कृष्णराज आणि ई.पी.डब्ल्यू


(साभार: साप्ताहिक साधना)

-रामचंद्र गुहा

एक वैचारिक नियतकालिक एकाधिकार वृत्तीने चालवले नाही, तर ते अस्तित्वातच राहणार नाही. त्यातील आवश्यक मजकूर निवडण्याची अंतिम जबाबदारी ही एका आणि फक्त एकाच व्यक्तीच्या हाती असायला हवी.
– एच. एल. मेन्केन, ब्रिटिश इतिहासकार

इ.पी.थॉम्पसन यांनी एकदा असे म्हटले होते की, ‘‘भारत हा आज महत्त्वाचा देश नाही; पण जगाच्या भवितव्यासाठी तो कदाचित सर्वांत महत्त्वाचा ठरू शकेल. हा असा देश आहे, जो कोणाच्याही मेहेरबानीवर जगत नाही. जगावर प्रभाव टाकणारे सर्व विचारप्रवाह या देशातून वाहतात; हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, निधर्मी, स्टॅलिनवादी, उदारमतवादी, माओवादी, लोकशाही समाजवादी, गांधीवादी… जगात असा एकही विचार नाही, जो पश्चिम किंवा पूर्वेकडील देशात आहे आणि भारतातल्या कोणत्याही समूहात कार्यरत नाही.’’

ही प्रतिक्रिया वाचून मला असे वाटले, की थॉम्पसन बहुतेक मुंबईत प्रसिद्ध होणारे ‘इकॉनॉमिक ॲण्ड पोलिटिकल वीकली’ (ईपीडब्ल्यू) नियमितपणे वाचत असावा; कारण त्यामध्येच अशा प्रकारच्या विचारांच्या प्रभावांची मांदियाळी अनुभवाला येते. माहितीने समृद्ध आणि वेगवेगळ्या विषयांवर आणि प्रकट झालेल्या मतांवर चमकदार टीकेने भरलेली या साप्ताहिकाची पाने भारतीयांच्या आयुष्याची सूची आहे असे म्हणता येईल. अर्थव्यवस्था, जातींचे राजकारण, धार्मिक हिंसा आणि मानवी हक्क यांसारख्या विविध व महत्त्वाच्या विषयांवर ‘ईपीडब्ल्यू’ने अत्यंत अधिकृत, मर्मभेदी आणि तपशीलवार वृत्तांत व विश्लेषण असलेले लेखन प्रसिद्ध केले आहे. या नियतकालिकाला केवळ अभ्यासक आणि पत्रकार यांचेच लेखन मिळते असे नाही; तर वेगवेगळ्या क्षेत्रांतील कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी आणि काही राजकारणीही या नियतकालिकाच्या लेखकसूचीमध्ये आहेत.

जगातल्या अन्य काही नियतकालिकांप्रमाणेच ‘ईपीडब्ल्यू’चा आपल्या वर्गणीदार संख्येच्या व्यस्त प्रमाणात (म्हणजे फारच मोठ्या प्रमाणात) वाचकांवर प्रभाव आहे. भारतामधील बौद्धिक चर्चेला या साप्ताहिकाने आकार देऊन इतक्या वरच्या पातळीवर नेले आहे, की ध्येयधोरणविषयक विचारांवर तिचा फार मोठा प्रभाव पडतो. म्हणूनच ‘ईपीडब्ल्यू’ हा न्यूयॉर्कमधील ‘नेशन’ या प्रख्यात साप्ताहिकाचा भारतीय अवतार आहे असे आपण समजायचे काय? दोहोंमध्ये तसे अनेक गोष्टींत साधर्म्य दिसते. पहिली बाब अशी, की दोहोंचेही बाह्यरूप ओबडधोबड आहे. ‘नेशन’बाबत कॅल्व्हिन ट्रिलिनने अशी टिप्पणी केलेली आहे की ‘नेशन हे बहुधा देशातील असे एकच नियतकालिक असावे, ज्याची झेरॉक्स काढली तर मूळ नियतकालिकापेक्षा झेरॉक्स प्रत अधिक देखणी असेल!’

त्यातील आशयाबद्दल अधिक नेमकेपणाने बोलायचे तर तत्त्वज्ञान किंवा उद्दिष्टांबद्दलच्या त्यांच्या घोषणा सारख्याच आहेत. म्हणजे ‘नेशन’चे भूतपूर्व संपादक व्हिक्टर नावास्की यांच्या शब्दांत सांगायचे तर ‘पारंपरिक सुज्ञपणास प्रश्न विचारणे, सनातन विचारांबाबत संशय निर्माण करणे, विविध प्रकारच्या मतभेदांना आणि ते मांडणाऱ्यांना आश्रय देणे, त्यांच्याबद्दल विशेष संवेदनशील बनणे आणि हे सर्व करताना अधिक चांगल्या जगाचे स्वप्न पाहणे.’

वृत्तलेख प्रसिद्ध करणारी नियतकालिके ही अनुभवी पत्रकार आणि पूर्णवेळ वार्ताहर यांच्यामार्फत चालविली जातात. तर वैचारिक जडणघडण करणारे लेख प्रसिद्ध करणाऱ्या नियतकालिकांकडे स्वतंत्रपणे लेखन करणारे लेखक आणि विद्यापीठांतील अभ्यासक-प्राध्यापक यांचे साहित्य येत असते. ख्रिस्तोफर लॅश या इतिहासकाराने नमूद केल्याप्रमाणे टेलिव्हिजनच्या उदयानंतर आणि प्रसारमाध्यमांच्या थैमानानंतर अशा प्रकारची नियतकालिके हीच अभ्यासू आणि विद्वान मंडळींना एकमेकांशी संपर्क साधण्याची माध्यमे राहिली आहेत. बुद्धिवादी मंडळींना एकत्र आणून त्यांच्यामध्ये शिल्लक असलेली थोडीफार एकजूट आणि एकात्मता दृढ करण्याचे काम ही नियतकालिके करीत आहेत. ‘नेशन’ नियतकालिकाबाबत हे जेवढे खरे आहे तेवढेच, किंबहुना त्यापेक्षा अधिक ‘ईपीडब्ल्यू’बाबत खरे आहे.

नफा मिळवणारी गुळगुळीत कागदावरील आकर्षक नियतकालिके आणि विचारप्रसार करणारी निवडक वाचकांसाठी चालविली जात असलेली साधी व अनाकर्षक दिसणारी नियतकालिके यांच्यात आणखी एक मोठा फरक आहे. ड्राइट मॅक्डोनाल्ड या समीक्षकाच्या मते, मोठ्या व व्यावसायिक नियतकालिकांपेक्षा ही विचारप्रसार करणारी नियतकालिके अधिक आतुरतेने वाचली जातात; कारण त्यातील व्यक्तिगत प्रकटीकरण हे समविचारी लोकांना उत्कट आवाहन करीत असते. ही नियतकालिके त्यांचा जनमतावर किती परिणाम होतो यावरून ओळखली जात नाहीत, तर त्यांचा शासनाच्या ध्येयधोरणावरील प्रभाव, सार्वजनिक महत्त्वाच्या प्रश्नांवरील वाद-संवाद आणि वाचकांचे प्रेम व निष्ठा यावरून ओळखली जातात.

‘ईपीडब्ल्यू’ची तुलना ढोबळमानाने न्यूयॉर्कमधील ‘नेशन’ किंवा लंडनच्या ‘न्यू स्टेटस्‌मन’शी करता येईल; पण खोलवर विचार केला तर ‘ईपीडब्ल्यू’चे पारडे जड झालेले दिसेल. पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाशी या नियतकालिकाने बांधिलकी ठेवलेली नाही. (अमेरिकेतील ‘नेशन’चे वाचक डेमॉंक्रॅटस्‌ आहेत आणि ब्रिटनमधील ‘न्यू स्टेटस्म‌न’ हे लेबर पक्षाकडे झुकले आहे असे मानले जाते). दुसरी गोष्ट म्हणजे ‘ईपीडब्ल्यू’चा पालक कोणी धनवान नाही. तुटपुंज्या निधीवर आणि वर्गणीदारांच्या पाठिंब्यावर चाललेले हे साप्ताहिक आहे. पण तिसरा विशेष फरकाचा मुद्दा म्हणजे त्याचा बौद्धिक भारदस्तपणा. ‘ईपीडब्ल्यू’मध्ये भारतातील जगदीश भगवती, कृष्ण भारद्वाज, आन्द्रे बेतेल, अमर्त्य सेन, एम.एन. श्रीनिवास आणि इतर अनेक विद्वानांचे अतिउत्कृष्ट लेख प्रसिद्ध झाले आहेत आणि आजही होत आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इपीडब्ल्यूचा दर्जा व प्रभाव पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ टिकून आहे.

‘ईपीडब्ल्यू’च्या अंकात राजकीय पूर्वग्रह, नि:पक्ष वृत्तांतकथन आणि बौद्धिक कसोट्या लावून केलेले मार्मिक पृथक्करण या तिन्हींचा अनोखा संगम आढळतो. अंकाची सुरुवात मागील काही दिवसांच्या घटनांवर जाणीवपूर्वक दिलेल्या प्रतिक्रिया आणि त्यावरील टिकाटिप्पणी यांनी होते. हे लेखन निनावी असते. साप्ताहिकाचा दुसरा भाग देशभरातून मिळवलेल्या (वृत्तसंकलकांच्या नावासहित) बातम्यांनी भरलेला असतो. या वृत्तांताच्या सावध वाचनाने आपण ‘बातम्यांमागील बातम्या’ समजावून घेऊ शकतो. उदाहरणार्थ, बिहारमधील जमीनदार आणि शेतमजूर यांच्यामधील संघर्षाच्या कथा, ईशान्य भारतातील फुटीर हालचाली इत्यादी. सर्वसाधारणपणे हे वृत्तांत दैनिक वृत्तपत्रांच्या क्षमतेपेक्षा मोठे आणि अधिक माहितीपूर्णही असतात. अंकाच्या शेवटच्या भागात, अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या काही पुस्तकांची परीक्षणे आणि दोन-तीन अभ्यासपूर्ण माहिती-लेख (साधेपणाने लिहिलेले व भरपूर तळटीपा असलेले) वाचकांसाठी पुरवलेले असतात.

बाह्यस्वरूपाने नाही तर आतील मजकुरामुळे महत्त्व प्राप्त झालेल्या ‘ईपीडब्ल्यू’ने एक विशेष विक्रम केलेला आहे. या नियतकालिकाच्या मुखपृष्ठाइतके सपक मुखपृष्ठ मी इतर कोणत्याही नियतकालिकाचे पाहिलेले नाही. पांढऱ्या पार्श्वभूमीवर काळी अक्षरे, डाव्या कोपऱ्यात टाकायचा म्हणून टाकलेला केविलवाणा तिरका लाल पट्टा. आतला मजकूर : नाइन पॉईंट आकारातील अक्षरांत, पानात साठ ओळींत गच्च भरलेला व रकाने असूनही वाचण्यास कठीण झालेला! आता अलीकडेच साप्ताहिकाची पुनर्रचना झाली असे ऐकले, पण नवा अवतारही बहुतांशी जुन्यासारखाच आहे. अक्षरांचा टाइप लहान, कागद आणखीच जुनाट दिसणारा, मुखपृष्ठाचे रूप अद्यापही चिंताजनकच, पण आत छापला गेलेला मजकूर मात्र अन्‌प्रेडिक्टेबल आणि विविधतापूर्ण; अगदी पूर्वीसारखाच!

1949 मध्ये ‘ईपीडब्ल्यू’ची सुरुवात ‘इकॉनॉमिक वीकली’ या नावाने झाली. एका प्रतिभावान बंगाली कुटुंबातील सचिन चौधरी या व्यक्तीने या नियतकालिकाची सुरुवात केली. त्यांचा एक भाऊ यशस्वी चित्रपटनिर्माता होता; तर दुसरा एक विख्यात शिल्पकार होता. सचिन चौधरी यांनी प्रथम राष्ट्रीय चळवळीतील कार्यकर्ता, नंतर हिमालयातील एक साधक, अर्थशास्त्रातील पीएच.डी.चा विद्यार्थी आणि मार्केट रिसर्च असे अनेक उद्योग केले होते. कधी काळी त्यांनी ‘बाँबे टॉकीज’ या आद्य फिल्म कंपनीत जनरल मॅनेजर म्हणूनही काम केले होते.

सचिन चौधरींनी साप्ताहिक सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना आपल्या आधीच्या अनुभवांचाही उपयोग झाला. भारत नुकताच स्वतंत्र झाला होता, त्यामुळे नवीन साप्ताहिक सुरू करण्यास ती योग्य वेळ होती. त्यामुळे नव्या राष्ट्राची घडण कशी असावी याबाबत देशात चाललेल्या बौद्धिक चर्चेचे हे साप्ताहिक एक केंद्र बनले. त्या वेळेच्या गरजा लक्षात घेता, त्या साप्ताहिकातील बऱ्याचशा चर्चा आर्थिक नियोजन आणि विकास या विषयांवर असत. पण धूसर शास्त्रीय अंदाजांपलीकडे जाऊन वास्तवाचा शोध घेण्याचे प्रयत्न करणारे लिखाण ‘ईपीडब्ल्यू’मध्ये सुरुवातीपासूनच प्रसिद्ध होत होते. पहिल्या काही वर्षांतच या साप्ताहिकातून भारतीय राजकारणावरील जातीसंस्थेचे वर्चस्व दाखवणारे अनेक लेख प्रसिद्ध झाले होते, त्या लेखांचे नंतर एक पुस्तकही प्रकाशित झाले आहे.

ऑगस्ट 1966 मध्ये या साप्ताहिकाचे नामांतर होऊन ‘इकॉनॉमिक ॲन्ड पोलिटिकल वीकली’ हे नाव रूढ झाले. त्याच वर्षाच्या अखेरीस सचिन चौधरी यांचे निधन झाले. त्यांच्यानंतर प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ आर.के.हजारी यांनी या नियतकालिकाची सर्व सूत्रे हाती घेतली. पण दोन वर्षांतच ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’मधील नेमणुकीमुळे त्यांना ती सोडावी लागली. मग ते काम अनेक उपसंपादकांपैकी एक असलेल्या श्री.कृष्णराज यांच्याकडे सोपविण्यात आले. कृष्णराज केरळमधील ओट्टापालम या गावचे. ‘दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये त्यांचे शिक्षण झाले आणि 1960 पासून सचिन चौधरींबरोबर काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. संपादक म्हणून त्यांची कारकीर्द साप्ताहिकाच्या संस्थापकांच्या कारकिर्दींपेक्षा मोठी, म्हणजे 1969 पासून 2004 साली त्यांचा मृत्यू होईपर्यंत अशी 35 वर्षे राहिली.

‘ईपीडब्ल्यू’शी माझा प्रत्यक्ष परिचय माझा मित्र बर्नार्ड डिमेलो याने करून दिला. त्याआधी दिल्ली विद्यापीठातील एक विद्यार्थी म्हणून ते साप्ताहिक माझ्या नजरेखालून गेले होते; पण त्या काळात मी ते कधीच उघडले नाही. 1980 मध्ये मी समाजशास्त्रातील पीएच.डी. पदवीसाठी कलकत्त्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) या संस्थेत प्रवेश घेतला. त्याच वर्षी बर्नार्डनेही त्याच संस्थेत अर्थशास्त्रातील डॉक्टरेक्ट मिळविण्यासाठी अभ्यास सुरू केला. त्याआधी काही वर्षे तो ‘ईपीडब्ल्यू’चे वाचन करीत असे. त्या साप्ताहिकाची त्याची प्रत एकाकडून दुसऱ्याकडे अशी फिरत आलेली असे. त्या प्रतीचे पहिले वाचक मुंबईत राहणारे बर्नार्डचे वडील असत. नंतर ती बर्नार्डकडे पाठविली जाई आणि त्यानंतर ती प्रत त्याच्याकडून माझ्या हाती येत असे.

मला नंतर ‘ईपीडब्ल्यू’ वाचनाची एवढी चटक लागली, की मी उन्हाळ्याच्या सुट्टीत डेहराडूनला माझ्या घरी गेलो की ते अंक वाचायला न मिळाल्याने मला अस्वस्थता येई. काही दिवसांनी बरीच शोधाशोध केल्यानंतर एका वृत्तपत्रविक्रेत्याकडे ते साप्ताहिक मिळते असे मला कळले. गावाच्या खूप आत पलटन बझार रस्त्यावर आणि इमारतींच्या कंटाळवाण्या गर्दीत मला ते दुकान सापडले. माझ्या घरापासून गावाच्या थेट दुसऱ्या टोकाला ते ठिकाण होते. तिथे पोहोचण्यासाठी मैल-दीड मैल चालत जाऊन मला बसस्टँडवर जावे लागे. त्यानंतर बसची वाट पाहणे, बस आल्यानंतर तिच्यातून वीस मिनिटांचा प्रवास आणि शेवटच्या थांब्याशी उतरून बाजारच्या त्या गर्दीतून पुस्तक दुकानापर्यंतची अडखळत वाटचाल, असा तो सर्व प्रवास होता. पण मला या प्रवासाचा त्रास होत नव्हता. कारण नवनवीन कल्पना- विचार माझ्या डोळ्यांसमोर तरळत असायचे, त्याचबरोबर भारताचाही शोध चालू असायचा. आणि ईपीडब्ल्यूपेक्षा आणखी कोण मला भारताचे समृद्ध व सर्वांगीण दर्शन घडवू शकले असते? पलटन बझारच्या रस्त्यावरून जाताना ईपीडब्ल्यूचा नवीन अंक माझ्या हाती पडणार या कल्पनेने मला विशेष तरतरी येई, आणि तो अंक घेऊन परतताना त्यातील मजकुराच्या औत्सुक्याने मी भारावून जात असे.

सुट्टी संपल्यानंतर मी आयआयएममध्ये परतलो तेव्हा पहिली गोष्ट मी केली असेल ती म्हणजे स्वत: ‘ईपीडब्ल्यू’चा वर्गणीदार झालो. त्यामुळे साप्ताहिकाची प्रत आधी माझ्याकडे आणि नंतर बर्नार्डकडे, असे चालू झाले. बर्नार्डला वडिलांकडून तो अंक मिळेपर्यंत माझा अंक येऊनही तीन-चार दिवस उलटून गेलेले असत. आणि त्यात त्याच्या संशोधनासाठी उपयुक्त ठरणारा एखादा निबंध अगर राजकीय चर्चाविषयक लेख हमखास असे. त्यामुळे टपालातील ‘ईपीडब्ल्यू’चा अंक हाताळण्यासाठी आम्ही दोघेही अतिशय उत्सुक असू. आमच्यासारखेच असे बहुसंख्य वर्गणीदार व वाचक त्या वाचनासाठी हपापलेले असत.

मी आयआयएममध्ये प्रवेश घेतल्यानंतर जवळजवळ दोन वर्षांनी एक घटना घडली. मी कॉलेजच्या कॉरिडॉरमधून जात असताना प्रो.निर्मल चंद्रा यांच्या कक्षासमोरून चाललो होतो. प्रो.निर्मल चंद्रा हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक पण अनेक युरोपियन भाषांवर- अगदी रशियन भाषेसह- त्यांचे प्रभुत्व होते. आणि लेनिनच्या साहित्याचा व त्याच्या कार्याचा त्यांचा सखोल अभ्यासही होता. त्या दिवशी त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडा होता. त्यांच्या हातात पुस्तक होते आणि डाव्या हाताच्या बोटांत अर्धी पेटलेली सिगारेट धरून ते पुस्तक वाचत होते. मी कॉरिडॉरमधून जात असताना त्यांनी अचानक वर पाहिले आणि मला आत येण्याची खूण केली. चकित होऊन मी आत पाऊल टाकले (तोपर्यंत त्यांच्याशी मी क्वचितच चार शब्द बोललो असेन!). त्यांनी टेबलावरचा एक कागद शोधला आणि तो माझ्या हाती देत ते म्हणाले, ‘हा घे. हा कदाचित तुझ्यासाठीच असावा.’ मी कागद हातात घेऊन खोलीबाहेर पडलो. त्या कागदाचा रंग हिरवट होता. उलटसुलट करून पाहिल्यावर ते आंतरदेशीय पत्र आहे असे कळले, त्यावरचा टाईप केलेला मजकूर असा होता.

प्रिय निर्मल,

जिम बॉइस नुकताच येथे येऊन गेला. त्या भेटीत त्याने मला भारतातील वनप्रदेशांच्या इतिहासावर संशोधन करणाऱ्या एका तरुण अभ्यासकाशी झालेल्या परिचयाबद्दल सांगितले. नॅशनल लायब्ररीमध्ये ते दोघे शेजारशेजारच्या डेस्कवर काम करीत असत; त्याचे नाव जिम विसरला. पण तो तुमच्याच संस्थेचा विद्यार्थी असावा, असा त्याचा अंदाज आहे. तुम्ही त्याला शोधू शकाल का? ‘ईपीडब्ल्यू’साठी काही उपयुक्त मजकूर त्याच्याकडे असल्यास पहावा. अनेक धन्यवादांसह,

आपला कृष्णराज

हे पत्र वाचून मी पुन्हा प्रो.चंद्रा यांच्या कार्यालयात गेलो. त्यांना मी थोड्याशा हताशपणेच विचारले, ‘सर, मी या पत्राचे काय करू?’ ते म्हणाले, ‘तू स्वत:च उत्तर लिही आणि त्यात तुझ्या कामाबद्दल त्यांना सर्व माहिती दे.’ त्यांनी सांगितल्याप्रमाणेच मी केले. त्याला उत्तर म्हणून कृष्णराज यांचे हिरवे पत्र मला मिळाले. त्यात त्यांनी म्हटले होते, की ते स्वत:च कलकत्त्याला पुढील महिन्यात येत आहेत आणि मला भेटण्यात त्यांना रस आहे.

कृष्णराज यांच्याबरोबरची माझी पहिली भेट अशी अनपेक्षित ठिकाणी झाली, ग्रेट ईस्टर्न हॉटेलमध्ये! ते पश्चिम बंगाल सरकारचे पाहुणे म्हणून आले होते. ते ज्या परिसंवादासाठी कलकत्त्यात आले होते तो पश्चिम बंगाल सरकारनेच आयोजित केल्यामुळे त्यांची राहण्याची सोय त्या अलिशान हॉटेलमध्ये करण्यात आली होती. पण मला जाणवले, त्या एकूण वातावरणाच्या विरोधी असणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व. मला तीव्रपणे जाणवली ती त्या वातावरणातली त्यांची तटस्थता. त्यांची वागणूक, त्यांचे बोलणे, त्यांची भाषा हे सर्वच त्यांच्या सौम्य आणि संकोची स्वभावाचे द्योतक होते. त्यांना भेटून मी बुचकळ्यात पडलो. आपल्या साप्ताहिकातून तीक्ष्ण आणि झणझणीत अग्रलेख लिहिणारा हाच का तो माणूस, ज्याने आपल्या साप्ताहिकाचा लौकिक (त्यातील प्रकाशित लेखांमधून) थेट ओरखडे ओढणारे नियतकालिक असा मिळवला? कृष्णराज यांची माझ्यावर अशी पहिली छाप पडली, ती पुढेही तशीच कायम राहिली. नंतर मी कधीतरी कृष्णराज यांना मुंबईत त्यांच्या ऑफिसमध्ये भेटलो. या जागेचे एकूण रंग-रूप आणि तेथील साधेपणा कृष्णराज यांच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला साजेसाच होता. या भेटीत ते थोडे अधिक बोलले, पण तसेच खालच्या स्वरात, सौम्यपणे. इतक्या सौम्य आणि शांतपणे की हा माणूस आपल्या बायको-मुलांवर कधीतरी चिडत असेल का; किंवा हाताखालील लोकांना रागावून बोलत असेल का असा प्रश्न मला पडत असे. या प्रश्नांचे उत्तर ‘नाही, त्रिवार नाही’ असेच मिळाले. तरीही त्यांच्या वागणुकीतील हा सौम्यपणा थोडा गैरसमज निर्माण करणारा आहे. त्यांच्या व्यक्तिगत स्वभावाचे ते प्रकटन असेलही; पण व्यावसायिक कर्तव्यांमध्ये ठामपणाच्या आड त्यांचा स्वभाव येऊ शकत नाही. अनेक प्रकारचे लेखक आणि आश्रयदाते यांच्यातील विविधता सांभाळून अशा प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण साप्ताहिक चालवणे आणि आठवड्यामागून आठवडे त्याचे अंक नियमितपणे प्रकाशित करणे यासाठी लागणारी अधिकृतता एका विशेष प्रकारच्या अधिकारभावनेतूनच निर्माण होत असावी.

हिरवट दिसणारी ती आंतरदेशीय पत्रे कृष्णराज यांच्या पत्रव्यवहाराचे महत्त्वाचे साधन होती. त्यावर ‘हितकरी हाऊस, 284 फ्रीअर रोड, मुंबई 400038 हा त्या नियतकालिकाचा पत्ता होता. त्यानंतरच्या काळात रस्त्याचे नाव बदलून ‘शहीद भगतसिंग मार्ग’ झाले आणि पिनकोड नंबर 400001, एवढाच बदल त्या हिरव्या पत्राच्या बाहेरील बाजूला झाला. आतल्या बाजूला संपादक मात्र तोच, तसाच! त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांना भेटणे ही एक प्रकारची धर्मनिरपेक्ष तीर्थयात्रा होती. व्ही.टी.स्टेशनची इमारत आणि रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय यांच्यामध्ये हे हितकरी हाऊस होते. मुंबईचा हा सर्व भाग अनेक प्रकारचे ऐतिहासिक संदर्भ आणि त्यांच्या स्मृती- इतकेच नव्हे तर मानवतेच्या कहाण्यांनी भरलेला आहे. व्ही.टी.स्टेशन आणि रिझर्व्ह बँक या दोन भव्य इमारती, यांच्यामध्ये भरगच्च दुकानांनी भरलेला आणि त्यावरून गाड्या, सायकली आणि पादचारी यांनी गजबजून गेलेला असा तो रस्ता दिसत असे.

त्या इमारतीत शिरण्यापूर्वी रस्त्यावरून आत वळले म्हणजे हायसे वाटे. या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर ईपीडब्ल्यूचे ऑफिस होते. लिफ्टचे दार उघडून बाहेर आले की समोर ओळीने छोट्या क्यूबिकल्सची रांग एका अरुंद पॅसेजच्या बाजूने लागलेली असे. या रांगेच्या टोकाला तसेच एक संपादकाचे क्यूबिकल, सहा फूट बाय चार फूट याच आकाराचे. त्यात एक लहान डेस्क आणि दोन-तीन खुर्च्या. तिथे एअर कंडिशनरचा काही संभव नव्हता. खोलीची एक उघडी खिडकी हीच चैन, जिच्यामधून एखाद्या चांगल्या दिवशी येणारी वाऱ्याची झुळूक वातावरण सुखकारक बनवून जाई. हा साधेपणा इतर न दिसणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये दिसून येई. कृष्णराज यांचा हा आग्रह होता, की त्यांच्या नियतकालिकात नोकरीला असलेल्या कनिष्ठ कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या पगाराच्या पाचपटीपेक्षा अधिक पगार ते घेणार नाहीत. 2002 मध्ये तीस वर्षे संपादकपदाची जबाबदारी निभावल्यानंतर त्यांचा मासिक पगार 12000 रुपये होता. त्यावर्षी ‘ईपीडब्ल्यू’च्या विश्वस्तांनी त्यांचे मानधन दुप्पट म्हणजे 24000 रुपये केले; विद्यापीठाच्या प्राध्यापकाला मिळणाऱ्या पगाराएवढे. तरीही ते त्या काळात अपुरेच होते. त्या कामाचा आवाका आणि महत्त्व लक्षात घेता, एखाद्या विद्वानाने किंवा अभ्यासकाने आपल्या संशोधनासाठी घेतलेल्या श्रमांच्या किमान दुप्पट मेहनत कृष्णराज यांनी घेतलेली असे.

कृष्णराज यांच्याकडे लिहिणाऱ्या अनेक लेखकांप्रमाणेच पत्रव्यवहारातून मला कृष्णराज चांगलेच समजले. वर्गणीदार म्हणून त्या साप्ताहिकाचा अंक दर आठवड्याला हाती पडणे ही तर एक चेतना देणारी घटना होतीच, पण त्याचबरोबर आपल्या पत्रपेटीत ते हिरवे पत्र- संपादकाने पाठवलेले- येऊन पडणे ही थरारून टाकणारी गोष्ट होती. त्यांच्या पिढीतील इतर लोकांना न जमलेली एक गोष्ट म्हणजे, इलेक्ट्रॉनिक संपर्क साधनांशी त्यांनी पटकन आणि कार्यक्षमतेने केलेली दोस्ती. ही त्यांची उपलब्धी त्यांच्या परदेशी लेखकांना दिलासा देणारी ठरली; पण या देशातील वाचक- लेखकांच्या वतीने बोलायचे झाले तर वेगळ्या रंगात उठून दिसणारी ही आंतरदेशीय पत्रे आणि त्याहीपेक्षा अद्‌भुततेचा आनंद देणारा आतील मजकूर यांची उणीव मला भासू लागली होती. त्यांच्या सहीचा पत्रव्यवहार त्यांच्या बिनसहीच्या संपादकीयाइतकाच मोजक्याच शब्दांत पण आशयपूर्ण असे, जी गोष्ट इंग्रजीमधून लिखाण करणाऱ्या बहुसंख्य भारतीयांमध्ये अभावानेच आढळते.

कृष्णराज यांच्याशी परिचय झाल्यानंतरच्या वीस वर्षांत आम्ही फार तर आठ-नऊ वेळाच भेटलो असू. पहिल्या वेळी माझ्या आठवणीप्रमाणे कलकत्त्यात आणि शेवटी बंगलोरला त्यांच्या निधनाच्या आधी काही महिने. (तिथे राहणाऱ्या त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी ते आलेले होते). इतर वेळी आम्ही मुंबईलाच त्यांच्या ऑफिसमध्ये भेटलो होतो. लांबट चेहऱ्याचे, शुभ्र केस असलेले कृष्णराज उमदे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या चष्म्यामागील शोधक दृष्टीने ते समोरच्याचा वेध घेत. त्यांच्यासमोरील डेस्कवर दोन-तीन फूट उंचीचा कागदांचा ढीग असे. स्वीकारायच्या किंवा नाकारायच्या लेखांचा ढीग. शेजारच्या शेल्फवर पुस्तकांची रांग असे. त्यातील एक-दोन पुस्तके भेटायला येणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडे परीक्षण लिहिण्यासाठी दिली जात.

हितकरी हाऊसच्या लिफ्टमध्ये मी पहिल्यावेळी शिरलो तेव्हा आणि शेवटच्या भेटीतही माझा मलाच अचंबा वाटायचा तो हा, की याच ‘ईपीडब्ल्यू’चा एक अंक विकत घेण्यासाठी आटापिटा करीत मला पलटण बझारला जावे लागे; तेव्हा याच साप्ताहिकाच्या कचेरीत जाऊन आपण त्या संपादकांना भेटू आणि जवळजवळ बरोबरीच्या नात्याने विचारांची देवाणघेवाण करू असे आपल्याला त्यावेळी वाटले तरी होते काय? किंचित कल्पना तरी होती काय?

माझे वय वाढत गेले तेव्हा मला अभिमान वाटावा असा सन्मान ईपीडब्ल्यूने मला दिला. ‘कॉट्रिब्यूटर’ या पदापासून ‘काँट्रिब्यूटर अँड टॅलेन्ट स्पॉटर’ अशी बढती मला मिळाली. जेम्स के. (जिम) बॉयस हे अर्थशास्त्रज्ञ आणि प्रो.निर्मल चंद्रा यांच्या शिफारसीमुळे या नियतकालिकात माझा प्रवेश झाला, आणि आता मलाच ‘ईपीडब्ल्यू’साठी आजूबाजूच्या समाजातील बुद्धिमान तरुण मुले-मुली शोधून त्यांची नावे सुचविण्याची कामगिरी करायची होती. माझ्यासारखे अनेकजण त्यांच्या ‘ईपीडब्ल्यू’मधील कामाचा पाठपुरावा करीत करीत वरच्या रांगेत जाऊन बसले होते; आणि हळुवार शाबासकीने माझ्याप्रमाणे त्यांना प्रोत्साहनही मिळत होते. पण कृष्णराज यांनी यासाठी केवळ स्तुती हे एकच साधन वापरले नाही, त्यांनी खास व्यावसायिक दृष्टीने या नवोदितांना उभे केले. त्यामुळेच त्यांना ‘ईपीडब्ल्यू’चा दर्जा इतकी वर्षे कायम ठेवता आला. त्यासाठी त्यांच्याजवळ असलेला असाधारण गुण (जो त्यांनी त्यांच्या पूर्वसुरींकडून) सचिन चौधरी यांच्याकडून उचलला होता. तो असा की, त्या साप्ताहिकासाठी सामाजिक शास्त्रांत प्रावीण्य मिळवलेली उगवत्या पिढीतील बुद्धिमान युवक मंडळी हेरून त्यांना साप्ताहिकात आणायचे.

मी कृष्णराज यांना ‘जंटल कलोसस’ (सौजन्यमूर्ती) असे म्हटले आहे. या उपाधीत आंतर्विरोध आहेच. हिरेन मुखर्जी या कम्युनिस्ट संसदपटूने जवाहरलाल नेहरूंवर लिहिलेल्या पुस्तकाला हे शीर्षक दिलेले आहे आणि मी ते जाणीवपूर्वक उचललेले आहे. नेहरूंचे राजकारण मुखर्जींना मान्य नसे. काही वेळा तर नेहरूंच्या राजकीय भूमिकांवर ते कडक टीकाही करीत. पण नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वातील सभ्यपणा, सहृदयता आणि कळकळ, त्याचबरोबर स्वतंत्र भारतात लोकशाही परंपरा रुजविण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम यांबद्दल मुखर्जींनी नेहरूंना धन्यवाद दिले आहेत. त्याचप्रमाणे ‘ईपीडब्ल्यू’च्या मित्रमंडळीत, साप्ताहिकाला मार्क्सवाद्यांमध्ये चाललेल्या वाद- विवाद आणि चर्चांत जो विशेष रस वाटतो, त्यामुळे माझ्याप्रमाणेच वैतागणारे इतरही आहेत. तरीही ‘ईपीडब्ल्यू’च्या संपादकांच्या व्यक्तिमत्त्वातील गोडवा, त्यांच्या वर्तणुकीतील सभ्यता आणि विशेष म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतही जवळजवळ एकहाती साप्ताहिक चालवून भारतातील बुद्धिवादी संस्कृतीची जोपासना करण्याचा ध्यास हा सर्वांच्याच प्रेमाचा विषय होता.

सचिन चौधरी आणि कृष्णराज या दोघांनीही भारतीय समाजात विचारप्रसार करून बुद्धिनिष्ठ नागरिक निर्माण करण्याचा उद्देश ठेवला होता. आपल्या सहयोगी मित्रांच्या कार्याची खबर घेण्यासाठी आणि विरोधकांचे इरादे समजावून घेण्याचे साधन हे नियतकालिक होते. या साप्ताहिकाच्या संदर्भात एक वस्तुस्थिती अशी आहे, की त्याचे संपादक बंगाल आणि केरळ या राज्यांतून आलेले आहेत. हा अपघात नसून त्याचे सुदैव आहे. कारण ही दोनही राज्ये बौद्धिकदृष्ट्या फार क्रियाशील आहेत आणि विवादपटु (जराशी भांडखोर)सुद्धा. दोनही राज्यांत कम्युनिस्टांनी दीर्घकाळ सत्ता राबविलेली आहे, सार्वत्रिक मतदानातून ती सत्ता त्यांना मिळाली आहे. त्यामुळे अति डाव्या मंडळींचा त्यांना कडवा विरोध आहे, कारण क्रांतीचा मार्ग सशस्त्र लढ्यातूनच उजळतो अशी त्यांची श्रद्धा आहे. दुसऱ्या बाजूने कम्युनिस्टांनी स्वातंत्र्य, मालमत्ता व परंपरा यांच्याविरोधी घेतलेल्या भूमिकांमुळे उदारमतवादी आणि सनातनीही, सचिंत होऊन त्यांना विरोध करीत असतात. केरळ आणि पश्चिम बंगाल यांच्यामध्ये होणाऱ्या राजकीय चर्चांचे अगर संघर्षांचे पडसाद देशभर उमटतात. त्याचे वाहक म्हणून ‘ईपीडब्ल्यू’ची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. जर त्याचे संपादक देशातील अन्य कोणत्याही राज्यातील असते तर कदाचित हे साप्ताहिक अधिक सौम्य झाले असते, पण मग ते तितके वाचनीयही झाले नसते.

‘इकॉनॉमिक वीकली’चे प्रकाशन सुरू झाले त्यावेळी जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान होते. नेहरूंचा आर्थिक दृष्टिकोन समाजवादी होता, पण राजकीयदृष्ट्या ते उदारमतवादी होते. बहुतेक वेळा त्यांची लोकशाहीप्रती असलेली बांधिलकी त्यांच्या समाजवादी विचारसरणीला डोईजड होताना दिसे. तरुण भारतीय बुद्धिवाद्यांना हे आवडत नसे. त्यामुळे आपले विचार व्यक्त करण्याचे त्यांचे साधन ‘इकॉनॉमिक वीकली’ हे होऊन बसले. उद्योगधंद्यांवरील खाजगी मक्तेदारीबद्दल ते टीका करीत. जमीन सुधारणा कायद्याची मंद गती ही नेहरूंच्या काँग्रेस पक्षाचे जे वर्गीय स्वरूप आहे त्यामुळे आहे, असे त्यांना वाटे; कारण त्यांच्यामते श्रीमंत शेतकऱ्यांचे हितसंबंध काँग्रेस सांभाळत होती आणि सधन मंडळींकडून पक्षासाठी पैसा गोळा करीत होती.

मी आधीच म्हटल्याप्रमाणे ‘ईपीडब्ल्यू’ हे कोणत्याही पक्षाशी जोडलेले नव्हते. पण मुळातच त्याचा राजकीय आविष्कार प्रखर होता. सचिन चौधरींच्या संपादकीय कारकिर्दीत या साप्ताहिकात लिहिणारे लेखक स्वच्छपणे दोन गटांत विभागलेले होते. उदारमतवादी आणि डावे असे त्यांचे दोन गट होते. ‘आम्ही नेहरूंचे प्रशंसक आहोत, पण त्यांचे अनुयायी आहोत असे मात्र नाही’ ही भूमिका स्वत: चौधरी यांची होती. 1966 साली सुरू झालेल्या ‘इकॉनॉमिक ॲण्ड पोलिटिकल वीकली’च्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच अंकात त्यांनी नेहरूंविषयी लिहिले. त्याआधीच नेहरूंचे निधन झाले होते, पण त्यांचा करिष्मा शिल्लक होता. चौधरींनी या अंकात लिहिले, ‘दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात अनेक अविकसित देशांच्या जीवनात एखाद्या पुढाऱ्याच्या नेतृत्वामुळे आणि करिष्म्यामुळे त्याचप्रमाणे थोड्याफार सकारात्मक परिस्थितीमुळे अभिमान वाटावा असा कालखंड आला असणे स्वाभाविक आहे; पण त्या मार्गावरची वाटचाल किती देशांना पुढे चालू ठेवता आली, आणि किती त्या मार्गावरून बाजूला गेले? परिस्थिती अशा प्रकारच्या ‘नेहरूं’ना घडवून समाजासमोर आणते. पण विचारी आणि महत्त्वाकांक्षी स्त्री-पुरुषच, समाजाला आकार देऊन लोकांचे ‘राष्ट्र’ बनवतात आणि त्यांची वाटचाल चालू ठेवतात….’

काही वर्षांतच नेहरूंच्या उदारमतवादाला त्यांच्या कन्येनेच गंभीर आव्हान दिले. भारताच्या प्रधानमंत्री झाल्यावर इंदिरा गांधींनी पक्षामधील आणि पक्षाबाहेरील मतभेदांना उत्तेजन दिले. अर्थव्यवस्थेतील राजकीय हस्तक्षेप वाढवला. न्यायमूर्ती आणि प्रशासनातील अधिकारी यांच्या नेमणुकीत पक्षपात केला. या सर्व एककेंद्री कारभाराचा कळस 1975 ते 1977 या काळातील आणीबाणीत झाला.

श्रीमती गांधींचे टीकाकार जुन्या जमान्यातील उदार लोकशाहीवादी आणि उजवे हिंदू परंपरावादी असे दोनही प्रकारचे होते. कृष्णराज यांच्या संपादकीय कारकिर्दीत त्यात मार्क्सवादी या तिसऱ्या गटाची भर पडली. स्वत: कृष्णराज चीनच्या प्रभावाखाली असलेल्या तरुण नक्षलवाद्यांच्या ध्येयवादामुळे फार प्रोत्साहित झाले होते. येथील प्रस्थापित कम्युनिस्ट पक्षांनी जो संसदीय मार्ग निवडला होता, त्याला ही नवोदित कम्युनिस्ट तरुणाई सतत आव्हान देत होती. या साप्ताहिकाने डाव्यांच्या राजकारणाकडे जो झुकाव दाखवला त्याचा एक फायदा असा झाला की, राज्याराज्यांमध्ये मानवी हक्क व अधिकार यांवर राज्यकर्त्यांकडून जे आक्रमण होत होते त्याचे तपशीलवार वृत्तांत ‘ईपीडब्ल्यू’मध्ये प्रसिद्ध होऊ लागले होते; पण त्याचबरोबर तोट्याची बाजू ही की मार्क्स, लेनिन किंवा माओ यांच्या एखाद्या विधानाचा सैद्धांतिक अर्थ लावण्यासाठी झालेल्या काथ्याकुटापायी साप्ताहिकाची पानेच्या पाने खर्ची पडत.

1980 च्या दशकात मी ‘ईपीडब्ल्यू’ प्रथम वाचायला सुरुवात केली तेव्हा नव्या आणि जुन्या दोनही डाव्यांना साप्ताहिकाने सारखीच जागा दिलेली होती. नंतर लवकरच त्यांना पर्यावरण आणि स्त्रीवादी चळवळींच्या स्वरूपात पुढे येणाऱ्या नव्या लोकांची विशेष दखल घेणे भाग पडले. यामुळे साप्ताहिकाचे पूर्वीचे निष्ठावान आश्रयदाते नाराज झाले व काहीजण साप्ताहिकापासून दूरही झाले. 1991 मध्ये धर्माकुमार या इतिहाससंशोधिकेने- जी सचिन चौधरींची स्नेही होती- ‘ईपीडब्ल्यू’मधील मार्क्सवादी मक्तेदारीचा शेवट करून पुन्हा वस्तुनिष्ठ वैश्विक भूमिका संपादकांनी घ्यावी असे पत्र लिहिले आणि ते ‘ईपीडब्ल्यू’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर संतापयुक्त प्रतिक्रियांचा खच पडला. त्यात विशेष म्हणजे अटलांटिक पलीकडून चिथावणी मिळालेल्या जवळजवळ दोन डझन पाश्चिमात्य अभ्यासकांनी एक लांबलचक पत्र लिहून असे सूचित केले होते की, ‘प्रा.धर्माकुमार यांचा विरोध हा आयएमएफ व वर्ल्ड बँक यांच्या भारताला अस्थिर करणाऱ्या कटाचाच एक भाग असावा!’ पण धर्माकुमार यांना पाठिंबा देणारीही काही पत्रे साप्ताहिकात प्रसिद्ध झाली, त्यांमध्ये भारतातील डाव्यांनी पूर्व युरोपात वाहणाऱ्या उदारमतवादी वाऱ्यांची दखल घ्यावी असे म्हटले होते.

नेहमीप्रमाणे ‘ईपीडब्ल्यू’कडे येणारी पत्रे आणि इतर लेख यांची जागा सैद्धांतिक चर्चा, काथ्याकूट यांच्यासाठी देण्याचा पवित्रा साप्ताहिकाने घेतला. ही चर्चा अनेक महिने चालली. पण त्याचा शेवट स्वागतार्ह झाला. कारण कृष्णराज यांनाच ही जाणीव झाली की बदल फक्त रशियातच होतो आहे असे नाही; तर तो चीन व भारतामध्येही होतो आहे. विसाव्या शतकाने हे दाखवून दिले आहे की, सत्तेच्या तुलनेत आर्थिक परिवर्तनाचा वेग वाढविण्यात बाजारपेठेची कार्यक्षमता अधिक आहे. ‘ईपीडब्ल्यू’मध्ये नंतर उदार दृष्टिकोन बाळगणाऱ्या अर्थतज्ज्ञांचाही आवाज उठू लागला. त्याच काळात या साप्ताहिकाची पोच तरुण इतिहास-अभ्यासक आणि समाजशास्त्रज्ञ यांच्यापर्यंत गेली होती. या तरुणांच्या खांद्यावर त्यांच्या शिक्षकांप्रमाणे पक्षाच्या तत्त्वज्ञानाचे ओझे नव्हते. पण ‘ईपीडब्ल्यू’सुद्धा मजकुराचा रोख दुसऱ्या टोकाला जाणार नाही याबद्दल सावध होते, म्हणूनच त्यात जागतिकीकरणाच्या समर्थकांना त्यांची बाजू मांडण्यास जागा दिली तर त्यांच्या भूमिकेच्या विरोधकांनाही उत्तर देण्याची संधी लगेच मिळे.

‘ईपीडब्ल्यू’ हे भारतातील बौद्धिक चर्चेचे एक व्यापक व्यासपीठ आहे. याची पाने आपल्या लेखनाने सजविणाऱ्यांत मुक्त बाजारव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्यांपासून ते नक्षलवाद्यांची वकिली करणाऱ्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. तथापि, या नियतकालिकाने एक प्रकारचा दृष्टिकोन मात्र चर्चेत न आणण्याचा सतत प्रयत्न केला, तो म्हणजे धार्मिक दहशतवाद. या दृष्टीने पाहिले तर या देशाच्या राजकीय विचारांचे पूर्ण प्रतिबिंब या साप्ताहिकात पडले आहे असे म्हणता येत नाही; कारण आजच्या भारतात हिंदुत्वाचा प्रभाव फार मोठा आहे, पण धार्मिक उग्रवादी ‘ईपीडब्ल्यू’मधून आपले विचार मांडण्यास उत्सुक नसतात. या बाबतीत जगातील त्यांच्याच धार्मिक भूमिकेशी साम्य असलेल्यांची सर्वत्र हीच कथा आहे. तसेही हिंदू मूलतत्त्ववादी आपल्या विचार प्रसारासाठी ‘ईपीडब्ल्यू’सारख्या नियतकालिकाचा अस्सल इंग्रजी भाषेतील मजकुरासाठी वापर करण्याऐवजी तोंडी पसरवलेल्या गप्पा आणि अफवा यांचा प्रभावी उपयोग करतात.

कृष्णराज यांचे निधन झाल्यावर ‘ईपीडब्ल्यू’च्या विश्वस्तांनी त्यांच्या जागी अर्थशास्त्रज्ञ राममनोहर रेड्डी यांची नियुक्ती केली. आणीबाणीमध्ये अटक झालेल्या सोशलिस्ट रेड्डींचे हे सुपुत्र. रेड्डींचे शिक्षण चेन्नईमध्ये, कोलकाता व थिरुअनंतपुरम्‌ध्ये झाले. त्यांच्या संचालकत्वाखाली ‘ईपीडब्ल्यू’ने आपला दर्जा आणि सच्चेपणा टिकवून धरला आहे. नवीन संपादकांनी काही महत्त्वाचे बदल या साप्ताहिकात सुरू केले आहेत. त्यांपैकी दोन गोष्टी संपादकांच्या पूर्वसुरींचा सन्मान करणाऱ्या आहेत. त्यांतील एक म्हणजे चालू अंकामधल्या मजकुराशी संबंधित किंवा संदर्भ असलेले जुन्या अंकांतील उतारे, स्तंभ किंवा लेख वा संपादकीय यांचे पुनर्मुद्रण. दुसरी गोष्ट म्हणजे साप्ताहिकाच्या पहिल्या पानावर त्याच्या नावाखाली ठळक अक्षरांत दर आठवड्याला प्रसिद्ध केला जाणारा मजकूर… ‘‘1966 साली प्रसिद्ध झालेल्या पहिल्या अंकापासून ‘ईपीडब्ल्यू’ हे भारतातील चालू घटनांचे परीक्षण करणारे आणि सामाजिक शास्त्राचे संशोधन करणारे एक महत्त्वाचे नियतकालिक आहे. 1949 ते 1965 या काळात सचिन चौधरी यांनी स्थापन करून चालविलेल्या ‘इकॉनॉमिक वीकली’ या पत्राचे ते आणखी प्रगत व सुधारित रूप आहे. त्यानंतर 1969 पासून 2004 पर्यंत हे पत्र कृष्णराज यांनी कसोशीने चालवून या पत्राला आजची प्रतिष्ठा मिळवून दिली आहे.’’

माझ्यासाठी कृष्णराज हे मित्र आणि अतिशय भरवशाचे सल्लागार अशा दोनही भूमिकांत राहिले. आमच्या वीस-बावीस वर्षांच्या सहवासांत दोन वेळा एकमेकांपासून दूर होण्याचे प्रसंग आले. 1991 मध्ये व 1999 मध्ये असा दोन वेळा ‘ईपीडब्ल्यू’शी मला संघर्ष करावा लागला. मला स्वत:ला अत्यंत तात्त्विक वाटणाऱ्या पण इतरांना केवळ सैद्धांतिक म्हणून जुजबी वाटणाऱ्या काही गोष्टींवरूनच आमच्यात बेबनाव निर्माण झाला. त्या घटनांच्या खूप नंतर कृष्णराज यांनी मला कळवले होते. ‘तुम्ही ज्या लढायांचा किंवा संघर्षांचा उल्लेख केला त्या ‘ईपीडब्ल्यू’साठी फार हिताच्या ठरल्या.’ पण प्रत्येक वेळी समेटाचा हात मीच पुढे केला ही गोष्ट मला इथे नोंदवावीशी वाटते; कारण ‘ईपीडब्ल्यू’चे माझ्याशिवाय निभावेल, पण मी मात्र त्याशिवाय राहू शकत नाही.

(अनुवाद : कुमुद करकरे)

Previous articleफिशिंग (phishing) आणि भावनांचा बाजार
Next articleद हिल वी क्लाईंब
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.