अशा ठरवून केलेल्या लग्नातही अत्यंत सॉलीड केमिस्ट्री असणार्या, सर्वोतपरी एकमेकांना ओळखणार्या-जाणणार्या, एकमेकांवर भरभरून प्रेम करणार्या असंख्य जोड्या आपल्याभोवती दिसतात. बहुतांश माणसं आपापल्या जोडीदाराशी साध्या, सरळ तर्हेनं घट्ट जोडून घेतात. एकमेकांत घट्टमुट्ट विरघळून जातात. एकमेकांना जपत, एकमेकांची काळजी करत छान संसार करतात. भांडणांवर, रुसव्याफुगव्यांवर प्रेमाचाच उतारा करतात. अत्यंत अनोळखी असलेल्या माणसाशी असे एकरूप होतात की, जणू ते अनोळखी नव्हतेच एकमेकांसाठी. एकमेकांची ही अशीच साथसोबत प्रामाणिकपणे देत-देत कधीतरी त्यातली एक व्यक्ती दुसर्याला एकटं करत एकट्यानंच निघूनही जाते. इतकं सॉलीड बाँडिंग प्रेमाशिवाय झालेल्या लग्नानंतरच्या नात्यात दिसतं आणि मग वाटतं की, लग्नाचा आणि प्रेमाचा संबंध नाहीचयेऽ असं तरी कसं?
‘लव्ह अॅन्ड शुक्ला’मध्ये नुकतंच लग्न झालेला रिक्षा ड्रायव्हर मनू शुक्ला आणि त्याची लाजरी, अबोल बायको लक्ष्मी अशा दोघांच्या लग्नातल्या नव्या-नव्या अवघडलेपणाची गोष्ट आहे. मुंबईच्या चाळीतल्या वन आरकेमध्ये आईवडलांसोबत राहणारं हे जोडपं. लग्नाआधी कसलीही ओळख नाही, बोलणं नाही, एकमेकांविषयी काहीच माहिती नाही, स्वभाव माहीत नाहीत की आवडीनिवडी. यांवर कडी म्हणजे नवीन जोडपं म्हणून त्यांना रात्रीसाठीसुद्धा वेगळी स्पेस नाही. आईवडलांच्या आणि सासरहून भांडून आलेल्या बहिणीच्या बिछान्यासोबतच मध्ये दोन सुटकेसचं पार्टिशन टाकून दिलेली जागा तेवढी त्यांच्या पदरी.
सुरुवातीला लग्नसंबंध प्रस्थापित करण्यासाठी बेचैन असलेला आणि पुढं आपण आपल्या पत्नीला आधी समजून घ्यावं, तिचं मन जाणावं, तिला खूश करावं यासाठी धडपडणारा नवरा… तोही तिच्या प्रेमात पडलेला नाही पण बोलावं, वेळ घालवावा असं मात्र त्याला मनापासून वाटतंय… आणि काही काळानं तीही तुला जाणून घ्यायचंय म्हणत मनापासून पुढाकार घेणारी… हा प्रवास सुंदर आहे. प्रेमात आकर्षण आणि ओढ असावीच लागते. लग्नानंतर अशा तर्हेचे मोमेंटस गोळा करत, त्या क्षणांचा सोहळा करत कित्येक जोडपी प्रेमात बुडून जातात. कुटुंबीयांनीच ठरवून दिलेला जोडीदार असतानाही त्याच्याशी मनानं मनापासून जुळणारी माणसं पाहिली की अरेंज मॅरेजही सुखद वाटायला लागतात.