पूर्वी राजधानी असलेले हे ठिकाण सध्या एका छोट्याशा खेड्याच्या स्वरूपात दिसते . आम्ही प्रथम वराह नरसिंह मंदिर पहायला गेलो . भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असणारे हे मंदीर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे . या मंदिरात दोन गर्भगृहे आहेत . त्यांची तोंडे एकमेकांकडे आहेत . त्यापैकी एका गर्भगृहात वराह मूर्ती तर दुसऱ्या मध्ये नरसिंहाची मूर्ती आहे . दुपार असल्याने दोन्ही गर्भगृहे बंद होती . आम्ही मग मंदिर पाहून घेतले . थोड्या वेळाने तेथील पुजारी आला . त्याने गर्भगृहाचे दार उघडून दिले . आत गेलो असता मूर्तींना वस्त्रे घातली असल्याचे दिसले त्यामुळे त्या मूर्तींचे मूळ रूपच बदलून गेले असे वाटले . सकाळी पूजेच्या वेळी तुम्हाला मूळ मुर्त्या पाहता येतील असे तो पुजारी म्हणाला . तेथील वराह मूर्तीच्या सोंडेवर एक छोटीशी देवीची मूर्ती आहे . तिला पृथ्वीचे रूपक समजतात . संपूर्ण ग्रॅनाईटमध्ये या मूर्ती घडवल्या आहेत . मंदिरात एक मोठा शिलालेख काचेत ठेवला आहे . जयकेशीन कदंब की जो सहाव्या विक्रमादित्य चालुक्य राजाचा जावई होता त्याचा हा शिलालेख आहे . तो देवनागरी लिपीत आहे . त्या शिलालेखावरील मजकूर जर इंग्रजी भाषेत त्याच्या शेजारी बोर्ड वर असता तर तो पर्यटकांना समजू शकला असता असे वाटले . तेथे येणारे उत्सुकतेने तो शिलालेख पहात होते पण मजकूर वाचता येत नसल्याने त्यांची निराशा होत होती . या मंदिराच्या परिसरात अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत . हे सर्व पाहून येथून एक किमी अंतरावर असलेल्या सुवरनेश्वर मंदिराकडे निघालो . वाटेत कलमेश्वर मंदीर आहे . तेथे गर्भगृहात मध्यम आकाराची पिंड असून बाहेरच्या बाजूला गणपतीची व सप्तमातृका यांची सुस्थितीतील मूर्त्या आहेत . पुढे एके ठिकाणी सतीची शिला बघायला मिळाली . ही शिला इतर शिलांपेक्षा वेगळी होती . त्यावर असणारा हात आकाराने छोटा होता व त्यावर स्त्री व पुरुषाचे शिल्प कोरले होते .