तिरुपती बालाजी

-राकेश साळुंखे

तिरुपती बालाजी– लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व अनेक दंतकथा जोडले गेलेले हे स्थान आहे. भारतातील सर्वात श्रीमंत असे हे देवस्थान असून दररोज किमान पन्नास हजार भाविक बालाजी मंदिराला भेट देत असतात. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील  तिरुमला पर्वतरांगेत बालाजी म्हणजेच व्यंकटेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. चोल, पल्लव तसेच विजयनगर साम्राज्यांनी  या मंदिरासाठी योगदान दिले आहे.

      तिरुमला पर्वत रांगेत एकूण सात डोंगर आहेत. तिरुपतीच्या चारही बाजूला असलेल्या या डोंगररांगांना शेषनागाचे सात फणे मानले जातात. त्यामुळेच यांना सप्तगिरी म्हटले जाते. बालाजीचे मंदिर सातव्या डोंगरावर आहे. जो वेंकटाद्री तथा वेंकटाचल नावाने ओळखला जातो. तिरु म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती असे मानतात.तिरुपती रेल्वेस्थानक भारतातील जवळपास सर्व शहरांशी जोडले आहे. विमान सेवाही येथे उपलब्ध आहे. मुख्य शहरापासून रस्ता मार्गे 20 किमी तर पायवाटेने 11 किमी अंतरावर बालाजीचे मंदिर आहे. मी दोनदा या ठिकाणी भेट दिली आहे.

     पहिल्यांदा माझ्या पुतण्यांसोबत जायचा योग आला होता. ते दरवर्षीच बालाजीला जातात. आम्ही पाच ते सहा जण मिरजेहून रेल्वेने गेलो होतो. त्यावेळी बालाजीला पायवाटेने चालत जाऊन भेट दिली होती. माझा हा नवीन आणि पहिलाच अनुभव होता. या खडतर मार्गाविषयी ऐकून होतो. मला जमेल की नाही, असे वाटत होते, पण जमवले. पायवाटेने डोंगर चढताना आपल्या शारीरिक तसेच मानसिक क्षमतेचा कस लागतो. येथील या डोंगर चढणीचा अनुभव सर्वांनी एकदा तरी घ्यावा असाच वाटला.

    त्यावेळी आम्ही सर्वजण मिरजेहून रात्री ट्रेनने निघून सकाळी तिरुपती येथे पोहोचलो. हॉटेलवर फ्रेश होऊन लगेचच बालाजी दर्शनासाठी ज्या पायवाटेने जाणार होतो तिकडे बसने गेलो. जवळचे सामान तसेच चप्पल वगैरे तेथील काउंटरला जमा केले. तेथेच नावनोंदणी केली व पायवाटेने निघालो. आमचे सामान वर मिळेल असे माझ्या एका अनुभवी पुतण्याने सांगितले. थोड्या पायऱ्या थोडी सपाट जागा अशा वाटेने तिरुपतीचा डोंगर चढू लागलो. चालणारे लोक ही भरपूर होते. झाडांच्या सावलीतून ही वाट जात असल्याने उन्हाचा फारसा त्रास होत नव्हता. तसेच पाय भाजू नयेत म्हणून काही ठिकाणी खाली मॅट टाकले होते. कुठेही कचरा दिसत नव्हता. एक गोष्ट सांगावी वाटते की तिरुपती रेल्वे स्टेशनवर उतरल्यापासून तेथील स्वच्छता आपल्या नजरेत भरते. हजारो लोक वावरत असताना सुध्दा कुठेही कचरा दिसत नाही. पावलोपावली सफाई कामगार रस्ते साफ करत असतात. तसेच जागोजागी कचराकुंड्या ठेवलेल्या दिसून येतात. या पायवाटेवर पिण्याच्या पाण्याची सोय, बसण्याची व्यवस्था, अधूनमधून ऊन-पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून शेड अशा सगळ्या सोयी चालणाऱ्यांसाठी केलेल्या आहेत. चालणारे सगळे लोक खूप उत्साहात होते, मुखाने ‘गोविंदा,गोविंदा’असा गजर करत एकमेकांना प्रोत्साहन देत पायऱ्या चढत होते. काहीजण दंडवत घालत होते. त्यात एक अपंग व्यक्ती ही दिसला. पायी चालत येणाऱ्या भाविकांसाठी मुख्य मंदिरात दर्शन रांग वेगळी असते तसेच त्यांना बालाजी दर्शन ही लवकर घडेल हे पाहिले जाते. जरा हटके असा हा अनुभव आला.

        दुसऱ्यांदा तीन वर्षांपूर्वी काही नातलगांबरोबर बालाजी ला गेलो होतो .ही बालाजी दर्शन ट्रिपही  संस्मरणीय झाली होती. जवळपास चौदा पंधरा जणांचा आमचा ग्रुप होता. यावेळीही मिरजेहून ट्रेन पकडली. खूप दिवसांनी एकमेकांना सगळे असे निवांत भेटले असल्याने गप्पा संपतच नव्हत्या. डब्यातून आणलेले जेवण तसेच इतर जिन्नस रसनातृप्ती,क्षुधाशांती करणारे असले तरी गप्पांच्या ओघात त्याकडे कोणाचे लक्ष नव्हते. रात्रभर प्रवास करून सकाळी सहाच्या दरम्यान तिरुपती स्टेशनवर उतरलो. विमानतळावर ज्याप्रमाणे सरकता जिना असतो तशा जिन्याने उतरून स्टेशनच्या बाहेर येऊन एके ठिकाणी थांबलो. हॉटेल बुकींगची वाट पहात पुन्हा एकदा गप्पांचा फड तिथे रंगला. स्टेशन परिसर असला तरी स्वच्छता मात्र सगळीकडे दिसत होती. हॉटेल मिळवण्यासाठी तसेच रेंट वर वाहन ठरवण्यासाठी गेलेल्या मंडळींना बराच वेळ लागला होता. तेथेच शेजारी ग्रील पलीकडे उभ्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर तयार होणाऱ्या गरमागरम वाफाळत्या इडल्या पाहून लहान्यांना तसेच मोठ्यांनाही भूक आवरता येईना. थोडे ट्राय करू असे म्हणत सगळ्यांनीच अगदी ताव मारला. हॉटेल बुकिंग कन्फर्म झाल्यावर हॉटेलवर जाऊन सामान ठेवले व फ्रेश झालो. बालाजी दर्शनाचे बुकिंग ट्रिपला जायच्या अगोदरच केले होते, त्यानुसार संध्याकाळी सहा वाजता मंदिरात  प्रवेश मिळणार होता. पुन्हा एकदा हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये इडली,मेंदूवडा,डोसा असा भरपेट नाश्ता थोडक्यात जेवणच करून बाहेर पडलो.

      प्रथम पद्मावती मंदिर पाहण्यास  गेलो. तिरुपती पासून पाच किमी अंतरावर तिरुचनूर या गावी हे मंदिर आहे. सकाळचे 11 वाजले होते. खूप गर्दी होती. मंदिरात जाण्यासाठी काउंटरवर कूपन घेतले व जवळील सामान म्हणजे मोबाईल, कॅमेरा तसेच चप्पल इ. जमा केले. भलीमोठी रांग पाहून मंदिरात जावे की नको असा विचार आला. पण सगळ्यांच्या मताला मान देऊन रांगेत उभा राहिलो. पायाला भाजू नये म्हणून फरशीवर मॅट टाकले होते पण डोक्यावर छत नसल्याने मेंदू वितळतो की काय अशी अवस्था झालेली. तासा दोन तासाने मंदीरात प्रवेश मिळाला. आम्ही आत जातो न जातो तोपर्यंत देवीच्या आरतीची वेळ झाली, त्यामुळे दर्शन थांबवले. पण यावेळी आत सावली असल्याने ऊन सुसह्य झाले.  हे मंदिर दक्षिण भारतीय मंदिरांप्रमाणे द्रविडी शैलीतील आहे. मंदिर परिसरात होम हवन चाललेले होते. होमाच्या धुराने व मंत्र उच्चाराने आतील परिसर भरून गेला होता. तेवढ्यात रांग पुढे सरकू लागली. सर्वांचे देवी दर्शन झाले व बाहेर पडलो. तेथे प्रसाद म्हणून द्रोणामध्ये दहीभात दिला होता.

      पद्मावती देवीला व्यंकटेश्वराची पत्नी मानले जाते. बालाजी दर्शन हे पद्मावतीचे दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही असे म्हणतात.येथे देवीची चांदीची भव्य मूर्ती असून ती सोन्याच्या दागिन्यांनी व वस्त्रांनी मढवली होती. पद्मासन अवस्थेतील या मूर्तीच्या दोन्ही हातात कमळाची फुले होती व मूर्ती भोवतीची सजावट ही फुलांनी केली होती. मंदिराच्या प्रांगणात छोटी छोटी मंदिरे आहेत, पण वेळ व इच्छेअभावी ती पाहता आली नाहीत.

      आता सर्वानुमते हॉटेलवर जाऊन थोडी विश्रांती घेण्याचे ठरले. दुपारी तीन वाजता बालाजीकडे रवाना व्हायचे होते. सर्वांनी थोडे खाऊन घेतले व आपापल्या रुम्स गाठल्या.  दुपारी तीनच्या दरम्यान आम्ही बाहेर पडलो. बसने जायचे असल्याने आम्ही  आमच्या वाहनाने स्टँडवर गेलो व तेथून बसने तिरुमलाच्या दिशेने निघालो. (जेथे बालाजीचे मंदिर आहे त्या डोंगराला तिरुमला म्हणतात, तर खाली गावाला तिरुपती म्हणतात.) डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या चेक पोस्ट वर सर्वांची तपासणी झाली. वळणावळणाच्या गुळगुळीत रस्त्याने बस धावू लागली. पाऊण एक तासात वर पोहोचलो. तिथे काउंटरला जवळचे सामान जमा करून आत गेलो. स्वच्छ परिसरात हिरवळ पाहून त्यावर बसून फोटोग्राफी करण्याचा मोह आवरता आला नाही. कल्याण कट्टा, जेथे केस दान केले जातात तेथे मी सोडून आमच्यातील बाकी पुरुष मंडळी केस दान करण्यासाठी गेली. मागच्या वेळी मी हे स्थळ पाहिले नव्हते म्हणून यावेळी पहायला गेलो. मोठया हॉलमध्ये केशकर्तनाचा कार्यक्रम सुरू होता. पुरुष, स्त्रीया, मुले मुली, लहान बालके सगळे भक्ती भावाने केस दान करत होती.  मी तेथे फक्त नजर टाकून बाहेर आलो. आता डोक्यावरची केस दान केलेली  आमचीच माणसं आम्हाला ओळखू येत नव्हती. सर्वांनी पुन्हा एकदा फोटोसेशन केले.

आमची दर्शन वेळ जवळ आली होती. संध्याकाळी पाच वाजता मुख्य गेट जवळील रांगेत उभे राहण्याचा पुकारा झाला, त्याबरोबर आम्ही सगळे रांगेत उभे राहिलो.हा सगळा अनुभव माझ्यासाठी नवीनच होता. मागच्या वेळी चालत येऊन बालाजी दर्शन घेतले होते, त्यामुळे असे रांगेत उभं रहायला वगैरे लागले नव्हते.  आत मध्ये चार ते पाच मोठे हॉल होते.  त्यामध्ये बसण्याची व्यवस्था केली होती. पुढचा हॉल रिकामा झाला की मागच्या हॉल मधील लोक पुढच्या रिकाम्या हॉलमध्ये जात होते. सर्व काही शिस्तबद्ध चालले होते. अधून मधून ‘गोविंदा- गोविंदा’ अशा आरोळ्यांनी हॉल दुमदुमून जायचा. एका हॉल मध्ये साधारण पन्नास लोक बसतील अशी व्यवस्था केली होती. व्हेंटिलेशन उत्तम असल्याने कुठेही घुसमटत नव्हते. सगळे हॉल पार करून मुख्य मंदिराच्या प्रांगणात यायला दोन तास लागले. इथपर्यंत शिस्तीत असलेली माणसे आत गेल्यावर धावू लागली. मला समजेना काय होतेय. तेवढ्यात माझ्या एका नातेवाईकाने मला ओढून एका रांगेत उभे केले. मग मला समजले की तेथे ज्या दोन चार रांगा होत्या त्यापैकी एका विशिष्ट रांगेत उभे राहिले असता बालाजी दर्शन जवळून घडते.

   द्रविडी शैलीतील बालाजीचे दगडी मंदिर आपले लक्ष वेधून घेते. आतून मंदिराला रंगरंगोटी केली नसल्याने मंदिराची पवित्रता राखल्यासारखी वाटते. भारतातील श्रीमंत देवस्थान असूनही या प्रांगणात ते जाणवत नाही. बाहेर मात्र वेगळंच वातावरण असते. इतक्या मेहनतीनंतर काही सेकंदात बालाजी दर्शन करून बाहेर पडलो. मला फक्त मूर्ती दिसली,तर अनुभवी लोकांना अखंडपणे तेवणारा नंदादीप, मूर्तीवरचे दागिने, आणखी काय काय दिसले. काळ्या पाषाणातील बालाजीची मूर्ती मात्र खूपच लक्षवेधक वाटली. बाहेर आल्यावर दान हुंडी दिसली. इतके  ‘दानशूर’ लोक पाहून, मग आपल्या देशात एवढी गरीबी का आहे? असा प्रश्न मला पडला. खिशात हात घातला असता जे काही हाताशी लागेल ते सर्व या हुंडीत टाकायचे असते हे ऐकून मी खिशात हात न घालताच बाहेर पडलो. बाहेर आलो की प्रथम आपला प्रसाद (प्रसिद्ध बुंदी लाडू) ते पण जवळील कूपन देऊन लगोलग ताब्यात घ्यायचा हे मी मागील अनुभवावरून शिकलो होतो. त्याप्रमाणे प्रसाद घेऊन सामान ज्या ठिकाणी जमा केले होते तेथे गेलो. सामान ताब्यात घेऊन बसने हॉटेलवर आलो.

         सकाळी प्रथम रूमचे बुकिंग एक दिवसासाठी वाढवून घेतले. नंतर काँम्बो नाश्ता करून आम्ही ओल्ड बालाजी मंदिर बघायला गेलो. तिरुमला डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका छोट्या गावात हे छोटेखानी मंदिर आहे. सुंदर नक्षीकाम केलेले,सुबक मूर्ती व मोठाले गोपूर असणारे मंदिर छान वाटले. येथून जवळच थोड्या अंतरावर तिरुमला डोंगरावर जाण्यासाठी पायवाट आहे. त्यानंतर तिरुपती पासून साधारण 120 ते 130 किमी अंतरावर असणाऱ्या प्रसिद्ध गोल्डन टेंपल कडे निघालो. वाटेत दोन चार छोटी मोठी मंदिरे बघितली. मला उत्सुकता होती ती सुवर्ण मंदिराची. हे महालक्ष्मीचे मंदिर  वेल्लूर शहराच्या दक्षिण भागात थिरूमलाई कोडी या गावात आहे. मंदिराच्या बांधकामात पंधराशे किलो सोनं वापरले आहे, असे सांगितले जाते. शंभर एकर पेक्षा जास्त भागात पसरलेल्या या मंदिराचा आकार चांदणी प्रमाणे आहे.

वेल्लूरकडे जाताना वाटेत हंपीसारखी ठेवण असलेल्या(मोठ मोठे दगड एकमेकांवर रचल्याप्रमाणे ठेवणे)  छोट्या छोट्या टेकड्या दिसल्या.संध्याकाळी सहाच्या सुमारास आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. मंदिरातील लाइट्स लागल्याने त्या प्रकाशात मंदिर उजळून निघाले होते. मंदिराच्या परिसरात सगळीकडे पसरलेली हिरवीगार लाँन मंदिराच्या देखणेपणात भर घालत होती. आत आखून दिलेल्या मार्गाने फिरावे लागते. प्रदक्षिणा मार्ग बराच मोठा असल्याने मध्ये बसण्यासाठी आसन व्यवस्था केली होती. तसेच जागोजागी स्वच्छतागृहेही होती.  महत्वाचे म्हणजे ती स्वच्छ होती. मंदिर परिसरात ‘सर्व तीर्थम’ नावाचा एक तलाव आहे. त्यामध्ये पडलेले  झगमगत्या मंदिराचे प्रतिबिंब मन मोहून टाकत होते.या तलावात नाणी तसेच नोटा टाकलेल्या दिसत होत्या.  मंदिर पाहून साडेसात च्या दरम्यान बाहेर पडलो. रात्री आठ वाजता हे मंदिर बंद होते. तिरुपतीला पोहचायला उशीर होणार होता त्यामुळे वाटेतच पोटपूजा केली. हॉटेलवर पोहचायला बराच उशीर झाला होता पण पर्यटकांच्या तेथील वर्दळीमुळे किती वाजले हे लक्षात येत नव्हते. रात्रंदिवस लोकांची ये जा  येथे सुरूच असते .

       सकाळी आवरून आम्ही बंगलोरकडे रवाना झालो. दुपारच्या फ्लाईटने पुण्यात येणार होतो. आमच्यापैकी बऱ्याच जणांचा पहिलाच विमान प्रवास असल्याने गाडीत खूपच उत्साही गडबड चालू होती. विमानतळावरही  हा उत्साह सोहळा चालूच होता. बालाजी दर्शनापेक्षा प्रथम केलेल्या विमान प्रवासातील गमतीजमतीच सर्वांच्या आठवणीत अजूनही ताज्या आहेत, असे मला वाटते.

(लेखक ‘लोकायत’ प्रकाशनाचे संचालक आहेत)

84849 77899

Previous articleट्रोल्स कोण असतात?
Next articleसुखदुःखाचा ताळेबंद….
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.