  या सगळ्या सिनेमांमध्ये होती . अशी ही रिमी दशकाच्या उत्तरार्धात एकदमच अंतर्धान पावली .  कारण तिच्यात सिनेमाच्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी जे पब्लिक रिलेशन्स जपावं लागत, सतत नेटवर्किंग करावं लागतं त्याचा अभाव होता . हेच प्राक्तन प्रीती झंगियानी , किम शर्मा , आफताब शिवदासानी यांच्या नशिबात पण होतं .

महेश भट्टच एक माझं फेवरेट कोट आहे . मुळातच हिंदीमधून वाचण्यासारखं . “हर किसी के अंदर बिजली का एक नंगा तार झूल रहा होता है. कुछ कमनसीब उसको छू बैठते हैं और भयानक झटके से मर जाते हैं. ‘सेल्फ डिस्ट्रक्टिव ‘असण्याची इतकी चांगली व्याख्या मी अजून दुसरी ऐकली नाही . बॉलिवूडमध्ये प्रत्यक्ष आयुष्यात  सेल्फ डिस्ट्रक्टिव असणारी चिक्कार उदाहरण आहेत . महेश भट्ट हा स्वतःच एकेकाळी सेल्फ डिस्ट्रक्टिव होता . सतत दारूच्या नशेत लास असायचा . बायकांचं व्यसन तर होतच . आलियाचा जन्म झाला आणि तो सावरला . आमूलाग्र बदलला .  हे सेल्फ डिस्ट्रक्टिव  असणं कलाकार असण्याचं बाय प्रोडक्ट असावं . कलाकाराचं अस्थिर आयुष्य , अति संवेदनशीलता यांचं मिश्रण माणसाला आगीकडे झेपावण्यास प्रवृत्त करत असावं . खूप जणांचं मत एकदम विरुद्ध असतं. या आर्टिस्ट लोकांना स्वतःचे लाड करून घ्यायची सवय असते आणि कायम चर्चेच्या केंद्रभागी असण्याचा नार्सिसिज्म यांच्यात असतो, असा त्यांचा युक्तिवाद असतो . मला स्वतःला हे पटत नाही . अर्थात अतिसंवेदनशील असणं ही काही फक्त कलाकारांची मक्तेदारी आहे, असंही म्हणणं नाही . पण प्रेमात व्याकुळ होऊन प्रेयसीला आपला कान छाटून देणाऱ्या व्हॅन गॉगच्या तगमगीच एरवी स्पष्टीकरण कस देणार… माझं सगळ्यात असं आवडत पात्र म्हणजे ‘रॉकस्टार ‘ मधला जनार्दन जख्खर . एका कातर क्षणी एक खतना भाईने जनार्दनला सांगितलेलं असत , महान कलाकार होण्याचा रस्ता वेदनेतून जातो. मग हा भोळा सांब जनार्दन वेदनेच्या शोधात लागतो. त्यासाठी प्रेमात पडतो. खरंच  उद्धवस्त होतो. मोठा कलाकार होतो . पण उध्वस्त होण्याचा आनंद पुरेपूर लुटून . दुसरा म्हणजे ‘देव डी’ मधला देव . पारोला सतत गृहीत धरणारा आणि ती सोडून गेल्यावर उद्धवस्त होण्याच्या वेगवेगळ्या वाटा शोधणारा देव हा टिपिकल भारतीय पुरुष . एकूणच भारतीय पुरुषांना ‘देवदास सिंड्रोम ‘ च आकर्षण असावं, असा अंदाज आहे . दारू पीत किंवा सिगरेट ओढत हातातून निसटून गेलेल्या संधीच्या दुःखाचे  कढ काढायला त्याला मनापासून आवडतं. असंही आपल्यापैकी अनेकजण आयुष्याच्या एका टप्प्यावर सेल्फ डिस्ट्रक्टिव असतोच . तुम्ही त्या फेजमधून गेला नसाल तर -हाय कंबख्त तुने पी ही नही . ही अल्पकाळ विजेसारखी चमकून गायब झालेल्या माणसांमध्ये  सेल्फ डिस्ट्रक्ट असण्याचा अंश असणारच .

  या अल्पकाळ प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या लोकांच्या अंगी एक ठराविक टॅलेंट असतंच . मग प्रॉब्लेम नेमका कुठं येत असावा ? नशीबाचा ? मी दोन दिवसांपूर्वी ‘द वाईल्ड  रिव्हर ‘ नावाचा नितांत सुंदर सिनेमा पाहिला . त्यात एक भारी डॉयलॉग होता . त्यातलं एक पात्र म्हणत , ” जंगलामध्ये नशीब नावाची गोष्ट नसते . म्हणजे एखादं हरीण वाघाची शिकार होतं ते हरीण कमनशिबी असतं म्हणून नाही. तो शिकार होतो तो कुठेतरी कमजोर पडतो म्हणून.” ही काही काळापुरती प्रसिद्धीच्या झोतात येऊन काही काळाने बाजूला पडलेली माणसं पण कुठंतरी कमी पडलीच असावीत . Afterall life is a jungle and आपण आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर शिकार बनणार हरीण पण असतोच . पण काही लोकांना हरीण बनण्याची किंमत जास्त मोठ्या प्रमाणावर चुकवावी लागते इतकंच

कागा रे कागा रे मोरी इतनी अरज तोसे,चुन चुन खाइयो मांस,
अरजिया रे खाइयों न तू नैना मोरे,खाइयों न तू नैना मोरे,
पिया के मिलन की आस.

(लेखक नामवंत चित्रपट स्तंभलेखक व ब्लॉगर आहेत.)
७४४८०२६९४८

Previous articleआप आणि कॉँग्रेसला धडा शिकवणारा भाजपचा दिल्ली विजय !
Next articleमाझा नवा मित्र-ChatGpt
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here