सायबरदुनिया तुमच्यात काय बदलं घडविते?

नीलांबरी जोशी

उठल्यावर ताबडतोब मोबाईलवर मेसेजेस तपासणं आणि रात्री बिंज पध्दतीत एकामागून एक भाग संपवत वेबमालिका पहाणं हे आयुष्य आपल्याला फार फार आवडतं. दरम्यानचा मधला दिवस दर एका मिनिटानं मोबाईलवर इमेल तपासणं, व्हॉटसअॅप तपासणं, अॅमेझॉनवर आजची खरेदीची आॉफर काय आहे हे तपासणं, वेबिनार घेणं किंवा अटेंड करणं, खाण्याचे पदार्थ स्विगीवरुन मागवणं, ते खात असताना मोबाईलवर नवीन व्हिडिओ पहाणं अशा मौलिक(!) गोष्टींमध्ये जात असतोच.

हे सगळं करत असताना एक महत्वाची गोष्ट घडते. ती म्हणजे, आॉफलाईन दुनियेतले तुम्ही आणि आॉनलाईन असतानाचे तुम्ही यात जमीनअस्मानाचा फरक असतो. तुम्ही तुमच्या मुलाला पुस्तक वाचून दाखवताना, कुटुंबियांशी बोलताना, जोडीदाराबरोबर गप्पा मारताना जे काही असता ते आॉनलाईन दुनियेत पूर्णपणे बदलून जाता.

एकतर पृथ्वीवरचं आपलं भौतिक अस्तित्व आणि सायबरदुनिेयेतलं आपलं विश्व ही दोन वेगळी जगं आहेत. या अर्थानं सायबरस्पेस खरी मानायची का भासमान? या प्रश्नाचं उत्तर “हो” असं आहे. मोबाईल फोनवर बोलताना, इमेल चेक करताना, वेबसाईट धुंडाळताना तुम्ही पूर्णपणे वेगळ्या दुनियेत गेलेले असता. आॉनलाईन असताना तुमच्या जाणीवा, भावना, प्रतिसाद आणि तुमचं वागणं वेगळंच असतं.

 उदाहरणार्थ, प्रत्यक्ष आयुष्यात अचूक वेळ पाळणारे लोक आॉनलाईन असताना वेळेचं भान विसरतात. रोजच्या आयुष्यात घड्याळाच्या काट्यांना आयुष्य बांधल्यासारख्या लोकांना नेटवर गेल्यावर मात्र घड्याळात मिनिटं निघून गेली का तास हे सहजी कळत नाही. त्यातला महत्वाचा भाग म्हणजे आॉनलाईन दुनियेत “टाईम डिस्टॉर्शन इफेक्ट” होतो. आॉनलाईन दुनियेत आपल्याला प्रत्यक्षातल्या आयुष्याचा, आपल्या व्यक्तिमत्वाचा आणि आपल्या प्राधान्यक्रमानं करायच्या कामांचा विसर पडतो. आपण तिथे “अॅलिस इन वंडरलॅंड” मधल्या अॅलिससारखं हरवून जातो. वेळेचं भान हरपल्यानं आॉनलाईन असताना गॅसवरची भाजी करपली, मीटिंगची वेळ निघून गेली असं बर््यालचदा होतं.

याचं महत्वाचं कारण म्हणजे सायबरचं विश्व गेल्या २० वर्षात निर्माण झालं आहे. कोणत्याही व्यक्तीला नवीन घरात, नवीन शाळेत, वेगळ्या शहरात किंवा परदेशात गेल्यानंतर आपलं वागणं तिथल्या वातावरणाशी जुळवून घ्यायला लागतं. तसं करताना आपल्यात मानसिक बदल घडवावे लागतात. काही बदल आपोआप घडतात. अशा नवीन ठिकाणी रुजताना एक वेगळं आत्मभान येत जातं. पण त्या जगाशी जुळवून घ्यायला वेळ लागतो. सायबरविश्वाच्या बाबतीत आपलं नेमकं हेच झालं आहे. या बदलत्या सायबरजगात स्वत:ला जुळवून घेणं अनेकांना त्रासदायक ठरतं. यामुळे गोंधळ उडतो. हा गोंधळ काढून टाकण्याचा एक मार्ग म्हणजे याबद्दल जास्तीत जास्त माहिती करुन घेणं. सायबरचं वातावरण आपल्यावर कसा परिणाम करतं ते जाणून घेणं.

पण मुळात आॉनलाईन असताना आपल्यात बदल होतो हे अनेकजण मान्य करत नाहीत. आपल्याच घरात, नेहमीच्या खुर्चीवर, सवयीच्या वस्तू भोवताली विखुरलेल्या असतात. पण आपण कम्प्युटरवर वेगळ्या दुनियेत असतो हे त्यांना मान्य होत नाही. ते प्रत्यक्षात प्रवास करुन कुठेच गेलेले नसतात असं त्यांचं मत असतात. त्याचवेळी सायबरविश्व वेगळं असल्यामुळे वास्तव जगातल्या त्यांच्या जाणिवा, संवेदना सायबरस्पेसमध्ये वेगळ्या प्रकारे काम करतात.

एखादा माणूस सायबरदुनियेत काय काय वापरतो, कोणत्या वेबसाईटस पहातो, कोणत्या जाहिरातींवर क्लिक करतो, कोणत्या वेबसाईटसवर अनेकदा जातो अशा अनेक गोष्टींवरुन तो माणूस सायबरदुनियेत कसा जगतो ते कळतं. तो काय करतो आणि काय करत नाही याचाही पत्ता लागतो. त्या व्यक्तीचं सायबरदुनियेतलं वागणं कसं असेल हे तिचं प्रत्यक्षातलं वय, तिचा शारीरिक आणि मानसिक पातळीवर झालेला विकास आणि व्यक्तिमत्वाचे पैलू अशा गोष्टींवर ठरतं.

 बिहेविअरल मानसशास्त्रज्ञ माणसाच्या प्रत्यक्ष दुनिेयेतल्या वागण्याचं विश्लेषण करुन त्यावरुन त्या व्यक्तीबद्दल निष्कर्ष काढतात. याला “पॅटर्न आॉफ अॅनॅलिसिस” असं म्हणलं जातं. तसेच निष्कर्ष माणूस सायबरस्पेसमध्ये कसा वागतो याबद्दल काढले जातात.

या विश्लेषणावरुन सायबरदुनियेत माणसं कशी वागतात ? का वागतात ? त्यांच्या भावना, विचार आणि वर्तणुकीत कसा बदल होतो यावर “सायबरसॉयकॉलॉजी” ही शाखा काम करते.

“माध्यमं आणि मानसशास्र्” या विषयावरच्या माझ्या आगामी पुस्तकातून – नीलांबरी जोशी – ३ जून २०२१

(नीलांबरी जोशी ‘कार्पोरेट कल्लोळ’ , ‘झपूर्झा’, ‘जिथे मुलांना पंख फुटतात’ आदी गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत)

[email protected]

…………………………

नीलांबरी जोशी यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –नीलांबरी जोशी– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleमूलतत्त्ववादी, सनातनी आणि आधुनिक विज्ञान
Next articleईश्वराला घडवणाऱ्या कलावंतांच्या आयुष्याची कहाणी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.