धर्मसंस्थेचे उपद्रव

डॉ. मुग्धा कर्णिक

—————-

धर्म ही स्वतः एक संस्था आहे आणि तिच्यात अनेक पोटसंस्थाही वाढत असतात. मानवी समाजाची घडण होण्याच्या सुरुवातीच्या काळात, सृष्टीचा अर्थ लागत नसल्याच्या काळात निसर्गाच्या विविध शक्ती चालवणारे देव माणसाच्या मनात तयार झाले आणि त्यापाठोपाठ वर्तनाचे नियम तयार झाले- त्यातच धर्माचीही सैलसर रचना होऊ लागली. वर्तणुकीचे नियम, नीतीनियम हे धर्माच्या स्वरुपात यायला बराच काळ जावा लागला. निआन्डर्थल आणि क्रो मॅग्नॉन यांची भेट, संघर्ष, संकर, होण्याच्या चाळीस हजारपेक्षा जास्त काळापूर्वी धर्माचे आतासारखे स्वरुप नसले तरीही उच्चनीच, आपण आणि इतर, बलवानांकडे नेतृत्व या गोष्टी असतीलच असा पुरातत्वज्ञांचा निष्कर्ष असतो. यातूनच समाजाचे नियम संथपणे तयार होत गेले. कधीतरी त्या नियमांना स्थानिक स्वरुपात सैलसर धर्माचे रूप येत गेले आणि मग संघटित धर्माचे. ज्या धर्मांच्या बाबतींत एक संस्थापक होता त्यांच्या बाबतीत संघटित स्वरुप येण्याची, संस्थात्मक होण्याची प्रक्रिया गतीमान होती. तर जेथे केवळ सामाजिक-राजकीय-आर्थिक वर्तनाचे नियम एवढेच स्वरुप होते तेथे एकसंध किंवा एकसूत्री संस्था निर्माण न होता अनेक केंद्रके असलेली व्यवस्था तयार होत गेली असावी. हा फरक आपल्याला सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व धर्मांच्या इतिहासाकडे नजर टाकली तर निरखता येतो. धर्मांचा इतिहास हा आजचा विषय नाही त्यामुळे आपण पुढे सरकू या.

धर्माच्या अंतर्गत येणाऱ्या संस्थांमध्ये धर्मपीठे, धर्मगुरू किंवा आचार्य, पॅपसीसारख्या विशिष्ठ उतरंडी, प्रार्थनास्थळे, मठ यांच्याबरोबरच धर्मपरंपरा, त्यातून चालू राहिलेल्या सामाजिक-राजकीय उतरंडी यांचा समावेश होतो. धर्म हा बहुतेक वेळा देव-ईश्वर किंवा पारलौकिक शक्ती यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग असतो हे मानवजातीच्या समजेमध्ये पूर्वापार रुजले आहे त्यामुळे त्यासाठी तयार झालेले पापमार्जन, पुण्यसंचय याचे शॉर्टकट्स हेदेखील धर्माच्या नवनव्या आस्थापनांतून पुरवले जातात. आणि याच आस्थापना नफ्यात चालणाऱ्या असल्यामुळे धर्माच्या संस्थामध्ये बलाढ्य होत जातात.

खरं म्हणजे धर्माने निर्माण केलेल्या संस्थांचा उपद्रव हा मूलतः धर्माचाच उपद्रव असतो.

आता आपण उपद्रव या शब्दाकडे येऊ. उपद्रव कोणत्या बाबतीत होतो, कुणाला होतो. धर्म या संस्थेचा उपद्रव होतो आहे पण त्याचे काही फायदे होते का आणि ते अजूनही आहेत का. धर्माचा उपद्रव हा प्रथमपासून कुणाला ना कुणाला झाला होता की हे काहीतरी नवीन आहे?

आमचा देव तुमचा देव, आमचा स्वर्ग तुमचा स्वर्ग, आमची कर्मकांडे तुमची कर्मकांडे अशी स्पर्धा धर्माधर्मांतून आहे. पश्चिमेकडे ज्युडाईझम, ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम या तीन एकेश्वरी धर्मांत हीच स्पर्धा होती. रोमन किंवा नॉर्डिक किंवा मोंगोल जमातींच्या अनेक देवाच्या अर्चनेला कमी लेखत ख्रिश्चॅनिटीचे पाईक रक्तपात करत सुटले, त्यानंतर इस्लामने बाकी सर्वांना हराम, काफिर ठरवत रक्तपाताच्या मार्गाने धर्मप्रसाराचा मार्ग स्वीकारला. या धर्मप्रसाराच्या रक्तपाताने जगभर थैमान घातले ही गोष्ट गेल्या दोन हजार वर्षांतली. पण त्या आधी भारतात बुद्धाने, जैनांनी नाकारलेले वेदप्रामाण्य यामुळे हिंदू किंवा वेदिक धर्मीय आणि बौद्ध आणि जैन यांमध्येही संघर्ष उभा राहिला होता. इथेही रक्तपात झाला होताच.

धर्माचे झेंडे नेहमीच उपद्रवकारक राहिले आहेत. हे सामान्य माणसांचे संघर्ष नव्हते. त्यांच्या राजकीय किंवा धार्मिक नेतृत्वाने त्यांच्या हातचा नांगर किंवा हातमाग किंवा कारागिरांची साधने काढून हातात तलवार दिली होती. पोट भरण्याचा पर्याय हा जीव राखण्याचा पर्याय होत होता हे जगभरातील सर्व प्रदेशांत सत्य होते.

समोर दिसणाऱ्या निसर्गचक्राचा, जीवसृष्टीतील आश्चर्यांचा अर्थ लागत नाही म्हणून कल्पना केलेल्या महाशक्तीला विविध दैवी रुपे दिली गेली. कुणी अनेक तर कुणी एक. कुणी एकच ईश्वर मानत होते तर कुणी सतराशे साठ, तर कुणी कोट्यावधी. पण एक असो वा अनेक हे देव म्हणजे आश्चर्याने भयभीत असलेल्या सामान्य लोकांचे काल्पनिक आधार होते. आपल्या डोक्याला ताप नको ही एक माणसाचं माणूसपण गायब करू शकणारी भावना आहे. डोक्याला ताप नको म्हणून डोकं गहाण टाकायचं, वापरायचं नाही. धर्माने सांगितलं ते करायचं कारण ते देवानेच सांगितलेलं असतं- आपण स्वतःच्या विचाराने योग्य काय अय़ोग्य काय, नीती काय अनीती काय, भलं काय बुरं काय याचा कीस काढण्याची गरज नाही. आपण आपले दैनंदिन काम करू, खाऊपिऊ, नाचू गाऊ, आनंदात राहू, प्रेमाने राहू पण धर्माने सांगितलं तर इतरांची डोकीही फोडू… त्यात पाप नाही. असा विचार करणारे झोंबी धर्मांनी तयार केले हा धर्मसंस्थेचा सर्वात मोठा उपद्रव.

उत्क्रांती सिद्धांतातील एक उदाहरण आहे. पतंग म्हणजे मॉथ्स हे गेली अनेक सहस्रके चंद्राच्या प्रकाशात, चंद्राची दिशा पकडून रात्री प्रवास करत. पण माणसाला अग्नीचा वापर करता यायला लागल्यापासून, मानवाने लावलेले जळते दिवे, मेणबत्त्या आल्यानंतर त्यांना हा नवा प्रकाशाचा स्रोत आपल्यासाठी घातक आहे हे कळत नाही आणि ते थेट त्यांच्या दिशेने उडून त्यावर आदळून जळून जातात. धर्मकल्पनेच्या बाबतीत माणसांचे काहीसे असेच होते आहे.

धर्माचे फायदे प्राचीन इतिहासपूर्व काळातील किंवा प्राचीन इतिहासातील माणसांना थोडेफार होत असतील. विचार करून जो ताणतणाव सोसावा लागतो त्यापासून मुक्ती मिळत असेल. तेव्हा या दृष्टीने लोक धर्माकडे आकर्षिले जात असतील. धर्मांच्या आश्रयाखाली कला-साहित्य यांना फुलोरा आला म्हटले जाते. काव्य, गायन, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला या सर्वांसाठी धर्मांचा आधार होता म्हणतात. पण आपण कधी विचार केला आहे का की या कलांना मर्यादा घालून देणारे धर्माचे साखळदंड नसते तर या कला कशा प्रकट झाल्या असत्या. कदाचित् अधिक मोकळेपणाने! मायकेल अँजेलोच्या बाबतीत तर मला नेहमी वाटते. एवढ्या थोर कलाकाराला सिस्टीन चॅपेलमधे केवळ बायबलमधलेच देखावे रंगवण्याची जबरदस्ती नसतीच तर कदाचित् त्याने मुक्तपणे जे काम केले असते ते किती सुंदर झाले असते? अर्थात हाही केवळ कल्पनाविलासच आहे. पण कल्पना करून पाहाण्याची मुभा आपल्याला असतेच.

एकंदरीतच विज्ञानाची प्रगती कमी असण्याच्या काळात, जगण्यासाठी शारीरिक कष्ट भरपूर आणि पोषणाची शाश्वती कमी असताना धर्म हा प्रथमोपचारासारखा काम करीत असेल. तात्पुरते समाधान देत असेल. पण आता परिस्थिती बदलली आहे. जगण्यासाठी विचार करावा लागतो, शारीरिक कष्टांपेक्षा वैचारिक कष्ट करावे लागतात, पोषणाची, आरोग्याची परिस्थिती सुधारली आहे- अशा वेळी पुन्हा धर्माकडेच वळणे, प्राचीन उपायांचा आधार घेणे म्हणजे केवळ गुणसूत्रीय स्मरणांच्या आधारे उडणाऱ्या, आगीत झोकून देणाऱ्या मेंदूहीन पतंगांसारखेच वर्तन करणे होय.

माणूस जीवनसंघर्षात टिकण्यासाठी शारीरिक शक्तीचा वापर जरूर करतो, पण शारीरिक शक्ती योग्य प्रकारे वापरण्यासाठी बुद्धीचा वापर करतो. इतर कोणत्याही सजीवापेक्षा मानवाचे जगणे अधिक बुद्धीनिष्ठ आहे. पण धर्माची अपेक्षा बुद्धीपेक्षा श्रद्धेवर भर द्यावा ही आहे. अर्थात धर्माच्या अनुयायांनी. धर्ममार्तंड किंवा त्यांचे राजकीय आश्रयदाते मात्र बुद्धीचा वापर भरपूर करतात. अनुयायांना जोखडाखाली ठेवण्यासाठी, अंधविश्वासात ठेवण्यासाठी त्यांना भरपूर तंत्रे वापरावी लागतात.

दारूच्या किंवा गांजाच्या नशेत असलेला मनुष्य जसा आनंदात असतो, शुद्धीत येईपर्यंत रंगीत स्वप्ने पाहातो, तशीच धर्मश्रद्धेच्या किंवा ईश्वरश्रद्धेच्या आहारी गेलेला समाज स्वमग्न खुशीत असतो.

या वर्तमान आय़ुष्यात काय चुकीचं आहे, ते कसं सुधारलं पाहिजे, काय चांगलं केलं पाहिजे या विचारापेक्षा धार्मिक समाजाला परलोकांत आपल्याला काय चांगलं मिळेल याचाच विचार अधिक असतो.

ख्रिश्चन धर्मात आपण पाप केलं असूनही स्वर्गात प्रवेश मिळावा, म्हणून काही प्रायश्चित्त, प्रार्थना, तीर्थयात्रा इंडल्जन्स या नावाने करण्याची व्यवस्था आहे. काही काळपर्यंत चर्चला देणग्या देऊनही इंडल्जन्स मिळवता येत असे. नंतर यातून होणाऱ्या गैरव्यवहारांमुळे आणि हे एकंदरीतच अनीतीमान आहे असे निदान काही प्रभावी व्यक्तींच्या लक्षात आल्यामुळे ती पद्धत बंद झाली. पण गैरकृत्य करून झाल्यावर कन्फेशन किंवा पेनन्स करणे हे शॉर्टकट्स अजूनही ख्रिश्चॅनिटीमधे सुरूच आहेच. रोजची पूजा करून, समोर येईल त्या व्यावसायिक भिकाऱ्यांना थोडीफार भीक घालून, स्वतःच्या धंद्यात इतरांना नाडल्याचे पापक्षालन करणारे, तौबातौबा करणारे अनेक धर्मीय आपण भारतातही पाहातो. म्हणजे खरोखरच्या सत्कृत्याबद्दल यांना काहीच वाटत नसते. धर्माच्या कर्मकांडाने दिलेले शॉर्टकट्स पुरेसे वाटणे यातच नैतिकतेच्या चिरंतन मूल्यांचा पराभव असतो. आता कुणी म्हणेल यात धर्माचा दोष नसून धर्मगुरूंचा दोष आहे. धर्म राबवणाऱ्या संस्थांचा दोष आहे. बरोबर आहे. पण मग आपण धर्म आणि धर्मसंस्थांना अलग करू शकतो का. याचा विचार करावा. नाही करू शकत. ते हातात हात घालूनच चालतात.

आपल्या भारतातल्या बहुसंख्यांचा धर्म हिंदू आणि सध्या या धर्माच्या रक्षणाच्या नावाखाली देशातले वातावरण विषारी करून टाकले गेले आहे. आपण इतर धर्मांबद्दलही बोलायचं, फक्त हिंदू धर्मावर टीका नको वगैरे भूमिका मला मान्य नाही. माझे मित्र सनल एडामुरुक्कू यांना त्रास झाला तेव्हा मी ख्रिस्ती धर्माच्या उपद्रवाबद्दल बोलले, फ्रान्समध्ये इस्लामी धर्मवेड्याने खून पाडला तेव्हा मी इस्लामच्या उपद्रवाबद्दल बोलले, विवक्षित घटनांच्या संदर्भात विवक्षित धर्मांच्या उपद्रवाबद्दल बोललेच पाहिजे. माझ्या प्रतिपादनाचा मुख्य मुद्दा नेहमीच हा राहील की धर्म ही संस्थाच कालबाह्य झाली आहे आणि तिचा उपयोग कमी आणि उपद्रव जास्त हीच परिस्थिती आहे, आणि हे सर्व धर्मांबाबत सत्य आहे. धर्म या प्राचीन मानवसमाज, ऐतिहासिक घटना जाणून घेण्यापुरतेच माहीत असले पाहिजेत. बाकी ते त्याज्य आहेत. त्यांच्या संस्थापनेच्या काळानुरुप ते उपयोगी होते, त्यातून मूलतः प्रकट होणारी समाजनियमनाची गरज त्यातून भागत होती. आज जे उरले आहे ते केवळ त्याचे म्यूझियममधे संग्रहित करण्यासारखे आणि आपल्या रोजच्या आय़ुष्यात थारा न मिळण्यासारखे रूप.

पण अखेर धर्मसंस्थेचा उपद्रव या विषयावर बोलताना आपल्या परिसरात जो धर्माचा उपद्रव होतो आहे त्यावर बोललेच पाहिजे. त्यावर जास्त बोलले पाहिजे.

भारतातला मूळ धर्म खरेतर कोणत्याच नावाचा नव्हता. एकाही वेदात या आचारधर्माला हिंदू हे नाव दिलेले नाही. आणि वेदांच्या आधी किमान तीसचाळीस हजार वर्षे आधीपासून सध्या ज्या भूखंडाला भारत म्हणतात त्या भूखंडावर मानव वसत होता. अश्मयुगीन मानववस्तीही इथे होती, खडकांवर चित्रे काढणाऱ्या शिकार करून जागणाऱ्या मानवी टोळ्याही इथे होत्या, इथेच हडप्पा संस्कृती नांदली. ती तिच्या अस्तकाळासमीप असताना नंतर सिंधु नदीपासून यमुनेच्या पश्चिम काठापर्यंत आणखी एक संस्कृती बहरली. दक्षिणेकडे आणखी एक प्राचीन संस्कृती वाढत होती. या सर्वांनी साधने, निवासस्थाने, अग्नीचा उपयोग, चाकाचा उपयोग, पशूंचा उपयोग यासारख्या अनेक गोष्टींसोबतच काय योग्य, काय अयोग्य, कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ याच्या कल्पना मांडल्या. त्या परिणत होत गेल्या. पुरुषसूक्तातील काही सूत्रांनुसार कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ हे जे काही पुढे आले ते निरंतर घट्ट होत गेले. आणि मग सत्ताकेंद्रांना सोयीचा असा धर्म पक्का होत गेला हे समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून म्हणता येते. ही विभागणीची तत्त्वे जरी तीन हजार वर्षांपूर्वी मान्य केली गेली असतील तरी ती केवळ प्राचीन आहेत म्हणून टिकवून न ठेवता आताच्या चौकटीत योग्य नाहीत हे ठरवून लोकशाही देशाने बाजूला टाकली. जसे जगातल्या अनेक नवराष्ट्रांनी जुने करार फेकून दिले, बायबल फक्त घरात ठेवले आणि राजकीय प्रणालीतून हद्दपार केले तसेच आपणही केले.

दोन हजार किंवा चौदाशे वर्षांपूर्वी संस्थापित झालेले धर्म काय किंवा तीन हजार वर्षांपासून विकसित होत गेलेले धर्म काय या सर्वच धर्मांच्या मर्यादा आहेत हे मान्य करण्यासाठी धैर्य दाखवले पाहिजेच.

शतकभरापूर्वीच नव्हे तर अजूनही आपल्यातील अनेकजण या दोनतीन हजार वर्षांपूर्वी मान्य असलेल्या धार्मिक-सामाजिक तत्त्वांना शिरोधार्य मानतात. भारतातील हिंदू धर्माचा सर्वात मोठा उपद्रव आहे तो जातीव्यवस्थेचा- त्यात एका मोठ्या मानवसमूहाला शूद्र, हीन लेखण्याचा. त्याखालोखालचा उपद्रव आहे तो लिंगभेदाचा. पुरुष श्रेष्ठ आणि स्त्री कनिष्ठ, भिन्नलिंगींना तर स्थानच नाही. हा उपद्रव आपण संविधानाच्या मार्गे नष्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. जातीतच लग्ने करणे, धर्मातच लग्ने करणे हे अजूनही श्रेयस्कर मानले जाते. नव्हे जातीबाहेरच्या विवाहांना अजूनही विरोध केला जातोच. नव्या निओधार्मिक भारतात तर आजकाल जातींचा अभिमान हेतूपूर्वक पोसला जाताना दिसतो. सोशल मिडियातून आम्ही अमके, आम्ही तमके, आम्ही ठमके असली स्वकर्तृत्वाशिवाय मिळालेल्या जातींची बिरुदे मिरवणारे ग्रुप्स दिसतात. इतरांशी संबंध ठेवू नका असला एक अत्यंत दळभद्री सूर त्यातून असतो. इतर धर्मांचा द्वेष तर असतोच पण जातींचाही द्वेष असतो. स्वजातीचा अभिमान आणि इतर जातींचा द्वेष हे सारे मूर्खपणाच्या सीमा ओलांडून जाताना दिसते आहे.

काही जातीजमाती तर स्वतःच्या प्रथापरंपरांचे इतके कडक नियम करून टाकतात की त्यात त्यांच्यातील व्यक्तिमत्वे पार खुरटून जातात. जातींच्या पंचायती, खाप पंचायती यांचे नियम हा आपला धर्म आहे आणि तो इथे जन्मलेल्या सर्वांनी पाळलाच पाहिजे या जुलुमाच्या आधारेच लादले जातात.

पण या झाल्या सर्वसाधारणपणे आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी. या पुढे जाऊन धर्माचा सर्वात मोठा उपद्रव आहे तो होमो सेपिएन्स- शहाणा माणूस या आधुनिक मानवजातीला.

कुठल्या ना कुठल्या देवाधर्माच्या पगड्याखाली असलेल्या पालकांच्या पोटी (अर्ज न करता) जन्म घेतलेल्या मुलांना बाळपणापासून बाप्पा जयजय शिकवले जाते, बाप्टाइझ करून ‘सेव्ह’ केले जाते, किंवा नमाजाचा व्यायाम आणि येता जाता या अल्ला परवरदिगारची रट शिकवली जाते. त्या त्या धर्माप्रमाणे जे जे ठरीव संस्कार असतील ते ते मुलांना भोगावे लागतात. पाळण्यात असल्यापासून धार्मिक संस्कारांची सुरुवात होते. कसल्याही पापपुण्यांच्या, श्रेष्ठकनिष्ठांच्या, उच्चनीचतेच्या संकल्पनांचा स्पर्श न झालेल्या बाळाला निवडीचे स्वातंत्र्य असत नाही.ते बाळ धर्माच्या जुनाट चिंधोट्यांत गुंडाळले जाते. आणि त्याला कधीच आपल्या वैचारिक गुलामीची किंवा मुस्कटदाबीची कल्पनाही येत नाही.

दुर्गावाहिनी नावाच्या अल्ट्राहिंदुत्त्ववादी स्त्रिया-मुलींच्या संघटनेची एक फिल्म आहे बीबीसीने केलेली. ती पहा. त्यात वडिलांनी ज्या मुलीला धर्मरक्षणासाठी ‘सोडलं’ त्या मुलीची मुलाखत आहे. जगाबद्दलचे अर्धवट ज्ञान असलेली ही मुलगी बापाच्या नजरेत यशस्वी ठरण्यासाठी इतर धर्मीय व्यक्तींना गोळी घालून ठार मारायला तयार होते आहे. ती कुणाला ठार मारेल की नाही हा प्रश्न पुढचा. पण विचार करा, एक जिवंत व्यक्ती जग किती विशाल आहे, सुंदर आहे, त्यात माझी बुद्धी काय करू शकेल याचा प्रश्नही न पडता केवळ दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीचा द्वेष करायला शिकते आहे हे किती भयंकर आहे. मराठी भाषक परिवारातील मुलगी आहे ती. आणि तिला या भाषेतून व्यक्त झालेल्या मांगल्याची, प्रेमाची, सहृदयतेची ओळखच नाही.

काही काळापूर्वी मी नेहा दीक्षित यांनी आसाम भागात केलेल्या एका शोधाबद्दल लिहिलं होतं. तिथे अत्यंत गरीब परिस्थितीत जगणाऱ्या ३३ बालिकांना शाळेत घालतो म्हणून सांगून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका समाजकार्य शाखेने आईवडिलांपासून वेगळं करून नेलं होतं. आईवडिलांनी वात्सल्यावर दगड ठेवून पोरींचं भलं होतंय, त्यांना शिकायला मिळणारे आहे तर जाऊ दे म्हणून नेऊ दिलं होतं. आणि नंतर त्यांच्याशी संपर्कच तुटल्यानंतर कासावीस होऊन त्यांनी आपलं दुःख काही सरकारी अधिकाऱ्यांच्या कानावर घातलं, तिथून ते पत्रकार नेहा दीक्षित यांच्या कानावर गेलं. ईशान्येकडच्या आदिवासी समाजाच्या या कुटुंबांचा हिंदू संघटित धर्माशी काडीचाही संबंध नव्हता. त्यांच्या मुलींना दूरदूर पंजाब, गुजरातमधे नेऊन अजेंडावाल्या शाळांतून दाखल करून हिंदू देवधर्माचे संस्कार करून त्यांना ‘हिंदू खतरे में…’ या अजेंड्यासाठी लढायला तयार केलं जात होतं. त्यांची मूळ मांसाहारी आहार पद्धती बदलून त्यांना जबरीने शाकाहारी बनवण्यात येत होतं.

अगदी थेट असाच प्रकार १९व्या शतकात अमेरिकेत नेटिव अमेरिकन्सच्या मुलांच्या बाबतीत ख्रिस्ताच्या चर्चेसच्या दलालांनीही केला होता. गरीब मुस्लिम मुलांना हेरून मदरशांमधून त्यांना कट्टरपंथी बनवण्याचे प्रयत्न होतात हा देखील याच रांगेतला प्रयत्न असतो. आज तालिबानमध्ये सामील झालेले अनेक तरूण आणि किशोर हे बालपणापासून तालिबानी ‘संस्कारात’ वाढवलेले असतात. त्यांना काफरांना नष्ट करणे, त्यातच मरणे आणि नसलेल्या स्वर्गात जाणे यापलिकडे जगात दुसरं काही आहे हे शिवतच नाही. सनातनसारख्या तथाकथित अध्यात्मिक हिंसक संस्थेत असे बालपोपट तयार केले जात आहेत हे त्यांनीच प्रसृत केलेल्या अनेक व्हिडिओंतून कळू शकते. सर्वच धर्माच्या संस्थांमध्ये हे बीज असते हे पुरेसे स्पष्ट आहे. कुणी स्वतःला महान धर्म म्हणवायला नको.

नवीन भविष्य घडवू शकणाऱ्या मुलांना कालबाह्य धर्मांच्या कोलूला बांधण्याचे हे उद्योग म्हणजे धर्माचा मोठाच उपद्रव आहे.

किशोरवयीन मुले आपल्या धर्माचा, जातीचा अभिमान सांगताना पाहून केवळ वाईटच नाही तर भय वाटतं. उच्चशिक्षण घेतल्यानंतरही जातीतलीच मुलगीमुलगा हवा असा आग्रह धरणाऱ्या मुलामुलींना पाहून वाईट वाटतं. –नाही म्हणजे रहाणीच्या, खाण्यापिण्याच्या सवयी सारख्या असल्या की बरं असतं अशी एक सबब दिली जाते. हे म्हणजे परदेशी फिरायला जायचं पण जेवण अगदी घरच्यासारखं हवं, ते त्यांचं काही आपल्याला आवडत नाही असा नाक वर करून आग्रह धरणाऱ्या टुरिस्टांसारखच आहे. किती वैविध्याला आपण मुकतो याची जाणीवही नसते.

धर्माच्या पगड्याखाली मान मुडपून रहाणारे सारेच जगभराच्या वैविध्याला मुकतात. समुद्र ओलांडायचा नाही हे धर्माने सांगितलं म्हणून आपापल्या आळीत जगत रहाणारे लोक ते हेच.

ख्रिश्चनांच्या किंवा इस्लामच्या धर्माने हे सांगितलं नाही म्हणून कदाचित् ते जगभर पसरले असतीलही.

धर्माने घालून दिलेले नियम, कर्मकांडे, परंपरा पाळताना आणि धर्मासाठी देवांची किंवा प्रेषितांची प्रार्थनास्थळे बांधताना आजवर जगभरात साधनसामग्रीचा किती नाश झाला आहे याची आकडेवारी काढताच येणार नाही इतकी अवाढव्य आहे. यातून टोलेजंग चर्चेस, संगमरवरी मशीदी, शिल्पित संगमरवरी किंवा दगडी मंदिरे, सोन्याचे वर्ख चढलेले कळस, पॅगोडा, प्रतिमा वगैरे फार सुंदर गोष्टी निर्माण झाल्या म्हणणे मला पटत नाही. राजांचे राजवाडे जितके त्यांच्या बळाचे प्रदर्शन म्हणून बांधलेले असतात तितकेच प्रदर्शन धर्माच्या वास्तू आणि मूर्तींतूनही केले जाते. कारण नसताना, बघा आम्ही किती बलाढ्य आहोत, तुम्हाला संपवून टाकू शकतो असाच इशारा त्यातून द्यायचा असतो.

व्हॅटिकनची संपत्ती इतकी प्रचंड आहे की ती करुणामय समजल्या जाणाऱ्या ख्रिस्ताच्या पचनी पडली नसती. आता व्हॅटिकन हे करुणेचे नसून केवळ सत्तेचे आणि इतर राजकीय सत्तांना खेळवण्याचे साधन आहे.

धर्माचे महात्म्य वाढवण्यासाठी संपत्ती-साधनांचा जो विनियोग होतो किंवा उधळपट्टी होते ती कशाकशावर खर्च होते? सामान्यांना दीपवून टाकणाऱ्या धार्मिक वास्तू बांधण्यावरील खर्च, धर्माचे गुरू, पुजारी, आचार्य, आर्चबिशप्स, मुल्ले यांचे अनुत्पादक आणि ऐषारामी रहाणीमान सांभाळण्यासाठी होणारा खर्च. कफन्या घालून जाग्वार, रोल्सरॉईस, मर्सिडिझ, बीएमडब्लूमधून फिरणारे पोंगेपंडित पाहून घ्या. टोलेजंग धार्मिक वास्तू बांधून झाल्यावर त्या वास्तूला शोभतील अशा निरुपयोगी सोन्यारुप्याच्या, रत्नजडित वस्तू, मौल्यवान दागिने चढवलेल्या मूर्ती, इतर प्रतीके वगैरे तळघरांतून ठासून भरण्याचा एक कार्यक्रम होतो. सोमनाथ,पद्मनाभ मंदिर या हिंदू धर्मातील ऐय्याषी तर ख्रिस्ती व्हॅटिकन, नॉत्रदाम ही ठळक उदाहरणे. एका चिवरावर फिरणाऱ्या बुद्धाच्याही सोन्याच्या प्रतिमा केल्या जातात. या धार्मिक वास्तूंचे हिशेब, किंवा इतर प्रशासन सांभाळण्यासाठी अनुत्पादक नोकरभरती होते, प्रचारसाहित्य पुस्तके वगैरेंची छपाई सुरू असते.

धार्मिक वास्तूंच्या किंवा संस्थांच्या भोवती कित्येक मानवी तास वाया जात असतात. शिवाय तिथे जे गुडघे टेकून चालते त्यातून डोकी चालण्यापेक्षा फिरण्याचेच प्रमाण वाढते. फालतू आगापीछा नसलेल्या कथांची पारायणे करण्यात लोक वेळ घालवतात. काहीही उपयोग नसलेल्या प्रार्थना, जपजाप्य हे करणारे लोक त्या वेळात खरोखर काही दुसरे काम करू शकतात. बागेत काम केले तरी खूप झाले…धर्माच्या नावाखाली आजन्म ब्रह्मचर्याच्या शपथा दिल्या जातात. धर्माच्या सैन्यात भरती झालेल्या पुरुषांना आणि स्त्रियांना ही नैसर्गिक भूक दडपणे शक्य नसते. मग कुणातरी निष्पापांचा लैंगिक छळ किंवा लपवाछपवी, ब्लॅकमेल या गोष्टी धर्माच्याच मांडवात सुरू रहातात.

उपासतापास करून शरिराची हानी करून घेणे हा एक आणखी उपद्रव धर्माने तयार करून ठेवला आहे. भारतात अमुकवारी खायचे नाही, तमुक तिथीला उपवास करायचा, महिनामहिनाभर उपवास धरायचे, पाणीही प्यायचे नाही वगैरे महाभयंकर आणि काहीही चांगली निष्पत्ती न देणारे धार्मिक प्रकार म्हणजे एक घराघरात शिरलेला उपद्रव असतो.

भारतात हिंदू धर्मातील उपवास किंवा मांस न खाण्याचे धार्मिक खूळ हे विशेषतः स्त्रियांच्या शरीराला बाधक असते. आई करते म्हणून मुलगी करते, म्हणून सुनेने केलंच पाहिजे हा सगळा वेडाचार शरीराची हानी करतो आणि मग बुद्धीचीही हानी करतो. शरीर आणि बुद्धी चांगली रहायची असेल तर चांगला आहार नियमितपणे घेणे आवश्यक आहे… पण व्रतेवैकल्यांचा बाऊ करणे हे धार्मिकतेचे म्हणजेच पर्यायाने नैतिकतेचे लक्षण मानले जाते.

उपासतापास करणारे लोक वागताना वाईट वागत नाहीत का, वागतात. तरीही त्यांना श्रेष्ठ मानायची आपली एक पद्धत आहे…

धर्माचा उपद्रव हा त्याच्यामुळे लहान मुलांना होणाऱ्या कल्पनासंसर्गामुळे अधिक आहे असं अखेर मान्य करावं लागतं. लहानपणापासून एकाद्या विश्वासाशी संबंध आला की तो विश्वास भिरकावून देणे सर्वांनाच जमत नाही. म्हणूनच पाचसहा मुले असलेल्या एकाच कुटुंबातील एखादेच मूल मोठे होऊन विचारशील, बुद्धीनिष्ठ होते. बाकीची घरातल्या धार्मिक प्रवाहासोबत वाहत, वाहावत जातात.

घरातून इतर धर्मांच्या द्वेषाचे बाळकडू मिळालेली धार्मिक घरातील मुले बाकी जीवनात, इतर विषयांत, व्यवसायात कितीही प्रगती करोत, उत्तम डॉक्टर्स, इंजिनियर्स काय अगदी वैज्ञानिकही होवोत पण लहानपणी मिळालेला द्वेष किंवा पूर्वग्रह त्यांना त्याज्य वाटत नाही. आणि त्यातून काय होते हे सध्या आपण प्रत्यक्ष पाहातो आहोत.

आचरणाचे काही नियमन असावे म्हणून आकाराला आलेल्या धर्मयोजनेचा हेतू केव्हाच संपला आणि फोलपटी धर्म उरला. आजच्या जगात तर आचार धर्म झिजून जाऊन केवळ उपचार धर्म उरला आहे. आणि त्या फोलपटाभोवती चाललेल्या पोकळ अस्मितांच्या लढायांचा अनाचार धर्म. देवाच्या अस्तित्वावरील मूलभूत विश्वासातून आणि मानवी जीवनधर्माला वळण लावण्यातून निर्माण झालेल्या धर्मकल्पना काही काळानंतर किडत गेल्या, कालबाह्य झाल्या. पण त्यांचे समूहमनातील अधिष्ठान कायम राहिले. अज्ञाताची भीती बाळगणाऱ्या कमकुवत मनांवर कब्जा करून त्यांना मनःसामर्थ्य देण्याच्या गोंडस नावाखाली फसवणूक जारी राहिली. जरी जगभरात अनेक निरुपद्रवी आणि सद्वर्तनी ईश्वरश्रद्ध धार्मिक लोक असले तरीही त्यांच्या संख्याबलातूनच धर्माधर्मांतील सत्ताकांक्षी प्रबळांची निर्मिती झाली. मानवजातीची एकंदर घडण पाहिली तर अप्रबुध्दांची संख्या नेहमीच प्रबुध्दांपेक्षा जास्त असते. आणि बुध्दीमान, प्रतिभावान अशी माणसे तर तशी फारच कमी प्रमाणात जन्माला येतात. अनेक बुध्दीमान सत्प्रवृत्त लोकांची प्रज्ञाप्रतिभा जशी या जगाला पुढे नेते, तशीच काही बुध्दीमान धूर्त, दुष्प्रवृत्त लोकांची चलाखी या जगाला आहे तिथेच ठेवून आपल्या हाती सारी सूत्रे ठेवण्याचा प्रयत्न करते किंवा मागे नेऊन जुन्या निर्बुध्दतेचे पिंजरे बळकट करू पाहाते. हे तर आपल्या देशात अगदी प्रयोगशाळेत मांडून ठेवलेल्या प्रयोगासारखे आपल्याला नीट निरखता येते आहे.

देशातील गोरगरीब जनतेच्या कल्याणाचे, कष्टकऱ्यांच्या योग्य मोबदल्याचे, उत्पादक गुंतवणुकीचे अनेक प्रकल्प पैशाच्या पाठबळाच्या प्रतीक्षेत आहेत, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाचे कर्ज देशावर आहे असे असताना धार्मिक अस्मितेच्या ज्वराला खतपाणी घालणाऱ्या प्रचारावर आणि थोतांड प्रकल्पांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो आहे. हा देशाच्या भविष्यावर थेट परिणाम करणारा उपद्रव काही फक्त भाजप आणि त्यांच्या मायबाप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पारड्यात टाकता येणार नाही. त्याचे मूळ आहे ते धर्माच्या उपद्रव शक्तीमधेच. त्यांनी तर केवळ धर्माचे उपद्रवमूल्य बरोब्बर ओळखले आणि त्या आधारावर साऱ्या जुमल्यांचे इमले रचले आहेत. जोवर सामान्य लोकांचे नेतृत्व धर्माचे राजकारण न करता त्यांना धर्माची कालबाह्यता पटवून देत नाही, धार्मिक कार्यक्रमांची निमंत्रणे नाकारत नाही तोवर हे खेळ असेच सुरू रहाणार. धर्मवर्चस्ववादी राजकारण इतक्यात थांबणार नाही. द्वेषाचे फासे टाकत भारताच्या पटावरली सत्तेचा जुगार सुरू राहील. धर्मामुळे दुखावणाऱ्या नाजूकसाजूक वाटणाऱ्या खुनशी भावनामुळे भारत काही दशके मागे गेला आहे. या मूर्खपणाची रक्तरंजित किंमत मोजल्याशिवाय धार्मिक भारतीयांचे डोळे उघडणार नाहीत.

धर्म हा केवढा मोठा धोका आहे हे जनसामान्यांना कळायला कदाचित् अजून एकदोन शतके जातील. तोवर आपण हा धोका आहे हे सांगायला चुकायचे नाही. यात आपला पराभव होतो आहे असेही वाटून घ्यायला नको. हा होमो सेपियन्सच्या सामाजिक-बौद्धिक उत्क्रांतीचा एक दीर्घ टप्पा आहे.

सध्या जेवढे करू शकतो तेवढे करत रहायचे.

किशोरांपर्यंत पोहोचत रहायचे. तीच पुढल्या शहाण्या शतकांची आशा आहे.

सध्या माजलेल्या अविचाराचे पारिपत्य करायलाच हवे.

(लेखिका इंडिया स्टडी सेंटर ट्रस्टच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत)

[email protected]

मुग्धा कर्णिक यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –मुग्धा कर्णिक– type करा आणि Search वर क्लिक करा.