पटोलेंच्या मार्गावरील पाचरी !

■प्रवीण बर्दापूरकर

र्वांशी जुळवून घेणार्‍या सौम्य वृत्ती अन संयमी असणार्‍या बाळासाहेब थोरात यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून आक्रमक प्रतिमा असणार्‍या नाना पटोले यांची अपेक्षेपणे नियुक्ती झाली आहे . पाटोळे यांची यापदी नियुक्ती व्हावी , या बातम्या चालवून चालवून प्रकाश वृत्त वाहिन्यांना नाही पण , त्या बातम्या ऐकून/बघून प्रेक्षकांना मात्र जाम कंटाळा आलेला होता हे नक्की . त्यामुळे वृत्त वाहिन्यांनी छळले होते पटोले यांनी सुटका केली असंच बातम्या ऐकणारांना वाटलं असणार !  पटोले यांची नियुक्ती करताना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी एकीकडे राजकीय चातुर्य दाखवलं आहे तर दुसरीकडे नाना पटोले यांना मुक्तपणे काम करता येणार नाही , अशी पाचरही मारुन ठेवली आहे .

कोणत्याही पक्षाचा अध्यक्ष नियुक्त करणे ही राजकीय प्रक्रिया असते त्यामुळे त्यात पक्षाची स्थिती , येणार्‍या निवडणुका जिंकण्याच्या रणनीतीसोबतच जात आणि धर्म आणि त्या व्यक्तीची प्रतिमा हे मुद्दे प्रभावी ठरतात . राज्याच्या सत्तेत असूनही काँग्रेसचं फार कांही वजन-बिजन सरकारात आहे , असं चित्र नाही . खरं सांगायचं तर , सरकारमध्ये काँग्रेसची अवस्था तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी आहे . काँग्रेसच्या मंत्र्यांना डावललं जातं वगैरे तक्रारी अधूनमधून ऐकायला येतातच पण , विरोधी पक्षात असण्यापेक्षा सरकारात बसणं केव्हाही चांगलं अशी ती अगतिकता आहे ! निवडणुकांचे  निकाल हा निकष लावायचा झाला तर पक्षाचं राजकीय अस्तित्व राज्यात  मुळीच सुदृढ नाही आणि सर्वदूर पाळंमुळं अजूनही घट्ट असली तरी काँग्रेस पक्षाला मरगळ आलेली आहे . शिवाय मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन काँग्रेस पक्ष चांगलाच कोंडीत सापडलेला आहे . राज्यातल्या मराठा मतदारांवर पकड मिळवण्यासाठी  (महा)राष्ट्रवादी  ( म्हणजे  मराठ्यांचा पक्ष असंच समीकरण आहे ! )  आणि भारतीय जनता पक्षात जोरदार प्रयत्न सुरु आहेत . अशावेळी बहुजन वर्गावर  डोळा ठेवत  राज्यात पक्षाची फेरबांधणी करण्याचा काँग्रेस पक्षाचा मानस असावा , असे नाना पटोले यांच्या नियुक्तीवरुन स्पष्ट दिसतं आहे .

नाना पटोले पूर्व विदर्भातले . भंडारा जिल्यहयातील साकोली तालुक्यातील सुकळी हे त्यांचं गाव . महाविद्यालयीन जीवनापासूनच नाना पटोले तसे चळवळे आहेत . पदव्युत्तर शिक्षण  घेताना ते काँग्रेसप्रणित एनएसयूआय या संघटनेचे सदस्य  होते . ‘अरे’ ला ‘कारे’नं जबाब देण्याची नाना पटोले यांची  संवय तेव्हापासूनची आहे . सध्या वयानं साठीच्या आंतले ( जन्म ५ जून १९६३ ) असलेले नाना पटोले यांनी राजकारणात प्रवेश केला तो १९८०च्या जिल्हा परिषद निवडणुकीत . तेव्हापासून आजवरचा त्यांचा राजकीय प्रवास अनेक वाटा-वळणाचा आहे . अपक्ष , काँग्रेस , भाजप आणि पुन्हा काँग्रेस अशी ही राजकीय वळणं आहेत ; या प्रवासात जय आणि पराजयाचे  चढ-उतारही भरपूर आहेत .  २०१४च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या राजकारणातील एक दिग्गज , उद्योगपती आणि राष्ट्रवादीचे एक बडे नेते प्रफुल्ल पटेल यांना त्यांच्याच पारंपरिक भंडारा मतदार संघातून नाना पटोले यांनी पराभवाची धूळ चाखायला लावली आहे .  ‘जायंट किलर’ म्हणून तेव्हाच जर नरेंद्र मोदी यांच्या सरकारात मंत्रीपद मिळालं असतं तर , नाना पटोले यांनी भाजपचा त्याग केला असता असं म्हणणं धाडसाचं ठरेल .

बहुजन आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नावर आक्रमक असणारा नेता अशी नाना पटोले यांची प्रतिमा आहे . भारतीय जनता पक्षात राहून नरेंद्र मोदी यांच्याशी पंगा घेणं हे कांही सोपं काम मुळीच नव्हे ; आठवा – लालकृष्ण अडवाणी , जसवंतसिंह , शत्रुघ्न सिन्हा , यशवंत सिन्हा प्रभृती . नाना पटोले यांनी मात्र ते धाडस  दाखवलं आणि बंडखोर म्हणून त्यांची प्रतिमा नव्याने उजळली . २०१९च्या लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदार संघातून भाजपचे ‘हेवी वेट’ नितीन गडकरी यांना पांच लाखानी पराभूत करण्याची घोषणा केल्यावर तर त्यांना खूपच प्रसिद्धी मिळाली . महाराष्ट्रभर नाव माहिती नसलेले नाना पटोले एकदम राष्ट्रीय स्तरावर पोहोचले . लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तरी एव्हाना महाराष्ट्र काँग्रेसला एक आक्रमक आणि बहुजन नेता मिळाला होता . हा चेहेरा आज ना उद्या राज्य काँग्रेसचं नेतृत्व करणार हे स्पष्टच होतं .

काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्षपद सोपवतांना नाना पटोले यांचे पंख आधीच कापून ठेवले आहेत . प्रदेशाध्यक्षाला राज्यात विभागवार एक सहायक सहकारी ही कल्पना कितीही आदर्शवादी असली तरी पक्ष चालवण्याच्या दृष्टीने ती कटकटीची आहे कारण हा प्रत्येक विभागवार कार्यकारी अध्यक्ष त्याच्या विभागाच्या पोळीवर जास्तीत जास्त तूप कसं ओढून घेता येईल याचाच विचार करणार हे उघड आहे . यातील आणखी एक अडचण म्हणजे खुद्द नाना पटोले यांना पक्ष राज्यभर वाडी आणि तांड्यापर्यन्त कसा पसरलेला आहे याची सखोल माहिती नाही कारण इतक्या व्यापक आणि सूक्ष्म पातळीवर कोणत्याच पक्षाच्या संघटनात्मक कामाचा त्यांना अनुभव नाही . भाजपत नरेंद मोदी आणि अमित शहा यांची एकाधिकारशाही आहे हा आरोप राजकीय म्हणून ठीक आहे ; मात्र काँग्रेस पक्षातही अधिकारांच दिल्लीत इतकं केंद्रीकरण झालेलं आहे की तालुका अध्यक्ष नियुक्त करण्याचे अधिकारही पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला एकमतानं ( ! )  देण्याचा रोग काँग्रेस पक्षाला जडलेला आहे आणि या रोगावर कोणतंही औषध नाही ; यावर नाना पटोले कसे मात करतात यावर त्यांच्या मर्जीची स्वतंत्र टीम उभारुन पक्षाला उभारी देण्याचे त्यांचे मनोरथ पूर्ण होणं अवलंबून आहे .

नाना पटोले यांची प्रतिमा आक्रमक , बंडखोर असणं आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करणं या वेगळ्या बाबी आहेत . प्रतिमा प्रतिसाद मिळवून देऊ शकते पाठिंबा नाही . पाठिंबा मिळवण्यासाठी शून्यातून प्रयत्न सुरु करावे लागतात आणि ते अखंड असतात . विधानसभा आणि लोकसभा निवडणुकातील सलग पराभवामुळे काँग्रेस पक्षात मरगळ आणि कार्यकर्त्यात नैराश्य आलेलं आहे . पक्षाला नवी उभारी देण्यासाठी नाना पटोले यांना अगदी तालुका पातळीपर्यन्त दौरे करावे लागतील , कार्यक्रम घ्यावे लागतील , रस्त्यावर उतरुन संघर्ष करावा लागेल . दौरे आणि कार्यक्रमासाठी भरपूर निधी लागेल आणि काँग्रेस पक्षाची तर तिजोरी आटलेली आहे शिवाय प्रदीर्घ काळ सत्तेत राहिल्यानं रस्त्यावर उतरण्याची संवयच राहिलेली नाही . दिल्ली ते गल्ली पातळीपर्यंत काँग्रेसच्या भरवशावर लाखो नेत्यांचे आर्थिक साम्राज्ये उभी ठाकली पण , यापैकी पक्षाच्या कोषात कुणीही घसघशीत परतफेड टाकलेली नाही .

काँग्रेसचे हे बहुसंख्य मनसबदार त्यांच्या मतदार मतदार संघात पक्षापेक्षा जास्त प्रभावी आणि त्यांची घराणेशाही हाही एक मुद्दा आहे ; त्या साम्राज्याची एक वीट जरी ढासळण्याची शक्यता निर्माण झाली तर यापैकी बहुसंख्य  मनसबदारांच्या पक्षीय निष्ठा डळमळीत होतात , असाच आजवरचा अनुभव आहे .  शिवाय गांधी घराण्याने प्रचाराची धुरा घ्यावी आणि त्या प्रचाराला आलेली विजयाची फळे आपण चाखावी अशा ऐदीपणाच्या संवयीचे ग्रहण  काँग्रेस पक्षाला लागलेलं आहे ; ते ग्रहण किमान महाराष्ट्र  राज्यापुरतं तरी सोडवण्यात यश आलं तरच नाना पटोले यांच्या कारकिर्दीला यश बघता येईल . संघटनात्मक काम करण्याचं भाजपचं मॉडेल नाना पटोले यांनी नीट अभ्यासावं आणि काँग्रेस विचाराची एक नवी रचना उभी करण्याचा प्रयत्न करायला हवा . काँग्रेसी विचाराची प्रभावी व्यवस्था उभी राहिली आणि त्यातून विश्वासाचा पूल पुन्हा बांधला गेला तर पक्षापासून दुरावलेले मुस्लिम , मागासवर्गीय , आदिवासी  पुन्हा जोडले जाऊ शकतात . त्यातूनच  ‘व्होट बँके’त घसघशीत वाढ होऊ शकते . अर्थात ही प्रक्रिया दीर्घ आहे आणि त्यासाठी निष्ठावान कार्यकर्त्यांचा मोठा संच , संयम तसंच चिकाटी लागेल .  काँग्रेस पक्ष इतक्या गांभीर्यानं कोणत्याच पातळीवर राजकारण करण्याच्या मन:स्थितीत अलीकडच्या दोन अडीच दशकात दिसलेला नाही , हाही एक मुद्दा आहेच . प्रदेशाध्यक्ष म्हणून अशी एक नाही तर अनेक पाचरी नाना पटोले यांच्या मार्गावर आहेत .

स्वत:चं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी दुसयावर केवळ टीकेसाठी  टीका करुन किंवा वाचाळवीरपणा करुन  प्रसिद्धीच्या झोतात राहण्यापेक्षा शांतपणे आपली रेषा मोठी करण्याचा प्रयत्न नाना पटोले यांना करावा लागणार आहे . अन्यथा , भाजपत नरेंद्र मोदी यांना आव्हान देणारा एक नेता काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आला आणि गेला , यापेक्षा वेगळी कांही नोंद राज्य काँग्रेसच्या इतिहासात होणार नाही !

-वर केलेल्या प्रतिपादनाला किंचित छेद देणारा एक मुद्दा आहेच . कुणाल पाटील , प्राणिती शिंदे या तरुण चेहेर्‍यांच्या निवडीचं स्वागत करायला हवं . सुशीलकुमार शिंदे आणि रोहिदास पाटील या दिग्गज नेत्यांचे हे ( आशादायी ) वारस आहेत . दाजी उपाख्य रोहिदास पाटील हे एक बडे पण , सतत डावलले गेलेले काँग्रेस नेते . आता त्यांच्या वारसदाराला जर पुढे आणण्याचं काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी ठरवलं असेल तर त्याकडे झालेल्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून बघायला हवं . प्रणिती शिंदे गेल्या दहा वर्षात पक्षासाठी ‘समृद्ध अडगळ’ वाटत आणि सोलापूरपुरत्या मर्यादित होत्या . वडिलांचा वारसा आणि गुणांच्या आधारे  प्राणिती शिंदे यांनीही या संधीचं सोनं करायला हवं .  राजकारणात संधी वारंवार मिळत नसते हे या दोघांनीही लक्षात ठेवायला विसरायला नको  .

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९

 

 

Previous articleमधुबाला: आईये मेहरबां
Next articleरामेश्वरम 
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.