‘चार्वाक’: प्राचीन, ऐतिहासिक घडामोडींचा विशाल पट वर्तमान संदर्भासह उलगडणारे पुस्तक

-प्रमोद मुनघाटे

सारे जग धर्मांधतेकडून धर्मनिरपेक्षतेकडे जात असताना भारत मात्र पुन्हा उलट्या वळणाने धर्मांधतेकडे जाऊ लागला आहे. जगातली अरब राष्ट्रेच केवळ स्वतःला धार्मिक म्हणवून घेतात. भारतालाही त्यात सामील करण्याचा इथल्या एका राष्ट्रीय पक्षाचा प्रयत्न आहे. या स्थितीत याच देशात जन्मलेला व साऱ्या संकटांना तोंड देत टिकलेला चार्वाक इथे आणखी किती काळ तग धरणार? यातला भारताचा संदर्भ केवळ आनुषंगिक आहे. चार्वाक ही साऱ्या जगाला त्याच्या मानवी जीवनाच्या आरंभापासून लाभलेली देणगी आहे. या देणगीच्या बळावरच त्याला आपली प्रगती साधता आली. हितसंबंध व स्वार्थ या गोष्टी स्वाभाविकच स्थितिवादी व प्रगतीला विरोध करणाऱ्या असतात. त्यांनी चार्वाकांचा विचार केवळ बदनामच नाही तर नाहीसा केला… पण चार्वाक व त्याचा विचार ही मानवी मनाची व बुद्धीची एक सामाजिक व अविभाज्य अशी बाजू आहे.”

प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या ‘चार्वाक’ या नव्या पुस्तकाच्या पहिल्याच प्रस्तावनापर लेखातील या ओळी आहेत. आधुनिक मानवी जीवनाच्या विचारविश्वाला व्यापून राहिलेल्या कळीच्या प्रश्नाला द्वादशीवार यांनी या पुस्तकात हात घातला आहे. पुस्तकाच्या शीर्षपृष्ठावर ते या पुस्तकाच्या विवेचनाचे एक सूत्र पुढीलप्रमाणे मांडतात:

ईश्वराला रिटायर करा – श्रीराम लागू

ईश्वर मेला आहे – नित्शे

ईश्वर जन्मालाच आला नाही –चार्वाक

००

एरवी तत्त्वज्ञानपर व वैचारिक पुस्तकं वाचताना कमालीचा संयम लागतो. थांबून थांबून वाचावे लागते. पण द्वादशीवार यांचे ‘चार्वाक’ अपवाद आहे. एखाद्या रहस्यकथेसारखे ते पकड घेते आणि दीडशे पृष्ठांचे हे पुस्तक आपण वाचूनच संपवतो. रेल्वेप्रवासात स्टेशनवरच्या बुकस्टॉलवर घेतलेले पुस्तक पुढचे स्टेशन येईपर्यंत आपण वाचून खाली ठेवावे असे हे पुस्तक वाचताना लेखक आपल्या समोर बोलत आहेत, असा अनुभव देणारे आहे.

मराठीत यापूर्वी उपलब्ध असलेला ‘चार्वाक’ वाचला आहेच. लहानपणी एकदा (नवनीत की अमृत) एका डायजेस्ट मधून ओळख झाली होती. नंतर वाईच्या प्राज्ञ पाठशाळेचे सदाशिव आठवले यांचे आणि पुढे डॉ. आ. ह, साळुंखे यांचे लोकायत प्रकाशनाचे ‘आस्तिकशिरोमणी चार्वाक’ हेही पुस्तक वाचले होते. पण ही पुस्तके वाचताना तत्त्वचर्चेचे दडपण मनावर असते.

द्वादशीवार यांचा ‘चार्वाक’ वाचताना ताज्या सामाजिक-सांस्कृतिक संदर्भांसह प्राचीन-पौराणिक-ऐतिहासिक घडामोडींचा एक विशाल पट धावत्या चित्रपटासारखा आपल्या डोळ्यासमोर येतो. त्यामुळे केवळ तात्त्विक चौकटीतच नव्हे तर जीवनाच्या सर्व क्षेत्राला व्यापून राहिलेल्या धर्म-राजकारण व अर्थकारणाच्या संदर्भात चार्वाक दर्शन काय सांगते आणि आज आपण चार्वाकाला कुठे शोधू शकतो, याचे भान हे पुस्तक देते.

‘चार्वाक’मध्ये एकूण पंधरा छोटी प्रकरणे आहेत. त्यातून लोकायत या धर्मपरंपरेचे आणि चार्वाक पंथाचे विविध पैलू ते उलगडून दाखवितात. त्यांच्या एकूण विवेचनाची दिशा ऐतिहासिक वर्णनपर किंवा तत्त्वज्ञानाच्या अकादमिक शिस्तीची नाही. ती वर्तमान सापेक्ष धर्म, नीती, अर्थ, युद्ध, शिक्षण, विज्ञान, राजकारण आणि जीवनमूल्यांच्या सापेक्ष आहे. जगाच्या इतिहासात धर्म, श्रद्धा कसे अस्तित्वात आले, विषमता आणि शोषण धर्माचाच एक भाग कसे बनले, मनुष्याचे जीवन सुखकारक करण्यासाठी विचारसरणी कशा उदयास आल्या, पुढे विज्ञानाने काय दिले, भारतात वैदिक, सांख्य, जैन, बुद्ध या ज्ञान परंपरांचे चार्वाकाच्या संदर्भात काय स्थान आहे, अशा प्रश्नांची अत्यंत नेमकी, टोकदार व प्रासादिक शैलीत उत्तरे शोधण्याचा प्रयत्न प्रा. द्वादशीवार यांनी केला आहे.

आद्य धर्म आणि धर्मव्यवस्था सांगताना ते प्रारंभीच म्हणतात, “लोकायत हा जगाचा आद्य धर्म आहे. तो कुणा गुरूच्या ग्रंथातून वा ईश्वराकडून माणसाला मिळाला नाही. तो त्याने स्वतःच आत्मसात केला आहे. या धर्माची सारी शिकवण शब्दांतून येत नाही. ती प्रत्यक्ष अनुभवातून येते. आईवडील, शिक्षक, समाज, राजा वा सामाजिक संस्था तो सांगत नाहीत. तो ज्याचा त्याने प्रमाणपूर्वक वा प्रयत्नातून मिळवलेला व जपलेला असतो. या धर्माची अनेक नावे आहेत. चार्वाक, बार्हस्पत्य वा जीवनाचे शास्त्र. जेवढी नावे अधिक तेवढाच त्याचा आवाका वा प्रभावाचे क्षेत्रही मोठे आहे. तो ज्ञानी वा अज्ञानी, शिक्षित वा अशिक्षित, शहरी वा ग्रामीण किंवा पाश्चात्य वा-पौर्वात्य अशा सर्व व्यक्तींना सहजगत्या प्राप्त होणारा आहे.”

जगातील धर्मांचा उदय आणि प्रसार यांचे विवेचन करून ते भारतातील धर्मव्यवस्थेच्या संदर्भात आपली काही निरीक्षणे मांडतात:

“हिंदू धर्म त्याच्या सहिष्णुतेसाठी प्रसिद्ध आहे. त्याने इतर धर्मांचे ग्रंथ जपले… पण चार्वाकांचा एकही ग्रंथ ठेवला नाही… कारण इतर धर्म कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ईश्वर, मंदिर व भक्ती मानत होते. चार्वाकांचा लढाच त्याविरुद्ध होता. काही विद्वानांच्या मते, तेराव्या शतकात सापडलेला तत्वोपप्लवसिंह हा जयराशीभट्टाचा ग्रंथ चार्वाकांचा असावा… पण त्याचा ग्रंथकर्ता म्हणतो, ‘ मी चार्वाक मतासह सर्व धर्ममतांचे खंडन करून दाखवतो. ‘तात्पर्य, चार्वाकांचा ग्रंथ नाही, परंपरा नाही, त्यांचे आचार्य नाहीत आणि तरीही तो पंथ राहिला आहे. कशाच्या बळावर ? सामान्य माणसांच्या अनुभवसिद्ध ज्ञानाच्या भरवशावर.”

थोडक्यात आज चार्वाकावर एकही ग्रंथ अस्तित्वात नाही, कारण चार्वाक हा शब्दप्रामाण्य आणि ग्रंथप्रमाण्याच्या विरोधातच होता. स्त्री-शूद्रांचे शोषणच ग्रंथप्रमाण्याच्या आधारे होत होते हा इतिहास आणि चार्वाकाचा या शोषणालाच विरोध होता.

धर्मांनी शोषणासाठी आणि सत्तेसाठी अनुकूल समाजमन कसे घडवले, ते सांगतान प्रा. द्वादशीवार लिहितात,

‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे ‘ ही विचारसरणी केवळ दुःखमयच नाही तर सुतकी आहे. माणसाला त्याचा जन्म मिळतो तोच शिक्षा म्हणून, पूर्वजन्मीच्या संचिताचे प्रायश्चित्त म्हणून. ते प्रायश्चित्त या जन्मात चांगले अनुभवले तर त्याला पुढील जन्म चांगला मिळतो किंवा तो मोक्षप्राप्ती करतो. हे आपले धर्मचिंतन माणसाचे आयुष्य मुळातच दुःखी असल्याचे, संचिताचे फलित असल्याचे व ब्रह्मतत्त्वाशी सायुज्यता प्राप्त केल्याखेरीज खरे सुख प्राप्तच होत नाही असे सांगणारे आहे . ही रडतराऊ धर्मचिंतने ख्रिश्चन, बौद्ध , जैन यांनीही सांगितली आहेत. तात्पर्य… धर्म, सुखाचा निषेध करणारे , ते पापांचे फलित असल्याचे सांगणारे, त्यावर चोरटेपणाचा आरोप लावणारे आहेत. खरी सुखे त्यागात, भक्तीत, सर्वसंगपरित्यागात, संन्यासात वा संसारात राहूनही त्याचा आनंद न घेण्यात मिळते असे म्हणतात. ख्रिश्चन धर्म तर स्त्रीपुरुषांनी अपत्यप्राप्तीसाठी समागम करावा… पण त्या समागमाचा शारीरिक वा मानसिक आनंद मात्र घेऊ नये असे सांगतो .

निर्वाणात आनंद, मोक्षात आनंद, स्वर्गात आनंद आणि मृत्यूनंतर तो मिळण्याची शक्यता हे धर्माचे सांगणे तर सुख याच जन्मात आजच व सर्व त-हेच्या परिश्रमाने मिळवायचे हे अमेरिकेच्या घटनेप्रमाणे आधुनिक जगाचेही सांगणे आहे. आश्चर्य हे की, हेच चार्वाकांचे मत आहे. जोवर जगायचे तोवर सुखाने जगा… कारण मृत्यू अज्ञात आहे , तो आला की सारे संपते. देहाची एकदा राख झाली की मग मागे काही उरत नाही हे चार्वाकांचे सुखदर्शी सांगणे आहे. सुखप्राप्तीचा संबंध सामान्यपणे कोणत्याही मार्गाने सुख प्राप्त करण्याशी जोडला जातो. चंगळवाद, फसवणूक, हिंसा, दडपशाही, युद्ध वा जय हे सारे सुखप्राप्तीचेच स्वरूप व मार्ग आहेत. त्यांचा दरवेळी नीतीशी संबंध असतोच असे नाही. मग चार्वाकांना नीतीचा मार्ग अमान्य आहे काय? नाही. चार्वाकांचा मार्ग केवळ नीतीचाच नाही तर सुखी व सुरक्षित जीवन जगण्याचा आहे. आयुष्य सुरक्षित करणे, त्याच्या गरजा भागवणे आणि आपली सुखे अनुभवणे हा तो मार्ग आहे. त्यांना हिंसा, अनीती, फसवणूक व चंगळही मान्य नाही.”

थोडक्यात आजच्या वर्तमान धर्मप्रणीत हुकुमशाहीकेंद्री बाजारमूल्यांवर आधारित शासनप्रणालींच्या ऐतिहासिक प्रेरणा समजून घ्यायच्या असतील आणि शाश्वत जीवनमूल्यांच्या दिशेने जाणारा भविष्याचा मार्ग शोधायचा असेल तर ज्ञानलालसा असलेल्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे असे झाले आहे.

(लेखक नामवंत समीक्षक व नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभागप्रमुख आहेत)

7709012078

०००

सुरेश द्वादशीवार यांच्या  , ‘चार्वाक’, ‘एकाकी’  आणि ‘तुझ्यासवे …तुझ्याविना’ या नवीन पुस्तकांसाठी संपर्क – 

साधना प्रकाशन -४३१ , शनिवार पेठ , पुणे

020-24459635

M.7058286753

[email protected]

Previous articleसर्व बंद, तरीही सर्वच सुरू!
Next articleसंगीत मन को पंख लगाये, गीतों से रिमझिम रस बरसाये..!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.