ग्रेसफुल…अनकन्व्हेन्शनल-सुश्मिता सेन

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक -२०२०

-सानिया भालेराव

एक मुलगी वयाच्या अठराव्या वर्षी मिस इंडिया स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छित असते. ती फॉर्म भरायला जाते, पण तेव्हा तिला कळतं की, एक अत्यंत देखणी मुलगी देखील या वर्षी स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे. ती मुलगी इतकी सुंदर आहे, की तिच्यापुढे इतर कोणी टिकू शकत नाही, अशी चर्चा या स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छिणार्‍या मुलींमध्ये होत असते. त्या मुलीचं नाव ऐश्वर्या राय! तिच्या सुंदरतेची हवा चहुबाजूला इतकी पसरलेली असते की, काही मुली या स्पर्धेमध्ये भाग घेण्यास  तयार नसतात.  ही मुलगी सुद्धा मग फॉर्म न भरता तशीच घरी येते. तिची आई तिला विचारते की, ‘‘तू फॉर्म का नाही भरलास?’’यावर ती म्हणते की, ‘‘इतकी सुंदर मुलगी जर या कन्टेस्टमध्ये भाग घेणार असेल, तर माझा निभाव लागणं शक्यच नाहीये तिच्या दिसण्यापुढे. मी जिंकण्याची साधी शक्यता सुद्धा नाहीये.’’ यावर तिची आई तिला म्हणते,‘‘हारायचंच असेल तुला, तर जी व्यक्ती सगळ्यात बेस्ट वाटते तिच्याशी हार. असं आधीच मागे हटण्यात काय अर्थ आहे?’’ मग ती मुलगी दुसर्‍या दिवशी जाऊन फॉर्म भरते आणि ती कंटेस्ट जिंकून मिस इंडिया बनते! त्यानंतर 1994 मध्ये  ती सुंदर मुलगी मिस वर्ल्ड बनते आणि ही मुलगी तिला मागे टाकून मिस युनिव्हर्स बनते. मिस इंडिया आणि नंतर मिस युनिव्हर्सचा किताब मिळवणारी ती मुलगी म्हणजे सुश्मिता सेन!

सुश्मिता सेनच्या मिस इंडिया स्पर्धेतली एक फार इंट्रेस्टिंग आठवण आहे, जी तिने एका कार्यक्रमात सांगितली होती. तिचे वडील एअरफोर्स कमांडर आणि आई हाऊस मेकर. साधारण मिडलक्लास बॅकग्राऊंड असल्याने मिस इंडिया स्पर्धेसाठी जे चार वेगवेगळे डिझाइनर पेहराव लागणार होते, ते विकत घेणं आपल्यासाठी थोडं अशक्य आहेे हे सुश्मिताच्या कुटुंबाला माहीत होतं. या स्पर्धेत तिने जो विनिंग गाऊन घातला होता, तो दिल्लीच्या सरोजिनी नगरच्या मार्केटमधून कापड आणून, एका साध्याशा शिंप्याकडून शिवून घेतला होता. उरलेल्या कपड्यातून तिच्या आईने एक फूल बनवून त्या गाऊनवर लावलं होतं. काळे सॉक्स विकत घेऊन, ते कापून त्याचे ग्लोव्हज् बनवल्या गेले आणि सुश्मिताने ते अत्यंत स्टाईलने कॅरी केले. याच गाऊनमध्ये तिने मिस इंडियाचा मुकुट डोक्यावर चढवला होता. हे  सांगताना सुश्मिता म्हणाली होती की, ‘‘एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला पैशाची गरज नसते, ती गोष्ट मिळवण्यासाठी तुमच्या मनामध्ये असेलला हेतू प्रामाणिक हवा आणि हे मला माझ्या आई वडिलांनी शिकवलं.’’ हे सुश्मिताचं वेगळेपण. तिच्या विचारांमधली स्पष्टता, स्वतःच्या कष्टाने घडवलेलं करिअर आणि एक स्त्री म्हणून स्वतःची डिग्निटी सगळ्यात वर ठेवणं… यामुळे खर्‍या आयुष्यात सुद्धा ती मला एक स्ट्राँग हेडेड नायिका वाटत आली आहे.

     सुश्मितामध्ये असं वेगळं काय आहे याचा मी जेव्हा विचार करते तेव्हा जाणवतं की, ती कायमच ‘सो कॉल्ड’अन्कन्व्हेन्शनल होती. वयाच्या चोविसाव्या वर्षी मुलगी दत्तक घेणं, लग्न न करता राहाणं, तिची प्रेमप्रकरणं, मनाला वाटेल तेच रोल्स करणं, काही वर्षांनी पुन्हा दुसरी मुलगी दत्तक घेणं, सिंगल मदरहूड स्वीकारलं तरी स्वतःचं असं आयुष्य जगणं, हे सगळं तिच्या काळातल्या नायिकांच्या पठडीत न बसणारं. इतकंच काय, तर गेल्या एक दीड वर्षांपासून तिचं रोहमन शॉल या मॉडेलसोबत असलेलं प्रेमप्रकरण देखील तिने अगदी मोकळेपणाने मीडियासमोर आणि जगासमोर आणलं आहे. तिचं वय चौरेचाळीस आणि त्याचं एकोणतीस. दोघांच्या वयामध्ये तब्बल पंधरा वर्षांचा फरक, पण ते सोबत राहतात. त्याचं केवळ तिच्याच आयुष्याचा नाही, तर तिच्या दोन मुलींच्या आयुष्याचा पण सहजतेने भाग बनणं… आणि हे सगळं मोकळेपणाने पेलणं… यासाठी सुश्मिता सेनचं कौतुक वाटतं. आता तसं बघायला गेलं, तर वयाचं अंतर हे बॉलिवूडसाठी काही नवीन नाहीये. सैफ-करीना किंवा अशी बरीच जोडपी आहे ज्यांच्यामध्ये वयाचं अंतर खूप आहे. पण, स्त्री वयाने मोठी आणि पुरुष कमी वयाचा अशी जोडपी किती? त्यातही स्त्री चाळीशी पार केलेली, दोन मुलींची आई आहे. हे नक्कीच गजब वाटावं असं!

     नुसतं बोलणं आणि जे बोलतो आहेत ते जगणं, यात फार अंतर असतं. त्यात बॉलिवूड म्हणजे तर दिखाव्याची दुनिया. आजही नायिकांना एका विशिष्ट चष्म्यातून पाहिलं जातं. त्यात ज्या काळात सुश्मिता नायिका म्हणून आली, ते होतं नव्वदीचं दशक!  त्या काळात तिचं हे असं मुलीला दत्तक घेणं बघून, तुझं करिअर संपेलपासून तुझ्याशी आता कोण लग्न करेल इथपर्यंत काय काय ऐकवलं गेलं असणार. तिने दत्तक घेतलेली मुलगी रेने ही खरंतर तिचीच मुलगी आहे, एका प्रेमप्रकरणातून झालेली, असं सुद्धा बोललं जातं होतं. म्हणजे अगदी आजही बोललं जातं. पण तरीही सिंगल मदरहूड त्या काळात इतक्या सुरेख पद्धतीने पेलणारी सुश्मिता या सगळ्या गॉसिपच्या पलीकडे जाऊन एक नितांत सुंदर स्त्री आहे, असं मला वाटतं. स्त्रीची प्रेमकरणं चघळणं, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं, गॉसिप करणं यापुढे जाऊन तिच्यातली क्षमता, तिच्यामधलं साहस, तिचं कर्तृत्व हे आपण कधी पाहायला शिकणार? नायिकेबद्दल बोलताना हमखास तिच्या अफेअर्सची तिखट मीठ लावून चर्चा करणं, त्यावर लिहिणं यापेक्षा तिच्या आयुष्यात ती कशी खंबीरपणे उभी राहिली, तिने कोणती संकटं पेलली यावर जर बोललं गेलं, तर निदान काही लोकांना जगण्याचं बळ तरी मिळेल.

     सुश्मिताचा पहिला चित्रपट म्हणजे 1996 साली आलेला ‘दस्तक’. त्यानंतर एका तामीळ चित्रपटात तिने काम केलं आणि मग डेव्हिड धवनच्या ‘बीवी नंबर वन’ मधल्या कामासाठी तिला बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टरसाठी फिल्मफेअर मिळालं. तसं  पाहता, सुश्मिताने चित्रपटांमध्ये खूप असं काम केलं नाही. ‘सिर्फ तुम’, ‘आँखे’, ‘मैं हूं ना’, ‘फिलहाल’, ‘मैं ऐसा ही हूं’, ‘मैंने प्यार क्यूं किया’ सारख्या चित्रपटात तिने काम केलं. 2015 साली ‘निरबाक’ या बंगाली चित्रपटात तिने काम केलं. हा तिचा पहिला बंगाली चित्रपट. सुश्मिताच्या करिअरमध्ये एक काळ असा होता, जेव्हा तिचे चित्रपट लागोपाठ बॉक्स ऑफिसवर आपटत होते. एका मॅगझीनच्या कव्हरस्टोरीवर छापून आलं होतं, सुश्मिता फेल्स ! यावर सुश्मिताची प्रतिक्रिया होती की, ‘चित्रपट फेल झाले, सुश्मिता सेन नाही.’ तिचा हा अप्रोच मला फार अमेझिंग वाटला.

     2014 मध्ये ‘निरबाक’ या बंगाली चित्रपटाचं शूटिंग संपवून जेव्हा सुश्मिता घरी परतली तेव्हा ती आजारी पडली. खूप चाचण्यांनंतर तिला समजलं की, तिला अ‍ॅडसन्स डिसीज हा आजार आहे. तिला जेव्हा हा अ‍ॅड्रिनल इंसफीशियन्सीचा अटॅक पहिल्यांदा आला तेव्हा एक-एक करून तिचे अवयव निकामी होत गेले. या आजारामध्ये होतं असं की, आपल्या शरीरातील अ‍ॅड्रिनल  ग्रंथी, जी एरवी ‘कोर्टिसोल’ हे हॉर्मोन बनवत असते, ती निकामी होते आणि शरीरामध्ये कोर्टिसोल्स बनत नाहीत. खरं बघायला गेलं, तर हा आजार बरा न होणारा आहे. म्हणजे औषधांनी यावर उपाय होऊ शकतो, पण यातून पूर्णतः बाहेर येणं तसं अवघडच. अ‍ॅड्रिनल क्रायसिसच्या अटॅकनंतर सुष्मिताला हायड्रोकॉर्टिसोल हॉर्मोनचं इंजेक्शन प्रत्येकी आठ तासानंतर घ्यावं लागायचं. पुढची दोन वर्ष सलग हे इंजेक्शनचे शॉट्स ती घेत होती. आता विचार करा… मिस युनिव्हर्स जिंकलेली तरुणी, एक अत्यंत सुंदर नायिका, सतत सुंदर दिसण्याचं प्रेशर आणि करिअरची गरज सुद्धा. या स्टिरॉइडच्या इंजेक्शन्समुळे, गोळ्यांमुळे शरीरावर इतर वाईट परिणाम होतात. सुश्मिताच्या शरीरावर सुद्धा ते दिसायला लागले. केस गळणं, चेहेरा सुजणं हे सुरू झालं. तसंच हे इंजेक्शनही तिला घेणं गरजेचं होतं; कारण तिचं जगणं त्यावर अवलंबून होतं. तिचं वजनसुद्धा यामुळे वाढत गेलं. ब्लड प्रेशरचा त्रास देखीन सुरू झाला. आता आपल्याला लाख वाटतं की, या लोकांकडे तर खूप पैसा असतो वगैरे वगैरे! पण, शेवटी सुश्मिता होती तर सिंगल पेरेंट. दोन मुलींना बघणं, स्वतःचं घर बघणं हे ती एकटी करत होती. साहजिकच या आजारामुळे ती खचून गेली असणार. ती वेगवेगळ्या देशांमध्ये गेली ट्रीटमेंटसाठी आणि टेस्ट्सनंतर हेच सांगण्यात आलं की, तिला आता आयुष्यभरासाठी ही स्टिरॉईड्सची इंजेक्शन, गोळ्या घेत राहावं लागणार. या आजारामध्ये एनर्जी लेव्हल्स खूप कमी होते आणि सुश्मिताची एखादी इव्हेंट असली की, फक्त ती इव्हेंट अटेंड करता यावी म्हणून तिला जास्त डोस घ्यावा लागायचा, तो काळ नक्कीच तिच्यासाठी वाईट होता. तिला जवळपास सगळ्या डॉक्टरांनी सांगून टाकलं होतं की, तू तुझं प्रोफेशन बदलून टाक. कारण एका विशिष्ट साच्यातलं दिसणं. तो स्ट्रेस कॅरी करणं, हे तुझं शरीर आता करू शकणार नाही. पण, सुश्मिताने ठरवलं की, मी हार मानणार नाही.

     तिने स्वतःच्या शरीराचा आवाज ऐकायला सुरवात केली. डॉक्टरांनी तिला काही विशिष्ट व्यायाम प्रकार करायला मनाई केली होती. तिने मात्र ते व्यायाम प्रकार सुरू केले. योगसाधना सुरू केली आणि स्वतःला जागं केलं. एक दिवस अचानक ती चक्कर येऊन पडली. तिला पुन्हा अ‍ॅड्रिनल क्रायसिसचा अटॅक आला आहे, असं वाटून अबूधाबीमधल्या हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केलं. तिच्या टेस्ट झाल्या. पण, टेस्टमधून एक चमत्कारिक गोष्ट दिसून आली. तिच्या शरीराने पुन्हा ‘कोर्टिसोल’ बनवण्यास सुरवात केली होती.  हे म्हणजे आश्चर्य होतं. आता तिला स्टिरॉइड्सची गरज नव्हती. पण, असं एकदम स्टिरॉइडसची औषध बंद करणं इतकं सोपं नसतं. पण तिने ते केलं. भयंकर विथड्रॉल सिप्टम्स सहन करत, 2018 पर्यंत. पुरती दोन वर्षं ती लढत राहिली. आता ती यातून बाहेर आली आहे आणि आपलं आयुष्य पूर्ववत् जगते आहे. जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य ते शक्य होतं, हे सुश्मिताने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. सुश्मिता सेन कविता सुद्धा करते. तिच्या आजारपणाच्या काळात तिने इन्स्टाग्रामवर काही कविता शेअर केल्या होता. तिच्यामधली सेन्सिटिव्हिटी तिच्या साध्याशा शब्दांमधून जाणवत राहते. ‘I have but one desire, To flow yet not to be lost’  तिच्या कवितेप्रमाणे सुश्मिता वाहते आहे, मार्गात अडथळे आले तरीही तिचं प्रवाही असणं तिने थांबवलं नाहीये आणि वाहतांना ती हरवून सुद्धा गेली नाहीये. न हरवता असं वाहणं सोपं नाहीये आणि अवघड सुद्धा! होतं असं की, आपण सगळेच जण कधी समाजाने, कधी आपल्या कुटुंबाने तर कधी आपण स्वतःच तयार केलेल्या साच्यांमध्ये स्वतःला बांधून ठेवतो. नटी आहेस म्हणून अमुक एक करू नको, या साच्यात बसणारी सुश्मिता कधी नव्हतीच. नसतील चालले तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर, नसतील मिळाले तिला ढिगाने पुरस्कार उत्तम अभिनयासाठी; पण एक स्त्री म्हणून, एक व्यक्ती म्हणून ती वरचढ आहे.

     सुश्मिता सेनने आपल्या दोन मुलींना फार विचारपूर्वक आणि मोकळ्या वातावरणात वाढवलं आहे. सुश्मिता म्हणते की ‘मी मुलांसाठी अमुक एक त्याग केला’ असं म्हणणं मला पटत नाही. कारण जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा अप्रत्यक्षरित्या आपण मुलांवर मी तुमच्यासाठी असं केलं, याचं प्रेशर टाकतो. सुश्मिताची ही मला आवडणारी अजून एक गोष्ट. आई होणं, म्हणजे फक्त आणि फक्त मुलांचा विचार सतत करत राहाणं, असं नसतं. यावर सुश्मिता एके ठिकाणी म्हणाली होती, ‘माझं असं सुद्धा एक आयुष्य आहे. जशी मी माझ्या मुलींची आहे तशीच मी माझ्या स्वतःची सुद्धा आहे.’ एक आई म्हणून तिने या दोन पोरींना इतक्या सुरेख पद्धतीने वाढवलं आहे की, त्यांना तिने सांगितलं आहे की, मोठं झाल्यावर जर तुम्हा दोघींना तुमचे बायोलॉजिकल आईवडील कोण आहेत हे जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही तसं करण्यास मोकळ्या आहात. दत्तक घेतलेल्या  मुलांना हा असा चॉईस देणं यासाठी काळीज फार पक्के लागतं आणि ते या बाईकडे आहे आणि म्हणूनच ती वेगळी आणि सुंदर  भासते. तिला बोलतांना ऐकावं फक्त! अगदी दोन मिनिट! अठराव्या वर्षी सुद्धा ती त्या वयाच्या मानाने प्रगल्भ होती आणि तिची प्रगल्भता पुढेही बहरत गेली.  ग्रेस हा शब्द सुष्मिताला फार परफेक्टली लागू होतो. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर ती ग्रेसफुल वाटते, कारण ती स्वतःशी प्रामाणिक राहिली आहे. तिचे स्ट्रगल्स, तिचे निर्णय, तिचे अनुभव या सगळ्यांनी ती समृद्ध झाली आहे. दिसण्यापलीकडे असलेलं तिचं असणं भुरळ घालणारं आहे ते म्हणूनच!

     कोणताही असा एक साचा नसतो. स्त्री म्हणून, आई म्हणून, नायिका म्हणून, हे सुश्मिताकडे पाहिलं की जाणवत राहतं. माणसाचं कर्तृत्व, यश मोजण्याची जगाची एक गंमतशीर फुटपट्टी असते. त्या पट्टीवर कदाचित सुश्मितासारखी नटी बसत नसेलही, पण तिच्या आत दडलेली अत्यंत बुद्धिमान  आणि कंपॅशनेट व्यक्ती, प्रेमळ आई आणि अत्यंत सुंदर स्त्री मोहवून टाकणारी आहे. सुश्मिता सेनचा एक कोट मला फार आवडतो.

     सुश्मिता सेनचा एक कोट मला फार आवडतो. Remember your dream, Do one thing everyday that scares you स्वप्नांच्या मागे नुसतं धावण्यापेक्षा, स्वप्न डोक्यात ठेवून, आपल्या गतीने चालत असताना, रोज अशी एक गोष्ट आपण करून पहिली ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते आहे, तर स्वप्न साकार होण्याचा हा जो प्रवास आहे तो आपल्याला एक माणूस म्हणून अत्यंत प्रगल्भ करणारा ठरू शकतो.

     आजारातून बाहेर पडून, स्वतःवर काम करून वयाच्या त्रेचाळिसाव्या वर्षी एक नायिका जर म्हणत असेल की, कामाची सुरवात ही कधीही पुन्हा होऊ शकते, तर ते नक्कीच प्रशंसनीय आहे.  आपण सुरवात कधीही, कोणत्याही वयात आणि कशाही परिस्थितीत करू शकतो. हे इतकं जरी या कमालीच्या कणखर आणि प्रेमळ स्त्रीकडून घेता आलं तर कदाचित आपल्याला खर्‍या आयुष्यात हिरो बनता येईल, सुश्मितासारखं!

(लेखिका संशोधिका असून त्यांची इकोसोल नावाची पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणारी कंपनी आहे.)

८४०८८८६१२६

Previous articleमुशायरा जिवंत ठेवणारा शायर-राहत इंदोरी!
Next articleस्त्री पुरुष संबंध – नैतिकच्या निसरड्या वाटा…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.