सर्व बंद, तरीही सर्वच सुरू!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषण शैलीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते . त्यावर अनेक विनोद , मीम्सही तयार केले जातात . त्यांच्या भाषणात वारंवार येणारे शब्द, ते स्वतःलाच विचारत असलेल्या प्रश्नांचे विडंबनही होते. मंगळवारी दुसऱ्या लॉकडाउनची घोषणा करतांना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाचे पत्रकार नितीन पखाले यांनी केलेले हे गमतीशीर रुपांतर.

…………………………………….

-नितीन पखाले

हा निर्णय घेताना मला आनंद कसा होईल? होणारच नाही. मला माहिती आहे, तुम्हाला सुद्धा आनंद होणार नाही. कसा होणार? स्वाभाविक आहे. पण तरीही मला विश्वास आहे, तुम्ही मला साथ देणार. का नाही देणार? द्यावीच लागणार. हा साथीचा आजार आहे, त्याच्याशी आपल्याला एकमेकांच्या साथीनेच लढावे लागणार आहे. नाही? आपण गेल्या वर्षभरापासून लढतोय. किंबहुना, या काळात माझ्या महाराष्ट्रातील जनतेने जे अतुलनीय धैर्य दाखविले, ते कोण्या येऱ्यागबाळ्याचे कामच नाही. तुम्ही, नव्हे; आपण प्रत्येकजण योद्धा आहोत. ही लढाई आपल्याला लढावीच लागणार आहे.

परिस्थिती भयंकर आहे. कोरोनाने आपल्याला घेरलेय, तिकडे रेमडीसीवीर इंजेक्शन अभावी कित्येक निष्पाप लोकांचे जीव जाताहेत. दवाखान्यांमध्ये बेड उपलब्ध नाहीत. आता तर आपल्या महाराष्ट्रात ऑक्सीजनचाही प्रचंड तुटवडा पडलाय. पण आम्ही हे ऑक्सिजन अगदी सातासमुद्रापार मिळवू. अद्याप ते मिळाले नसले तरीही आम्ही लढतोय, आपण सर्वजण लढतोय. आपली महाराष्ट्राची परंपरा लढण्याची आहे. मला विश्वास आहे, आपण कोरोनाला नक्की हरवणार आहोत. का नाही हरवणार ? हरवायलाच हवे. त्यासाठी पुन्हा आपल्याला काही कठोर निर्बंध लादावे लागतील. खरं तर मला जनतेवर असे काही लादणे योग्य वाटत नाही. जबदरस्तीने काही गोष्टी लादणे हा माझा स्वभाव नाही.

एखादी गोष्ट करायची तर ती आम्ही करून दाखवतो. गेल्या लाटेत आपण ते करून दाखवलं. हो करून दाखवलं. त्यावेळी आतापेक्षा परिस्थिती हाताबाहेर गेलेली नव्हती. तरीही आपण कोरोनाला आपल्यापर्यंत येण्यापासून थोपविले. आता तो आपल्या घरात शिरलाय, त्याला घरातून हुसकावता येत नाही, आणि तुम्हाला घराबाहेर पडा, असे म्हणताही येत नाही. पण तरीही आपल्या लोकांचे जीव वाचावे म्हणून तुम्ही घरात थांबणेच योग्य आहे. मी गेल्या वर्षभरापासून सतत हेच बोलतोय. गरज असेल तरच बाहेर पडा. पण मधल्या काळात आपण सैराट वागलो आणि कोरोनाने डाव साधला.

हल्ली काय डाव साधायला कावळे टपूनच असतात. मला त्या कर्कश ओरडणाऱ्या कावळ्यांची चिंता नाही, ओरडू देत त्यांना, आपण दुर्लक्ष करायचे. मला माझ्या जनतेची काळजी आहे. त्यांचा प्रत्येक श्वास माझ्यासाठी लाखमोलाचा आहे.

मला माहितेय माझ्यावर तुमचा विश्वास आहे, म्हणूनच तुम्ही मला अशा अडचणीच्या काळात प्रत्येकवेळी साथ देत आला आहात. हा खरं तर आपल्या सर्वांच्या परीक्षेच्या काळ आहे. किंबहुना, ही परीक्षा गेल्या वर्षभरापासून सुरूच आहे. तरीही योग्य निकाल लागेपर्यंत आपल्याला ती वारंवार देत राहावी लागणार आहे.

सध्या विद्यार्थ्यांना परीक्षेची चिंता नाही, ती खरं तर बोर्ड आणि विद्यापीठांना आहे. आणि का नसावी? त्यांना ही चिंता असणे स्वाभाविक आहे. सतत परीक्षेच्या तारखा बदलत आहेत. मुलं, अभ्यास, लिहणं, वाचणं सर्व विसरली आहेत. परीक्षा अशाच पुढे ढकलत राहिलो तर अनेकांना स्वत:चे नाव, रोल नंबरही लिहिता येणार नाही, ही भीती आहे. ही भीती असणे समजू शकतो, पण पालकांना चिंतेचे कारण नाही. परीक्षा नाही झाली तरी तुमचा पाल्य पुढल्या वर्गात सन्मानाने ढकलला जाईल, तशा सूचना आजच मंत्रिगटाच्या बैठकीत दिल्या आहेत.

आता आपल्याला चिंता करायची आहे ती स्वत:च्या जीवाची. मला माहिती आहे, सध्या आपल्या स्वत:च्या जीवापेक्षा काहीही मौल्यवान नाही. त्यामुळे आता मी जे काही सांगणार आहे, त्याचे तुम्ही स्वत:चा जीव वाचविण्यासाठी तरी नक्कीच पालन कराल, हा विश्वास मला आहे. का नसणार, असायलाच हवा, किंबहुना तो आहेच. या विश्वासावरच तर गेले दीड वर्ष सर्व बाजूंनी ‘प्रहार’ होत असतानाही मी आणि हे राज्य खंबीर आहे. सरकार टिकून आहे. या काळात जनतेचे झालेले हाल पुन्हा होऊ नये यासाठी साडेपाच हजार कोटींची मदत, पुन्हा भोजन थाळी मोफत… असे जम्बो पॅकेज आता आणले आहे. या साडेपाच हजार कोटींतून तुम्हाला काही मदत होईल, असा विश्वास तुम्हाला असेल तर तो विश्वास मी भ्रमात कशाला बदलवू? आपण वास्तव स्वीकारून जगलं पाहिजे.

टाळ्या-थाळ्या नाद करूनही कशी दाणादाण उडते हे आपण बघतच आहो.

मला माहिती आहे, तुमच्या सर्वांच्या मनात एक प्रश्न सतत घोळत आहे. कारण माझ्याही मनात तोच प्रश्न सतत येत आहे. हा कोरोना महाराष्ट्रावरच का कोपला? तिकडे बंगाल, दक्षिणेत आणि हरिद्वारमध्ये चिक्कार गर्दी होत असूनही का पोहचत नाही, हाच तो प्रश्न. साहजिकच आहे, असे प्रश्न पडायलाच हवे. प्रश्न पडले तरच आपण त्याच्या उत्तरांचा शोध घेण्याचा प्रयत्न करू. या प्रश्नाचेही उत्तर आपण सर्वमिळून नक्की शोधूया. पण सध्या ही उत्तरे शोधण्याची वेळ नाही. आता आपल्याला कोरोनाला पुन्हा हरवायचे आहे. त्यासाठी सध्या कागदोपत्री बंद असलेल्या बऱ्याच गोष्टी उद्यापासून पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मला लॉकडाऊन म्हणायचे नाही. साडेआठ वाजता टिव्हीवर येऊन मी लॉकडाऊनची घोषणा केली तर त्यांच्यात नि माझ्यात फरक काय? जनतेचे हित कशात हे बघायला नको का? म्हणून मी लॉकडाऊन वगैरे धडकी भरविणारे शब्दप्रयोग करणार नाही. आपल्याला केवळ कठोर निर्बंधांना सामोरे जायचे आहे.

म्हणजे बघा गेल्या वर्षभरापासून तुम्ही आर्थिक, आरोग्यविषयक, मानसिक, कौटुंबिक त्रासात आहात, हे मला माहिती आहे. म्हणूनच आता तुम्हाला अधिक त्रास द्यायचा नाही, हे मी दादांसोबत बसून ठरविले. त्यामुळेच आपण अनेक गोष्टी उघड-बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या १ एप्रिलपासून राज्यात रात्री जमावबंदी आणि संचारबंदीसुद्धा होती. आता रात्री चोर, दरोडेखोरांशिवाय कोणीही एकत्र येत नाही, तरीही ही बंदी का होती, हे विचारण्याची ही वेळ नाही. त्यामुळेच आता यात आपण बदल करतोय, पूर्वी जे आपण रात्री करत होतो, ते आता आपल्याला दिवसा करायचे आहे. आता दिवसाही संचारबंदी राहणार आहे. नाही, असे घाबरण्याचे कारण नाही, कारण ही संचारबंदी असली तरी जीवनावश्यक गोष्टींना कुठेच बंदी नसणार आहे. अत्यावश्यक सेवा, किराणा, दुध डेअरी, फळ, भाजी, पेट्रोलियम, माहिती तंत्रज्ञान, बँका, रेल्वे, लोकल, बससेवा या सर्व गोष्टी जनतेची गैरसोय टाळण्यासाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य सेवा तर अविरत सुरू आहे, होती आणि राहणारच आहे. ती बंद करून कसे चालेल?

तुम्हाला प्रश्न पडला असेल मग बंद काय राहणार? काहीच बंद राहणार नाही. कारण सर्व सुरू असूनही आपण नेहमीप्रमाणे गर्दी करून बेजबाबदारपणा कोरोनाच्या या लाटेत करणार नाही, याची शाश्वती मला अजिबात नाही. नाहीतर काय ही दुसरी लाट आहे, पुढे तिसरी, चौथी अशा कितीतरी लाटा येतील. किंबहुना परदेशात त्या आल्या आहेत. त्यामुळे उद्यापासून लागू होणाऱ्या कडक निर्बंधात आताप्रमाणेच उद्याही सर्वच आतून सुरू असून बाहेरून बंद राहणार आहे. म्हणजे बघा आता कसे, सर्व दुकाने वरून बंद असतात आणि शटरच्या आत सर्व व्यवहार सुरळीत असतात, अगदी तसेच उद्यापासूनही राहणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंटला केवळ पार्सलची परवानगी असली तरी, तिथे ‘पार्सल’ घेऊन जाणाऱ्यांची सर्व ‘व्यवस्था’ केली जाते, हे मला माहिती नाही, असे समजू नका. फुटपाथवर खाद्य पदार्थ विकणारे ‘केवळ पार्सल मिळेल’चे बोर्ड लावून चक्क प्लेटमध्ये भेळ, वडापाव देतात, हे काय मला कळत नसेल म्हणता?

मांजरीला वाटत असतं, ती डोळे मिटून दूध पिते म्हणजे, ती कोणाला दिसतच नाही!पण तुम्ही डोळेझाक केली तरी मला सर्व दिसतं. मला आश्चर्च वाटतं की, बांधकाम मजुरांना परवानगी, तर बांधकाम साहित्याची दुकाने बंद का, असा तद्दन फालतू प्रश्न लोक का विचारतात? अहो एका भागाची दुसरी बाजू उघडी आहे म्हणजे दुसऱ्या भागाची पहिली बाजूही उघडीच असणार ना! काल काही पत्रकारांनी मला प्रश्न विचारला, तुम्ही संचारबंदीत केवळ अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच बाहेर पडण्याची परवानगी का दिली? मी स्वत: संपादक राहिलो आहे. मला पत्रकारांच्या अडचणी कळत नाही, असे होईल काय? मला माहिती आहे, श्रमिक पत्रकारांना इथे कोण विचारतं हो? ते वेठबिगार कॅटेगिरीत मोडतात. त्यांना अधि’स्वीकृती’ कशी राहणार? आणि वेठबिगारांना कुठे, कोणते नियम असतात? त्यांनी खपायचंच असता ना कधी तरी! म्हणून मुद्दाम ती अट टाकली. असो मुद्दा हा नाहीच आहे. मुद्दा आहे, उद्यापासून लागू होणाऱ्या कडक निर्बंधांचा. तर त्या तिकडे विदर्भात कुठे कापडविक्रीच्या बंद दुकानातून पोलिसांनी काल शंभरावर ग्राहकांना बाहेर काढले. त्या पोलिसांचे कौतुक करावे की त्यांच्यावर कारवाई करावी, याचा निर्णय नवीन गृहमंत्र्यांनी घ्यावा, अशा सूचना मी केल्या आहेत.

आता तुमच्या लक्षात आले असेल की, हे लॉकडाऊन नव्हे ; निर्बंध म्हणा हवे तर. मात्र तेही फार क्लिष्ट किंवा लोकांना त्रासदायक होईल, असे नसणार आहे. म्हणजे सर्व बंद असूनही सर्वच सुरू राहणार आहे. त्यामुळे मला तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे. ते तुम्ही देत आहातच तरी सुद्धा कुटुंबप्रमुख म्हणून माझी काही जबाबदारी आहे. मी बेजबाबदार नाही, नव्हतो आणि नसणार; हे आता तुमच्या लक्षात आले असेल. तुम्हीही बेजबाबदारपणा करू नका, कारण आपल्याला कोरोनास हरवायचे आहे. राजकारण करणाऱ्यांना ते करू देत, आपल्याला लोकांचा जीव वाचवायचा आहे, आपला जीव वाचवायचा आहे. राजकारण करणाऱ्यांना नंतर सावकाश बघू. सध्यातरी तुम्ही घरातच राहा, फारच गरज असेल तरच घराबाहेर पडा. हे लॉकडाऊन नसले तरी, कठोर निर्बंध आहेत, एवढे मात्र लक्षात असू द्या!

(लेखक ‘लोकसत्ता’ चे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी व दैनिक ‘मतदार’ च्या यवतमाळ आवृत्तीचे संपादक आहेत)

9403402401

Comments are closed.