राजेश खन्नाचं स्वत:चं एक युग होतं. सिनेमा बोलायला लागल्यावर ईश्वरलाल नावाच्या नटाचे एका वेळी दहा सिनेमे वेगवेगळ्या थेटरात सुरु होते. राजेश खन्नाने ते रेकोर्ड मोडलं. त्याचे एका वेळी अकरा सिनेमे देशभर वेगवेगळ्या पडद्यावर झळकत होते. त्या काळात तरुण पोरं लांडे गुरु शर्ट घालून स्वत:ला राजेश खन्ना समजायचे. पोरी त्याला रक्ताने पत्र लिहायच्या, त्याच्या गाडीच्या चाकाखालची धूळ सिंदूर म्हणून कपाळाला लावायच्या. त्याने डिंपलशी लग्न केलं तेव्हा २-४ मुलींनी आत्महत्या आणि ५-१५ मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. दिल तर लाखो मुलींचे तुटले. आपल्या आवडत्या हिरोने ओढून फेकलेली सिगारेट उचलून पिणाऱ्यांचे किस्से आपण खूप ऐकले. पण या पठ्ठ्यानं स्वत:च्या सिगारेटची राख झाडायला एक पगारी माणूस ठेवला होता. इतिहास घडवणाऱ्या माणसांची पायाखालची जमीन अनेकदा सुटते. राजेश खन्नाचे तेच झाले. त्याला यश आणि अपयश दोन्हीही पचवता आले नाहीत. प्रसिद्धी आणि लोकप्रियता त्याच्या डोक्यात गेली. पैसा त्याने खूप पाहिला होता. स्वत:च्या एमजी स्पोर्ट्स कारमधून काम मिळवण्यासाठी स्ट्रगल करणारा तो कदाचित एकमेव ‘स्ट्रगलर’ असावा. साधनसमृद्ध माणसाला जो एक विशिष्ट तऱ्हेचा बेफिकीर आत्मविश्वास येतो तो राजेशकडे जन्मजात होता. ‘युनायटेड प्रोड्युसर्स’नी घेतलेल्या स्पर्धेत विजेता ठरून तो सिनेसृष्टीत आला होता. त्या स्पर्धेच्या शेवटच्या फेरीचा किस्सा नमुनेदार आहे. मुंबईच्या ‘टाईम्स ऑफ इंडिया’ इमारतीतल्या एका आलीशान दालनात नामचीन निर्माते बसले होते. जतीन खन्ना (राजेशचे खरे नाव) अंतिम मुलाखतीसाठी उभा राहिला. परीक्षकांनी त्याला काही संवाद दिले. त्या संवादात मुलगा आपल्या आईशी बोलत होता. जतीनने विचारले, ‘आई कोण आहे?’ परीक्षक चक्रावले, म्हणजे काय? जतीन म्हणाला, ‘अचला सचदेव हैं, दुर्गा खोटे हैं, ललिता पवार, या निरुपा रॉय? कौन है? बेटे के बोलने की स्टाईल मां से मिलतीजुलती होनी चाहिये ना? इसलिये पूछ रहा हूँ..!’ आणि जतीन खन्ना त्या मुलाखतीत पास झाला…!