व्हिएतनाम: निसर्गसौंदर्याने उधळण केलेला स्वस्त आणि मस्त देश

 

-राकेश साळुंखे

‘ व्हिएतनाम ‘ म्हटले की अमेरिकेला झुंजवणारा व त्याला माघार घ्यायला भाग पाडणारा देश , हेच चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. व्हिएतनामला स्वतःचा इतिहास आणि संस्कृती आहे. निसर्गसंपन्न, रसनातृप्ती करणारा आणि पर्यटकांचे आर्थिक गणित न बिघडवता म्हणजेच स्वस्तात पर्यटन घडवणारा असाही या देशाचा लौकिक आहे. पर्यटक आकर्षित व्हावे, असे अनेक नैसर्गिक आश्चर्य असतानाही पर्यटनदृष्ट्या हा देश काहीसा माघारलेला होता .अलीकडे मात्र जगभरातून पर्यटक या देशाला भेट द्यायला येतात. मलाही अचानक या देशाला भेट द्यायची संधी मिळाली.

या देशात हवाई,समुद्र, रस्तामार्गे जाता येते. पासपोर्ट, व्हिसा आवश्यक आहे. भारतीयांना विमानाने गेल्यास Visa on Arrival मिळतो आणि तो स्वस्तही असतो. कोलकातावरुन व्हिएतनामची राजधानी ‘हनोई’ ला थेट विमानसेवा उपलब्ध आहे. हा प्रवास अडीच तासांचा आहे. तसेच सिंगापूर व बँकॉकमार्गेही विमान बदलून जाता येते . या देशाला वर्षभरात कधीही भेट देता येऊ शकते . तेथील हवामान तसे थंड असते. फेब्रुवारी ते एप्रिल व ऑगस्ट ते ऑक्टोबर हा काळ योग्य आहे. मे पासून ऑक्टोबरपर्यंत हवामान थोडे गरम, दमट, तुफानी पावसाचे राहते. तसा वर्षभर पाऊस सोबतीला असतोच.

‘डोंग’ ही तेथील करन्सी आहे. आपला १ रुपया म्हणजे ३२७ व्हिएतनामी डोंग होतो. जर डॉलर डोंग मध्ये बदलून घेतले , तर आपण लक्षाधीश झाल्याचे वाटू लागते. गंमत म्हणजे येथे लहानसे बिल ही 10,000 VND असते. दैनंदिन आर्थिक व्यवहारात व्हिएतनामी डोंग वापरतात . त्यामुळे आपण डॉलरचे डोंगमध्ये रूपांतर करून घेतलेले सोयीचे पडते . Money Exchange Center मधून व्हिएतनामी करन्सी घ्यावी. कारण एक तर विमानतळावर महाग पडते आणि स्थानिक दुकानात फसवले जाण्याची शक्यता असते .इतर परदेशी पर्यटनस्थळांपेक्षा व्हिएतनाम मध्ये वास्तव्य करणे स्वस्त आहे . भरपूर हॉटेल्स असल्याने आपल्याला निवडीला वाव मिळतो.

व्हिएतनाम हा देश खवैय्यांचे माहेरघर आहे. येथे खाण्यापिण्याची खूप चैन करता येते. येथे नाना प्रकारचे अन्नपदार्थ चाखायला मिळतात. विविध प्रकारचे ब्रेड, राईस नूडल्स, पोर्क, स्प्रिंगरोल्स, हर्ब्स, बीफ, भाज्यांची लोणची, मासे , माशांचे सॉस , डिपिंग सॉसेजेस, भाज्यांचे प्रकार, विविध सूप्स इ .अनेक पदार्थ खाण्याची मजा लुटता येते. गंमत म्हणजे रस्त्याच्या कडेला टेबल्स लावलेली असतात व तेथेही सुखेनैव उदरभरण सुरू असलेले पहायला मिळते. आम्हीही त्याची मजा घेतली . व्हिएतनाममधील Street food फार प्रसिद्ध आहे. त्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे . अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी देखील येथील पदार्थांचा स्वाद घेतला आहे .येथे जेवणापूर्वी चहा/कॉफी/बिअर/ वाईन पिण्याची पध्दत आहे . जेवणात सूप्सचे भरपूर प्रकार असतात . जेवणाच्या टेबलावरील छोट्या स्टोव्हवर हे सुप्स तसेच वेगवेगळे पदार्थ गरम होत असतात . मी हे प्रथमच पहात होतो . हॉटेलमधे तसेच लग्नकार्यातही प्रत्येक टेबलवर एक स्टोव्ह होताच .अजून एक विशेष जाणवले की शहाळ्याचे नारळ पूर्णपणे सोललेले असतात . आपल्याला हिरवी शहाळी पहायची सवय असते तर इथे ती पांढरी आढळतात . येथे लोक जेवणात भरपूर सूप पीत असल्याने पाणी कमी पिताना दिसतात.

हा कम्युनिस्ट राजवट असलेला व बुद्धांना मानणारा देश आहे.  लोक शांत व हसतमुख आहेत. बुध्दांच्या विचारांचा प्रभाव लोकांच्या वागण्या – बोलण्यात दिसून येतो. अर्थात अपवाद असतातच. या देशात पोशाखावर बंधन नाही. आपल्या सोयीनुसार आपण पोशाख घालू शकतो. फक्त मंदिरामध्ये पायापर्यंत ड्रेस घालण्याचे बंधन आहे. त्यांचा आवो दाई(Ao Dai) हा पारंपरिक पोशाख आहे. आवो म्हणजे कुर्ता व दाई म्हणजे लांब . हे कुर्ते सिल्क कपड्याचे व विविध रंगी असतात. वयस्कर लोक आवो दाई या पारंपारिक पोशाखात वावरताना दिसत होते . येथे बहुतेक ठिकाणी स्त्रियाच कामे करताना दिसतात . मार्केट , हॉटेल्स , रस्त्यावरील स्टॉल्स सर्व ठिकाणी स्त्री राज्य आहे . येथील लोकांच्या आर्थिक परिस्थितीत फारशी तफावत आढळली नाही.

व्हिएतनाममध्ये रस्ते प्रशस्त व खड्डेरहीत असून Two wheelar चालवणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने त्यांच्यासाठी वेगळी lane आहे . सायकल चालवणारेही बरेच दिसतात .
व्हिएतनामी भाषा समजायला अवघड आहे . मँडरीन भाषेशी (चीन मध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी ) साम्य असणारी ही भाषा आहे. इंग्रजी भाषा लोकांना समजते व बोलायला येते . त्यामुळे भाषेची अडचण येत नाही. आपल्या जवळचा देश असूनही भारतीय पर्यटक येथे कमी दिसतात. भारत ही बुद्धाच्या भूमी आहे व त्या दृष्टीने भारतीयांविषयी त्यांना खूप आदर व आपुलकी वाटते.
मी व माझा एक मित्र लग्न attend करण्यासाठी तेथे गेलो होतो. तेव्हा या आपुलकीचा खूप जवळून अनुभव आला. खरं तर आम्ही वधूचे पाहुणे होतो , पण सर्वांपेक्षा जास्त आमची सरबराई चालली होती .तेथे जमलेल्या सर्वांसाठी आम्ही कौतुकाचा विषय होतो. बुध्द भूमीतून आल्यामुळे आमच्या विषयी त्यांना आदर वाटत होता व तो सर्वांच्या वागण्यातून दिसून येत होता .

भोजनामध्ये इतर व्हिएतनामी पदार्थांबरोबरच आमच्यासाठी खास बटाटेवडेही बनवण्यात आले होते. .त्या लोकांसाठी बटाटावडा बनवणे तसे अवघडच पण त्यांनी त्याची रेसिपी मिळवून त्या प्रमाणे वडा बनवून आम्हाला खायला घातला व तो परफेक्ट जमलाही होता . जेवताना एक मजेशीर किस्सा घडला. आमचे जेवण होत आले असताना आम्हाला एक पदार्थ वाढण्यात आला. त्याची चव चांगली लागल्याने उत्सुकतेपोटी मी त्याविषयी विचारले तर ते फ्रॉग (बेडूक) असल्याचे सांगितले . हे ऐकताच पोटात असे काही ढवळले की आता येथेच पोटात गेलेले सगळे पदार्थ बाहेर पडतात की काय, असे वाटायला लागले . सुदैवाने तसे झाले नाही.

लग्नसोहळा  आपल्याप्रमाणेच सभागृहात  आयोजित केला होता. तिथे  मोठ्या स्क्रीनवर वधूवरांचे प्री वेडिंग शूट डिस्प्ले होत होता . लग्नाचे विधी फार नव्हते . एकमेकांना वाईन पाजणे हाच मुख्य विधी झाला . स्टेजवर वधूवरांच्या आईवडिलांखेरीज कोणीही नव्हते . लग्न समारंभासाठी एकत्र आलेल्या सर्वांची वधूवर प्रत्येक टेबलाजवळ जाऊन जातीने चौकशी करत होते .  दुसऱ्या दिवशी वधूच्या मूळ गावी धार्मिक विधीचा कार्यक्रम होता. आम्हीही त्यासाठी निमंत्रित होतो . त्यामुळे व्हिएतनामी ग्रामीण जीवन पहायला मिळाले . तेथे लग्न घरात आपल्यासारखीच लाऊडस्पीकरवर गाणी लावलेली होती . दिवसभर विधी चाललेले होते . एका गोष्टीचे मला आश्चर्य व कौतुकही वाटले , वधू मुलगी तिच्या लग्नाच्या सुरू असलेल्या कार्यक्रमातून वेळ काढून आम्हाला ड्रॅगन फ्रुटची शेती दाखवायला आली आणि त्यावर तेथे कोणीही आक्षेप घेतला नाही . त्या गावी मी प्रथमच Dragon fruit ची शेती पाहिली  त्या फळाची चवही चाखली .

व्हिएतनामचा प्रवास लग्न समारंभाच्या उपस्थितीने सुरु झाला .त्यानंतर प्रेक्षणीय स्थळांच्या दिशेने आम्ही पावले वळवली .Hanoi , Ho Chi Minh , Ha long Bay , Sa Pa , Hue , Golden Bridge . यापैकी काही ठिकाणांना आम्ही भेट दिली.  Ha Long Bay- युनेस्को प्रमाणित , जागतिक वारसास्थळ असलेल्या जगातील नवीन सात आश्चर्यापैकी एक असे हे ठिकाण आहे . . व्हिएतनामची राजधानी ‘ हनोई ‘ पासून येथे जायला साधारणपणे तीन तास लागतात . टॅक्सी किंवा बसने Ha long bay च्या किनाऱ्यापर्यंत जाऊन नंतर तेथून पुढे क्रुझने जावे लागते . क्रूझचे 2 दिवस – 1 रात्र असे पॅकेजिंग घेणे योग्य ठरते . आपल्या इच्छेनुसार 3 स्टार, 5 स्टार क्रूझ उपलब्ध असतात.

Ha log bay चा व्हिएतनामी भाषेत अर्थ Ha म्हणजे पसरलेला व Long म्हणजे ड्रॅगन असा आहे . Ha long bay हा चुनखडीच्या दगडांपासून तयार झालेल्या व समुद्रातून वर आलेल्या हजारो बेटांचा समूह आहे . या बेटांवर असलेल्या उंच सुळक्यांवर जंगलवजा झाडी आहे . या सुळक्यांना त्यांच्या आकारावरून निरनिराळी नावे दिलेली आहेत . या ठिकाणी समुद्राचे पाणी पाचू सारखे चमचमते .
बोटीने आपल्याला या बेटांवर सोडतात . या बेटांवर बऱ्याच नैसर्गिक गुहा आहेत . त्यापैकी Sung Sot Cave सर्वात मोठी व सर्वात सुंदर गुहा आहे . या गुहेमध्ये जाण्यासाठी थोडी चढण चढून जावे लागते . ही चढण दमछाक करणारी आहे .या चढणीवर आमचे एकमेकांशी चाललेले बोलणे ऐकून एक साठीतला युरोपियन तरुण आमच्याकडे पाहून ‘सलाम बॉम्बे ‘ म्हणाला . आम्हीही त्याला त्याच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत त्याच्याकडे गेलो असता , तो तरुण फ्रेंच असून दोनदा  मुंबईला येऊन गेल्याचे समजले.

गुहेतील नजारा आपल्याला झालेले श्रम विसरायला लावतो . निरनिराळ्या रंगांच्या प्रकाशझोतांनी संपूर्ण गुहा उजळलेली दिसते . आतमध्ये डोंगरातील झिरपलेल्या पाण्यातील क्षार थिजून तयार झालेल्या निरनिराळ्या आकृती बघायला मिळतात . गुहेच्या भिंतींवर लाईम स्टोन ची झीज (errosion ) होऊन वेगवेगळी चित्रे उमटलेली दिसतात .निसर्गाच्या या कलाकृतीपुढे नतमस्तक व्हावे वाटते .
या ठिकाणी कयाकिंग करत असताना हिंदी गाणे (राज कपूर चे) गाणारे एक जोडपे भेटले .आम्ही उत्सुकतेने त्यांच्याशी बोललो पण त्यांना हिंदी कळेना .इंग्रजीतून चौकशी केली असता ते इराणी असून त्यांच्या देशात हिंदी चित्रपट आणि गाणी लोकप्रिय असल्याचे त्यांनी सांगितले . क्रुझवर जगभरातून आलेल्या पर्यटकांचे जणूकाही संमेलन भरले होते . युरोपियन दिसणारे गोऱ्या कातडीचे लोक एकमेकांना अनोळखी असूनही एकत्र ऊठबस करायचे आणि आशियाई एका बाजूला असायचे.

क्रूझवर मला मूळचा जॉर्डनचा असणारा पण डेन्मार्क ला स्थायिक झालेला ज्यू गृहस्थ भेटला . तो मात्र आमच्यात मिसळून वागायचा तसेच चिली येथील जग फिरायला निघालेली एक युवती आमच्यात सामील झाली होती . एक कोरियन शिक्षक त्याच्या बायकोबरोबर क्रूझवर भेटला . तो पूर्वी बोधगयेला येऊन गेला होता . भारतीय लोक व भारतीय संस्कृती विषयी त्याला खूप आपुलकी होती . तो भारताविषयी खूप भरभरुन बोलत होता . अजंठा लेणींना  भेट द्यायला तो येणार होता त्यावेळी पुन्हा भेटायचे असे ठरले होते. दुर्दैवाने माझ्याकडून त्याचा नंबर हरवला . आम्हा सर्वांचे चांगलेच सूत जमले होते त्यामुळे निरोप घेताना आम्ही खूप भावुक झालो . जॉर्डनचा मित्र म्हणाला ,भेटू पुन्हा जिवंत राहिलो तर ! जग छोटे असले तरी आयुष्यात पुन्हा त्या व्यक्ती भेटतीलच, असे होत नाही .
एक रात्र मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही किनाऱ्यावर यायला निघालो . एक सांगायचे म्हणजे  क्रूझवर सर्व काही उपलब्ध असते.  बाहेरून काहीही खरेदी करण्यास बंदी असते . आमच्या क्रूझवरील एकाने वाइनची बाटली बाहेरून छोट्या नावेतील विक्रेती कडून खरेदी केली , परंतु ती काही केल्या त्याला उघडेना व क्रूझवर ती ओपन करण्यासाठी बाटलीच्या क्रूझ वरील महागड्या किमतीइतकेच पैसे मागू लागले , शेवटी त्याने त्याचा नाद सोडला . त्यामुळे असा खरेदीचा विचार पर्यटकांनी न केलेला बरा .

(व्हिएतनाम- दुसरा भाग पुढील आठवड्यात)

(लेखक ‘लोकायत’ प्रकाशनाचे संचालक आहेत)

84849 77899

Previous articleग्रेप्स ऑफ रॉथ:एका महान कलाकृतीचा सकस व सरस अनुवाद
Next articleगांधीजी आणि सरदार पटेल
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.