“नोमॅडलॅंड”: चार भिंतींची ओढ जिप्सीला राहिलेली नाही..!

नीलांबरी जोशी

“घर हा निव्वळ एक शब्द आहे? की तुम्ही मनात सदैव सोबत घेऊन फिरता अशी एक गोष्ट आहे?” “नोमॅडलॅंड” या नुकत्याच आलेल्या चित्रपटातलं हे वाक्य..! घराची किंमत न परवडणाऱ्या लोकांना बॅंकांनी दिलेली भरमसाठ कर्ज या कारणामुळे अमेरिकेत २००८ साली ओढवलेल्या आर्थिक मंदीनंतर अमेरिकेत २६ लाख लोकांच्या नोक-या गेल्या. त्यात विकत घेतलेल्या घरांचे हप्तेही न परवडणारे असंख्य लोक रस्त्यावर आले.

“नोमॅडलॅंड”मधल्या फर्नलाही नवरा, नोकरी सगळं गेल्यानंतर घरदार सोडावं लागतं. मग ती मिळेल त्या नोक-या करत आपल्या गाडीतल्या घरातून अमेरिकाभर फिरते. वाटेत तिला तिच्यासारखे भटके भेटतात. सुरुवातीला आर्थिक मजबूरीतून असं फिरणा-या फर्नला आपला मूळ पिंड असा भटक्याच आहे हे पटतं.

**********

फर्नला एकटं रहायचं असलं तरी ती माणूसघाणी नाही. ती स्वावलंबी आहे. पण मैत्री करायला तिला आवडतं. या चित्रपटात तिची अगदी तरुण मुलांपासून मृत्यूच्या दारातल्या वयोवृध्दांपर्यंत सगळ्यांशी स्नेहपूर्ण मैत्री होते. एका प्रसंगात तर ती अत्यंत चपखल अशी Shall I compare thee to a summer’s day? शेक्सपिअरची ही कवितादेखील म्हणून दाखवते.

ती एकटी असली तरी एकाकी नाही. सगळ्या भटक्यांच्या सहवासात वर्षातले काही महिने ती रमते. या चित्रपटातला एक भटक्या बॉब वेल्स हा खरोखर भटक्या आहे. त्याचं CheapRVliving हे युट्यूब चॅनेल आहे. त्याचे ५,११,००० सबस्क्रायबर्स आहेत. “इतका खुला निसर्ग सोबत असताना ९ ते ५ मधलं रॅटसेसवालं आयुष्य कुणाला हवंय? मी मजेत आहे. मुख्य म्हणजे मी peace of mind अनुभवतोय” असं बॉब या चॅनेलच्या introductroy video मध्ये सांगताना दिसतो.

“सगळ्या सुखी कुटुंबांच्या कथा एकसारख्या असतात, पण दु:ख मात्र प्रत्येक कुटुंबात आपापली कहाणी सांगतं…” असं टॉलस्टॉयचं वाक्य आहे.

“नोमॅडलॅंड”मधल्या भटक्यांच्या प्रत्येकाच्या कहाण्या चटका लावून जातात. बॉबच्या कहाणीबद्दल आपल्याला कळतं तेव्हा मी कोणालाच गुड बाय म्हणत नाही.. I’ll see you down the road .. असं तो का म्हणतो ते कळतं.

*******

यातला खुला निसर्ग हे नोमॅडलॅंडमध्ये जोशुआ रिचर्डसच्या सिनेमॅटोग्राफीमधून उलगडत जातं. फर्नचे मूडस भोवतालच्या निसर्गाच्या चित्रीकरणातून आपल्यापर्यंत पोचतात. एकटं भटकत असताना पानंफुलं, पाणी, समुद्र, लाटा, बर्फ, ऊनवारापाऊस, भगभगीत वाळवंट, डोंगरकडे, शिळा, अरण्यं, पशुपक्षी सगळंच किती वेगळं दिसतं ते अनेक फ्रेम्समध्ये जाणवतं.

चित्रपटात संवाद खूप कमी असले तरी फ्रान्सेस मॅकडरमॉट या अभिनेत्रीच्या किंचितशा स्मितहास्यातून, कपाळावरच्या आठ्यांमधून, केवळ नजरेतून ती सतत आपल्याशी बोलते. ते ऐकू येत रहातं.. तिच्याशी नाळ जुळत जाते. याआधी दोन आॉस्कर पारितोषिकांची धनी असलेली ही नायिका या चित्रपटाचं आॉस्कर मिळाल्यावरही “माझ्या कामातून मी बोलते.. ते ओळखल्याबद्दल धन्यवाद” इतकंच म्हणाली आहे.

क्लोई झाओ या दिग्दर्शिकेला या चित्रपटाबद्दल आॉस्कर मिळालेलं आहे. चायनीज असलेल्या तिनं पूर्वी काही उद्गार काढल्याबद्दल “नोमॅडलॅंड”वर चीनमध्ये मात्र बंदी आहे.. !

***********

“नोमॅडलॅंड” चित्रपटानं अनेक गोष्टी आठवायला भाग पाडलं. पहिल्यांदा आठवली ती “द ग्रेट गॅटसबी” ही कादंबरी.

“प्रत्येक अमेरिकन नागरिकाला स्वातंत्र्य, समानता आणि समान संधी मिळायला हवी” या आदर्शावर “अमेरिकन ड्रीम” ही संकल्पना उभी होती. १८९० पासून अमेरिकन मिशनरी आणि उद्योजकांनी अमेरिकेच्या विकासाच्या आणि यशाच्या या मॉडेलचा जगभर प्रचार केला होता. त्याकाळी अमेरिका हा एक प्रगतीपथावर असलेला देश होता. अंगात धडाडी आणि डोळ्यात स्वप्नं असलेल्या कोणीही या देशात यावं आणि स्वत:ची आणि त्याचबरोबर देशाची प्रगती करावी हे त्याकाळी शक्य असायचं. म्हणूनच अमेरिका या देशात अपवर्ल्ड मोबिलिटी त्याकाळी खूपच जास्त होती. त्याचा परिणाम म्हणून उज्वल भवितव्यासाठी, यशस्वितेसाठी अनेक देशातले लाखो लोक अमेरिकेच्या किना-यावर येऊन धडकायला लागले होते. “गॉडफादर” चित्रपटात जहाजांवरुन भरभरुन अमेरिकेत येणारे लोक दिसतात.

पण काही काळातच या वाढत्या प्रगतीनं चंगळवादाचं रुप धारण केलं. याच काळात सामान्य लोक नवनवीन गाड्या, महागडी घरं अशा तथाकथित विकासासाठी मरेस्तोवर काम करत होते. सगळेजण फक्त चंगळवादी ग्राहक बनत गेले.

या चंगळवादामागे लागून कवेत न येणा-या क्षितिजाकडे वाटचाल करण्याची इच्छा बाळगणा-या एका माणसाची अखेर ‘द ग्रेट गॅटसबी’ या चित्रपटात दिसते. एफ स्कॉट फिटझगेराल्ड या लेखकाचं यातलं “Gatsby believed in the green light, the orgastic future that year by year recedes before us. It eluded us then, but that’s no matter—tomorrow we will run faster, stretch out our arms farther. . . . And one fine morning….. हे वाक्य शवपेटीएवढी जागा लागत असताना, त्यासाठी उर फुटेस्तोवर धावणाऱ्या  माणसाची “हाऊ मच लॅंड अ मॅन वॉंटस” या कथेची आठवण करुन देते.

जेसिका ब्रुडर या लेखिकेच्या Nomadland: Surviving America in the Twenty-First Century या २०१७ सालच्या पुस्तकावर “नोमॅंडलॅंड” आधारित आहे.

सर्वार्थानं संपन्न असलेल्या अमेरिकेचं कायम आपल्याला दर्शन होत असतं.. पण असं भटकं जीवन जगायला लागणा-या अमेरिकेबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते.

*******

“नोमॅडलॅंड”मुळे सुकेतू मेहताचं “धिस लॅंड इज अवर लॅंड” हे पुस्तकही आठवलं. अलीकडच्या काळात वसाहतवाद, युध्दखोरी, विषमता आणि पर्यावरणातले बदल यामुळे अविकसित देशांमधल्या लोकांना आपापल्या देशात एक डिसेंट आयुष्य काढणं अवघड होत गेलं. १९६० ते २०१७ या सालांच्या दरम्यान आपापला देश सोडावा लागणा-यांची संख्या तिप्पट झाली. २०१२ साली ९,३०,००० लोकांना आपापला देश सोडून दुसरीकडे आश्रय शोधायची वेळ आली. तीन वर्षांनंतर ही संख्या २३ लाख झाली होती. आज जगातले ३.४ टक्के (म्हणजे २९ पैकी १ जण) ज्या देशात जन्माला आले तिथून दुस-या देशात रहायला जातात. अशा लोकांचाच एक स्वतंत्र देश होऊ शकेल. असं सुकेतू मेहता यांनी या पुस्तकात मांडलं आहे.

“नोमॅडलॅंड” मधली नायिका वयाच्या साठीत आपल्या गाडीत घरात लागणा-या वस्तू घेऊन फिरु शकते. अमेरिकेतली गरिबीची संकल्पना आणि अविकसित देशांमधली गरिबीची संकल्पना यातला फरक या चित्रपटात सतत जाणवतो. पण निर्वासितांचा प्रश्न दिवसेंदिवस किती अवघड होत चालला आहे ते चित्रपट पहाताना जाणवत होतं.

*******

“नोमॅडलॅंड”मध्ये वयाच्या साठीनंतर मिळेल ते काम करणारे वृध्द दिसतात. यातला प्रश्न म्हणजे वाढतं वयोमान. २०५० साली जगातल्या तीन माणसांपैकी एक माणूस साठीच्या वरच्या वयाचा असेल असं भाकित युनायटेड नेशन्सनं केलं आहे. बहुतेक देशांमध्ये आत्ता पुरुषांचं आयुर्मान ७९.३ आणि स्त्रियांचं ८३ आहे असं सर्वेक्षण सांगतं. २०३९ साली पुरुषांचं आयुर्मान ८९ आणि स्त्रियांचं ९३ होईल असा अंदाज आहे. ऑस्ट्रेलियात आत्ताच चार माणसांपैकी एका माणसाचं वय ५५ पेक्षा जास्त असतं. २०२० साली ६० पेक्षा जास्त वयाचे इंग्लंडमध्ये २३.९ टक्के लोक असतील.

२०२७ सालापर्यंत इंग्लंडची लोकसंख्या ७ कोटी होईल. इंग्लंडमध्ये बाहेरच्या देशांमधून सुमारे २ लाख लोक दरवर्षी स्थलांतरित होतील. त्यांचं सर्वसाधारण वय २० ते ३९च्या दरम्यान असेल. एकूण तिथे १६ वर्षांच्या माणसांपेक्षा ६५ वर्षांची माणसं अधिक प्रमाणात असतील. यामुळे कामाच्या ठिकाणी अनेक वृध्द लोकांना सामावून घ्यावं लागेल. युरोपमध्ये २०५० साली ५५ ते ६४ वयाच्या दरम्यान असलेल्या कर्मचार््यां चं प्रमाण ६० टक्के असेल. थोडक्यात ६० हे निवृत्तीचं वय नक्कीच रहाणार नाही..!

बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर जुळवून घेण्यासाठी सगळ्यांनाच मेहनत करावी लागते आहे. तीच मेहनत वयानं जास्त असलेल्या कर्मचाऱ्यांनाही करावी लागेल. मात्र त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन आणि त्यांना सरसकट एका साच्यात बसवलं जाणं या दोन गोष्टींचाही सामना वयोवृध्द लोकांना करावा लागेल. तसंच आपलं आरोग्य सांभाळून त्यांना कामाकडे लक्ष द्यावं लागेल.

*******

“नोमॅडलॅंड”मध्ये फ्रान्सेस घरातल्या असंख्य वस्तू देऊन टाकते. त्यावरुन आता मिनिमलिझमकडे जायला हवं आहे हे परत जाणवलं. भटकं जीवन जगणारा आदिम काळातला माणूस कळपानं रहात होता. त्याच्या मालकीच्या वस्तू फार कमी होत्या. पण सुमारे १०,००० वर्षांपूर्वी आपण शेतीप्रधान व्यवस्थेत मालकीच्या वस्तू जमवायला सुरुवात केली. त्याचा आज अतिरेक झाला आहे. सर्वसाधारण अमेरिकन घरांमध्ये आज ३ लाख वस्तू असतात. ब्रिटनमध्ये १० वर्षांच्या मुलाकडे २३८ खेळणी असतात आणि तो त्यापैकी १२ खेळण्यांशी जेमतेम खेळतो. त्यामुळे आपल्याला गरजेच्या नसणाऱ्या वस्तू, आपल्या अतिरिक्त क्षमता आणि उपलब्ध असणारा अतिरिक्त वेळ आपण शेअर करायला हवा आणि मिनिमलिझमकडे जायला हवं.

********

“नोमॅडलॅंड”मधली फ्रान्सेस दोन वेळा सुरक्षित भासणा-या छपराखाली रहायची संधी मिळूनही अखेरीस भटकं जीवन पसंत करते. असा आपला कंफर्ट झोन सोडणं सोपं नसतं..!

त्यावरुन पाडगांवकरांची जिप्सी आठवणं अपरिहार्य होतं..

घर असूनहि आता घर उरलेलें नाही

चार भिंतींची ओढ जिप्सीला राहिलेली नाही..

कुणीं सांगावे ? असेल पूर्वजन्मीचा हा शाप

घडी सुस्थिरपणाची विसकटे आपोआप …

कुणी तरी साद घाली दूर अनंतामधून …

एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

 

(नीलांबरी जोशी ‘कार्पोरेट कल्लोळ’ , ‘झपूर्झा’, ‘जिथे मुलांना पंख फुटतात’ आदी गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत)

[email protected]