मधुबाला: आईये मेहरबां

(साभार : दैनिक ‘महाराष्ट्र दिनमान’)

-मिथिला सुभाष

‘आईये मेहरबां’ हे मधुचं निमंत्रण ज्याने स्वीकारलं त्याचा तो ‘खुदा ही निगहबान!’ इतर कुणीच त्याला वाचवू शकत नाही. तिच्या नजरेच्या होऱ्यात आपली जान ठेऊन फक्त इंतजार करायचा की, “तू आके नजर डाले.. या ठोकर मारे..!” ठोकर मारायला पण नजर तर टाकावीच लागते ना?? खूबसूरतीच्या या आतषबाजीचं गारुड आजही कमी झालेलं नाहीये. जिच्या पडद्यावरच्या केवळ दर्शनाने शरीरातल्या अवघ्या रक्ताची झगझगती वीज व्हावी, तिची मधुर-दाहक याद आजही अनेकांनी आपल्या हृदयात जपलीये. हव्याहव्याशा वाटणाऱ्या तिच्या Crooked Smile सारखी.

‘अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना’ असं मोहवणारी, ‘पिया, पिया, ना लागे मोरा जिया’ असं व्याकूळ होऊन सांगणारी आणि लगेच ‘आजा चोरी-चोरी’चं जालीम आव्हान देणारी, ‘आईये मेहेरबां’ म्हणत ओढाळ आमंत्रण देणारी, ‘ये क्या कर डाला तूने’ गातांना मधेच ओठांचा दिलक़श चंबू करून जीवघेणी शीळ घालणारी, ‘पांच रुपय्या बारा आना’च्या बहाण्याने त्याला खेळवणारी, ‘दो घडी वो जो पास आ बैठे’मधली मधाळ, मीलनोत्सुक कटाक्ष फेकणारी..! अल्लाह मुसिबत है..!! किती.. कित्ती रूपं आठवायची या मधुबालाची?? ‘मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे’ या गाण्यात ती जेव्हा

पहिल्यांदा घुंगट उचलते, शहजादा सलीमला तिचा पहिला दीदार होतो, तेव्हा तिनं क्षणभर ओठ चावलाय. ते बघून आपण ‘सलीम’ व्हावं की ‘नंदलाल’ व्हावं याचा निर्णयच आपण करू शकत नाही! ‘परदा नहीं जब कोई खुदा से, बंदे से परदा करना क्या,’ असं ठणकावून विचारणारी अनारकली त्यानंतर झालीच नाही! अतिशय उत्कटपणे आठवणारी अनारकली म्हणजे… दोघं एकांतात भेटलेले असतात.. त्याचवेळी जिल्ले-सुभानी अकबर बादशहा तिथे येत असल्याची ललकारी होते. अनारकली धावत परत जायला निघते.. ती एवढी मोठी बारादरी-बारामदा.. ही या टोकावरून निघते आणि त्या टोकावर पोचेपर्यंत तिथं बादशहा आलेला असतो.. अनारकली वळते.. पुन्हा सलीमच्या दिशेने झेपावते.. तो तिला आधार द्यायला निश्चल उभा.. ही त्याच्यापर्यंत पोचते आणि त्याच्या मिठीत शिरून बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळते.. कोसळताना तिच्या मुठीत आलेल्या त्याच्या मोत्याच्या माळा तुटून मोती इतस्त: पसरतात.. प्रेमभंगाचे अश्रू सांडल्यासारखे! ही मधुबाला जो विसरला तो… उफ्फ! ये भी कोई भूलनेवाली फ्रेम है?

१४ फेब्रुवारी हा तिचा वाढदिवस! इथं आपण काही तिचा बायोडेटा पाहायचा नाहीये की तिच्या आणि दिलीप कुमारच्या विफल प्रेमाची गोष्टही मी सांगणार नाहीये. ते सगळं चावून चोथा झालंय राव. आपण काहीतरी वेगळं बोलू तिच्याबद्दल. तिचं पडद्यावरचं जीवन जसं अलौकिक चंद्रकिरणांवर स्वार झालेलं वाटायचं, तसंच तिचं पडद्यामागचं जीवनही तेवढंच सनसनीखेज होतं. तिचा बाप तिला सौंदर्याची पुतळी म्हणून नाचवत होता आणि ती समवयीन नायकांत ‘दिल का कद्रदान’ शोधत होती. प्रेमनाथ आणि दिलीपकुमारमधे तिला मिळवण्याची स्पर्धा होती. ‘मधुबालाचं माझ्यावर प्रेम आहे,’ असं कमाल अमरोही मीनाकुमारीला भासवत होता. मधुबाला हॉट केक होती. तिच्या आधीच्या हिंदी चित्रपटातल्या बहुतेक नायिका पोक काढून चालायच्या आणि केसांची महिरप मेणाने कपाळावर चिकटवायच्या. त्यांच्या गर्दीतून पुढे आलेली मधुबाला अवखळ नदीसारखी, सोनेरी भुरभुरत्या बटांचं भान नसलेली, नाममात्र रंगरंगोटी करणारी, सत्यात उतरलेल्या स्वप्नासारखी अलगद चंदेरी पडद्यावरून रसिकांच्या दिलात उतरली. डोळ्यांना नाममात्र मेकअप करणारी ती त्या काळात एकच होती. बाकी तर सगळ्या काजळाच्या डब्या होत्या. इडलीला काजळ लावल्यासारख्या दिसायच्या!

‘स्टार’ या शब्दाला त्याचा खरा अर्थ मिळवून देणारी मधुबाला, अभिनेत्री म्हणून काही असामान्य नव्हती. पण अभिनय लेकाचा इथं कळतोय कोणाला? हिरोची मर्दानगी आणि हिरोईनची खूबसूरती, नखरे, अदा.. बास! ‘स्टार्स’चा विचार केला तर आज तरी काय वेगळं आहे??

एकदा पी.एल.संतोषीच्या ‘निराला’मधे मधुने पाण्यात भिजायला नकार दिला. बहुत वादावादी झाली. तिचे अब्बाजान भडकले, म्हणजे विषय कटच ना?? संतोषी शूटिंग सोडून निघून गेले. दुसऱ्या दिवशी ही बातमी पेपरात आली. मधुने काय करावं?? तिनं पत्रकारांवर बहिष्कार टाकला. ग्रेटा गार्बोनंतर पत्रकारांवर बहिष्कार टाकणारी मधुबालाच. हा बहिष्कार पुढे खूप गाजला. एक वर्षानंतर राम औरंगाबादकरांना मधे घालून तिच्या अब्बाजानने हा बहिष्कार संपवला. मधुबालासोबत कायम एक पिस्टलधारी बॉडीगार्ड असायचा. हे पण त्या काळात नवीन होते. तेव्हाच्या हिरोईनी बाबूजी, भाईसाहब, अम्मी, खाला, आपा, अब्बा वगैरेना सोबत घेऊन यायच्या.

वेळ आणि शिस्तीच्या बाबतीत मधुबाला अतिशय नियमित होती. नटीच्या आईपासून तिच्या कुत्रीपर्यंत आणि पेट्रोलपासून ज्यूसपर्यंतचे खर्च जेव्हा निर्मात्याच्या माथी मारले जायचे, तेव्हा मधु हे सगळे खर्च तिचे ती करायची. ती शिकलेली नव्हती. पण बुद्धिमान होती, हट्टी होती. १९५१ साली फ्रँक काप्रा भारतात आले तेव्हा त्यांनी मधुबालाला भेटण्याची इच्छा ब्लिट्झच्या करंजियांकडे व्यक्त केली. मधुला जेवणाचं निमंत्रण गेलं. ही पठ्ठी ‘काट्या-चमच्या’ने जेवता येत नाही म्हणून गेलीच नाही.

आपलं लग्न दिलीप कुमारशी व्हावं अशी तिची इच्छा होती. दिलीप कुमारही तिच्या प्रेमात होताच. मियां-बिबी राजी होते. काजी पण राजी झाला असता. पण बिबीच्या अब्बाने मोडता घातला. दिलीप कुमारने आधी आपल्या पाचही बहिणींची लग्न करून द्यावीत, मग मी त्याला जावई करून घ्यायचा की नाही याबद्दल विचार करेन, असं फर्मान त्यानं काढलं. सोन्याचं अंडं देणारी कोंबडी त्यांना सोडायची नव्हती. दिलीप-मधुमधे वितुष्ट आलं. ‘मुगले आझम’ हा अमर प्रेमाचा शाहकार चित्रित होतांना ही दोघं एकमेकांशी शब्दाने बोलायची नाहीत.

या तुटलेल्या प्रेमसंबंधाने नंतर दोघांना खूप मनस्ताप दिला. एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान बोलतांना दिलीप म्हणाला होता की माझं मधुबालावर प्रेम आहे आणि ते मी मरेपर्यंत राहील. तो चालता-बोलता होता तोपर्यंत मधुच्या कबरीवर फुलं ठेवायला जायचा असं म्हणतात.

दिलीप कुमार-मधुबालाच्या प्रेमाला रसिकांचा पाठिंबा होता. त्यांचं लग्न व्हावं असं त्यांच्या तमाम चाहत्यांना वाटायचं. पण.. ते नाही झालं.. यातला दु:खद भाग हा की या दोघांच्या मधे वैराची धगधगती रेष आखली गेली. १९५७ साली बी.आर.चोप्रांचा ‘नया दौर’ आला. स्क्रीनमधे त्याची पानभर जाहिरात आली. मोठ्या अक्षरात दिलीपकुमार, मधुबाला.. पण मधुबालाच्या नावावर एक बटबटीत लाल फुली आणि पुढे वैजयंतीमाला, अशी ती जाहिरात प्रकाशित झाली. पुढच्याच आठवड्यात दुसऱ्या एका नियतकालिकात पुन्हा एक पानभर जाहिरात झळकली. ही होती मधुबालाच्या आगामी सिनेमांची यादी. त्या यादीत मधेच ‘नया दौर’ असं नाव होतं आणि त्यावर ठळक फुली होती. हे प्रकरण कोर्टात गाजलं होतं.

प्रेमभंग होत असतात. पण त्यानंतर दोघं एकमेकांशी कसे वागतात, यावर त्या प्रेमाची प्रत आणि त्या दोघांचा दर्जा ठरत असतो. प्रेमभंगाचा ग्रेसफुल स्वीकार फार कमी लोकांना जमतो.

दिलीप कुमार नावाच्या tragedy king शी संबंध तुटल्यावर मधुबाला एकदम जाऊन पडली ती कॉमेडी king च्या बाहुपाशात. १९५९ मधे तिनं किशोर कुमारशी लग्न केलं. तेव्हाही ती आजारीच होती. त्यानंतर दहा वर्ष ती तिच्या आजाराशी लढत होती. तिच्या शेवटच्या वाढदिवशी तिला फक्त एक गुलदस्ता आला. ते तिच्या जीवाला लागलं. आणि पुढच्याच आठवड्यात, अवघ्या छत्तीसाव्या वर्षी, ती उदबत्तीच्या पवित्र, कुंवार धुरासारखी वातावरणात विरून संपून गेली. खूपसा सुगंध आणि एक चटका मागे ठेऊन!

मधुबाला सदैव अर्धोन्मिलीत कळीसारखी अस्पर्शित भासायची. तिला कधीच जाडी, फताडी किंवा सुरकुतलेली कोणी पाहिलं नाही. शेवटी मिटेपर्यंत तिचे डोळे तसेच होते.. मेकअपशिवाय टपोरे.. हसरे.. खट्याळ निमंत्रण देणारे. ‘मोगले आझम’मधे किती तरी किलोच्या साखळ्या ओढून ती आजारी पडली असं तिचा अब्बाजान म्हणायचा. पण..

… पण आम्हाला माहित आहे, तिने ओढला होता तो रथ तिच्या विलक्षण मोहमयी सौंदर्याचा सुवर्णरथ होता. त्याला चंद्रधवल डौलदार, शुभ्र अश्व होते.. त्या सुवर्णरथावर अलौकिक प्रेमाचा संदेश देणारा गुलाबी ध्वज होता.. आणि मदनबाणाच्या टपोऱ्या सुगंधित कळ्यांनी बनलेला लगाम तिच्या हातात होता..!! अजूनही कधीतरी ती कल्पनेत येऊन नुसती हसली तरी ते अश्व उधळतात आणि चांदीची धूळ उडवत थेट काळजात शिरतात, तिच्या Crooked Smile सारखी. आणि मदनबाणाच्या सुगंधाने आसमंताला भुरळ पडते..!! सगळी क़ायनात तिच्या जन्नती खूबसूरतीने भरून… भारून जाते..!!

(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आहेत)

Previous articleबंटी और बबली: शामत और क़यामत
Next articleपटोलेंच्या मार्गावरील पाचरी !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here