राही मासूम रझा यांचे ‘टोपी शुक्ला’

(साभार : साप्ताहिक साधना)

– रझिया पटेल

या कादंबरीचा मोठाच प्रभाव माझ्या मनावर पडला. एकीकडे अंतर्मुख केलं, तर दुसरीकडे लढ्याची नवी दृष्टी दिली. या कादंबरीची भाषा लढ्याची प्रेरणा देताना, मानवी करुणेचीही आहे. यातील भाषाशैलीने मनाची पकड घेतली आणि युवकांशी संवाद साधण्याची नवी दृष्टी दिली. या कादंबरीने मनात प्रश्नही उपस्थित केला की- ज्या देशात, समाजात तरुणांना सांप्रदायिकतेचं आणि केवळ सत्ताप्राप्तीचं साधन मानलं जातं, त्या देशाला-समाजाला काय भवितव्य असतं?

……………………………………….

मन आणि विचारांना साद घालणाऱ्या, जागृत करणाऱ्या अशा एकाच पुस्तकावर लिहिणं कठीण आहे. अनेक पुस्तकं डोळ्यांसमोर तरळून गेली. शेवटी राही मासूम रझा यांच्या ‘टोपी शुक्ला’ या कादंबरीवर लिहायचे ठरवले. युवा अवस्थेत या कादंबरीने मला झपाटून टाकलं होतं, अस्वस्थ केलं होतं. छात्र युवा संघर्ष वाहिनीमध्ये काम करताना ही कादंबरी वाचली आणि युवा आंदोलनात काम करताना रस्त्यावर उतरलेले हजारो तरुण पाहिले. ही आंदोलने सत्तरच्या दशकातली. त्यापूर्वी एक दशक आधीच, साठच्या दशकात राहीसाहेबांनी ही कादंबरी लिहिली- ज्यात भारतीय तरुणांसमोरची आव्हानं आणि अस्वस्थता चित्रित केली. हा एक भाग झाला. पण राही मासूम रझा म्हणजे भारतीयतेचे भाष्यकार. निर्माते बी. आर. चोप्रा यांनी त्यांना महाभारत या दूरदर्शन मालिकेचे संवाद लिहायची विनंती केली, तेव्हा काही हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांना पत्रं लिहिली, ‘सर्व हिंदू मेले का? एका मुसलमानाकडून महाभारताचे संवाद लिहून घेता?’ तेव्हा रझा यांनी बी. आर. चोप्रा यांना कळवलं, ‘चोपडासाहब, अब महाभारत के संवाद मैं लिखूँगा, मैं गंगा का बेटा हूँ । मुझसे ज्यादा हिंदुस्तान की सभ्यता और संस्कृती को कौन जानता है?’ (उत्तर प्रदेशातील गंगेच्या काठावर वसलेले गंगौली गाव ही राहीसाहेबांची जन्मभूमी, म्हणून ते स्वत:ला गंगापुत्र म्हणवून घेत. ‘मुझे मेरी मौत के बाद गंगा को सुपूर्द कर देना’, असे ते म्हणत.) आणि राही मासूम रझा यांच्या महाभारत मालिकेने इतिहास घडवला. ते म्हणायचे, ‘मैं तो लेखकों की उस जमात का हूँ, जो मानते है कि, लेखक का  काम दुनिया में अमन फैलाना है । उसका काम मोहोब्बत के ऐसे अफ़साने गढ़ना है जिसे पढ़ते ही लोग आपसी दिवारों को भूल जाएँ । लेखकों का काम तो सरहदें मिटाना होता हैं।’

राही मासूम रझा यांच्या आयुष्यातील आणखी एक प्रसंग म्हणजे त्यांनी भारतात लादल्या गेलेल्या आणीबाणीचा निधडेपणाने निषेध केला होता. फिल्म रायटर्स असोसिएशनने आणीबाणीचं समर्थन करणारा ठराव पास करायचं ठरवलं. तेव्हा रझा यांनी या ठरावाला प्रखर विरोध केला आणि हा विरोध नोंदवला जावा, असाही आग्रह धरला. विमल दत्त व अझीझ कैसी या दोन मित्रांनी त्यांना साथ दिली आणि त्यांच्यासोबत त्या ठरावाच्या विरोधात सभात्याग केला. पुढे रझा यांनी आणीबाणी आणि त्या काळातील दहशत यावर ‘कटरा बी आरजू’ ही कादंबरीही लिहिली.

इफ्फन आणि टोपी शुक्लाची ही कथा या देशातल्या तरुणांची आहे. लेखक म्हणतो, ‘कृष्ण ने अर्जुन से कहा था, मैं ही सबकुछ हूँ । मैं कृष्ण नही हूँ, परंतु अपने पाठकों से कह रहा हूँ मैं ही टोपी हूँ और मैं ही इफ्फन। नाम कृष्ण हो तो उसे अवतार कहते है, और मुहम्मद हो तो पैगंबर । नामों के चक्कर में पड़कर लोग ये भूल गये कि, दोनो ही दूध देनेवाले जानवर चराया करते थे । दोनो ही पशुपति, गोवर्धन और ब्रजकुमार थे । इसलिए तो कहता हूँ, टोपी के बिना इफ्फन की और इफ्फन के बिना टोपी की कहानी अधूरी हैं । इस कहानी का हीरो टोपी अवश्य है, परंतु यह कहानी या यह जीवनी केवल टोपी की नहीं है- यह कहानी इस देश, बल्कि इस संसार की कहानी का एक स्टाईल है। संसार के तमाम बच्चे बेनाम पैदा होते है । पैदा तो केवल बच्चे होते है… मरते मरते वह हिंदू, मुसलमान, ईसाई, आस्तिक, नास्तिक, हिंदुस्तानी, पाकिस्तानी, गोरे, काले- जाने क्या क्या हो जाते हैं!’

जगातली तमाम माणसे धर्म, रंग, जाती, गरीब, श्रीमंत, अशा किती तरी विभागांत विभागली गेली आहेत. ती निखळ माणसं का असू शकत नाहीत? हे माणसाचं विभाजन का आहे? आणि विभाजनाचं राजकारण काय आहे? अत्यंत संवेदनशील आणि मानवी भावनेनं रझा यांनी हे सगळं चर्चा करत नेलं आहे.

टोपी शुक्ला- ज्याचं खरं नाव बलभद्र नारायण शुक्ला आहे आणि इफ्फन- ज्याचं नाव अन्वर हुसेन आहे. भारतातल्या सर्वसामान्य, मध्यमवर्गीय घरातली ही तरुण मुलं. जेव्हा त्यांची मैत्री होते, तेव्हा त्यांची सुख-दु:खं एक होतात. टोपी हा इफ्फनच्या घरात जाऊ शकतो, पण इफ्फन त्याच्या घरात नाही. कारण टोपीचं घर हे ब्राह्मणाचं आहे. त्या घरात मुसलमानाचं नाव घेणंही कठीण आहे. पण इफ्फनची खापरपणजी हिंदूंनी स्पर्श केलेलं काही खात नसे. कारण इफ्फनचं घराणं अशरफाचं- मुसलमानांमधील उच्चवर्णीयांचं घराणं आहे. पण टोपी आणि इफ्फन तर मित्र आहेत. नुसतेच मित्र नाहीत तर बालमित्र.

टोपीच्या घरात पर्शियन उर्दू बोलली जाते, कारण ती भाषा एके काळच्या सत्ताधाऱ्यांची आहे. इफ्फनच्या घरात उर्दू बोलली जाते, पण इफ्फनची आजी मात्र भोजपुरी उर्दू बोलते. तिच्या श्रद्धाही या मातीतल्या श्रद्धा आहेत. ती मौलवींच्या घराण्यातली नाही. जेव्हा तिच्या एकुलत्या एक मुलाला देवी झाल्या, तेव्हा ती त्याच्या अंथरुणाजवळ एका पायावर उभी राहिली आणि म्हणाली, ‘माता, मोरे बच्चे को माफ़ कर दो.’ पूरब की रहनेवाली थी. जब तक जिंदा रही पुरबी बोलती रही! उत्तर प्रदेशातील लोकभाषा उर्दू नव्हे, पण तिच्या सासरी लखनऊला- एका मौलवीच्या घरात लखनवी उर्दू बोलली जाते. ती माहेरच्या भाषेला सोडत नाही. लेखक वर्णन करतो, ‘वह तो मायके की भाषा को गले लगाए रही, क्योंकि इस भाषा के आलावा इधर उधर कोई ऐसा नहीं था जो उसके दिल की बात समझता ।’ तिची मातृभाषा तिचं या भूमीशी नातं सांगते आणि हेही सांगते की, भाषेला धार्मिक आधार नसतो. ‘मुसलमानांची भाषा उर्दू’ ही एक मिथ आहे. तिच्या मृत्यूची चाहूल लागल्यावर मुलाने विचारलं, ‘‘मां लाश कर्बला जाएगी या नज़फ़?’’ ही बगदादजवळची ठिकाणं, जिथून तिच्या सासरचं मौलवी घराणं आलं आहे. तर ती संतापून म्हणते, ‘‘ए बेटा, जऊन तूँ से हमरी लाश ना संभाली जाय त हमरे घर भेज दि हो।’’ ही तिची मातृभाषा आहे आणि धार्मिक पवित्र स्थळाऐवजी तिला इथल्याच मातीत दफन व्हायचं आहे. तिच्या नातवाने- इफ्फनने हा वारसा घेतलेला आहे. या वेळी राही मासूम रझा एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधतात. ते म्हणतात, ‘मर्दों और औरतों के इस फर्क को ध्यान में रखना ज़रुरी है । क्योंकि, इस बात को ध्यान में रखे बगैर इफ्फन की आत्मा का नाकनक्शा समझ में नहीं आ सकता।’

एक स्त्री म्हणून आणि न्याय व समतेच्या आंदोलनात काम करणारी कार्यकर्ती म्हणून मला तर ही गोष्ट लक्षणीय वाटली. कारण भाषा किंवा धर्म यांच्या अस्मितेचं राजकारण पुरुष आणि त्यातही अशरफ या उच्चवर्णीयांनी केलं. पण इफ्फनला त्याच्या दादीने एक वेगळा, सर्वसामान्य माणसाचा या मातीतला वारसा दिला आहे. उर्दू- त्यातही लखनवी उर्दू- ही आधी पुरुषांची भाषा. घरात स्त्रियांची भाषा ही स्थानिक रंगातली. संस्कृत ही कोणाची भाषा? रामायणकालीन भाषेचं उदाहरण ज्येष्ठ गांधीवादी नेते दादा धर्माधिकारी यांनी दिलं होतं, ते म्हणजे- या काळात पुरुष संस्कृत भाषेत बोलत आणि स्त्रिया प्राकृत भाषेत. म्हणजे आईच- भाषा-संस्कृतीचा प्रवाह मोठा करते. म्हणून भाषेचं राजकारण हे मूलत: पुरुषी आणि उच्चवर्णीयांच्या अस्मितेचं आहे. शिवाय वेगळेपणा आणि श्रेष्ठत्वाचं राजकारण आहे. टोपी शुक्लाची आई तीच भाषा बोलते, जी इफ्फनची दादी बोलते. त्यामुळे लहानग्या टोपीला इफ्फनची दादी जवळची वाटते. लेखक म्हणतो, ‘टोपी और दादीमें एक ऐसा संबंध हो चुका था- जो जनसंघ, मुस्लिम लीग और कांग्रेस से बड़ा था।’ हिंदू मुस्लिम राजकारणापलीकडे जाणारे हे प्रेमळ असे मानवी संबंध आहेत.

सकीनाचे वडील आणि इफ्फनचे सासरे मुस्लिम लीगच्या राजकारणाचे विरोधक आहेत आणि त्यामुळे कट्टर मुसलमान त्यांचा तिरस्कार करतात. पण दंग्यामध्ये ते कट्टर हिंदुत्ववाद्यांकडून मारले जातात. कारण सय्यद आबिद रझा हे त्यांचं नाव आहे. आणि ते हिंदू-मुसलमान मेलजोलमध्ये विश्वास ठेवतात. पण हिंदुत्ववादी आणि जातीयवादी मुसलमान दोघांनाही हे नकोय.

भारतीयतेचा एकेक चिरा कसा ढासळत चालला आहे, यावरील भाष्य या कादंबरीत येतं. सय्यद आबिद रझा यांची मुलगी सकिना आणि तिचे दोन भाऊ जे अलिगढ़ मुस्लिम विद्यापीठात शिकले. ‘बार बार मुस्लिम स्टुडंटस्‌ फेडरेशन और मुसलमान दादाओंने उन्हें पीटा परंतु वे पाकिस्तान का विरोध ही करते रहे। लेकिन जब पी.सी.जोशी की कम्युनिस्ट पार्टी ने सन्‌ पैंतालीस में मुस्लिम लीग का साथ देने का फैसला किया तो इन तीनों भाई बहनों का दिल खट्टा हो गया।’

देशाची फाळणी झाली, देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि देशाच्या राजकारणावर-समाजकारणावर याची गडद काळी सावली पडत राहिली. स्वातंत्र्योत्तर भारतात लेखक प्रश्न उपस्थित करतो –

‘कौन आझाद हुआ

किस के माथे से गुलामी की सियाही छूटी?’

स्वतंत्र भारतात ज्या सुख-समृद्धीची-शांततेची स्वप्नं पाहिली, त्याचं काय झालं? तरुण मुलं जी या देशाचं भविष्य आहेत, त्यांचं काय झालं? लेखक म्हणतो, ‘जो बच्चे गिरती दिवारों की छाँव में जवान हुए है, उनकी कहानी भी अजीब है ।’ ते अस्वस्थ आहेत. जेव्हा इफ्फन इतिहासाच्या वर्गात जातो, तेव्हा एक विद्यार्थी म्हणतो, ‘‘मुसलमान सम्राटों का युग भारतीय सभ्यता का काला युग हैं।’’ इफ्फन विचार करतो, ‘जब अछूतों के कान में पिघला हुआ सीसा डाला जा रहा था, वो क्या था?’ फिर उसे लगा, ‘अगर लड़को के दिमाग में यही बातें भरी जाती रही तो इस मुल्क का क्या बनेगा? नई नस्ल (पिढी) तो हमारी नस्ल से भी ज्यादा घाटे में हैं । हमारे पास तो कोई ख्वाब नहीं हैं, मगर इन के पास तो झूठे ख्वाब हैं। यहॉं यह हिस्ट्री, पाकिस्तान में इस्लामी हिस्ट्री; पता नही हिंदुस्तानी हिस्ट्री कब लिखी जाएगी?’

टोपीला प्रश्न पडतो- इथे जातीआधारित, धर्मआधारित शिक्षण संस्था का निर्माण होत आहेत? आणि भारताची आगामी पिढी या शिक्षण संस्थांमधून निर्माण होते आहे. दुसरा प्रश्न असा आहे की, या देशात किती प्रकारचं विभाजन आहे? जाती नष्ट होण्याऐवजी मजबूत होत आहेत. जातींच्या अस्मिता मजबूत होत आहेत. धर्माच्या अस्मिता आणि अलगाव मजबूत होतो आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की, ‘बलभद्र नारायण शुक्ला आणि त्याचा कोणी एक मित्र अन्वर हुसेन यांसारख्या लोकांना या देशात काही स्थान   आहे की नाही?’ लेखक प्रश्न उभा करतो, ‘धर्म, जाती सभी के लिए यहॉं कम या अधिक की गुंजाईश हैं, परंतु हिंदुस्तानी कहाँ जाएँ? लगता ऐसा है कि इमानदार लोगों को हिंदू-मुसलमान बनाने में बेरोज़गारी का भी हाथ हैं।’

या कादंबरीमध्ये इफ्फनला अलिगढ़ मुस्लिम विद्यापीठातून काढलं जातं, कारण तो कट्टर मुसलमान नाही. आणि टोपी शुक्लाला ना जातीवर आधारित महाविद्यालयात नोकरी मिळते, ना सनातन धर्म डिग्री महाविद्यालयात. कारण तो कट्टर हिंदुत्ववादाचं समर्थन करत नाही. धर्मनिरपेक्ष उदारमतवादाचा पराभव हे तरुण बघत आहेत. लेखक म्हणतो, ‘टोपी हर युग के जानलेवा भॅंवर की गोद में जन्म लेता है, वह हर युग में गिरती दिवारों की छाँव में पैदा होता है और अपने बदन की धूल साफ़ करने में उसे काफ़ी दिन लग जाते है । और इन दिनों वह बिलकुल अकेला और बेसहारा होता है । उसकी भाषा कोई नहीं समझता । हर टोपी आज जनसंघी, मुस्लिम लीगी, कांग्रेसी, कम्युनिस्ट सब कुछ है । आज उसका वक्तव्य टुकड़े टुकड़े है और उसका हर टुकड़ा एक नई भाषा बोल रहा है । देश में जो परिवर्तन हो रहा है, उसे केवल टोपी की खिड़की से नहीं देखा जा सकता; इफ्फन भी टोपी का ही एक रूप है । इस टोपी के बेशुमार रूप है- बंगाल, पंजाब, यू.पी., आंध्र, आसाम… सारे देश में यह टोपी अपनी अपनी समस्याओं का कशकोल (भिक्षापात्र) लिए विचारधाराओं, फलसफ़ो (फिलॉसॉफी), राजनीतियों के दरवाज़े खटखटा रहा है, लेकिन कोई उसे सहारा नहीं देता!

या कादंबरीचा शेवट टोपीच्या आत्महत्येनं होतो. हा धर्मनिरपेक्ष शक्तीचा पराभव आहे. पण तो का? लेखक म्हणतो, ‘मुझे यह उपन्यास लिखकर कोई खास खुशी नहीं हुई । क्योंकि, आत्महत्या सभ्यता की हार हैं, परंतु टोपी के सामने कोई और रास्ता नहीं था । यह टोपी मै भी हूँ, और मेरे ही जैसे और बहुत लोग भी है । हम लोगों में और टोपी में केवल एक अंतर है। हम लोग कहीं न कहीं, किसी न किसी अवसरपर ‘कांप्रोमाईज़’ कर लेते है, और इसलिए हम लोग जी रहे हैं । टोपी कोई देवता या पैगंबर नहीं था, किंतु उसने कोई ‘कॉम्प्रोमाईज़’ नहीं किया । इसलिए उसने आत्महत्या कर ली।’

या कादंबरीचा मोठाच प्रभाव माझ्या मनावर पडला. एकीकडे अंतर्मुख केलं, तर दुसरीकडे लढ्याची नवी दृष्टी दिली. या कादंबरीची भाषा लढ्याची प्रेरणा देताना, मानवी करुणेचीही आहे. यातील भाषाशैलीने मनाची पकड घेतली आणि युवकांशी संवाद साधण्याची नवी दृष्टी दिली. या कादंबरीने मनात प्रश्नही उपस्थित केला की- ज्या देशात, समाजात तरुणांना सांप्रदायिकतेचं आणि केवळ सत्ताप्राप्तीचं साधन मानलं जातं, त्या देशाला-समाजाला काय भवितव्य असतं?

या कादंबरीमुळे धर्म, जाती, प्रांतीयता, भाषा, लिपी, संस्कृती, राष्ट्रीयता, देशप्रेम या संकल्पना सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने समजून घेता आल्या आणि त्याचा धर्मनिरपेक्ष लोकतांत्रिक भारतीयतेशी असलेला अतूट संबंध समजून घेता आला.

या कादंबरीतील इफ्फनच्या आजीमध्ये मला माझी आजी दिसली आणि टोपीच्या आईत माझी आई. इफ्फन आणि टोपीचं माणूसपण व सांस्कृतिक एकतेसंबंधीचा विवेक या दोन स्त्रियांकडून आला आहे. त्यामुळे टाइम्स फेलोशिपवर भारतभर हिंडून मुस्लिम स्त्रियांची सर्वांगीण विचारपद्धती मी समजून घेतली आणि मुस्लिम स्त्रीचे केवळ एक किंवा दोनच प्रश्न महत्त्वाचे नसून, तिची जीवनदृष्टी काय आहे, हे समजून घ्यायचा प्रयत्न केला.

शेवटी टोपी शुक्लाची आत्महत्या ही एका तरुणाची आत्महत्या, त्याने तडजोड नाकारली म्हणून आहे. लेखक म्हणतो, ‘हम लोग कांप्रोमाईज कर लेते है, इसलिए जी रहे है।’ पण या संपूर्ण कादंबरीने सांगितले, लोकतांत्रिक व धर्मनिरपेक्षताविरोधी शक्तीशी तडजोड म्हणजेसुद्धा आत्महत्याच आहे आणि ती केवळ एका व्यक्तीची नाही, तर एका धर्मनिरपेक्ष लोकतांत्रिक देशाची आत्महत्या ठरेल. तेव्हा या मूल्यांसाठी लढणे अटळ आहे.

(लेखिका नामवंत सामाजिक कार्यकर्त्या आहेत . मुस्लिम समाजाचे प्रश्न , शिक्षण आणि स्त्री – पुरुष समता या क्षेत्रात त्या विशेष सक्रिय आहेत)

9823074054

Previous articleपारोमा: स्त्रीवादी जाणिवा सशक्तपणे रुजविणारा सिनेमा
Next articleएका अँकरचा मृत्यू आणि…..
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.