धर्माचे झेंडे नेहमीच उपद्रवकारक राहिले आहेत. हे सामान्य माणसांचे संघर्ष नव्हते. त्यांच्या राजकीय किंवा धार्मिक नेतृत्वाने त्यांच्या हातचा नांगर किंवा हातमाग किंवा कारागिरांची साधने काढून हातात तलवार दिली होती. पोट भरण्याचा पर्याय हा जीव राखण्याचा पर्याय होत होता हे जगभरातील सर्व प्रदेशांत सत्य होते.
ख्रिश्चन धर्मात आपण पाप केलं असूनही स्वर्गात प्रवेश मिळावा, म्हणून काही प्रायश्चित्त, प्रार्थना, तीर्थयात्रा इंडल्जन्स या नावाने करण्याची व्यवस्था आहे. काही काळपर्यंत चर्चला देणग्या देऊनही इंडल्जन्स मिळवता येत असे. नंतर यातून होणाऱ्या गैरव्यवहारांमुळे आणि हे एकंदरीतच अनीतीमान आहे असे निदान काही प्रभावी व्यक्तींच्या लक्षात आल्यामुळे ती पद्धत बंद झाली. पण गैरकृत्य करून झाल्यावर कन्फेशन किंवा पेनन्स करणे हे शॉर्टकट्स अजूनही ख्रिश्चॅनिटीमधे सुरूच आहेच. रोजची पूजा करून, समोर येईल त्या व्यावसायिक भिकाऱ्यांना थोडीफार भीक घालून, स्वतःच्या धंद्यात इतरांना नाडल्याचे पापक्षालन करणारे, तौबातौबा करणारे अनेक धर्मीय आपण भारतातही पाहातो. म्हणजे खरोखरच्या सत्कृत्याबद्दल यांना काहीच वाटत नसते. धर्माच्या कर्मकांडाने दिलेले शॉर्टकट्स पुरेसे वाटणे यातच नैतिकतेच्या चिरंतन मूल्यांचा पराभव असतो. आता कुणी म्हणेल यात धर्माचा दोष नसून धर्मगुरूंचा दोष आहे. धर्म राबवणाऱ्या संस्थांचा दोष आहे. बरोबर आहे. पण मग आपण धर्म आणि धर्मसंस्थांना अलग करू शकतो का. याचा विचार करावा. नाही करू शकत. ते हातात हात घालूनच चालतात.
शतकभरापूर्वीच नव्हे तर अजूनही आपल्यातील अनेकजण या दोनतीन हजार वर्षांपूर्वी मान्य असलेल्या धार्मिक-सामाजिक तत्त्वांना शिरोधार्य मानतात. भारतातील हिंदू धर्माचा सर्वात मोठा उपद्रव आहे तो जातीव्यवस्थेचा- त्यात एका मोठ्या मानवसमूहाला शूद्र, हीन लेखण्याचा. त्याखालोखालचा उपद्रव आहे तो लिंगभेदाचा. पुरुष श्रेष्ठ आणि स्त्री कनिष्ठ, भिन्नलिंगींना तर स्थानच नाही. हा उपद्रव आपण संविधानाच्या मार्गे नष्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. जातीतच लग्ने करणे, धर्मातच लग्ने करणे हे अजूनही श्रेयस्कर मानले जाते. नव्हे जातीबाहेरच्या विवाहांना अजूनही विरोध केला जातोच. नव्या निओधार्मिक भारतात तर आजकाल जातींचा अभिमान हेतूपूर्वक पोसला जाताना दिसतो. सोशल मिडियातून आम्ही अमके, आम्ही तमके, आम्ही ठमके असली स्वकर्तृत्वाशिवाय मिळालेल्या जातींची बिरुदे मिरवणारे ग्रुप्स दिसतात. इतरांशी संबंध ठेवू नका असला एक अत्यंत दळभद्री सूर त्यातून असतो. इतर धर्मांचा द्वेष तर असतोच पण जातींचाही द्वेष असतो. स्वजातीचा अभिमान आणि इतर जातींचा द्वेष हे सारे मूर्खपणाच्या सीमा ओलांडून जाताना दिसते आहे.
दुर्गावाहिनी नावाच्या अल्ट्राहिंदुत्त्ववादी स्त्रिया-मुलींच्या संघटनेची एक फिल्म आहे बीबीसीने केलेली. ती पहा. त्यात वडिलांनी ज्या मुलीला धर्मरक्षणासाठी ‘सोडलं’ त्या मुलीची मुलाखत आहे. जगाबद्दलचे अर्धवट ज्ञान असलेली ही मुलगी बापाच्या नजरेत यशस्वी ठरण्यासाठी इतर धर्मीय व्यक्तींना गोळी घालून ठार मारायला तयार होते आहे. ती कुणाला ठार मारेल की नाही हा प्रश्न पुढचा. पण विचार करा, एक जिवंत व्यक्ती जग किती विशाल आहे, सुंदर आहे, त्यात माझी बुद्धी काय करू शकेल याचा प्रश्नही न पडता केवळ दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीचा द्वेष करायला शिकते आहे हे किती भयंकर आहे. मराठी भाषक परिवारातील मुलगी आहे ती. आणि तिला या भाषेतून व्यक्त झालेल्या मांगल्याची, प्रेमाची, सहृदयतेची ओळखच नाही.
अगदी थेट असाच प्रकार १९व्या शतकात अमेरिकेत नेटिव अमेरिकन्सच्या मुलांच्या बाबतीत ख्रिस्ताच्या चर्चेसच्या दलालांनीही केला होता. गरीब मुस्लिम मुलांना हेरून मदरशांमधून त्यांना कट्टरपंथी बनवण्याचे प्रयत्न होतात हा देखील याच रांगेतला प्रयत्न असतो. आज तालिबानमध्ये सामील झालेले अनेक तरूण आणि किशोर हे बालपणापासून तालिबानी ‘संस्कारात’ वाढवलेले असतात. त्यांना काफरांना नष्ट करणे, त्यातच मरणे आणि नसलेल्या स्वर्गात जाणे यापलिकडे जगात दुसरं काही आहे हे शिवतच नाही. सनातनसारख्या तथाकथित अध्यात्मिक हिंसक संस्थेत असे बालपोपट तयार केले जात आहेत हे त्यांनीच प्रसृत केलेल्या अनेक व्हिडिओंतून कळू शकते. सर्वच धर्माच्या संस्थांमध्ये हे बीज असते हे पुरेसे स्पष्ट आहे. कुणी स्वतःला महान धर्म म्हणवायला नको.
धर्माचे महात्म्य वाढवण्यासाठी संपत्ती-साधनांचा जो विनियोग होतो किंवा उधळपट्टी होते ती कशाकशावर खर्च होते? सामान्यांना दीपवून टाकणाऱ्या धार्मिक वास्तू बांधण्यावरील खर्च, धर्माचे गुरू, पुजारी, आचार्य, आर्चबिशप्स, मुल्ले यांचे अनुत्पादक आणि ऐषारामी रहाणीमान सांभाळण्यासाठी होणारा खर्च. कफन्या घालून जाग्वार, रोल्सरॉईस, मर्सिडिझ, बीएमडब्लूमधून फिरणारे पोंगेपंडित पाहून घ्या. टोलेजंग धार्मिक वास्तू बांधून झाल्यावर त्या वास्तूला शोभतील अशा निरुपयोगी सोन्यारुप्याच्या, रत्नजडित वस्तू, मौल्यवान दागिने चढवलेल्या मूर्ती, इतर प्रतीके वगैरे तळघरांतून ठासून भरण्याचा एक कार्यक्रम होतो. सोमनाथ,पद्मनाभ मंदिर या हिंदू धर्मातील ऐय्याषी तर ख्रिस्ती व्हॅटिकन, नॉत्रदाम ही ठळक उदाहरणे. एका चिवरावर फिरणाऱ्या बुद्धाच्याही सोन्याच्या प्रतिमा केल्या जातात. या धार्मिक वास्तूंचे हिशेब, किंवा इतर प्रशासन सांभाळण्यासाठी अनुत्पादक नोकरभरती होते, प्रचारसाहित्य पुस्तके वगैरेंची छपाई सुरू असते.
देशातील गोरगरीब जनतेच्या कल्याणाचे, कष्टकऱ्यांच्या योग्य मोबदल्याचे, उत्पादक गुंतवणुकीचे अनेक प्रकल्प पैशाच्या पाठबळाच्या प्रतीक्षेत आहेत, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाचे कर्ज देशावर आहे असे असताना धार्मिक अस्मितेच्या ज्वराला खतपाणी घालणाऱ्या प्रचारावर आणि थोतांड प्रकल्पांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो आहे. हा देशाच्या भविष्यावर थेट परिणाम करणारा उपद्रव काही फक्त भाजप आणि त्यांच्या मायबाप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पारड्यात टाकता येणार नाही. त्याचे मूळ आहे ते धर्माच्या उपद्रव शक्तीमधेच. त्यांनी तर केवळ धर्माचे उपद्रवमूल्य बरोब्बर ओळखले आणि त्या आधारावर साऱ्या जुमल्यांचे इमले रचले आहेत. जोवर सामान्य लोकांचे नेतृत्व धर्माचे राजकारण न करता त्यांना धर्माची कालबाह्यता पटवून देत नाही, धार्मिक कार्यक्रमांची निमंत्रणे नाकारत नाही तोवर हे खेळ असेच सुरू रहाणार. धर्मवर्चस्ववादी राजकारण इतक्यात थांबणार नाही. द्वेषाचे फासे टाकत भारताच्या पटावरली सत्तेचा जुगार सुरू राहील. धर्मामुळे दुखावणाऱ्या नाजूकसाजूक वाटणाऱ्या खुनशी भावनामुळे भारत काही दशके मागे गेला आहे. या मूर्खपणाची रक्तरंजित किंमत मोजल्याशिवाय धार्मिक भारतीयांचे डोळे उघडणार नाहीत.