डॅनिअल एर्गिन यांचे ‘द प्राईझ’

(साभार: साप्ताहिक ‘साधना’)

-गिरीश कुबेर

जगात गेल्या दीडशे वर्षांत जे-जे काही घडलं त्यामागे खनिज तेल हा घटक आहे. ‘द प्राईझ’ने हा पहिलाच तेलधडा इतका विलक्षण प्रेमानं दिला की, नंतर त्यातून अनेक मार्ग माझे मला सापडत गेले. तेलक्षेत्रावर आणि म्हणून जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या व्यक्ती (‘एका तेलियाने’) ऊर्जाक्षेत्रावरील मालकीयुद्धाची आड-पैदास (म्हणजे बाय-प्रॉडक्ट) म्हणून त्यातून झालेला दहशतवादाचा उदय (‘अधर्मयुद्ध’) अशा विषयांचा प्रवास ‘द प्राईझ’नं लावलेल्या दिव्याच्या प्रकाशातूनच झाला.

……………………………………………

साधनाच्या संपादकांनी या अंकासाठी लिहिण्याचे निमंत्रण देताना पुस्तकांची ‘आवडलेली’ आणि ‘प्रभावित करून गेलेली’ अशी विभागणी केली. हे त्यांचं म्हणणं खरं आहे की, आवडलेली पुस्तकं अनेक असतात; परंतु त्या तुलनेत प्रभावित करणारी पुस्तकं तितक्या संख्येनं असतातच असं नाही. पण माझ्यासारख्याची अडचण अशी की, प्रभावित करून गेलेली पुस्तकंही खूप आहेत.

यातील ‘माझ्यासारख्या’ या शब्दाविषयी आधी स्पष्टीकरण. अन्यथा, गैरसमजाचा धोका संभवतो. शालेय वयात आपल्याबरोबरीचे काही असे असतात की, ते कधीच चुकत नाहीत. त्यांचे पालक केसांचा छान कोंबडा वगैरे पाडून, स्वच्छ गणवेशात त्यांना शाळेत रोज सोडतात. त्यांच्या वह्यांत कधी शाई सांडल्याचे डाग नसतात, की गृहपाठ कधी राहिलेला नसतो. हे गणितात पहिले येतात आणि शाळेच्या स्नेहसंमेलनात नाटकात त्यांना महत्त्वाचं कामही मिळतं. पुढे हे व्यवस्थापकीय संचालक, डॉक्टर, गेलाबाजार प्रशासकीय अधिकारी किंवा तत्सम असे आदर्श यशस्वी ठरतात. अशा जन्मत:च हुशार, शाळा ज्याच्याकडून अपेक्षा वगैरे ठेवते अशांच्या जवळपासही मी कधी नव्हतो. त्यामुळे ‘माझ्यासारख्या’ हा शब्दप्रयोग आत्मगौरवी अर्थानं नाही. पण त्याही वेळी या अशा हुशार, उद्याच्या भारताच्या भाग्यविधात्यांना मी एकाच क्षेत्रात मागे टाकू शकत होतो. ते म्हणजे, वाचन.

त्या हुशार… विद्यार्थ्यांच्या मातोश्री स्नेहलता दसनूरकर, योगिनी जोगळेकर आदी वाचत आणि तीर्थरूप ‘स्वामी’, ‘श्रीमान योगी’ वगैरे. आणि आई-  वडील उभयता पु.ल. त्या वेळी ‘एका स्पृश्याची डायरी’वाले सदा कऱ्हाडे, भाऊ पाध्ये, गुरुनाथ नाईक, नामदेव ढसाळ, भालचंद्र नेमाडे असे नवे लेखकही माझ्या वाचनात होते. त्या हुशार चुणचुणीतांच्या ‘स्वामी’, ‘श्रीमान योगी’ आणि समग्र पु.ल. यांच्या साहित्यातलंही हवं ते उद्‌धृत करता येईल इतकं तेव्हा माझ्या लक्षात असे आणि त्याच वेळी हे नवे दिशादर्शक लेखकही आवडत. ‘काला पहाड’ वगैरेंचा तर दिवसाला एक या गतीनं मी फडशा पाडत असे. तेव्हा पत्रात साधनाचे संपादक म्हणतात त्याप्रमाणे त्यातली थोडी पुस्तके अशी असतात- जी अधिक सखोल, गहन व गंभीर प्रभाव टाकून गेलेली असतात; तो प्रभाव आपली भाषा, शैली, विचार यांवर परिणाम करणारा असू शकतो. अशांतील पहिलं अर्थातच नरहर कुरंदकरांचं ‘जागर’. या विशेष लेखासाठी हा एक पर्याय होता. पण त्याच पत्रात ते म्हणतात त्याप्रमाणे, एखादं पुस्तक ‘नवे व अनोखे दालन खुले करून देण्यास कारणीभूत’ ठरलेले असते किंवा ‘जीवनविषयक दृष्टिकोनास’ कलाटणी देणारे ठरलेले असते. जीवनविषयक दृष्टिकोन हा फारच मोठा प्रकार आहे. पण एका पुस्तकानं आयुष्यात खरोखरच एक नवं कवाड उघडलं आणि ग्रॅहम ग्रीन म्हणतात त्याप्रमाणे भविष्य त्यातून आत आलं. हे पुस्तक म्हणजे डॅनिएल एर्गिन यांचं ‘द प्राईझ’.

साधनाच्या या लेखासाठी या दोन पुस्तकांवर मनातल्या मनात खूप वादविवाद झाले. कुरुंदकर सर्व विचारगोंधळावर मात करतात, त्याप्रमाणं त्यांच्या पुस्तकानं दुसऱ्यावर मात केलीही. पण नंतर असाही विचार आला की, त्यांच्याविषयी आणि त्या पुस्तकाविषयी मी आणखी नव्यानं आता काय सांगणार? तेवढी पात्रता नाही. आणि दुसरं असं की, डॅनियल एर्गिन यांच्या पुस्तकानं खनिज तेल या- इथं आत्मस्तुतीचा धोका पत्करूनही नम्रपणे सांगता येईल- मराठीसाठीही पूर्णपणे अनभिज्ञ विषयात कायमचा रस निर्माण केला. अनेक गोष्टी करू पाहणाऱ्यास एक तरी गोष्ट स्वत:चा हातचा म्हणता येईल, अशी हवी असते. गाण्याचे सर्व प्रकार सादर करणाऱ्यासही एखादा राग वा एखादी जागा विशेष जवळची असते. ‘द प्राईझ’ ही अशी माझी विशेष जागा. खनिज तेल या विषयावर आतापर्यंत तीन (आणि लवकरच चवथं) पुस्तकं लिहिण्याचा धीर ज्या कोणामुळं आला असेल, तर ते हे ‘द प्राईझ’. माझ्या तेलपुस्तक चौकडीची सुरुवात ज्यामुळे झाली, त्या ‘हा तेल नावाचा इतिहास आहे’ या पुस्तकाची प्रेरणा म्हणजे ‘द प्राईझ’. यानंतर या विषयावर लिहिताना डॅनियल एर्गिन यांचं बोट अजिबात धरावं लागणार नाही, इतका आत्मविश्वास निश्चित आला. त्याची सुरुवात ‘द प्राईझ’नं केली. या पुस्तकाचं माझ्यावर ‘जागर’इतकंच ऋण आहे. खरं तर अशा नव्या विषयाचा जागर मनात निर्माण झाला तो डॅनिएल एर्गिन यांच्या या पुस्तकामुळे. म्हणून हा लेख ‘द प्राईझ’वर.

डॅनिएल एर्गिन हे असं पुस्तक का लिहू शकले, या कारणाचा एक लोभस हेवा (रोमँटिसिझम) माझ्या मनात कायमचा घर करून राहिलेला आहे. एर्गिन हे ऊर्जाक्षेत्राचे अभ्यासक. या विषयाला त्यांनी आयुष्य वाहिलं. मॅसेच्युसेट्‌स इन्स्टिट्यूटमधल्या ऊर्जा अभ्यासशाखेचे ते प्रमुख. आपल्याला जे आवडतं ते आयुष्यभर अभ्यासावं आणि त्यावर पुस्तकाचा आकार, त्याची किंमत, बाजारपेठ याचा काहीही विचार करावा न लागता मनसोक्त लिहिता यावं, ही कोणत्याही ललितेतर लेखकासाठी चैन वाटावी अशी अवस्था. ती त्यांना आयुष्यभर उपभोगता आली. हे केवळ पाश्चात्त्य व्यवस्थेतच होऊ शकतं. म्हणून त्यांचा लोभस हेवा. यातून एर्गिन यांनी आपल्या अभ्यासाची खोली, लांबी/रुंदी इतकी वाढवत नेली की, अमेरिकादी अनेक बलाढ्य देशांच्या ऊर्जाविषयक धोरण आखणीत सल्लागार म्हणून त्यांना आज बोलवलं जातं. खनिज तेल यासारख्या चिकट, कंटाळवाण्या पदार्थाची उपपत्ती व त्याचे जगावर झालेले परिणाम अभ्यासायचे आणि होऊ घातलेल्या घटनांचं आपल्या ज्ञानाधारे भाकित बांधायचं, हे त्यांचं काम. गाण्यावर प्रेम असणाऱ्या जातिवंतास कोणी आयुष्यभरासाठी गाणं हेच चरितार्थाचं साधन दिलं, तर तो जितका भाग्यवान ठरेल तितके एर्गिन हे भाग्यवान ठरतात. हे त्यांचं भाग्य ‘द प्राईझ’मध्ये झिरपतं आणि आपल्याला स्पर्श करून जातं. म्हणूनही त्यांचा लोभस हेवा.

मानवी आयुष्यास आधुनिकतेचा स्पर्श झाला तो खनिज तेल या घटकामुळे. पृथ्वीच्या पोटातून हे तेल काढण्याची कला आणि शास्त्र विकसित झालं नसतं, तर अजूनही आपण लाकूडफाटा किंवा फार फार तर कोळसा जाळत बसलो असतो. या तेलाच्या उत्क्रांतीची कहाणी म्हणजे ‘द प्राईझ’. इतिहास दर्शवतो की, तेलातील हे जग बदलण्याची क्षमता ओळखणारा पहिला द्रष्टा म्हणजे विन्स्टन चर्चिल. पंतप्रधानपदी येण्याआधी किमान दोन दशकं त्यांनी खनिज तेलाचं महत्त्व ओळखलं. ते किती द्रष्टे असावेत? तर, जर्मनीत रुडॉल्फ डिझेलनामक अभियंत्यानं तेलावर चालणारं इंजिन बनवल्यानंतर लगेच चर्चिल यांच्या डोक्यात विचार आला तो ग्रेट ब्रिटनच्या शाही नौदलातील कोळशावर चालणाऱ्या सर्व नौकांची इंजिन्स बदलण्याचा. आपल्या नौकांत यापुढे तेलावर चालणारी इंजिन्स  असायला हवीत, हे त्यांनी पहिल्यांदा लक्षात घेतलं. त्यानंतर त्यासाठी त्यांनी मोहीमच चालवली. त्या इंजिनबदल मोहिमेतल्या शेवटच्या नौकेचं तेलइंजिनात रूपांतर झालं आणि पुढच्याच महिन्यात पहिल्या महायुद्धास सुरुवात झाली. जर्मनीचा त्या युद्धात पराभव झाला तो केवळ चर्चिल यांनी आपल्या नौकांची इंजिनं बदलल्यामुळे. त्यामुळे या नौकांची गती वाढली. खनिज तेलाच्या क्षेत्रात मोठ्या हिमतीनं उतरून त्या खेळावर जमेल तितकं नियंत्रण मिळवणं, हेच त्या देशास मिळणारं खरं बक्षीस- म्हणजे ‘प्राईझ’. चर्चिल यांचेच हे उद्‌गार आणि म्हणून या पुस्तकाचं शीर्षक ‘प्राईझ’.

पण याच चर्चिल आणि त्यांच्या ग्रेट ब्रिटनचा दैवदुर्विलास असा की, 1944 मध्ये दुसरं महायुद्ध अखेराकडे वाटचाल करीत असताना त्याआधी अवघं दशकभर सौदी अरेबियात फुललेल्या तेलविहिरींच्या बागांवर मालकी प्रस्थापित करण्यात चर्चिल आणि त्यांचा देश कमी पडला. पहिल्या महायुद्धाआधी चर्चिल पंतप्रधानही नव्हते. दुसऱ्या महायुद्धात देशाची सूत्रं त्यांच्या हाती होती. पण तरीही आपल्या साम्राज्याचा भाग असलेल्या सौदी अरेबियातील तेलविहिरी त्यांच्या डोळ्यादेखत अमेरिकेनं आपल्या कह्यात घेतल्या. अमेरिकेचे विकलांग अध्यक्ष रूझवेल्ट यांनी धट्ट्याकट्ट्या, आपल्याच गुर्मीत राहणाऱ्या बोक्यासारख्या चर्चिल यांच्यावर मुत्सद्दीपणात सहज मात केली. यामुळे ब्रिटननं केवळ तेलविहिरी गमावल्या नाहीत, तर त्या देशाचं महासत्तापण या तेलानं हिरावून घेतलं. महायुद्धोत्तर जगात अमेरिका प्रबळ झाली त्यामागील एकमेव कारण म्हणजे, त्या देशानं जगातील ऊर्जाक्षेत्रावर बसवलेली आपली मजबूत पकड.

जगात गेल्या दीडशे वर्षांत जे-जे काही घडलं त्यामागे खनिज तेल हा घटक आहे. ‘द प्राईझ’ने हा पहिलाच तेलधडा इतका विलक्षण प्रेमानं दिला की, नंतर त्यातून अनेक मार्ग माझे मला सापडत गेले. तेलक्षेत्रावर आणि म्हणून जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या व्यक्ती (‘एका तेलियाने’) आणि ऊर्जाक्षेत्रावरील मालकीयुद्धाची आड-पैदास (म्हणजे बाय-प्रॉडक्ट) म्हणून त्यातून झालेला दहशतवादाचा उदय (‘अधर्मयुद्ध’) अशा विषयांचा प्रवास ‘द प्राईझ’नं लावलेल्या दिव्याच्या प्रकाशातूनच झाला.

जवळपास 900 पानांचं हे पुस्तक आहे. एखाद्या ललितेतर विषयावर इतकं भव्य लिखाण करणं आणि अर्थातच तितक्या उत्कटतेने ते छापलं जाणं, हे सारंच कौतुकास्पद. एर्गिन यांचं आणखी कौतुक अशासाठी की, आज ते वयाच्या पंचाहत्तरीत आहेत. पण अजूनही तेलाचा त्यांचा ध्यास संपलेला नाही. काळानुरूप घडत गेलेल्या नवनव्या तेलघटना तर ते नव्या पद्धतीने मांडतच असतात. पण ‘द प्राईझ’चीसुद्धा सतत नवनवी आवृत्ती हे सर्व सामावून घेईल यावर त्यांचा कटाक्ष असतो.

ऊर्जा हा विषय सगळ्या मानवी प्रगतीच्या केंद्रस्थानी कसा आहे, याचा अमूल्य आणि तरीही आनंददायी धडा ‘द प्राईझ’मधून मिळतो. तो आवडायचं आणखी एक कारण म्हणजे, अमूल्य धडे हे नेहमी अगम्य भाषेतच द्यायचे असतात- हा आपल्याकडचा अनुभव ‘द प्राईझ’ वाचताना अजिबात येत नाही. म्हणजे वाचकाला ‘मी काही महत्त्वाचे सांगत आहे, ते तुम्ही समजून घेण्यातच तुमचे भले आहे’ असा आविर्भाव एर्गिन यांचा अजिबात नसतो.

चार वर्षांपूर्वी 2017 मध्ये दिल्लीत त्यांच्यासमवेत दोन दिवसांच्या परिसंवादाची संधी मिळाल्यानंतर तर एर्गिन आणि त्यांचं ‘प्राईझ’ अधिकच अमोल वाटू लागलं. एर्गिन यांच्यामुळे अप्रत्यक्षपणे का असेना, प्रेरित होऊन त्या विषयाचा पाठपुरावा करण्याची गोडी लागल्यानं एर्गिन यांच्याशी कधी तरी गप्पा मारायची संधी मिळायला हवी, अशी गेली कित्येक वर्षांची इच्छा! भारत सरकारच्या ऊर्जापरिषदेत सहभागी होण्यासाठी साक्षात एर्गिन यांच्या संस्थेकडून आलेल्या पत्रामुळे त्या इच्छेच्या पूर्ततेची शक्यता निर्माण झाली. तो अनुभव अविस्मरणीय. मुळात भारताच्या ऊर्जाक्षेत्रावरच्या परिसंवादात भाग घ्यायचा आणि समोर एर्गिन… ही कल्पना शालेय वयात गणिताच्या पेपराआधीच्या अवस्थेची आठवण करून देणारी. फरक इतकाच की, इथं अनुत्तीर्ण झालो तरी आनंदच असणार होता. या कार्यक्रमाच्या निमित्तानं एर्गिन यांच्याशी ‘द प्राईझ’वर मनसोक्त बोलता आलं. अनेक प्रश्न होते, त्यांची उत्तरं त्यांनी मोकळेपणानं दिली. पण आविर्भाव ‘मला आवडतं, मी लिहिलं’ असा सरळ-सोपा. उगाच माझा या विषयाचा अभ्यास, त्यासाठी घेतलेले कष्ट वगैरे भंपकपणा अजिबात नाही. या विषयावर मीही काही लिहितो वगैरे असं तिथं हजर असलेल्या आपल्या डॉ.विजय केळकरांनी एर्गिन यांना सांगितलं. शाळेत गणितात लाल शेरा मिळाल्यानंतर वाटायची त्यापेक्षा किती तरी अधिक लाज तेव्हा वाटली. या खात्याचे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे ही सगळी चर्चा ऐकत होते. ही इज आवर एर्गिन, असं ते एर्गिन यांना म्हणाल्यावर तर गणिताच्या बरोबरीनं भाषेतही लाल रेषा मिळाल्यासारखी लाज वाटली.

एकच एक विषय आयुष्यभरासाठी कसा आणि किती ध्यासाचा होऊ शकतो, याचं डॅनियल एर्गिन आणि त्यांचं ‘द प्राईझ’ हे मूर्तिमंत प्रतीक. अनुकरणीय असं. स्वत:च स्वत:ला झालेला हा एक ‘जागर’… साधनाच्या अंकास अपेक्षित नवे दालन खुले करण्यास कारणीभूत ठरलेला!!

(मागील पाव शतकापासून इंग्रजी व मराठी पत्रकारितेत कार्यरत असलेले व आगळ्या वेगळ्या विषयांवर अर्धा डझन पुस्तके लिहिणारे गिरीश कुबेर मागील दहा वर्षांपासून ‘लोकसत्ता’ या दैनिकाचे संपादक आहेत.)

[email protected]

Previous articleनिर्लज्जम सदा सुखी…
Next articleइजाजत : एका रात्रीची गोष्ट
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.