(साभार: साप्ताहिक ‘साधना’)
-गिरीश कुबेर
जगात गेल्या दीडशे वर्षांत जे-जे काही घडलं त्यामागे खनिज तेल हा घटक आहे. ‘द प्राईझ’ने हा पहिलाच तेलधडा इतका विलक्षण प्रेमानं दिला की, नंतर त्यातून अनेक मार्ग माझे मला सापडत गेले. तेलक्षेत्रावर आणि म्हणून जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या व्यक्ती (‘एका तेलियाने’) ऊर्जाक्षेत्रावरील मालकीयुद्धाची आड-पैदास (म्हणजे बाय-प्रॉडक्ट) म्हणून त्यातून झालेला दहशतवादाचा उदय (‘अधर्मयुद्ध’) अशा विषयांचा प्रवास ‘द प्राईझ’नं लावलेल्या दिव्याच्या प्रकाशातूनच झाला.
……………………………………………

चार वर्षांपूर्वी 2017 मध्ये दिल्लीत त्यांच्यासमवेत दोन दिवसांच्या परिसंवादाची संधी मिळाल्यानंतर तर एर्गिन आणि त्यांचं ‘प्राईझ’ अधिकच अमोल वाटू लागलं. एर्गिन यांच्यामुळे अप्रत्यक्षपणे का असेना, प्रेरित होऊन त्या विषयाचा पाठपुरावा करण्याची गोडी लागल्यानं एर्गिन यांच्याशी कधी तरी गप्पा मारायची संधी मिळायला हवी, अशी गेली कित्येक वर्षांची इच्छा! भारत सरकारच्या ऊर्जापरिषदेत सहभागी होण्यासाठी साक्षात एर्गिन यांच्या संस्थेकडून आलेल्या पत्रामुळे त्या इच्छेच्या पूर्ततेची शक्यता निर्माण झाली. तो अनुभव अविस्मरणीय. मुळात भारताच्या ऊर्जाक्षेत्रावरच्या परिसंवादात भाग घ्यायचा आणि समोर एर्गिन… ही कल्पना शालेय वयात गणिताच्या पेपराआधीच्या अवस्थेची आठवण करून देणारी. फरक इतकाच की, इथं अनुत्तीर्ण झालो तरी आनंदच असणार होता. या कार्यक्रमाच्या निमित्तानं एर्गिन यांच्याशी ‘द प्राईझ’वर मनसोक्त बोलता आलं. अनेक प्रश्न होते, त्यांची उत्तरं त्यांनी मोकळेपणानं दिली. पण आविर्भाव ‘मला आवडतं, मी लिहिलं’ असा सरळ-सोपा. उगाच माझा या विषयाचा अभ्यास, त्यासाठी घेतलेले कष्ट वगैरे भंपकपणा अजिबात नाही. या विषयावर मीही काही लिहितो वगैरे असं तिथं हजर असलेल्या आपल्या डॉ.विजय केळकरांनी एर्गिन यांना सांगितलं. शाळेत गणितात लाल शेरा मिळाल्यानंतर वाटायची त्यापेक्षा किती तरी अधिक लाज तेव्हा वाटली. या खात्याचे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे ही सगळी चर्चा ऐकत होते. ही इज आवर एर्गिन, असं ते एर्गिन यांना म्हणाल्यावर तर गणिताच्या बरोबरीनं भाषेतही लाल रेषा मिळाल्यासारखी लाज वाटली.






