पत्रीसरकारमधील गणपतीदादा काळाच्या पडद्याआड

-संपत मोरे

क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ब्रिटिश सरकारच्या विरोधात स्थापन केलेल्या पत्रीसरकारमधील सहकारी गणपती बाळा यादव (गणपतीदादा) काल बुधवारी गेले. गणपतीदादा अलीकडच्या काही दिवसांपर्यत सायकल चालवत होते.वयाची १०० वर्षे पार केलेला या अफलातून माणसावर बीबीसी,तसेच आंतरराष्ट्रीय किर्तीचे पत्रकार पी साईनाथ यांनी खास स्टोरी केली होती.त्यांची कथा ऐकून पी साईनाथ त्यांना भेटायला आले होते. पी साईनाथ सरांनी लिहिलेली दादांच्या जीवनप्रवासाची कहाणी मराठीसह इंग्रजी,उर्दू, हिंदी भाषेत प्रसिद्ध झाली होती.

नंतर बीबीसीने माझ्या गावपांढरीतला हा मोठा माणूस जगभर पोहोचवला होता. मी ‘मुलूखमाती’ या माझ्या पुस्तकात  या माणसाची कथा लिहिली आहे. दिनांक 31 जानेवारीला घरी येऊन ते ‘मुलूखमाती’ घेऊन गेले. जाताना नको नको म्हणत असताना पुस्तकाचे पैसेही दिले.आपल्यावर लिहिलेलं बराच वेळ न्याहाळत होते.काय लिहिलंय ते वाचून दाखव म्हणाले.’संपा, माझं सगळं आयुष्य पुस्तकात आलं.मला असं कवा वाटलं नव्हतं.त्वा लय लांब पोहोचवलं मला…”अस म्हणत कौतुक करत गेले..मुलुखमाती मधला एक नायक काळाच्या पडद्याआड गेला . मी काही वर्षांपूर्वी दैनिक ‘दिव्य मराठी’त त्यांच्यावर लिहिलेला हा लेख…

………………………………….

वयाच्या ९७व्या वर्षी सायकलीवरून फिरणारा गणपती बाळा यादव हा माणूस सोनहिरा खोऱ्यातील लोकांच्या कौतुकाचा विषय आहे. अंबक, देवराष्ट्र, मोहिते वडगाव, भाळवणी, शिरगाव, बलवडी या गावातील लोकांना आठवड्यातून एकदा तरी हा म्हातारा माणूस सायकलीवरून निघालेला दिसतोच. आसपासच्या गावातील पै-पाहुणे, मित्र यांना भेटायला जाण्यासाठी सायकल याच वाहनाला त्यांची पसंती असते.

‘मी बघतोय तवापासनं हा म्हातारा तसाच आहे. त्याच्यात काही बदल झालेला नाही.’ साठीकडं झुकलेला एक म्हातारा गणपती यादवांबद्दल सांगतो. त्यांची सायकलीवर बसण्याचीही एक स्टाइल आहे.

एका हातात धोतराचं टोक धरायचं, दुसऱ्या हातात सायकलचं हँडल धरायचं. हँडल धरून पाच-सहा पावलं चालत जायच. एकदम डावा पाय डाव्या पँडलवर देत टुणकन उडी मारून सायकलीवर बसायचं. सायकलीवर बसलं की, गणपा बाळा यादव नावाची एक्स्प्रेस खड्डे पडलेल्या रस्त्यात हळूहळू जाते आणि डांबरी रस्ता लागला की, सुसाट धावते.

गणपती बाळा यादव यांचं गाव कडेगाव तालुक्यातील रामापूर. पंचक्रोशीत ते ‘गणपा दादा’, ‘गणपा बाळा’ या नावानं प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वयाचा एकही माणूस आज या परिसरात नाही. वयाच्या ९७व्या वर्षीही त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. गणपा दादा क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकारच्या चळवळीतील एक सैनिक.

सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी इंग्रजी राजवटीच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात खारीचा वाटा उचललेले गणपा दादा आजही पत्री सरकारच्या लढ्याच्या रोमहर्षक आठवणी आपल्या डोळ्यासमोर उभ्या करतात.

माझी आणि गणपा दादांची देवराष्ट्रेच्या शिवारात गाठ पडली. ते सायकलीवरून येत होते. मी त्यांना थांबवलं.

‘दादा थांबा.’ ‘पोरा जाऊ दे आता. घरातली माणसं वाट बघत असत्याली.’

‘कुठ गेलता.’ ‘चिंचणीला गेलो होतो.’

‘दादा, सायकलीचा कंटाळा येत न्हाय का आता?’

‘न्हाय र बाबा सायकलीचा कंटाळा आला की, मी एका जागेवर बसणार बघ.’

‘इतक्या लांब सायकलीवरनं कशाला जाता? वाहनानं जात जावा.’

‘आर बाबा सायकल हाय म्हणून तर तुझ्यापुढं मी उभा हाय. सायकल नसती तर मागंच गळ्यात गुडघा आलं असतं.’

दादा त्यांच्या सायकल प्रवासाचं समर्थन करत होते. चिंचणी ते रामापूर अंतर दहा किलोमीटर तरी आहे. जाताना दहा आणि येताना दहा असा वीस किलोमीटर प्रवास दादा करून आलेले. रस्त्याकडेला असलेल्या आंब्याच्या झाडाखाली आम्ही बसलो. मग आमच्या गप्पा रंगल्या. मी त्यांच्याजवळ क्रांतिसिंह नाना पाटील, पत्री सरकारचा विषय काढला. तो विषय काढल्यावर ते उत्साहानं सांगायला लागले.

‘आमच्या गावच्या महादेव गायकवाडांच्या घरात नाना पाटील यायचं. त्यांच्यावर इंग्रज सरकारचं वारंट हुतं. आम्ही त्यास्नी महादेव गायकवाडांच्या माडीवर दडवून ठेवायचो. नाना पाटील गावात आल्याची खबर आम्ही या कानाची त्या कानाला कळून देत नव्हतो. दिवसभर ते गायकवाड मळ्यात मुक्कामाला असायचं. म्हादू गायकवाडांची आई भिमाबाई रोज आमच्याजवळ ताक आणि कण्या द्यायची.

नानास्नी जेवण पोहोच करायची कामगिरी माझ्यावर हुती. त्यांचं जेवण घिवून गेल्यावर नाना माझं कौतुक करायचं. त्यांचा स्वभाव लय चांगला हुता. मला वाटायचं, असल्या देवमाणसाच्या पाठीमाग इंग्रज सरकार लागलाय. ज्येनं उजळ माथ्यानं फिरायला पायजे, त्यो गरिबांचा कैवारी दडून राहतूया.

आन् गोरगरिबांवर अत्याचार करणारं गावकरी मात्र राजरोस फिरत्याती. तवा गावोगावचं गावगुंड गरिबांची उभी पिकं कापून न्यायचं. काहींच्या पिकात जनावर सोडायचं.

गावगुंड लय मातलं हुतं. त्यास्नी इंग्रज सरकारचं पोलिस कायबी करायचं न्हायती, पण नानासारख्या देवमाणसाच्या पाठीमागं हात धुऊन लागत हुतं. त्यांना पकडून देणाऱ्याला बक्षीस जाहीर केलं व्हतं. हे समदं बघून मला इंग्रजांचा राग यायला लागला.

मला वाटाय लागलं, इंग्रज या मुलकातनं हाकलून लावली पायजेती. मग मीबी त्या बंडात सामील झालो. तवा कुंडल, वडव, पारं या गावाची माणसं गावोगाव फिरून पत्री सरकारच्या चळवळीची माहिती देत हुती. त्यांच्यासोबत मीबी जायला लागलो. त्या चळवळीत गेल्यावर मलाबी आपल्या हातानं काय तरी चांगलं काम हुतय, असं वाटाय लागलं.’

‘दादा, ही चळवळ कशा प्रकारची होती?’ मी विचारलं. पत्री सरकार म्हंजी जनतेचं राज्य. इंग्रजाच्या अधिकाऱ्यास्नी काम करून द्याचं न्हाय. गावोगावी पत्री सरकारनंच राज्य करायचं. इंग्रजाच्या राजवटीला जुमानायचं न्हाय. न्याय निवाडंबी पत्री सरकारच करायचं. इंग्रजांच्या नोकरास्नी पत्री सरकारच्या लोकांनी सळो की पळो करून सोडलं हुतं. पत्री सरकारचा धडाका सुरू हुता, तवा आपल्यातली काही माणसं इंग्रजांना सामील हुती. पत्री सरकारच्या खबरी इंग्रजांना द्यायची.

काहींनी पत्री सरकारमधल्या लोकांना पकडून द्यायचा प्रयत्न केला. मग पत्री सरकारच्या सैनिकांनी अशा गद्दारांना अद्दल घडवायचं ठरवलं. भाळवणी गावात एक गावगुंड होता. तो पोलिसांचा हस्तक होता. पोलिसांच्या बळावर तो गावात लय शिरजोर झालेला. आम्ही एका रात्री त्याच्या घरावर चाल केली. त्याला पकडला. त्याच्या घरातली बायका-माणसं आम्हाला बघून घाबरायची. बायका रडाय लागल्या. आम्ही त्यास्नी म्हणलो, ‘तुमी आमच्या भणीप्रमाण हायसा.

आम्ही तुम्हाला काय करणार न्हाय. तुमी रडू नका. आम्ही दरोडेखोर न्हाय. पत्री सरकारची माणसं हाय.’ मग आम्ही त्या गावगुंडाला गावाच्या बाहेर आणला. त्याचं हात-पाय बांधलं. तो गयावया करत हुता. पण आम्ही त्याची दयामया केली न्हाय. त्याला जाम चोपला. त्याच्या पायाला पत्री लावली. मग त्याला खांद्यावर बसवून त्याच्या घरात पोहोच केलं.

‘दादा पायाला पत्री लावणं म्हणजे बैलाच्या पायाला लोखंडी पत्री मारतात तसच काय?’

माझा हा प्रश्न ऐकल्यावर दादा खळखळून हसायला लागले. म्हणाले, पत्री लावणं म्हंजी सगळ्यास्नी तसच वाटतं. पण आमची पत्री येगळी हुती.

इंग्रजांचा खबऱ्या म्हणून काम करणाऱ्या गावगुंडाची माहिती आम्हाला कळल्यावर आम्ही त्याच्या घरात जाऊन त्याला पकडून न्यायचो. त्याचं हात-पाय बांधायचं, पायावर चुन्याचं पाणी टाकायचं, चुन्याचं पाणी टाकलेल्या तळव्यावर काठीनं तडाखे द्यायचे. त्यालाच पत्री लावणं म्हणायचं.

अशी पत्री लावल्यावर त्यो गावगुंड सहा महिनं तरी एका जाग्यावर असायचा. त्याला चालायला यायचं न्हाय. त्यो पुन्हा गरिबाच्या वाट्याला जायचा न्हाय आन् पत्री सरकारच्याबी नादाला लागायचा न्हाय. आर, ही गावठी शिक्षा हुती म्हण की.’ दादा पुन्हा हसायला लागले. पत्री सरकारचा मंतरलेला काळ आपल्या डोळ्यासमोर उभा केलेल्या गणपा दादांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगितला.

‘एकदा क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पाठीमागं पोलिस लागलं. त्यांनी नानांचा पाठलाग केला. नाना एका घरात शिरलं. त्या घरात जाऊन म्हणलं, ‘मी येड्याचा नाना पाटील हाय. माझ्या मागं पोलिस लागल्याती. त्या घरातल्या माउलीला नानांची कीर्ती ऐकून माहिती हुती. तिची मुलगी बाळंतपणासाठी आली होती. तिनं कसलाही विचार न करता नानांना तिच्या मुलीच्या खोलीत दडवलं. तोवर पोलिस काठ्या आपटत घरात शिरले.

‘हिकडं नाना पाटील आलाय काय?’ म्हणत पोलिस आत निघालं. ती माउली धाडसानं पोलिसांना थांबवत म्हणाली, ‘आरं, आत कुठ चाललाया. आत माझी बाळंतीण लेक हाय. त्यो नाना पाटील माझ्या घराला कशाला यीलं.’ तिनं असं म्हटल्यावर पोलिस निघून गेलं. पोलिस गेल्यावर नाना बाहेर आलं. त्या बाईला हात जोडत म्हणालं, अक्का तुझं उपकार कवाच इसरणार न्हाय.’

शंभरीकडे झुकलेले गणपा दादा या वयातही पाच वाजता उठतात. सकाळी नित्यकामे आटोपून सायकल घेऊन रानात जातात. ‘सायकलचा प्रवास’ हा त्यांचा ‘वीक पाँइट’ आहे. आसपासच्या गावातच काय पण अगदी विटा, पलूस या दूरच्या गावालाही ते सायकलीवरूनच जातात. त्यांची कर्ती झालेली मुलं, नातवंडं त्यांना विश्रांतीचा सल्ला देतात. पण विश्रांती घेतील ते दादा कसले! अगदी एखाद्या दिवशी काहीच काम नसेल तर एखाद्या मित्राची गाठ घ्यायला जातील, पण एका जागेवर थांबणार नाहीत. जाताना मोकळ्या हातानं जाणार नाहीत. काही तरी घेऊन जातील.

गणपा दादा गोष्टीवेल्हाळ आहेत. गप्पांचा फड रंगवणे दादांची खास सवय. दुपारच्या प्रहरात चौकातल्या झाडांच्या सावलीत दादांची सायकल थांबली की समजून जायचं, आता दादांच्या गप्पा सुरू होणार… दादांना बघून एकएकजण त्या झाडाकडं येतो. पाच-सहा जण येतात. गप्पा सुरू होतात. विषयानं विषय निघत जातो. तिथल्या सगळ्यांचं बोलणं ऐकून झाल्यावर दादा बोलत राहतात.

पोरं ऐकत राहतात. दादांच्या विलक्षण कथनशैलीतून येणाऱ्या गोष्टी पोरांच्या डोळ्यासमोर उभा राहतात. दादा जगलेलं आयुष्य मांडतात. अनुभव सांगतात. पोरांना वाटतं, दादांनी बोलतच राहावं. पण कललेल्या ऊनावर ‘टाइम’ बघणारे दादा भानावर येत न्हणतात, ‘पोरांनू उठतो आता. सावल्या कुठं आल्या बघा की…’ दादा उठतात.

सायकलीवरून घराच्या दिशेनं जातात. शिकलेली पोरं मघापासून दादांचं ‘लेक्चर’ ऐकत बसलेली असतात. गोष्टी सांगण्यात पटाईत असलेले दादा लौकिकार्थाने अडाणी आहेत. ते शाळेत गेलेले नाहीत. त्यांना कुणी विचारलं, ‘दादा तुम्ही शाळंत का गेला नाही?’ तर दादा सांगतात, ‘कुठली शाळा बाबा. नकळता हुतो तवाच आयबाप वारलं. कोण घालल मला शाळंत?’

गणपा बाळा यादव चार भिंतीच्या शाळेत गेलेले नाहीत. पण बिनभिंतीच्या शाळेत त्यांनी अनुभवाचे धडे गिरवले आहेत. बिनभिंतीच्या शाळेत शिकलेल्या या माणसांनं नाना गोष्टी केल्या आहेत. त्यांच्याकडे पुढच्या पिढीला देण्यासाठी अनुभवाची शिदोरी आहे. त्याच शिदोरीच्या बळावर गणपा बाळा एक्स्प्रेस शंभरीकडे सुसाट धावतेय.

(लेखक दैनिक ‘सकाळ’ चे बातमीदार आहेत . नुकतच त्यांचे ‘मुलूखमाती’  हे व्यक्तिचित्रणात्मक लेखांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे . हे पुस्तक Amazon.in वर समोरील लिंकवर-https://amzn.to/3mNTTyN उपलब्ध आहे.)

९४२२७४२९२५

Previous articleकडू दूध आणि सुरंगीचा कडवटपणा
Next articleसर्व बंद, तरीही सर्वच सुरू!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here