पारोमा: स्त्रीवादी जाणिवा सशक्तपणे रुजविणारा सिनेमा

-प्रमोद मुनघाटे

अपर्णा सेनचा ‘पारोमा’ पाहायचा राहून गेला होता. परवा पाहिला मूळ बंगालीतून. ‘मुबी’वर सिनेमा पाहणे फारच सुखद अनुभव असतो; पण ‘पारोमा’ संपल्यावर दीर्घकाळ मनात काहीतरी कुरतडत राहते.

‘पारोमा’ (पारुमा, परूमा, परमा) सिनेमात अगदी शेवटचा उद्गार  पारोमाच्या (राखी गुलजार) तोंडी येतो तो ‘कृष्णपल्लवी’. हॉस्पिटलमधील तो प्रसंग आहे. नर्व्हस ब्रेकडाऊन झाला असतो. तिने नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला असतो. त्या जीवघेण्या शस्त्रक्रियेतून बाहेर आलेल्या पारोमाला डॉक्टर सांगतात, तुला मानसोपचाराची गरज आहे. त्यावर ती म्हणते की ती एका खादी भंडारात नोकरी करणार आहे, महिना ६०० रुपयावर. तिचा नवरा भास्कर चौधरी हतबुद्ध होतो. माझी बायको नोकरी करणार? त्याला ते सहन होत नाही.

डॉक्टर म्हणतात, पारोमा तुला तुझे गृहिणी म्हणून जीवन जगायचे नाही का? तुझं घर, नवरा, मुलं, त्यांची देखभाल… यावर पारोमा काहीच बोलत नाही. ती प्रश्नार्थक नजरेने पाहत राहते. त्यावर डॉक्टर म्हणतात, हे यासाठी म्हणतोय की त्यामुळे तुझ्यातील अपराधभाव निघून जाईल. त्यावर पारोमा विचारते अपराधभाव? कशाचा अपराधभाव?

या ‘अपराधभावाला’ नकार ‘पारोमा’ सिनेमाचा मुख्य विषय आहे. एका श्रीमंत, कुलीन व सुखवस्तू कुटुंबातील गृहिणीने एका तरुणावर केलेले प्रेम आणि त्यात स्वतःला झोकून देणे, हा तिच्या अवतीभवतीच्या लोकांना अपराध वाटणे स्वाभाविक आहे. म्हणून तिच्या मनात ‘अपराधभाव’ असलाच पाहिजे असे ते गृहीत धरतात. आणि जणू काही तिचा तो अपराध मोठ्या मनाने ते पोटात घालू इच्छितात, म्हणून डॉक्टर तिला सुचवतात तिने मानसोपचार घ्यावे आणि पुन्हा ‘गृहिणी’ म्हणून कुटुंबाची सेवा करावी.

पण पारोमा त्यांनाच विचारते, ‘अपराधभाव? कशाचा अपराधभाव?’

१९८४ चा ‘पारोमा’ हा नायिकाप्रधान आणि स्त्रीवादी जाणिवा फार सशक्तपणे रुजविणारा सिनेमा आहे. प्रत्येक फ्रेम मूळ विषयाला पुढे नेणारी आणि अत्यंत कलात्मक. बरेच दिवसात इतका चांगला सिनेमा पाहिला नव्हता, असे मला वाटत राहिले.

कलकत्ता शहरात दुर्गापूजेच्या उत्सवापासून सिनेमा सुरू होतो. राहूल रॉय हा युरोपमध्ये ‘लाइफ’ सारख्या मासिकासाठी फोटोफिचर करणारा तरुण फोटोग्राफर भारतात आलेला असतो. त्याला ‘भारतीय गृहिणी’ असे एक फिचर करायचे असते. दुर्गापूजेत तो कॅमेरे लावून बसला असतो. पूजा करायला पारोमा (राखी गुलजार) येते. ती पूजा करताना विविध कोनातून राहूल तिचे भरपूर क्लोजअप्स घेतो. देखणी आणि सुखवस्तू घराच्या सगळ्या छटा चेहऱ्यावर असलेल्या पारोमाची एकूण देहबोली राहुलला आकर्षित करून घेते.

मंदिराच्या बाहेर खुर्च्या टाकून बसलेल्या त्या उच्चभ्रू कुटुंबात राहूलचीच चर्चा असते. तो त्यांच्या कुटुंबातील एकाचा बालमित्रच निघतो. त्याचवेळी पारोमाचेही कौतुक असते. भास्कर चौधरी या अत्यंत प्रतिष्ठित आणि मोठ्या उद्योगसमूहात उच्च पदावर असलेल्या उच्चवर्णीय गृहस्थाची पत्नी म्हणजे पारोमा. पारोमा कशी मनमिळाऊ आहे. सगळ्या कामात कुशल आहे. तिची म्हातारी सासू, नवरा, एक मुलगी आणि दोन मुलं यांचं तिच्याशिवाय एक पान हलत नाही वगैरे. घरात सतत पारोमा… पारोमा…असा जप सुरु असतो. ती मम्मीमा, काकीमा, भाभीमा, बहुमा अशा अनेक नावांनी ओळखली जात असते.

दुसऱ्याच दिवशी चौधरी कुटुंब सकाळचा नाश्ता करताना राहुलचा फोन येतो. त्याला टिपिकल इंडियन हाऊसवाईफ म्हणून पारोमा आवडल्याचे तो सांगतो. त्याने पाहिलेल्या हाऊसवाईफमध्ये पारोमा सर्वात सुंदर असल्याचेही तो सांगतो आणि तिचे फोटोसेशन करण्याची परवानगी मागतो. हे बोलणे सुरू असताना पारोमा धाकट्या मुलाला घास भरवत असते. त्याचवेळी घरातील सकाळची इतर कामेही चाललेली असतात. भास्कर चौधरी तिला सांगतात, ‘राहूल रॉय तुझे फोटो सेशन करणार आहे.’ अर्थात ती हा विचार क्षणात झटकून टाकते. नवऱ्याच्या हातरुमालाला इस्त्री करता करता ती सांगते, माझे फोटो काढून काय करायचे आहे. काढायचे असतील तर ती तिच्या मुलीकडे इशारा करते. सगळे हसतात. भास्कर चौधरी पुन्हा सांगतात राहुलला फक्त तिचेच फोटो हवे आहेत. काय हरकत आहे त्याला फोटो काढू द्यायला? असा प्रश्न करून ते आपल्या आईलाही आपल्या बाजूने करतात. परत वरून आता पारोमा सौंदर्यस्पर्धेत उतरणार आणि आम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही अशी थट्टाही ते करतात. सगळे जोरात हसतात. पण पारोमाला ते अजिबात आवडत नाही.

पुढच्या घटना भराभर घडत जातात. राहूल रॉय चौधरींच्या घरी येऊन जगभर फिरून त्याने काढलेले अनेक फोटो प्रोजेक्टरवर दाखवतो. दुसऱ्याच दिवशी भास्कर चौधरी आपल्या कामासाठी आठवडाभर मुंबईला निघून जातात.

त्याच दिवशी जेंव्हा राहुल रॉय कॅमेरा घेऊन पारोमाच्या घरी हजर होतो, तेव्हा ती धोब्याला कपडे मोजून देत असते. नवरा मुंबईला आणि मुलं शाळेत गेलेली आणि संपूर्ण दुपारची निवांत वेळा हाताशी. मग सुरू होते फोटो सेशन. विविध कोनातून, घराच्या विविध भागात, विविध छायाप्रकाशात पारोमाच्या चेहरा आणि देहाच्या सौंदर्याचा जणू तो महोत्सवच. नखशिखांत प्रमदा म्हणून पारोमाला तीची पावलं ओल्या कुंकवाने रंगवायची असतात. तिचा हात पोहचत नाही तिथपर्यंत तोच राहुल क्षणभराचा विचार न करता तिच्या समोर बसून तिचा पाय आपल्या मांडीवर घेतो. तेवढ्यात दाराची बेल वाजते, शाळेतून मुलं घरी आली असतात आणि परोमाकडून त्यांना लगेच कोल्ड कॉफी हवी असते.

दुसऱ्याच दिवशी राहुलला पारोमाचे आउटडोअर फोटोशूट करायचे असतात. ती सांगते की ती समोर बसून जेवण वाढल्याशिवाय तिची सासू दुपारचे जेवण घेत नाही. पण अंतर्बाह्य गृहिणी असलेल्या पारोमाला आता तिच्या देहातील सौंदर्याचे सुप्त झरे जणू साद घालत असतात. ती सासूला सांगून गाडी आणि ड्रायव्हर घेऊन बाहेर जाते. हा सिलसिला आणखी आठवडाभर चालतो. कलकत्यातील अनेक ठिकाणे. विशेषत: निर्जन जागा. खास बंगाली काठाच्या पारोमाच्या भरजरी साड्या, राहुलचे मोठमोठे टेलीलेन्स आणि सगळे शहर दैनंदिन उद्योगात बुडून गेले असताना त्या दोघांना मिळालेली रोजची निवांत दुपार. तिला आपल्या कॅमेरातून तो कलकत्त्याचे जीवन दाखवतो. त्या दोघांच्या सहवासातून दोघांचीही व्यक्तिमत्व प्रेक्षकांना उलगडत जातात. राहूलच्या युरोप टूरचे प्लान आणि पारोमाचे संगीत शिकणे, तिच्या आवडीनिवडी. एकदा मंदिराजवळच्या बाजारात ती काही खरेदी करत असते. तिथे एक लग्नाची वरात दिसते. वरातीचे फोटो काढायला राहुल धावत तिकडे पळतो. जाताना घाईघाईत आपल्या हातातील लेन्सचे कव्हर आणि स्वतःचे वॉलेट तिच्या पर्समध्ये टाकतो.

भास्कर चौधरीचा एक दिवस मुंबईहून फोन येतो की त्याला आणखी काही दिवस मुंबईत मुक्काम करावा लागणार आहे. राहुल रॉय पारोमाला घेऊन कुठे कुठे भटकतो. तिचे बालपण, तिची बालपणची स्वप्ने ती जणू विसरून गेली असते. राहूल सगळी दारे उघडत जातो. एक दिवस ती आपल्या आईच्या घरी त्याला त्याला घेऊन जाते. जिथे संगीताचे धडे घेते ती वरची जागा दाखवते. आता तिथे पडझड झाली असते. सारे काही विराण. छताला चिकटलेले एक वटवाघूळ फडफडत उडून जाते खिडकीबाहेर. त्या दुपारच्या अंधाऱ्या शांततेत भ्यालेली पारोमा घाबरून राहुलला बिलगते. स्वतःला सावरते. पण दुसऱ्याच क्षणी अनामिक ओढीने ती त्याच्या छातीवर विसावते. राहुलही आपल्या बाहूंच्या आधाराने ती कवटाळतो आणि तिचे चुंबन घेतो. पण ती लगेच सावध होते आणि त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवून घेते.

याच घरात तिला ती रोपट्याची जागा दिसते. सतार शिकते त्या जागेतील खिडकीच्या बाहेर. तिला नाव आठवत नाही, पण राहूलला ती त्या रोपट्याचे वर्णन करण्याचा प्रयत्न करते. (कॅलीनड्युला? असे ती म्हणते. पण त्याला फुलांचे गेंद येतात. ते नव्हेच. तिला नुसत्या पानांचे सौंदर्य असलेले झाड अपेक्षित असते.) दगडाच्या रंगाची नाजूक पाने असलेले ते लहानपणचे रोपटे. एका पावसात ते वाहून गेले मग दिसलेच नाही. राहूल विचारतो, पारोमा तुला खरंच पुन्हा शोधायची आहेत का ती बालपणची पानं? पारोमा फक्त हसते. पण ही रोपट्याची गोष्टच या संपूर्ण सिनेमाची एक कळ आहे. कसे ते या सिनेमाच्या अखेरच्या दृश्यातून कळते.

घरी पोचते तेव्हा तिला तिच्या मुलांची, सासूची काळजी वाटते. तिला रडायला येते. तेव्हढ्यात तिच्या नवऱ्याचा फोन येतो. ती त्याला सांगते की तिला खूप भीती वाटत आहे त्याने लगेच निघून यावे. पण रात्री झोपताना तिच्या पर्समध्ये राहिलेले राहुलचे वॉलेट काढून ती त्याच्या फोटोचे चुंबन घेते. त्यानंतर दोन दिवसांनी सकाळी पुन्हा हे सगळे संपवून टाकायचे या निर्धाराने राहुलला त्याचे वॉलेट परत करण्यासाठी तिची मैत्रीण शीलाच्या घरी बोलावते. तिच्याकडच्या बाईला सांगते की राहुल आला तर त्याला हे वॉलेट देऊन दे. म्हणजे तिला त्याला भेटायचे देखील नसते. पण हे बोलत असतानाच डोअरबेल वाजते. बाई दार उघडून राहूलला सांगते की तुम्ही जा आत आणि ती दुसऱ्या कामाला निघून जाते. पारोमा नि:शब्दपणे राहूलसमोर त्याचे वॉलेट धरते. तो ते घेऊन दारापर्यंत जातो आणि मागे वळून परवा घडलेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. त्या क्षणी पारोमाच्या भावनांचे एक पाऊल आत एक पाऊल बाहेर असे लंबकासारखे आंदोलित असते. दोघांची नजरानजर होते आणि तिचा बांध फुटतो. आर्त प्रेमाचा लंबक त्या दोघांच्या मिठीत विलीन होतो. जणू आयुष्यात असे प्रेम तिने कधी अनुभवलेच नव्हते याचा तिला साक्षात्कार होतो. पुढील काही दिवस राहूलच्या हॉटेलच्या रूममध्ये आणि इतरत्र त्यांच्या प्रणयाची सगळी दारे सताड उघडली जातात.

राहुल कलकत्यात पूर्वी राहात होता, त्या ठिकाणी पारोमाला घेऊन जातो. तिथे तिची ओळख आपली बायको म्हणून करून देतो. तिथल्या मुलांना तो स्वतःच्या जगभरच्या भटकंतीबद्दल सांगतो. आता पुढे जगभर मी फोटोग्राफीसाठी भटकणार आणि पारोमा तिचे सतारवादनाचे कार्यक्रम करणार असेही तो सांगतो. ते ऐकून ती हरखून जाते. या पूर्वी तिने असा कधी विचार केलेलाच नसतो. घर आणि कुटुंबातील सगळ्यांची काळजी घेणे हेच तिचे विश्व असते. पण राहूलच्या स्वप्नांनी तिला नवे विश्व दिसते. त्यात तिचे स्वतंत्र अस्तित्व असते. राहूलवरील तिच्या प्रेमाला स्वातंत्र्याचे पंख फुटतात. हे पंख केवळ मानसिक नव्हे तर दैहिक वासनेचे असतात. पण असे भान आलेली स्त्री कशी असू शकते, तिचे अत्यंत परिपूर्ण व्यक्तिचित्र रेखाटण्यात अपर्णा सेनला यश आले आहे.

नवरा आल्यावरही पारोमा राहूलला भेटत राहते. एकदा त्याच्या हॉटेलवर जाते तेव्हा त्याने तिच्यासाठी ते लहानपणचे तिचे हरवलेले रोपटे आणून ठेवले असते. अर्थातच ती विरघळून जाते. जणू राहूलने हरवलेली पारोमाच तिच्यापुढे शोधून आणलेली असते. या झाडाला फुलं नसतात. म्हणजे एखाद्या झाडाची फलश्रुती म्हणजे फळ-फुलं असलीच पाहिजे का? असा प्रश्न ती विचारते. पानांच्या निखळ सौंदर्याचे एक स्वतंत्र अस्तित्व असू शकत नाही का?

राहूल आता कलकत्ता सोडून युरोपला जाणार असतो. ती दोघे जगाच्या सफरीत कुठे कुठे जाणार, काय काय करणार ह्याचे प्लान्स करतात. ऑक्टोबरमध्ये राहूल परत येणार असतो कलकत्त्यात आणि तिला घेऊन जाणार असतो. त्या कल्पनेत प्रेमात आकंठ बुडालेल्या पारोमा जणू आशेच्या उडत्या गालिचावर उडू लागली असते.

सिनेमाचा पुढचा सगळा भाग दु:खद आहे. पारोमाच्या प्रेमाचे पंख तिच्या सुखी कुटुंबाला कुसळासारखे खूपू लागतात. पारोमाचे रोज रोज दुपारी नटूनथटून बाहेर जाणे, नवनवीन परफ्युम्स वापरणे हे मुलांच्या डोळ्यात भरते. वयात आलेली मुलगी स्पष्टच प्रश्न विचारते. पारोमा काही काळ विचलित होते. पण राहूलवरील प्रेमाचे उष्ण रक्त तिच्या पंखात सळसळत असते. दरम्यान भास्कर चौधरी मुंबईहून परत येतात. राहूल युरोपात निघून जातो. त्याची पत्रे शीलाच्या पत्त्यावर येतात. पत्रातून तो परत तिला जगभर भटकण्याचे स्वप्न दाखवत असतो. आणि एक दिवस एखाद्या जिवंत बॉम्बसारखा राहूलने पाठवलेल्या लाईफ मासिकाचा अंक भास्कर चौधरीच्या हाती पडतो. पारोमाच्या सौंदर्याच्या सगळ्या बाजू उघड करणारे तिचे फोटो त्या मासिकात तर असतातच. पण एक फोटोवर राहूलने बोल्ड मार्कर पेनने ‘लव्ह पारोमा’ असे लिहिले असते. ती घटना जणू एक मोठा स्फोटच असते. त्या क्षणापासून पारोमा बहिष्कृत ठरते. गृहिणी म्हणून असलेले सगळे हक्कच तिच्यापासून काढले जातात. ती आता मुलांचा अभ्यास घेऊ शकत नाही. नोकरांना काही सांगू शकत नाही. मुलं तिच्याशी नीट बोलत नाहीत. सासू अंथरून धरते. एखाद्या महारोग्यासारखा एकांत पारोमाच्या वाट्याला येतो.

पारोमा आपली मैत्रीण शीलाला सांगते की एवढ्या मोठ्या गजबजलेल्या कलकत्ता शहरात तिला एकटेपणा वाटतो आणि त्या एकटेपणाची तिला भीती वाटू लागते. शीला ही पारोमाची जणू पालक बनते त्या प्रेमप्रकरणातील. पारोमा या सिनेमाच्या मूळ कल्पनेचा एक आधार म्हणजे शीला ही व्यक्तिरेखा आहे. शीला स्वत:च्या शैलीत जगणारी, एकटी राहणारी कमवती स्त्री आहे. पारोमाला तिच्या घरी आता कोणतेच स्थान उरले नसते तेव्हा ती शीलाला आपले दागिने देऊन पैसे मागते.

घरातील अनामिक आणि मूक छळामुळे पारोमा कोलमडून गेली असते. मानसिक रुग्णच बनते. त्याची परिणती म्हणजे एक दिवस ती आत्महत्येचा प्रयत्न करते. मग हॉस्पिटल. तिथे सगळे भेटायला येतात. ती सगळ्यांकडे अनोळखी नजरेने पाहते. तिची मैत्रीण शीला आली की तेंव्हा स्मित करते. हळूहळू ती सावरते. पण आपल्याला मानसोपचाराची गरज आहे, हा डॉक्टरचा सल्ला ती धुडकावून लावते. तिला पूर्वीसारखं पुन्हा गृहिणी व्हायचं आहे, हे ते डॉक्टर आणि कुटुंबातील लोक परस्पर कसे गृहीत धरतात, याचेच तिला आश्चर्य वाटते. तिच्या प्रेमप्रकरणात जे काही घडले त्याचा तिला अजिबात पश्चाताप वाटत नाही. ती घडलेल्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वीकारते. तिच्या मनात कोणताही अपराधभाव नसतो.

शीला पारोमासाठी खादीभंडारमधील नोकरीची ऑफर घेऊन येते, याचा तिला खूप आनंद होतो. जाताना शीला एक पेपर देऊन जाते, ज्यात राहूलच्या फोटोग्राफीवर एक स्टोरी असते. तो अशा ठिकाणी गेला असतो, जिथे आता युद्ध सुरु झाले असते आणि त्याच्याशी काहीही संपर्क करणे शक्य नसते. पारोमाला आता खूप मोकळं वाटू लागते. ती खिडकीच्या बाहेर डोके काढून श्वास भरून घेते आणि हातातील तो पेपर हवेत सोडून देते. ह्याच खिडकीत राहूलने तिच्यासाठी आणलेले ते रोपटे असते. नाजूक आणि दगडी रंगाच्या पानांचे. पानांचे निखळ सौंदर्य. फुलांचे गेंद नसलेले. पारोमाचे अस्तित्व केवळ तिच्या गृहिणी म्हणून घरात राबण्यात आहे आहे का? या प्रश्नाच्या समांतर हे रोपटे, जणू तिला तिच्या खऱ्या सौंदर्याचा साक्षात्कार घडवते.

सिनेमाचा अखेरचा प्रसंग फार हृद्य आहे. पारोमाला आता हॉस्पिटलमधून घरी जाण्याची वेळ आली असते. डॉक्टर दासगुप्ता आणि भास्कर चौधरी तिला काही सांगायचे म्हणून मुलांना तिच्या खोलीबाहेर जायला सांगतात. ती ठाम नकार देते. तिला तिचे आयुष्य आता उघड्या आकाशासारखे निरभ्र वाटते. कोणतेही मळभ उरले नसते. ती आता स्वत:च्या खऱ्या अस्तित्वाला, सौंदर्याला आणि स्वातंत्र्याला सामोरी जात असते. डॉक्टर तिला मानसोपचार घेण्याबद्दल सांगतात. ती नकार देते. ते तिला कुटुंबातील गृहिणी म्हणून तिचे महत्त्व सांगतात. पश्चाताप बुद्धीने आता तिने परत आपले घर सांभाळावे असे जेव्हा तिला सुचवतात. पण त्याकडे तिचे अजिबात लक्ष्य नसते. ती तिच्या त्या रोपट्याकडे बघत असते. हसत हसत ती त्या रोपट्याच्या दिशेने बाल्कनीकडे जाते. जाताना ती आपल्या वयात आलेल्या मुलीच्या चेहऱ्याला प्रेमाने स्पर्श करते. जणू सौंदर्य आणि स्वातंत्र्याची एक अनुभूती तिला ती वाटून देते. तिला त्या क्षणी त्या रोपट्याला नाव सुचते. ती उद्गारते : ‘अरे यह तो कृष्णपल्लवी है, कृष्णपल्लवी.’ भारतीय परंपरेतील कृष्ण आणि त्याचे मैत्र-प्रेम तिला कदाचित सूचित करावयाचे असेल. आणि इथे सिनेमा संपतो.

एका मुलाखतीत अपर्णा सेन यांनी एका ठिकाणी म्हटलं आहे की ‘पारोमा बनवला तोपर्यंत मला फेमिनिझम काय असते, हे माहितही नव्हतं.’ या सिनेमाबद्दल लिंगभावात्मक दृष्टीकोन जरी बाजूला सारला तरी एक परिपूर्ण कलाकृती म्हणूनही ‘पारोमा’ उत्कृष्ठ आहे. कथा, पटकथा, चित्रीकरण, संपादन आणि संवाद सगळेच १९८५ च्या भारतीय सिनेमाच्या संदर्भात श्रेष्ठ आहेत. एक अभिजात कादंबरी किंवा कविता वाचल्याचा आनंद हा सिनेमा देतो. आणि त्यातील स्त्रीच्या अस्तित्वाचे, जगण्याच्या अर्थपूर्णतेचे संदर्भ विचारात घेतले तर तर दीर्घकाळ अस्वस्थता मनात निनादत राहते. पण भारतीय उच्चभ्रू वर्गातील स्त्रीचे कुटुंबातील स्थान आणि तिला अचानक ‘कृष्णपल्लवी’चा होणारा साक्षात्कार हाही एक अत्यंत मोहक असा अनुभव या सिनेमाचा आहे, आणि तो अधिक महत्त्वाचा आहे असे मला वाटते.

कथा आणि दिग्दर्शन अपर्णा सेन यांचेच आहे. संगीत भास्कर चंदावरकर यांचे. सिनेमातली प्रत्येक जागा, प्रत्येक प्रकाशाची तिरीप किंवा ध्वनीचा तुकडा ‘पारोमाच्या’ स्त्रीप्रधान व्यक्तिरेखेला अधिकाधिक ठळक करत जाते. कोणतीही फ्रेम आणि कोणताही संवाद निरुद्देश नाही. एक ‘आदर्श गृहिणी’ ते ‘मनस्वी प्रणयिणी’ हा पारोमाचा प्रवास राखीने अतिशय ताकदीने साकारला आहे. राखीच्या अभिनयात स्त्रीत्वाचे अनेक पदर एकमेकात मिसळले आहेत. अपर्णा सेन यांना अभिप्रेत असलेली अंतर्बाह्य प्रेमाने निथळून निघालेली आणि आपल्या भावनांशी तडजोड न करणारी मध्यमवयीन स्त्री राखीने अत्यंत संयतपणे उभी केली आहे. अपर्णा सेन स्वतः शीलाच्या भूमिकेत आहे. अत्यंत मितभाषी पण आपल्या करारी पण रूजू देहबोलीतून शीला पारोमाच्या हृदयात रुजलेल्या प्रेमावर फुंकर घालत जाते. तिची मैत्रीण म्हणून परोमाला आलेले देहामनाचे नवे भान ती जपते. त्यामागे स्त्रीस्वातंत्र्याची एक सुप्त धग असते. ‘पैसा’ ही गोष्ट स्त्रीस्वातंत्र्याच्या आड कशी येते, ते अनेक प्रसंगातून या सिनेमात व्यक्त झाले आहे. पारोमाला नवऱ्याने दिलेला हातखर्चाचा  पैसा नको असतो. त्याला त्याचे आश्चर्य वाटते. म्हणूनच ती खादी भंडारात नोकरी करणार असते. कारण फक्त एकच असते, ‘कृष्णपल्लवी’ तिच्या आयुष्यात नव्याने रुजलेली असते.

(लेखक नामवंत समीक्षक व नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाचे विभाग प्रमुख आहेत)

7709012078

‘पारोमा’ संपूर्ण हिंदी- नक्की पाहा- खालील Video वर क्लिक करा

Comments are closed.