वसंतराव नाईक: महाराष्ट्राला आकार देणारा द्रष्टा नेता

-मोहन राठोड

वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस राज्यभर कृषीदिन म्हणून साजरा केला जातो. तब्बल सव्वा अकरा वर्षे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा त्यांचा विक्रम अजूनही अबाधित आहे.

    कोणत्या नेत्याने किती काळ नेतृत्व केले, त्यापेक्षा त्याने आपल्या कारकिर्दीत कोणते जनहिताचे निर्णय घेतले,यावरून त्याचे मूल्यमापन होत आसते. १९६२ मध्ये यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला गेले,त्यानंतर मारोतराव कन्नमवार यांना मुख्यमंत्रीपद अल्पकाळ मिळाले. त्यानंतर   ५ डिसेंबर १९६३ रोजी वसंतराव नाईक साहेब मुख्यमंत्री झाले.त्यांच्याकडे राज्याची सूत्रे आली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती होवून तेव्हा जेमतेम साडेतीन वर्ष झाली होती. राज्याची स्थिती अनेक विषयात जेमतेम होती.  सिंचन,ऊर्जा ,शिक्षण ,आरोग्य ,कृषी,उद्योग अशा अनेक विषयात केविलवाणी स्थिती होती . राज्यात सिंचनाच्या सोयी अतिशय अल्प होत्या . वीज फक्त शहरात होती. शिक्षणाच्या सोयीही शहरातच होत्या . आरोग्य विषयात तर फारच केविलवाणी परिस्थिती होती. अन्नधान्याची प्रचंड टंचाई होती. सर्वांना पोटभर अन्न मिळत नव्हते. पारंपरिक शेतीशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय नव्हता.बेरोजगारांना रोजगार नव्हता.

अशा परिस्थितीत वसंतरावांना राज्याची उभारणी करायची होती. तेव्हाचा महाराष्ट्र हा कृषिप्रधान आहे हे लक्षात घेऊन वसंतरावांनी सर्वप्रथम कृषी क्षेत्राला प्राथमिकता द्यायचे ठरवले . तेव्हा महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही कोरडवाहू होती. त्यामुळे त्यांनी पाटबंधारे प्रकल्पावर भर दिला.११ वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळात उजनी,पवना,जायकवाडी,पेंच,अपर पैनगंगा,दूधगंगा,वारणा,गिरणा,मुळा,कुकडी,मांजरा,तिलारी,अपर वर्धा,इटिहाडोह,अपर तापी,लेंडी,पूस असे कितीतरी पाटबंधारे प्रकल्पाचे काम सुरु झाले.

     सिंचनाचे काम सुरू असतानाच कोराडी,खापरखेडा,पारस,परळी येथे त्यांनी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राच्या उभारणीस त्यांनी गती दिली . सिंचनाला विजेची जोड देणे आवश्यक होते.पाटबंधारे व वीज निर्मितीचे काम सुरु असतनाच  शेतात विहीर बांधणीचा धडक कार्यक्रम त्यांनी हाती घेतला.पूर्वी शेतकरी मोटीने शेती भिजवायचे,पण त्याला फारच मर्यादा होती.म्हणून डिझेलवर चालणारी इंजीन शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात देण्याची योजना आणली. किर्लोस्करसारख्या उद्योजकांना त्यांनी पुढे आणले.त्याकाळात किर्लोस्कर डिझेल इंजिन खूप प्रसिद्ध होती. १९६३ साली देशात २० तर महाराष्ट्रात केवळ ६.८%सिंचन क्षेत्र होते. पुधील १० वर्षात महाराष्ट्र १८ टक्क्यांपर्यंत पोहोचला .

 शेती आणि शेतकरी हा वसंतरावांच्या जिव्हाळ्याचा विषय होता.सिंचन,वीज या बाबींना गती देताना त्यांनी नवनवीन बियाणे आणण्यासाठी प्रयत्न केले.१९६५ मध्ये सी,एस.एच-१ हायब्रीड ज्वारी व एच.फोर. कापसाचे वाण हे त्यांचीच देण आहे. त्याचा परिणाम असा झाला की, शेतीतले हेक्टरी उत्पादन खूप वाढले. कृषी क्षेत्राला पूरक असलेल्या  पशुधन,दुग्ध,कुक्कुट पालन,मत्स्य या व्यवसायालाही त्यांनी चालना दिली.

  शेतकऱ्यांना आधुनिक वाण उपलब्ध होऊ लागले.परंतु भविष्यात शेतकऱ्यांची फसगत होऊ नये,म्हणून अकोला येथे महाराष्ट्र राज्य  बियाणे महामंडळाची स्थापना त्यांनी केली.तत्पूर्वी शेतकऱ्यांना शेतीचे तंत्र अवगत व्हावे,या उद्देशाने त्यांनी महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठाची निर्मिती केली.या विद्यापीठातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत  जावे आणि विद्यापीठाच्या शिवार पाहणीसाठी शेतकरी सहजपणाने यावे,हा यामागचा उद्देश होता.

  ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम.एस.स्वामिनाथन हे नाईक साहेबांच्या कार्य कर्तृत्वाची आठवण करताना म्हणतात,”माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी त्याकाळात ‘जय जवान जय किसान’असा नारा देऊन देशात कृषी क्रांतीची ज्योत पेटविली होती,वसंतराव नाईकांनी ती ज्योत सतत तेवत ठेवण्याचे काम केले.”

शेती मालाला चांगला भाव मिळावा म्हणून राज्यात कापूस एकाधिकार खरेदी व ज्वारी खरेदी योजना त्यांनी आणली.शेतकरी मोठ्या कष्टाने पिकवतो. नैसर्गिक संकट आले तर ज्वारी काळी पडते आणि काळी ज्वारी व्यापारी घेत नाहीत,त्यासाठी काळी ज्वारी हमी भावाने घेण्याचा निर्णय त्यांनी  घेतला.या योजनेला त्यावेळी केंद्रीय कृषी मंत्र्यांनीच विरोध केला होता.पण ही योजना किती महत्त्वाची आणि हिताची आहे,हे पटवून देण्यात ते यशस्वी झाले.नंतर हीच योजना देशभर लागू करण्यात आली. कापूस एकाधिकार योजना ही ख-या अर्थाने शेतकऱ्यांच्या मालकीची होती.कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक होते, म्हणून ही योजना अस्तित्वात आली.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या गाठीला चांगले दर मिळाले तर शेतकऱ्यांना तेव्हा बोनस मिळायचा आणि तोटा आला शासन सहन करायचे.

  रोजगार हमी योजनाही शेती आणि शेतमजुरांशी  निगडीत होती.चार महिने शेतीचे सोडले तर ८०% शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांच्या हाताला काम नसायचे. त्यावेळी भयंकर दुष्काळही पडला होता.ही योजना एवढी यशस्वी झाली की,त्याळात झालेली दुष्काळी रस्त्यांची कामे नंतर बारमाही व पक्की झाली.हजारो छोटे-छोटे बंधारे झाले.बांदबंधिस्तांची कामे झाली.परिणामी विहिरीतील पाण्याची पातळी वाढली.कामाची हमी मिळाल्याने लोकांमध्ये आत्मनिर्भरतेची भावना निर्माण झाली.

  वसंतराव खरिप हंगामाची बैठक कृषी विद्यापीठांमध्ये घेत. कृषी शास्त्रज्ञांशी चर्चा करत. नवीन कोणते वाण आले?आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी परिस्थिती आहे,यावर ते चर्चा करत. दरवर्षी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत देशातील मुख्यमंत्र्यांची राष्ट्रीय विकास परिषदेची बैठक होत असते.त्याबैठकीत राज्याच्या दृष्टीने विकास आराखडा मांडला जातो.त्याकाळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष असायचे.पंतप्रधानांनाही उत्सुकता असायची.

   आज जिल्हा स्तरावर ज्या जिल्हा नियोजन समित्या स्थान झाल्या,या वसंतरावांच्या संकल्पनेतून अस्तित्वात आल्या आहेत.दिल्लीत बसून ग्रामीण भागाचे नियोजन कसे करता येईल? असे त्यांनी ठणकावून सांगितले होते. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले .त्यावेळी  देशाचे साक्षरतेचे प्रमाण केवळ १४% होते.गोरगरीबांना शिक्षण मिळावे,यासाठी वसंतरावांनी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात शाळा सुरू केल्या.तसेच आदिवासी व भटके -विमुक्त जमातीतील मुलांना मोफत शिक्षण मिळावे,म्हणून राज्यात निवासी आश्रम शाळा सुरू केल्या.आज राज्यात शेकडो आश्रम शाळा आहेत.आश्रम शाळेमुळेच वंचित घटकातील मुले शिक्षण घेऊ शकले.शिक्षणाशिवाय समाजाची व राज्याची प्रगती होणार नाही,याचे त्यांना भान होते.आय.टी.आय. व तंत्र निकेतन त्यांच्याच काळात सुरू झाल्या.ग्रामीण भागातील मुलांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे,या कल्पनेतून त्यांनी विभागवार पब्लिक स्कूल सुरू केल्या.

    भटक्या-विमुक्तांची मुले आश्रम शाळेत शिकून बाहेर पडतील?पण पुढे काय ?महाविद्यालयीन शिक्षण ते घेऊ शकतील का? हा मोठा प्रश्न होता.भारत सरकारची शिष्यवृत्ती तर केवळ अनुसूचित जाती व जमातीच्याच मुलांना मिळत होती.त्यावर उपाय म्हणून त्यांनी भारतीय राज्य  घटनेच्या कलम १६(४)( ब) चा आधार घेऊन राज्यात एस.सी.,एस.टी.प्रमाणे व्ही.जे.एन.टी.ही तिसरी सूची निर्माण करून शिक्षण व नोकरीत चार टक्के आरक्षण देण्याचा दूरगामी निर्णय घेतला. त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही भारत सरकारची शिष्यवृती मिळू लागली.शिक्षण शुल्क माफीबरोबरच विद्यार्थ्यांना दरमहा ७० रुपये मुलांना मिळायचे,म्हणून या समाजातील  मुले शिक्षण घेऊ शकले. आज वंचित घटकातील जे डॉक्टर,इंजिनिअर,प्राध्यापक ,अधिकारी दिसतात, त्यामागे वसंतराव नाईक साहेबांची दूरदृष्टी आहे .

तेव्हा आदिवासींना  नोकरी व शिक्षणात सरसकट सवलती नव्हत्या.उदाहरणच द्यायचे झाले तर यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील ज्या जमातीला नोकरी व शिक्षणात सवलत असायची त्याच जमातीतील लोकांना अन्य ठिकाणी सवलती नसायच्या. मात्र नाईक साहेबांनी महाराष्ट्रापुरते हे क्षेत्रीय बंधन उठविले होते.नंतर  १९७६ मध्ये भारत सरकारने हे क्षेत्रीय बंधन उठविले.त्याकाळात हा दूरगामी निर्णय घेतला नसता तर महाराष्ट्रातील आदिवासी बांधव शिक्षणापासून कोसो दूर राहिले असते.

  माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार म्हणतात, ‘नाईक साहेबांनी महाराष्ट्राला दिशा दिली.साठच्या दशकात महाराष्ट्रात म्हणावे तसे उद्योग भरभराटीला आले नव्हते,उत्तर प्रदेश हे उद्योगाचे केंद्रबिंदू होते.त्यामुळे नाईक साहेबांनी  कृषीबरोबरच उद्योगाही चालना दिली.त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे मुंबई व अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग आले.कृषीवर आधारित सूत गिरण्या ,दुग्ध उत्पादन सुरू झाले.दुष्काळावर मात कशी करायची, याचे धडे वसंतरावांनी महाराष्ट्राला दिले.’

   वसंतरावांनी जवळपास एक तप राज्याचे नेतृत्व केले.त्यापूर्वी विविध  खात्याचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले होते.भाषावार प्रांत रचनेपूर्वी ते मध्य प्रांतात रविशंकर शुक्ला यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते.१९५२ सालच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ते पुसद विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले होते .त्याआधी १९४३ साली ते पुसदचे नगराध्यक्ष होते.राज्य पुनर्रचनेनंतर जुन्या मुंबई राज्यात सहकार,कृषी व दुग्ध विकास मंत्री होते.राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी १९४१ मध्ये अमरावतीत त्यांनी पंजाबराव देशमुख यांच्याबरोबर वकिली व्यवसाय केला होता.

  वसंतरावांच्या कारकिर्दीला कधीही गालबोट लागले नाही. मनमोकळा स्वभाव,आर्जवी व मृदू वागणूक ,हसतमुखाने कोणालाही आपलेसे करून घेण्याच्या हातोटीमुळे त्यांच्या सहवासात येणारी माणसं त्यांच्या प्रेमात पडत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,आचार्य विनोबा भावे,लोकनायक बापूजी अणे,पं.जवाहरलाल नेहरू,लालबहादूर शास्री,यशवंतराव चव्हाण आदी महनीय व्यक्तींनी देखील त्यांच्या शालीन व  सुसंस्कृतपणाचा वेळोवेळी गौरव केला आहे.

  नाईक साहेबांचे मुख्यमंत्री पद सगळ्या कसोट्यांवर उतरले होते. महाराष्ट्रातील दिग्गज राजकारण्यांना सांभाळत त्यांनी राज्यकारभार चालविला.त्यांचा कुठेही उपमर्द होणार नाही,याची काळजी त्यांनी घेतली . सर्वांचा आदर करतांना त्यांनी स्वतःच्या व्यक्तित्वाचे वेगळेपण, छाप कायम राखली . कोणत्याही निर्णयासाठी दिल्लीकरांची ते वाट पाहत नसत. तोंडातला पाईप जेवढ्या सहजतेने शिलगवावा तेवढयाच सहजपणे ते त्यांच्या समोरील  जटील प्रश्न सोडविताना राज्याला दिसले. प्रश्नांच्या ओझ्याने ते वाकल्याचे किंवा अवघडलेपणामुळे त्यांची स्वच्छ दृष्टी  झोकाळल्याचे कधी दिसले नाही.

    नाईक साहेबांच्या जीवनाला एक देखणी सांस्कृतिक बाजूही होती. ते चांगले व चोखंदळ वाचक होते.इंग्रजी व मराठी ग्रंथाचा मोठा संग्रह त्यांच्याकडे होता. १९७३ मध्ये त्यांच्या पुढाकारामुळेच यवतमाळ येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. ग.दि.माडगूळकर त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्या संमेलनात बोलतांना नाईक साहेबांनी ‘ग्रामीण महाराष्ट्राचे आणि त्यांच्या व्यथा वेदनाचे चित्र मराठी साहित्यात उमटू द्या’,असे आवाहन साहित्यिकांना केले होते.

 नाईक साहेबांच्या काळात महाराष्ट्रावर कोयनेचा भूकंप,१९७२ चा दुष्काळ  अशीअनेक संकटे आलीत. पण प्रत्येक संकटाचा सामना त्यांनी  धीरोदात्तपणे केला.  सर्व कसोट्यांना ते पुरून उरलेत त्यामुळेच त्यांची कारकीर्द देदीप्यमान व संस्मरणीय राहिली.

(लेखक राज्याचे माजी माहिती उपसंचालक आहेत)

9423848545

Previous articleबायडेन , पवार आणि माध्यमांची अगतिकता !
Next articleवसंतराव नाईक :वर्तमान व भविष्याची वाट प्रशस्त करणारा नेता
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here