ईश्वराला घडवणाऱ्या कलावंतांच्या आयुष्याची कहाणी

-सारिका उबाळे

लाल लाल फुललेल्या निखाऱ्यांवर एका ग्लासमध्ये द्रवरूपातलं पितळ आहे पिवळंधम्मक. किंचित पांढरट.आत्ता थोड्याच वेळापूर्वी पितळेचे एक भांडं होतं ते जुनं पसरट आकाराचं.दोन्ही बाजूला कड्या असलेलं. कितीतरी पिढ्यांनी स्वयंपाकघरात वापरलेलं .आता तुकड्या-तुकड्यात कापलं जाऊन अवघ्या काही वेळात ग्लासभर पाण्यात परावर्तित झालेलं. आता लगेच ते पाणी काही वेळात मूर्तीत परावर्तित होऊन कुणाच्यातरी देव्हाऱ्यात जाऊन बसणार आहे, देव बनून. एक भांडं किती धर्मात विभागलं जाणार आहे माहित नाही. त्याची जात ठरायची आहे अजून.

एक पेटी आहे छोटीशी, भुसभुशीत, मऊसूत मातीने ठासून भरलेली. त्या मातीत अत्यंत सुबकतेने काही मूर्त्यांचे ठसे घेतेय रुख्सानाबाई शेख.अतिशय बारकाईने, काळजीपूर्वक अन् सराईतपणे. वरून केलेल्या गोल छिद्रातून ते पितळेचं पाणी ओतलं की त्यातून सुंदर आखिव-रेखीव पितळी मूर्त्या येतील आकाराला.प्रत्येक मूर्तीचे धर्म वेगवेगळे असतील मात्र. पावभर पितळेतून चार ते पाच मूर्त्या एकाच साच्यातून जन्माला येतील.मात्र वेगवेगळ्या जाती धर्मांच्या. वेगवेगळ्या पद्धतीने पुजल्या जातील त्या, कुणाच्या डोक्यावर फुले तर कुणाच्या कपाळी चंदन- हळदी -कुंकवाचे बोट, कुणासमोर नुसत्याच मेणबत्त्या तर कोणी विशिष्ट जाती-धर्माचे प्रतीक म्हणून विराजमान होईल हॉलमधल्या शोकेसची शोभा वाढवत.

गणपती, शिवपार्वती, लंगडा कृष्ण, बालाजी, गजानन, रेणूका, लक्ष्मी, बाबासाहेब, विठ्ठलाची वामांगी रुक्मिणी, डोळे मिटलेले बुद्ध, मासोळ्या,कासव सगळे एकाच भांड्यात एकाखाली एक, वर,आडवेतिडवे, निपचित पडलेले आहेत शांत. त्यांना बनवणारे हात गप्पा करत, मुलांवर ओरडत, आजच्या निर्मितीतून किती कमाई होणार, या विवंचनेत आपल्या पालासमोर बसून त्यांना घडवण्याच्या कामात तल्लीन आहेत.

सय्यद शेख समोर असलेल्या विविध आकारातल्या पितळी जर्मन तांब्याच्या भांड्यांना मोठ्या कात्रीने कापून, पेटलेल्या कोळशातील तप्त भांड्यात ते तुकडे टाकून त्याचं पाणी करण्याचं काम करत आहेत. तर रुख्सानाबाई मूर्त्यांचे ठसे घेणे, त्यात गरम केलेलं पितळ ओतणे, पुन्हा माती नीट करून मूर्त्या साफसूफ करून घेणे, पुन्हा ठसे घेणे या कामात व्यस्त आहे. सय्यद शेखच्या बाजूला बसलेली रेहानाबाई मुलाला मांडीवर घेऊन एका हाताने भाता फिरवण्याचे काम करते आहे. ‘ही कोण आहे ?’ भयीन हाय हामची.’ हातातलं काम न थांबवता रुख्सानाबाई म्हणाली.’मांडीवरचं मुल ?’ ‘ हामचंच.’ ‘हे कोण तुमचे ?’ ‘घरवाले’ रुख्सानाबाईच्या घरवाल्याच्या अगदी जवळ शेजारी बसलेली रेहानाबाई तिची बहिण नसून सवत होती हे लक्षात यायला वेळ लागला नाही. ‘तुम्हाला किती मुलं ?’ ‘मला तीन पोरी एक पोरगा.तिला दोन पोरं एक पोरगी.’ ती बोलून गेली. ‘पोरासाठी केलं का तिला ?’ ‘हो! जास्त लपवालपवी न करता ती म्हणाली, ‘मला तीन पोरीच होत्या, तिला केलं, तिला पोरगं झालं. मग मला बी एक पोरगं झालं.’

पालातून आणखी एक लेकुरवाळी बाई बाहेर आली. ती रुख्सानाबाईची मोठी पोरगी. तिचा मुलगा आणि भाता फिरवणाऱ्या रेहानाबाईच्या मांडीवरचा मुलगा जवळपास एकाच वयाचे. पण ते एकमेकांचे मामा भाचे होते. तीन लेकुरवाळ्या बाया, दोन घरातली कामं करणाऱ्या पोरी, पैकी सय्यद शेख म्हणजे दोघींचा नवरा, तिघींचा बाप, आणि एका तान्ह्या पोराचा आजोबा. असं त्रांगडं.

हातभर काचेच्या बांगड्या, डोक्यावर पदर घेऊन त्याच्या बरोबरीने मेहनत करत नांदणार्या या दोन बायका रुख्सार, रेहाना. दोन्ही बायकांची मिळून सात मुलं.कमाई किती तर एका मूर्तीमागे तीस- चाळीस रुपये.दिवसभरात किती मूर्त्या होतील हे ऑर्डरवर अवलंबून.रोज काम मिळेल की नाही याचाही काही भरवसा नाही. घरोघर फिरुन मूर्त्यांच्या ऑर्डर घेणे किंवा कधीकधी तिथेच बसून काम करुन देणे.वर्षभर नवनवीन गावं भटकत फिरतांना मुलांचं शिक्षण,आरोग्य याकडे लक्ष द्यायलाही वेळ नाही.पण वंशाला दिवा मात्र हवाच.

त्यांच्या आजूबाजूला अशीच आणखी पाच-सहा पालं आहेत. दूर कर्नाटकातून बिदरहून इकडे येऊन काम मिळवण्यासाठी गावोगाव फिरणारी ही मुस्लीम तामटकारी कुटुंबं.

गरम झालेलं पितळ रुख्साना बाई तयार करून ठेवलेल्या मातीच्या साच्यात ओतत म्हणते, ‘तुम्हालाबी घेऊन जा बाई कोणती मूर्ती पाहिजेल का’ ‘घ्या कोणती बी. देवाची मूर्ती घ्या, बालाजी घ्या दोनशे रुपयाला, नाहीतर किष्ण घ्या अडीचशे रुपयाला,नाहीतर बाबासाहेब घ्या.’

‘हे गजानन महाराज केवढ्याला ?’ हे तीनशे रुपयाचं पितळ हाय बाई करनावळ धरून साडेतीनशे.’ ‘आणि बाबासाहेब ?’ ते बी तेवढेच साडेतीनशे.’ देऊका  बाई ?’

‘द्या’

‘तुम्ही या बाई फिरून बनवून ठेवतो आम्ही.’ साच्यातल्या मूर्त्यांवरची माती झटकत ती म्हणाली आणि जवळच्या प्लास्टिकच्या भांड्यातलं पाणी मूर्त्यावर शिंपडलं त्याबरोबर गरमागरम मूर्त्या सतेज झळकू लागल्या चकाचक. साच्यातून जोडून निघालेल्या देवांना चिमट्यात धरून तिने मोठ्या कात्रीने खटाखट कापून एकमेकांपासून विलग केलं.आणि साच्याबाहेर सांडलेल्या भुसभुशीत मातीत इकडे तिकडे विखरून पडले देव.

बारीक-बारीक पसरलेले कोळसे, पितळ वितळवून जळून गेलेले रिकामे स्टीलचे ग्लास, पसरट भांडे, पितळेचे तुकडे, भात्याच्या जवळ पडलेले जर्मन- तांब्याचे कापलेले तुकडे, लोखंडी चिमटे, पितळेच्या पाण्यातून मळ- कोळसे बाहेर काढण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी पळी या सगळ्यातून उलट्या सुलट्या पडलेल्या देवाच्या मूर्त्या गोळा रुख्सानाबाई सगळ्या जाती-धर्माचे देव एकत्र करुन एका मोठ्या भांड्यात भरते.

शेजारी एक मोठ्ठा सनमायकाचा तुकडा आहे.  तो वाकल्यामुळे पसरट नावेसारखा आकार आलाय त्याला. त्यात दहा-बारा मुलं दाटीवाटीने बसली आहेत. एका मुलाच्या हातात छडी आहे.आणि एका मुलीने ओढणीची साडी बनवून डोक्यावरून गळ्याभोवती घट्ट पदर लपेटून घेतला आहे डिक्टो रुख्सानाबाई सारखाच. वाटलं की हातात छडी घेऊन शाळा शाळाच खेळतायेत ही मुलं. पण वर्षभर आपल्या आई-बापा सोबत पोटाच्या विवंचनेत गावोगाव फिरणाऱ्या या मुलांच्या डोक्यात शाळा कशी काय असू शकेल ? हे लक्षात यायला जरा वेळच लागला. शाळा, छडी, शिक्षिका असं काही खेळत नव्हती ती मुलं. तर मायका म्हणजे एक वाहन होतं त्यांचं.वेगवेगळ्या गावांची नावं घेऊन छडीवाला मुलगा एकेका मुलाला खाली उतरवत आणि चढवत होता. साडीवाली मुलगी घट्ट पदर लपेटून आपलं सामान चढविण्याचा अभिनय करत होती.’चलो चलो भई जल्दी करो’, ‘उतरो उतरो’,’रुको रुको’, तिकिट-तिकिट’ अशा संवादासोबत, ऑटो, टेम्पो, ट्रक, बस, सामान ठेवणे, चढणे-उतरणे पालाच्या खुंट्या मातीत रोवणे,छत बनवने आजूबाजूचे ट्रॅफिक, रस्ते, भाड्याचे पैसे असं सगळं होतं त्यांच्या खेळण्यात. थोडी मोठी झाली की हीच मुले, मुली बांगड्या, कानातले, वेण्या, कान -नाक टोचणे, सजने-नटणे अशा गोष्टीत, तर मुलं केसांच्या वेगवेगळ्या फॅशन, गुटखा, पान अशा वेगवेगळ्या व्यसनात गुरफटत, पोटाच्या विवंचनेत व्यस्त होऊन जाणार आहेत त्यांच्या आई-बापासारखीच.

एक खूप छोटी दीड-दोन वर्षाची मुलगी आपल्या बाबाच्या कडेवर आहे. पंजाबी ड्रेस, हातात बांगड्या, डोळ्यात काजळ, पातळ केसांच्या बारीक-बारीक वेण्या आणि भांगात सोनेरी चमकी भरलेली आहे तिच्या.पातळ आणि रेशमी केस घट्ट बांधल्यामुळे तिच्या डोकभर पूर्ण चमकीच दिसते आहे चमचम. तिचा बाबा लॉकडाऊन मधले हाल आणि त्यांच्या गावोगाव फिरण्याची गोष्ट आम्हाला उत्साहानेसांगतोय .”ऐसे गाँव गाँव घुमते रह्यते हम ! पिछले पाँच सालसे इधरीच है महाराष्ट्र में ! सिरिफ शादी-वादी करनी हो तोयीच जाते उधर! गाव तरफ बनाते शादी ! फिर घुमते रहते जिधर काम मिला उधर !”

पोरीला कडेवर घेऊन, मान वळवून तोंडातून मावा भरल्या पिचकाऱ्या टाकत खूप काहीबाही सांगतो  तो.आजूबाजूच्या पालातल्या लोकांबद्दल, लॉकडाऊनबद्दल, कोरोनाबद्दल, तांब्या-पितळेची भांडी, मूर्त्या बनवणाऱ्या आपल्या परंपरागत व्यवसायाबद्दल. सय्यद शेखही आपल्या कामात व्यस्त असतांना मान वळवून गुटख्याची पिचकारी टाकून तोंड रिकामं झालं की मधून मधून काही गोष्टीत भाग घेत होता. आणि रुख्साना, रेहानाबाई तल्लीन होत्या तप्त आगीतून देव साकारण्याच्या कामात साडीचा पदर अंगभर लपेटून.

(पूर्वप्रसिद्धी – ‘मिळून साऱ्याजणी’)

…………………………

(सारिका उबाळे या नामवंत कवयित्री आहेत)

9423649202

[email protected]

Previous articleसायबरदुनिया तुमच्यात काय बदलं घडविते?
Next articleधर्मसंस्थेचे उपद्रव
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.