इजाजत : एका रात्रीची गोष्ट

-प्रमोद मुनघाटे

‘सुधा’ म्हणजे अमृत. इजाजतमध्ये रेखाचं नाव सुधा आहे.  पहिल्याच दृश्यात रेखा मूर्तिमंत अमृतमयच दिसते.    तिचे देखणेपण नाही म्हणत मी. नसिरुद्दीन शहाचा म्हणजे महिंद्रचा वेटिंग रूममध्ये प्रवेश झाल्या क्षणापासून तिचे सगळे विभ्रम बघा. तिची साडी, तिचा चष्मा, कपाळावरील कुंकू. सुरवातीला ती स्वतःच्या डोळ्यासमोर एक साप्ताहिक धरते पण तिची नजर महिंद्रवरच आहे. तो आपले समान काढतो. शोधाशोध करतो. त्याला किल्ली सापडत नाही. सामानाचा पसारा काढून तो बाथरूममध्ये जातो आणि त्याच्या सामानाची देखरेख करण्याची जबाबदारी तिच्यावर येते.  ‘सुधा’ म्हणजे अमृत असे म्हणालो ते यासाठीच. विवाहसंस्थेत स्त्रीच्या भूमिकेवर पुरुषप्रधान मानसिकतेने अपेक्षित किंवा आरोपित केलेले हे अमृत आहे. अमृत म्हणजे अंतर्बाह्य शुद्ध संजीवनीच. खरं म्हणजे सुधा आता महिंद्राची, ‘त्या क्षणी बायको नसली तरी ती जणू अनंत काळाची’ पत्नीच आहे. अमृत आहे.

००

गुलजारचा १९८७चा ‘इजाजत’ पहायचा राहून गेला होता. मात्र ऑडियो कॅसेटवर रेखा आणि नसिरुद्दीनच्या आवाजातील काळजाला चरे पाडणारे संवाद कितीदा ऐकले होते. आणि ती गाणी…’मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है…’. मध्ये एकदा १९९०च्या जुलै महिन्यात एका पावसाळी रात्री बिघडलेल्या व्हीसीआरवर ‘इजाजत’ अर्धाच  पाहीला होता. ट्रेनची वेळ झाली म्हणून, पहायचा राहिला तो राहिलाच. आणि काल रात्री परत पहिला, तीस वर्षांनी पूर्ण. मध्यरात्री सिनेमा संपल्यावर मनात पहिला प्रश्न आला की का नाही पाहिला आपण इतके दिवस?

००

सिनेमा सुरू होतो तेव्हा एक ट्रेन रात्री  स्टेशनवर येते, आणि संपतो तेव्हा ट्रेन सकाळी निघून जाते. नसिरुद्दीन शहा त्या स्टेशनवर उतरतो तेव्हा त्याला रेखा भेटते, फर्स्ट क्लासच्या वेटिंग रूममध्ये. पाच वर्षांपूर्वी ती त्याच्या आयुष्यातून निघून गेली असते. त्याची इजाजत न घेता. अचानक या पावसाळी रात्री त्याला भेटते. त्या एका रात्रीत त्या दोघांच्या पूर्वायुष्यात घडलेल्या घटना आंदोलित होत राहतात, संमिश्र भावनांसह. सुधा एकेकाळची पत्नी आणि महिंद्र, आता कोणतेही नाते नसलेला एक परपुरुष यांच्यात भावनांचे जे खेळ चालतात त्या क्षणी ते फार हळवे असतात, फार दुखरे असतात. लौकिकदृष्टीने निरर्थक असलेल्या भावनांच्या जीवघेण्या खेळात स्त्री-पुरूषांमध्ये जे नाते असते, ते नवरा-बायको-मित्र अशा नात्यांमध्ये कधीच कप्पेबंद करता येत नाही, हेच जणू गुलजार प्रेक्षकांना सांगू पाहतात.

सिनेमा संपतो तेंव्हा रेखा आपल्या नव्याने लग्न केलेल्या नवऱ्यासोबत जाताना नसिरुद्दीन शहाची इजाजत घेते, गरज नसताना. हाच तो भावनांचा अमूर्त गुच्छ असतो, ज्याला कुठले नावच देता येत नाही.

००

काल रात्री ‘इजाजत’ पाहिल्यापासून काळजात एक हलकीशी अनामिक सल आहेच. ‘इजाजत’ म्हणजे एक संपूर्ण कविताच आहे गुलजारची. ती अनुभवायचीच असते. चांगली कविता दुसऱ्याला नाही सांगता येत का आवडली ते. कवितेतील सगळेच सौंदर्य नाही स्पष्ट करता येत, म्हणून ती कविता असते.

स्त्रीपुरुषांमधील नाते हाच  ‘इजाजत’चा खरा विषय. खरे म्हणजे कुठलाच विषय नाही, विचार नाही असा तो निव्वळ  अनुभव आहे. ‘नातेसंबंध’ हा उच्चारायला किती सोपा शब्द. पण त्याचे किती पदर आहेत, आणि ते सगळे अमूर्त, अदृश्य. आयुष्यभर एकत्र राहणाऱ्यांनाच कळत नाही त्यांच्यातील नाते कसे होते. किती औपचारिक आणि किती हृदयाच्या खोलात पोचलेले.

‘इजाजत’ स्त्रीपुरुषातील या नात्यांमधील ताण खूप तरल आणि हळुवार रीतीने गुलजार यांनी हाताळले आहेत. कर्तव्य म्हणून स्वीकारलेले प्रेम आणि मनापासून केलेले प्रेम यातील सीमारेषा किती धूसर असतात ते ‘इजाजत’मध्ये नेमक्या व्यक्तिरेखा आणि नेमक्या प्रसंगातून जिवंत केला आहे. सिनेमाची प्रत्येक फ्रेम, प्रत्येक प्रसंग, प्रत्येक संवाद यातून गुलजार आपल्यापुढे एक अमूर्त अनुभवाची सुंदर कविताच मूर्त करीत जातात.

अशा नात्यातील अशा गुंतागुंतीवर कितीतरी चित्रपट आले असतील; पण एखाद्या कवितेत जसे नेमके शब्द कवीला सापडतात, तसे गुलजारला इथे प्रत्येक दृश्य नेमकेपणाने सापडले आहे असे म्हणावे लागते. रेल्वेस्टेशन, पावसाळी रात्र, वेटिंग रूम आणि विभक्त झालेल्या नायक-नायिकांची अचानक भेट होणे, हे सगळे एखाद्या दुर्मिळ कवितेसारखे साधले गेले आहे. चांगल्या कवितेचा आत्मा म्हणजे तिच्यातील अनुभवाची तीव्रता आणि त्या अनुभवाची परिपूर्णता. आणि हे सगळे कल्पनेच्या पातळीवर असते. ‘इजाजत’मधील एका पावसाळी रात्री झालेली महिंद्र आणि सुधाची भेट ही अशाच एका कवितेच्या अमूर्त अनुभवाचे  दृश्य रूप आहे, असे म्हणावे लागते.

००

कोणत्याही चांगल्या कलाकृतीत जीवनाचे जसेच्या तसे प्रतिबिंब नसते. (म्हणून ती कलाकृती असते.) सामान्य जीवनातील व्यक्ती, घटना-प्रसंगाना कलावंत ‘विशिष्ट’ रूपाचे कोंदण देतो. या रूपातील काव्य प्रेक्षकाच्या मनात जिवंत होते. कलाकृतीतील ती सृष्टी वास्तव सृष्टीपेक्षा वेगळी असते. तिथले कार्यकारण भाव वेगळे असतात. म्हणून वेगळे झालेले नवराबायको अचानक एका पावसाळी रात्री सुनसान रेल्वे स्टेशनवर भेटतात.  मग त्यांच्या भूतकाळातील एकेका घटनांमधून त्यांची आयुष्य जशी उलगडत जातात, तशी स्त्री-पुरुषांच्या प्रेमसंबंधातील काही कंगोरे नव्याने  कळू लागतात. महिंद्र आणि सुधा यांचे व्यक्तित्व काही जगावेगळे नाही.  पण ते ज्या परिस्थितीच्या सापळ्यात अडकतात, तो सापळा वास्तव जीवनाशी  समांतर आहे. पण याच  समांतर सृष्टीतून गुलजारला प्रेमाच्या परस्परविरोधी  छटा अधिक स्पष्ट करता येतात.  प्रेम ही एक मूलभूतच प्रेरणा आहे.  विवाहसंबंधात प्रेमाला नात्याच्या चौकटीत बंदिस्त केले जाते. औपचारिक नात्याची चौकट जरा सैल झाली तरच हृदयाच्या तळाशी असलेले प्रेम पानावरच्या दवबिंदूसारखे अलवार होते. अन्यथा त्याची वाफच होते.

००

गुलजारला ही अमृतमयी ‘पत्नी’ रेखाच्या प्रत्येक हालचालीतून, संवादातून साकार करायची आहे. तिच्याजवळ ऐसपैस वागणाऱ्या एकेकाळी नवरा असलेल्या महिंद्राच्या प्रत्येक समस्येची किल्लीच आहे, जशी तिच्या व्हिआयपी सुटकेसची किल्ली आहे तशी. तिच्याकडे माचीस आहे. महिंद्राच्या पुरुषी वृत्तीला फुलवणारी. (महिंद्र विचारतो तू स्मोकिंग करतेस का तर ती नाही म्हणते. त्याची विसरण्याची सवय आणि तिची जवळ बाळगण्याची सवय असं ती म्हणते) सुधाकडे शाल आहे, जी, पावसात भिजलेल्या महिंद्रच्या कुडकुडत्या शरीरावर ती घालते आणि स्वतः मात्र रात्रभर जागत असते. टॉवेलने त्याचे केस पुसून देणे असो त्याच्या उशाला पाण्याचा ग्लास ठेवणे असो. तो बाथरूममध्ये गेल्यावर त्याच्या सामानाची चौकीदारी करणे असो की त्याला चहा बनवून देणेअसो. सुधा अमृतमयी पत्नीच आहे.

आणि माया? तिचे नावच माया (अनुराधा पटेल) आहे. प्रेम आणि माया यात एकाचवेळी  किती सूक्ष्म आणि किती अफाट अंतर आहे. त्यातील भेद पुरुषाला कधीच  कळत नाही. माया हे स्त्री-पुरुषसंबंधातील प्रेमाची हद्द ओलांडणारे रूप आहे. ‘इजाजत’मधील मायाला कुठली नात्याची किंवा औपचारिक नातेसंबंधाची चौकट नको असते. तिला लग्न न करताच स्वत:चे बाळही हवे असते. महिंद्रला काय किंवा कोणत्याही पुरुषाला, स्त्रीच्या मायावी रूपाचे, तिच्या बेहद्द प्रेमाचे आकर्षण असतेच. त्या आकर्षणातून तो स्वतःला सोडवू इच्छित नाही, किंवा सोडवू शकत नाही. पण अमृतमयी सुधा ही महिंद्रची मुलभूत जैविक प्रेरणा असतेच. म्हणून सुधा जेंव्हा घर सोडून गेल्याचे कळते तेंव्हा त्याला हार्ट अटैक  येतो. लग्नसंबंधाची औपचारिक चौकट त्याला हवीच आहे. पण त्या चौकटीचा पाया सुधाच्या त्यागावर उभा आहे ,हे त्याला कळते म्हणून तो तिचा वियोग सहन करू शकत नाही.

विवाहसंस्थेतील साचेबंद नातेसंबंध गुलजार यांना सांगायचे आहेत का? तर नाही. पण काही विशिष्ट व्यक्तीरेखेतून माणसांच्या नात्यांच्या मुळांचा ते शोध घेऊ पाहतात. म्हणून त्या व्यक्तीरेखा प्रातिनिधिक नमुना ते होऊ देत नाहीत. त्यात काही तपशिलाचे अनोखे रंग ते भरतात म्हणून इजाजत सिनेमा ही एक कलाकृती बनते,  तो स्त्री-पुरुष संबंधांच्या चर्चेचा विषय होत नाही.

महिंद्र मायात गुंतत जातो तशी मनस्वी सुधा त्याच्या आयुष्यातून निघून जाते. माया सुधाला आणण्यासाठी पचमढीला जाण्याचा हट्ट करते तेव्हा महिंद्र तिला रागावतो आणि ती मध्यरात्री निघून जाते, पहाटे तिचा अपघात होतो आणि निष्प्राण देह महिंद्रच्या हाती लागतो.

महिंद्राच्या आयुष्यात आता प्रेमाचे अमृतरूप असलेली सुधाही नसते आणि प्रेमाचे मायावी पाश आवळणारी मायाही नसते आणि अचानक त्या रात्री रेल्वेच्या वेटिंग रूममध्ये त्याला सुधा भेटते. पण केवळ एका रात्रीसाठी. ती एक रात्र, त्या रात्रीत दोघांनी आठवलेले भूतकाळातील क्षण ही एक कविताच. त्या दोघांच्या आयुष्यातील आणि गुलजार यांनी प्रेक्षकांसाठी साकार केलेली. ती रात्र संपते. आणि सकाळी सुधाचा नवरा तिला घ्यायला येतो. तेंव्हा महिंद्र बघत असतो की सुधाने तिच्या नवऱ्यासाठी एक सिगारेटचे पाकीट घेतलेले आहे आणि त्याला रात्री सिगारेट पेटवण्यासाठी दिलेली माचीस ही सुद्धा तिच्या नवऱ्यासाठी आहे. सुधा एक आदर्श पत्नी आहे. पण हेही इतके सरळ चौकटबद्ध नाही. मनस्वी व्यक्तीच्या मनाचे धागे इतके सरळ नसतात.

एकदा सुधाला महिंद्राच्या शर्टाला अडकलेले मायाचे कानातील डूल सापडतात. त्यातून तो तिच्यात किती अडकला आहे, हे तिला जाणवते. त्याच दिवशी तो मायाला घरी आणायचे ठरवतो. पण सुधा अमृतमयी पत्नी असली तरी एक मनस्वी व्यक्ती आहे, हे तो विसरतो. ‘पत्नी’ हे नातेसुद्धा प्रेमाच्या अनुभवाच्या आड येण्याचा  काच असतो. ते अधिक काचले की ते नाते संपून जाते, हे तो विसरतो.

आणि रेल्वेच्या वेटिंग रूममधील रात्री सुधाने महिंद्रच्या अंगावर पांघरलेल्या शालीत तिचे इअररिंग अडकले असते. सकाळी महिंद्र सुधाला ते देतो. पण देताना तिला सांगतो, की जसे मायाचे कानातले अडकले होते, तसेच तुझ्या शालीत हे अडकले होते. महिंद्रसाठी दोन्ही अडकणे सारखेच होते का? तर होते. पण सुधासाठी ते नव्हते. तिचा नवरा तिला घ्यायला येतो तेव्हा, त्याला तिची शाल दिसत नाही. मग ती महिंद्र जिथे उभा असतो, त्या खुर्चीवर त्याला दिसते. ती शाल सुधाची होती आणि सुधा आता महिंद्राची कोणीच नव्हती. तरीही सुधा त्याच्या अंगावर ती शाल पांघरते, हे नुसते गुलजारच्या दृश्यात्मक निर्मितीमधील काव्यमय वैशिष्ट्य नाही तर अमृतमयी सुधा नावाच्या मनस्वी व्यक्तीरेखेचे वैशिष्ट्य आहे. इजाजतमधील पात्रे प्रातिनिधिक नाहीत ती या अर्थाने.

त्या एका रात्रीपुरती त्या शालीची ऊब महिंद्रला अनुभवता येते. फक्त त्या रात्रीपुरती. सुधाचा नवरा आश्चर्यचकित होत त्या खुर्चीवरील ती शाल उचलून घेतो.

(लेखक नामवंत समीक्षक व नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाचे विभाग प्रमुख आहेत)

7709012078

 

Previous articleडॅनिअल एर्गिन यांचे ‘द प्राईझ’
Next articleखोल समुद्रातील कचरा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.