वसंतराव नाईक :वर्तमान व भविष्याची वाट प्रशस्त करणारा नेता

(साभार: साप्ताहिक ‘साधना’)

……………………………………..

-सुरेश द्वादशीवार

यशवंतरावांच्या पश्चात कन्नमवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद स्वीकारणे हा तेव्हाच्या प्रस्थापित परंपरेचा भाग असला तरी कन्नमवारांपाठोपाठ वसंतराव नाईकांनी त्या पदावर येणे हा परंपरेचा वा साध्या योगायोगाचा प्रकार नव्हता. आरंभी राजकीय वाटलेली पण पुढे यशस्वी झालेली ती यशवंतरावांची योजना होती. 1962च्या भारत-चीन युद्धानंतर पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी यशवंतरावांना देशाचे संरक्षणमंत्रीपद देऊ केले. त्यावेळी दादासाहेब  कन्नमवार हे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदावर होते. विदर्भ राज्याची मागणी मागे टाकून आपल्या पन्नासावर आमदार-सहकाऱ्यांसह विदर्भाचे महाराष्ट्रात विलिनीकरण करायला ते तयार झाले होते. शिवाय ते एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्रीपद चालून यायला वसंतरावांच्याजवळ यातले काहीएक नव्हते.

1956 मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याच्या यशवंतराव मंत्रिमंडळात त्यांनी कृषी, सहकार व महसूल मंत्री म्हणून काम केले होते. त्यांच्या मागे स्वातंत्र्यसंग्रामाचे लखलखीत वलय नव्हते. अनुयायी म्हणविणाऱ्या लोकप्रतिनिधींचा वर्ग नव्हता. राज्यातील कोणतीही मोठी जात संघटित स्वरूपात त्यांच्यासोबत नव्हती. ते ज्या बंजारा समाजातून आले होते तो भटक्या व विमुक्तांचा वर्ग संख्येने लहान, अशिक्षित व मागासलेला म्हणून ओळखला जाणारा होता. अशा वर्गातून आलेले एक यशस्वी वकील, स्वच्छ चारित्र्याचे, हंसतमुख लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर आपल्या कर्तृत्वाची छाप उमटविणारे मंत्री एवढीच त्यांची ओळख होती. यशवंतरावांसारखे ते लोकनेते नव्हते आणि कन्नमवारांसारखी लोकप्रियता त्यांच्याजवळ नव्हती… तरीही त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर आणणे हा यशवंतरावांच्या राजकीय दूरदृष्टीचा व चाणाक्ष नेतृत्वाचा निर्णय होता.

यशवंतरावांनंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर यायला प. महाराष्ट्रातील मराठा नेत्यांचा एक वर्ग तेव्हाही सज्ज होता. बाळासाहेब देसाई हे त्यात अग्रेसर होते. यशवंतरावांसारखेच सातारा जिल्ह्यातून आलेले बाळासाहेब त्यांच्याहून वयाने वडील होते. राजकारणातील ज्येष्ठता, स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग आणि सोबत असलेली मराठा समाजाची संघटित ताकद या बळावर राज्याचे मुख्यमंत्रीपद आपल्याकडे येईल ही त्यांची समजूत योग्य म्हणावी अशीही होती. (संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्यावेळी ‘हे मराठी राज्य की मराठा राज्य’ असा अग्रलेख लिहून ग.त्र्यं. माडखोलकरांनी या राज्यावरील मराठा वर्चस्वाची जाणीव तेव्हा साऱ्यांना करूनही दिली होती.) तसे बाळासाहेब तेव्हा व नंतरही मुख्यमंत्र्याच्या थाटात असत व तसेच बोलत.

वसंतराव नाईक या मराठी व मराठा राजकारणाला तोवर बऱ्यापैकी अपरिचित असलेल्या नेत्याची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी या पार्श्वभूमीवर झालेली निवड हीच त्यांच्यासमोर असणारी राजकीय व प्रादेशिक आव्हाने स्पष्ट करणारी बाब होती. त्यांच्या पदोन्नतीमुळे खट्टू   व रुष्ट झालेले मराठा नेतृत्व आपलेसे करणे आणि स्वतःचे वैदर्भी व मागासवर्गीय असणे महाराष्ट्राच्या गळी गोड करून उतरविणे हा त्यांच्यासमोरचा प्राथमिक प्रश्न होता. कन्नमवारांपाठोपाठ विदर्भातून आलेल्या नाईकांना मुख्यमंत्रीपद देण्याचा यशवंतरावांचा निर्णय मराठा समाजाचा रोष त्यांच्यावर ओढवणाराही होताच. यशवंतरावांना स्वजातीय नेत्यांचा भरवसा नाही आणि आपल्यामागे ती माणसे आपले राजकारण चालवतील असा विश्वास त्यांना वाटत नाही अशी टीका त्या काळात त्यांच्यावर झाली हेही येथे लक्षात घ्यायचे.

मात्र तेव्हाची काँग्रेस संघटना आजच्याहून अधिक सघन व नेतृत्वनिष्ठ असल्याने आणि तीत यशवंतरावांचा शब्द बऱ्याच अंशी प्रमाण असल्याने वसंतरावांना या अडचणींवर मात करणे जसे शक्य झाले तसा त्यांच्या त्या महाराष्ट्रविजयात त्यांच्या स्वभावातील खुल्या वृत्तीचा, आर्जवी व मृदु वागणुकीचा आणि हंसतमुखाने कोणालाही आपलेसे करून घेण्याच्या हातोटीचाही वाटा मोठा होता. लोकनायक बापूजी अण्यांपासून यशवंतरावांपर्यंतच्या सगळ्या थोरामोठ्यांनी वसंतरावांचे शालीन व सुसंस्कृतपण यांचा गौरव करताना त्यांना ‘अवघड स्थितीतही आपले सत्प्रवृत्त मन जपणारा नेता’ असे म्हटले आहे. त्यांचा गौरव करताना अत्रे आणि मृणाल गोरे यासारख्या विरोधकांनीही हातचे फारसे राखलेले कधी दिसले नाही. जुन्या मध्यप्रांत व वऱ्हाडच्या विधिमंडळातील लोकप्रतिनिधी व उपमंत्री या नात्याने प्रशासनाशी त्यांची असलेली ओळख जुनी व पक्की होती. शिवाय ते कामालाही वाघ होते. तब्बल 11 वर्षे वसंतराव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर होते आणि तो सारा काळ आजच्या भाषेत 24 × 7 असे काम करीतच त्यांनी घालविला.

वसंतरावांकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद सोपविण्यामागे तोवर विझलेली वेगळ्या विदर्भ राज्याची चळवळ हेही एक कारण अर्थातच होते. लोकनायक बापूजी अणे, जांबुवंतराव धोटे आणि त्र्यं.गो. देशमुख हे त्या चळवळीचे तीन प्रमुख नेते यवतमाळ या वसंतरावांच्या जिल्ह्यातून आले असणे ही बाबही त्या निवडीला कारण ठरणारी होती. राज्य पुनर्रचना आयोगाने मान्य केलेली विदर्भ राज्याची मागणी त्या प्रदेशाला विसरायला लावण्याचे एक गणितही त्या निवडीमागे होते. वसंतरावांच्या मागे राजकीय कार्यकर्त्यांचा कोणताही गट व वर्ग नसल्याने त्यांचे मुख्यमंत्रीपद आपल्याला डोईजड होणार नाही असाही पश्चिम महाराष्ट्रातील कर्त्या नेत्यांचा एक कयास असावा… वसंतरावांचे मुख्यमंत्रीपद या सगळ्या कसोट्यांवर उतरले.

एक गोष्ट मात्र खरी, आपल्याकडून असलेल्या महाराष्ट्राच्या वजनदार नेत्यांच्या अपेक्षा जपताना वसंतरावांनी स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपण आणि त्याची स्वतंत्र छाप याही गोष्टी कायम राखल्या. कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयासाठी ते यशवंतरावांच्या किंवा दिल्लीकरांच्या संमतीसाठी थांबले आहेत असे त्यांच्या कारकीर्दीत कधी दिसले नाही. तोंडातला पाईप जेवढ्या सहजपणे शिलगवावा तेवढ्या सहजपणे ते त्यांच्यापुढचे जटील प्रश्न सोडविताना राज्याला दिसले. त्या प्रश्नांच्या ओझ्यांनी ते वाकल्याचे वा त्यांच्या अवघडपणामुळे त्यांची स्वच्छ दृष्टी झाकोळल्याचे कधी दिसले नाही. या काळात महाराष्ट्रावर अनेक मोठी संकटे आली. कोयनेचा भूकंप व सत्तरच्या दशकातील अभूतपूर्व दुष्काळासारखी काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित. या काळात वसंतरावांनी राज्याला जे धीरोदात्त नेतृत्व दिले आणि राजकीय व प्रशासकीय व्यवहारच नव्हे तर जनतेचे मनही आपण जाणतो याची जी ओळख महाराष्ट्राला पटविली ती जनमानसातील त्यांच्याविषयीचा आदर व विश्वास उंचावणारी होती…

कोयनेच्या भूकंपाआधी राज्याच्या राजकारणातही एक भूकंप झाला होता. बाळासाहेब देसायांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पाटणचा रस्ता धरला होता. मुंबईतील गिरणी कामगारांच्या एका मोर्च्याने हिंसक वळण घेतले तेव्हा त्याच्या बंदोबस्तासाठी गोळीबाराचा आदेश द्यायला बाळासाहेबांनी नकार दिला होता. त्यामुळे संतापलेल्या मुंबई काँग्रेसने त्यांच्याविषयीची नापसंती दर्शविणारा ठराव केला तर होमी तल्यारखान आणि कैलास या मंत्र्यांनी त्याचसाठी त्यांचे राजीनामे मुख्यमंत्री वसंतराव नाईकांकडे सोपविले. त्या प्रकारात तडजोड करण्यासाठी वसंतरावांनी स.का.पाटील या तेव्हाच्या मुंबईच्या वजनदार नेत्याची मध्यस्थी वापरली व त्या दोन मंत्र्यांना त्यांचे राजीनामे मागे घ्यायला लावले. दुसरीकडे बाळासाहेबांचे मन वळवून त्यांना गृहखात्याऐवजी महसूल खाते घ्यायला राजी केले. हा सारा खटाटोप त्यांना नसलेल्या राजकीय अनुभवाची परीक्षा घेणारा आणि तीत पास करणारा होता…

बाळासाहेबांना देऊ केलेले आणि त्यांना आरंभी न आवडलेले महसूल मंत्रीपद दुसऱ्या अर्थाने मात्र कमालीचे उपयोगाचे ठरले. ते पाटणमध्ये असतानाच कोयनेचा भीषण भूकंप झाला. महसूलमंत्री म्हणून वाट्याला आलेले सगळे अधिकार वापरून बाळासाहेबांनी भूकंपग्रस्तांसाठी जे काम केले ते अलौकिक म्हणावे असे होते. साऱ्या जगातून भूकंपपीडितांसाठी त्यांनी मदत आणली आणि त्यात घरे गमावावी लागलेल्या लोकांसाठी सत्तर हजार घरे बांधूनच ते मुंबईत परत आले. त्या सबंध काळात वसंतराव बाळासाहेबांच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहिले व त्यांच्या सगळ्या कामात त्यांना पडेल ती मदत करायला सदैव सज्जही राहिले. (या काळात बाळासाहेबांनी सरकारकडे 1 हजार घोंगड्या पाठवा म्हणून केलेली तार ‘1 हजार कोंबड्या पाठवा’ म्हणून मुंबईत अवतरली. तेव्हाच्या शहाण्या प्रशासनाने तिची शहानिशा न करता तेवढ्या कोंबड्या पाठविल्याही. खरा प्रकार लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी संबंधितांची जी जबर कानउघाडणी केली तो प्रसंग त्या भीषण आपत्तीतही साऱ्यांना हसायला लावणारा ठरला.)

सेनापती बापटांनी त्याच काळात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर सीमाप्रश्नावर आपले बेमुदत उपोषण मांडले. सेनापतींना सारा महाराष्ट्र भीष्माचार्य म्हणून शिरावर घेणारा होता. स्वाभाविकच सारे राजकारण त्यांच्या उपोषणाने ढवळून निघाले. सेनापतींचा निग्रह आणि राज्य सरकारचा नाइलाज यातून मार्ग कसा निघतो या चिंतेने साऱ्यांना ग्रासले असतानाच वसंतरावांनी सेनापतींची त्यांच्या उपोषणात मंडपात जाऊनच भेट घेतली. ते ज्या प्रश्नासाठी लढत आहेत त्यासाठी केंद्राकडे स्वतः मध्यस्थी करण्याची त्यांनी तयारी दाखविली. वसंतरावांच्या आर्जवातील प्रामाणिकपणाने सेनापतीच विरघळले. त्यांनी उपोषण तर सोडलेच आणि तेवढ्यावर न थांबता मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून त्यांचे एक दिवसाचे आतिथ्यही ‘वर्षा’वर जाऊन त्यांनी अनुभवले… आचार्य अत्रे ही त्याही काळात महाराष्ट्र सरकारला भेडसावणारी प्रातिभ शक्ती होती. सरकारवर घणाघाती प्रहार करण्याचे त्यांचे काम तेव्हाही सुरू होते. त्यांच्या वारांची धार कमी करायला वसंतरावांनी त्यांना आपल्याकडे जेवायला यायचे आमंत्रण दिले. जेवणातले आचार्यांसमोरचे ताट आणि वाटी वेगळी व चांदीची होती. आचार्यांनी त्याचे कारण विचारले तेव्हा ‘हे ताट वत्सलाबाईंनी त्यांच्या भावासाठी घेतले होते’ असा खुलासा वसंतरावांनी केला.वत्सलाबाईंचे भाऊ तेव्हा दिवंगत झाले होते. वत्सलाबाईंनी आपल्या भावाच्या जागी आपली स्थापना केल्याचा गहिवर मग आचार्यांनाच आवरता आला नाही.

मृणाल गोऱ्यांच्या नेतृत्वात त्याच काळात निघालेल्या एका लाटणे मोर्चाने मुख्यमंत्र्यांची गाडी रस्त्यात अडविली. त्यातली एक मोर्चेकरीण त्या गाडीच्या बॉनेटवर चढून बसली व तिने त्या गाडीवरील तिरंगी झेंड्याचा स्तंभच त्या झेंड्यासह उपटून हातात घेतला. आपल्या कार्यकर्तीने केलेली चूक मृणालताईंनी नंतर दुरुस्त केली. तो झेंडा त्याच्या स्तंभासह घेऊनच त्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या दालनात भेटायला गेल्या. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, त्यांनी हातात दिलेला राष्ट्रध्वज वसंतरावांनी ज्या अदबीने स्वीकारला ती त्यांच्या विनम्रतेएवढीच त्यांच्या मनातील राष्ट्रभक्तीची खूणगाठ पटवून देणारी होती… जांबुवंतराव धोटे हे वसंतरावांसारखेच यवतमाळचे. विदर्भवादी आणि वसंतरावांचे नको तसे घोर टीकाकार. त्यांनी वसंतरावांवर मोर्चे नेले, त्यांच्या गाड्या अडविल्या, सभा मोडल्या आणि ते सदैव अस्वस्थ राहतील असेच आपले राजकारण आखले. या जांबुवंतरावांची आई रुग्णावस्थेत मुंबईच्या इस्पितळात दाखल असताना तिला भेटायला प्रत्यक्ष मुख्यमंत्रीच एकदा तेथे हजर झाले. त्या घटनेने जांबुवंतरावांनाही वसंतराव समजले व त्यांचा त्यांना असलेला विरोध मग पूर्वीएवढा टोकाचा व धारदार राहिला नाही.

पण वसंतरावांनी केवळ अनुनयाचेच राजकारण केले नाही. कोणत्याही चांगल्या भटक्या विमुक्ताचा असतो तसा त्यांचा कणा राजकारणात ताठ होता आणि त्यांची मानही त्यात झुकलेली कधी कोणाला दिसली नाही. स्वतः शेतकरी असलेल्या वसंतरावांनी महाराष्ट्रात हरितक्रांती घडवून आणण्याचा ध्यास घेतला. तो घेताना ‘एक वर्षात राज्याचा अन्नधान्याच्या क्षेत्रातला अनुशेष संपविला नाही तर मला फासावर चढवा’ अशी घोषणाच त्यांनी पुण्याच्या जाहीर सभेत केली. लोकशाहीतल्या राज्यकर्त्याने तसे आततायीपण करू नये हा यशवंतरावांचा सल्लाही त्यावेळी त्यांनी मनावर घेतला नाही.

त्या वर्षात व नंतरच्या काळात महाराष्ट्रात शेती व सिंचनाच्या क्षेत्रात त्यांनी जे अतोनात परिश्रम घेतले त्याचा परिणाम हे राज्य सुजलाम सुफलाम होण्यात झालेलाच मग देशाला व जगाला दिसला… कधी नव्हे तेवढा जीवघेणा दुष्काळ 1971च्या सुमारास महाराष्ट्रात पडला. ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांएवढीच घरंदाज माणसेही रस्त्यावर आलेली तेव्हा दिसली. त्या संकटात न डगमगता सगळ्या पक्षांना सोबत घेऊन वसंतरावांनी रोजगार हमी योजनेची महत्त्वाकांक्षी मुहूर्तेढ महाराष्ट्रात रोवली. लाखोंना रोजगार मिळवून दिला आणि कोट्यवधींना जगण्याचे बळ प्राप्त करून दिले. रोजगार हमी ही त्यांची योजना नंतर साऱ्या देशाने स्वीकारली. आताची महात्मा गांधी रोजगार हमी योजना (नरेगा) ही तिचीच विस्तारित व राष्ट्रीय आवृत्ती आहे.

यशवंतरावांनी चालना दिलेल्या सहकाराच्या चळवळीला वसंतरावांनी पुढली 11 वर्षे बळ दिले. महाराष्ट्राचे ऊस उत्पादन वाढले. त्यातून साखरेचे शंभरावर कारखाने उभे राहिले. द्राक्षाच्या शेतीला प्रोत्साहन देण्याचे कामही त्यांचेच. द्राक्षांची निर्मिती व आजचे वायनरीचे उद्योग त्यातून आले. दुधाचे उत्पन्न वाढावे, शेतकऱ्यांना उत्पन्नाची जास्तीची साधने उपलब्ध व्हावी या प्रयत्नांना चालना देण्याचे कामही त्यांचे… विदर्भातील कापूस उत्पादकांसाठी सुरू झालेली कापूस ते कापड ही एकाधिकार खरेदी योजना त्यांच्याच कारकीर्दीतील. तिने शेतकऱ्यांना सावकारांच्या तावडीतून सोडवण्याचे क्रांतिकारी कार्य आरंभी केले.

वसंतरावांच्या धोरणानुसार ती तशीच पुढे चालू राहिली असती तर राज्यातला कापूस उत्पादक शेतकरी एक दिवस कापडाचा उत्पादकही झाला असता… या साऱ्या कामातून वसंतराव यवतमाळ वा विदर्भाचे प्रतिनिधी न राहता महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेचे विश्र्वसनीय नेते बनले. बळवंतराय मेहता समितीने देशात सत्तेच्या विकेंद्रीकरणाची योजना आणली आणि 1962 मध्ये तिचा भव्य प्रयोग महाराष्ट्रात सुरू झाला. नंतरची बारा वर्षे त्या योजनेची पायाभरणी भक्कम करण्यात व पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या कामाला आजचे वळण देण्यात त्यांचा वाटा मोलाचा होता. महाराष्ट्राच्या ग्रामीण कार्यकर्त्यांशी याच कामातून त्यांचे संबंध दृढ झाले व खेड्यांना त्यांचा विश्वासाचा साथी मिळाला.

वसंतरावांच्या जीवनाला एक देखणी सांस्कृतिक बाजूही होती. ते चांगले व चोखंदळ वाचक होते. उत्तमोत्तम मराठी व इंग्रजी ग्रंथांचा त्यांचा संग्रह मोठा होता. त्यांच्या भाषणात त्या ग्रंथांचे दाखले येत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राशीही त्यांनी जवळचा संबंध ठेवला होता. 1973 मध्ये यवतमाळात 49 वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन  भरले होते. वसंतरावांचे पुतणे सुधाकरराव त्याचे स्वागताध्यक्ष, ते स्वतः प्रमुख पाहुणे, यशवंतराव उद्‌घाटक तर ग.दि. माडगूळकर हे अध्यक्ष होते. ‘ग्रामीण महाराष्ट्राचे व त्याच्या व्यथा वेदनांचे चित्र मराठी साहित्यात जरा उमटू द्या’ हे त्यावेळच्या भाषणात मराठी सारस्वतांना त्यांनी केलेले कळकळीचे आवाहन आजही अनेकांच्या स्मरणात राहिले आहे… तेव्हाची ही आठवण. मंत्री आणि पदाधिकारी तेव्हा आजच्या एवढे तोऱ्यात राहात नसत आणि सामान्य माणसांपासून त्यांना तोडणारी सुरक्षा व्यवस्थाही त्या काळात आजच्या एवढी भक्कम नसे. संमेलनाचे उद्‌घाटन आटोपले होते आणि मंडपासमोरच्या चौकात एका बाजूला उभे राहून संमेलनाध्यक्ष, उद्‌घाटक आणि प्रमुख पाहुणे उभ्या उभ्याच गप्पा करीत रेंगाळले होते. पोलीस व्यवस्था दूर होती, संमेलनाला आलेली माणसे पुढाऱ्यांपर्यंत सहज जात-येत होती. वसंतरावांनी त्यांचा तो प्रसिद्ध पाईप पेटवायला घेतला आणि कोणाच्या काही लक्षात येण्याआधी डोक्यावर गाठोडे घेतलेला एक ग्रामीण माणूस लगबगीने त्यांच्यापर्यंत पोहचला. त्याने मुख्यमंत्र्यांना काय मागावे? तो म्हणाला, ‘जरा माचिस दे की बाबा’.

त्याच्या हातात त्याची विझलेली विडी होती. वसंतरावांनी त्याला क्षणभर न्याहाळले आणि काहीएक न बोलता आपल्या जवळच्या लायटरने त्याची विडी तिथल्या साऱ्यांसमक्ष पेटवून दिली. तो ग्रामीण माणूस आला तसाच परतलाही. त्याला अडवून एका पत्रकाराने विचारले, ‘तुझी विडी पेटविणारे कोण होते, ठाऊक आहे का तुला?’

‘नाही बा.’ तो भाबडेपणाने म्हणाला.

‘वसंतराव नाईक. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.’ पत्रकाराने त्याला सांगितले.

‘बापारे, म्हणजे त्या फुलसिंग नाईकाचा लेक?’ तो तेवढ्याच सहजपणे उद्‌गारला आणि चालू लागला… तेव्हाचे नेते जनतेच्या केवढे जवळ होते त्याचा हा साक्षात्कार.

वसंतरावांच्या व्यक्तिमत्त्वातले साधे माणूसपण असे अनेक प्रसंगांनी प्रगट व्हायचे. कधीकधी ते त्यांच्या नेतेपदाविरुद्धही गेलेले दिसायचे. विधिमंडळाचे अधिवेशन संपले की चंद्रपूरजवळच्या ताडोबा या अभयारण्यात येऊन विश्रांतीसाठी काही काळ काढायचा हा त्यांचा नेम होता. मुंबईहून चंद्रपूरला विमानाने आले की विमानतळावरूनच एका खुल्या गाडीत बसून ते थेट ताडोबाला पोहचायचे. वत्सलाबाई सोबत असायच्या. शिवाय काही निकटचे सहकारीही. अशा एका ताडोबा भेटीत त्यांच्यासोबत तेव्हाचे वनमंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री दादासाहेब देवतळे हेही होते. ताडोबाला पोहचत असताना वाटेतच त्यांना एक चांगला मोठा ढाण्या वाघ त्यांचा रस्ता उडवून उभा असलेला दिसला. वसंतराव जातिवंत शिकारी होते. त्यांना राहवले नसावे. जवळची बंदूक उचलून त्यांनी नेम साधला आणि एकाच गोळीत त्या वाघाला त्यांनी आडवे केले…

काही दिवसांआधी औरंगाबादच्या विमानतळावर त्यांना घेऊन येणारे हेलिकॉप्टर जमिनीवर आडवे झाल्याने त्यांचा एक हात प्लास्टरमध्ये बांधला होता व निकामीही होता. त्याही स्थितीत एका हातात धरलेली बंदूक अचूक चालविण्याचे त्यांचे कसब देवतळ्यांनाही चांगले जाणवले होते… त्या रात्री पत्रकारांसोबत बोलताना स्वतः देवतळ्यांनीच मुख्यमंत्र्यांच्या शिकारीबाण्याची व त्यांच्या एकहाती वाघ मारण्याची किमया खुलवून सांगितली आणि पत्रकारांनी, त्यात मीही होतो, ती सारी शिकारकथा तीत जमेल तेवढे रंग भरून आपापल्या वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर छापून आणली.

दुसरे दिवशी सगळ्या पत्रकारांच्या घरचे फोन खणखणले. आम्हा सगळ्यांनाच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कोळसा मुक्कामी चहाला यायचे निमंत्रण दिले होते. ठरल्यावेळी सरकारी गाड्यांतून आम्ही वनविभागाच्या तिथल्या विश्रामभवनात पोहचलो तेव्हा स्वतः मुख्यमंत्रीच आमची वाट पाहात व्हरांड्यातल्या खुर्चीवर पाईप ओढत असलेले दिसले. आगतस्वागत आणि चहा बिस्किटे झाली. जरा वेळाने आमच्यातले एक ज्येष्ठ पत्रकार म्हणाले, ‘काल तुम्ही केलेल्या वाघाच्या शिकारीबद्दल आम्हाला तुमचे अभिनंदन…’

त्याचे वाक्य अर्ध्यावर तोडत मुख्यमंत्री गरजले, ‘वाघाची शिकार? कोणी केली? कुठे झाली?’

आता अवाक्‌ व्हायची पाळी आमची होती. मुख्यमंत्री म्हणाले, ‘अरे या राज्यात वाघाच्या शिकारीवर बंदी आहे ना?’

‘होय’ आमच्यातला एकजण म्हणाला.

‘मग वाघाची शिकार येथे होईलच कशी?’ मुख्यमंत्री म्हणाले.

‘पण सर, आमच्यातला एकजण. तुमच्या शिकारीची माहिती खुद्द वनमंत्र्यांनीच…’

त्याला अडवीत मुख्यमंत्री म्हणाले, ‘अरे तो तुमचा वनमंत्री उद्या काहीही सांगेल, पण तुम्ही कायदाबियदा काही पाहायचा की नाही?’

‘पण सर.’

‘पण नाही आणि बिण नाही. कायद्याने वाघाच्या शिकारीवर बंदी असल्याने ती झाली नाही आणि होऊही शकत नाही हे तुम्हा पत्रकारांनाही कळू नये काय?’

आम्ही समजायचे ते समजलो. जरा वेळ गेल्यानंतर ‘आमची चूक’ कबूल करून आम्ही हंसतच वसंतरावांचा निरोप घेतला. त्यांच्याही चर्येवर स्मिताची जाणती रेषा होती.

पुढे ही शिकार विधानसभेत गाजली. वसंतरावांनी त्यांची चूक मान्य करताना आपण शिकारी असल्याने आपले भान कधी जात असल्याचे व तुम्ही द्याल ती शिक्षा आपल्याला मान्य असल्याचे डोळ्यात अश्रू आणून सभागृहाला सांगितले. त्यांचे प्रांजळपण लक्षात घेतलेल्या तेव्हाच्या समंजस सभागृहाने त्या प्रकरणावर मग पडदाही टाकला.

हा सारा काळ वसंतरावांचे व्यक्तित्व व नेतृत्व चौरस आणि प्रगल्भ करणारा होता. त्यांच्यात पूर्वीच असलेला गोडवा वाढविणाराही होता. सुदैवाने त्या काळात राजकारणातले वैर आजच्या एवढे विषारी नव्हते आणि हेत्वारोप करण्याचा आजचा सवंग प्रकारही त्या काळी नव्हता. टीका भूमिकेवर व्हायची आणि भूमिकांवर आक्षेप घेण्यात दुष्टावा असण्याचेही कारण नसायचे. राजकारणातली माणसे परस्परविरोधी पक्षात असतानाही एकमेकांना सांभाळून घ्यायची. व्यक्तिगत अडचणी राजकारणात कधी आणायची नाहीत. प्रांजळपणाएवढेच उदारपण खाजगी व्यथावेदनां- बाबतही असायचे… वसंतराव मुख्यमंत्री असताना त्यांना व्यथित करणारे अनेक प्रसंग त्यांच्या वाट्याला आले. एका पहाटे त्यांच्या तरुण मुलीचा मृतदेह मुंबईच्या प्लॅटफॉर्मशेजारी पडलेला लोकांना आढळला. पण ती घटना मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्यासाठी कोणी वापरली नाही. एका दु:खी बापाची व्यथा म्हणूनच साऱ्यांनी तिच्याकडे पाहिले. त्या घटनेत काही विपरीत असल्यास त्याची चौकशी करण्याची व संबंधितांना शासन करण्याची मागणी करूनच सारे थांबले. त्या घटनेने वसंतराव मात्र फार खोलवर दुखावले गेले. वत्सलाबाई त्यांच्याहून जास्तीच्या खचल्या. नंतरच्या काळात वसंतरावांनी त्यांना कधी एकटे राहू दिले नाही. आपल्या प्रत्येक शासकीय दौऱ्यात, कार्यक्रमात आणि प्रवासात त्यांना सोबत घेण्याचे पथ्य वसंतरावांनी अखेरपर्यंत सांभाळले.

पक्षीय राजकारणात त्यांनी भाग घेतला. पण पक्षीय  वैरांपासून ते सदैव दूर राहिले. रा.स्व. संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांची त्यांच्या अखेरच्या आजारात वसंतरावांनी भेट घेतली व ती घेताना आपले राजकारण बाजूला ठेवण्याचे पथ्य त्यांना पाळता आले. आपल्या जवळच्या माणसांना काय आवडेल, ते कशामुळे आनंदी होतील याचे भान त्यांना असे. प्रिन्स आगाखान भारतात आले आणि मुंबईच्या त्यांच्या मुक्कामात मुख्यमंत्र्यांनी ताज हॉटेलच्या प्रिन्सेस रूममध्ये त्यांच्या सन्मानार्थ मेजवानी दिली. तिला हजर राहायला खोजा समाजातील आपले मित्र डॉ. हिराणी यांना त्यांच्या पत्नींसह बोलावून घेऊन त्यांना जन्मभर पुरेल एवढा आनंद वसंतरावांनी मिळवून दिला. राजकारणात अभावानेच आढळणारे निर्वैरपण त्यांना नेहमी जपता आले. भटक्या व विमुक्त समाजात जन्मलेल्या आणि नागपुरातील घाटे या प्रतिष्ठित ब्राह्मण कुटुंबातून आलेल्या वत्सलाबाईंशी प्रेमविवाह केलेल्या वसंतरावांच्या मनाला जातीयताही कधी शिवली नाही. माणसे कशाकशाने फुलून आणि फुगून जाताना पाहावी लागण्याच्या आजच्या काळात 11 वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद अनुभवणाऱ्या या नेत्याला अहंकार वा गर्व सोडा, पण त्याच्या साध्या अभिमानाचा दर्प चढल्याचेही कधी आढळले नाही. त्याहून महत्त्वाची बाब ही की एवढी वर्षे सत्ता हातात ठेवणाऱ्या वसंतरावांवर कोणाला कधी तिचा गैरवापर केल्याचा आरोप ठेवता आला नाही. साऱ्यात राहून साऱ्याहून वेगळे राहता येणे, राजकारणात असतानाही राजकारणी न होणे आणि पदावर असतानाही जमीन व जमाना यांच्याशी नाते राखता येणे हीच आजच्या काळात किमया वाटावी अशी बाब आहे. महाराष्ट्राच्या एवढ्या वर्षांच्या राजकारणात एकट्या वसंतराव नाईकांनाच ती जमली असे म्हटले तर ते चूक ठरू नये.

मात्र वसंतरावांनी राजकारणाला स्वत:पासून दूर ठेवण्यात आपल्या सहज साध्या प्रकृतीधर्माच्या बळावर यश मिळविले असले तरी राजकारणाने त्यांना तसे नेहमीच राहू दिले नाही. ते यशवंतरावांचे विश्र्वासू सहकारी व स्नेही होते आणि त्यांना नसले तरी यशवंतरावांना जाचाचे ठरेल असे राजकारण करणारे लोक फार होते. ते दिल्लीत होते तसे मुंबईत होते आणि पुण्यात होते तसे नागपूर-विदर्भातही होते. यशवंतरावांचे पंख व पाय कापण्याचे राजकारण करणाऱ्या दिल्ली व मुंबईतील लोकांना वसंतरावांची त्यांच्यावरील निष्ठा सलणारीही होती. त्या माणसांनी प्रथम त्या दोघांत वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करून पाहिला. निदान त्यांनी यशवंतरावांचे राजकारण चालविणे थांबवावे अशी गळ त्यांना घालून पाहिली. दिल्लीकर यात पुढे होते आणि यशवंतरावांच्या पाठिंब्यासाठी स्पर्धा करणारी मुंबईतील माणसेही त्यात मागे नव्हती. पण वसंतराव त्यांच्या राजकारणाला कधी बधले नाहीत.

1969 मध्ये काँग्रेस पक्षाच्या झालेल्या दुभंगाच्या काळात त्यांनी इंदिरा गांधींचा पक्ष न घेता यशवंतरावांची बाजू घेतली. नंतरच्या इंदिरा व यशवंत यांच्यातील जवळिकीच्या काळातही ते यशवंतरावांच्या जवळ आणि इंदिरा गांधींपासून एक अंतर राखून राहिले. हा काळ इंदिरा गांधींचा दुरावा व रोष ओढवून घेणारा आणि त्यांची अस्वस्थता वाढविणारा होता. त्या दुराव्याचे कारण वसंतराव नव्हते, यशवंतराव होते. यशवंतरावांचे मराठी राजकारणातील स्थान जोवर भक्कम आहे तोवर दिल्लीकरांना त्यात फारशी ढवळाढवळ करता येत नव्हती. ते स्थान उखडायचे तर वसंतरावांना त्यांच्यापासून दूर करणे गरजेचे होते. वसंतदादा आणि शंकररावांना ते करणे जमले आणि पवारांनी स्वत:च त्यांचा मार्ग वेगळा केला. वसंतरावांनी मात्र यशवंतरावांची साथ अखेरपर्यंत सोडली नाही. परिणामी यशवंतरावांच्या राजकारणाची जी परवड त्यांच्या शेवटच्या काळात झाली तशीच ती वसंतरावांच्याही वाट्याला त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात आली.

दिल्लीच्या काँग्रेस नेतृत्वाने त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याचा आदेश ज्या तऱ्हेने दिला तो त्यांच्या तोवरच्या सेवेची कदर करणारा नव्हता. ज्यांचा आधार होता ते यशवंतराव स्वत: निराधार झाले होते आणि ते पायउतार होणार म्हणून उतावीळ झालेले महाराष्ट्रातील मराठा नेतृत्व त्यांची उपेक्षा करायला सज्ज होते. अखेरच्या काळात काँग्रेस पक्षाने वसंतरावांना लोकसभेचे तिकीट दिले. ते प्रचंड बहुताने निवडूनही आले. पण महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचे मुख्यमंत्रीपद तब्बल 11 वर्षे भूषविलेला हा नेता दिल्लीत साधा खासदारच राहिला. आपली व आपल्या मान्यवर नेत्याची दिल्लीत होणारी परवड पाहात व मुंबईत होणारी उपेक्षा सहन करीतच त्यांनी हा काळ काढला. अखेर त्याच स्थितीत सिंगापूरला असताना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.

वसंतरावांनी त्यांच्या आयुष्यात मिळविलेले यश मोठे होते. यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील गहुली या खेड्यात एका भटक्या जातीत जन्माला आलेला मुलगा, त्याची बुद्धी, परिश्रम व निष्ठा यांच्या बळावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, त्या पदावर तीन वेळा निवड होण्याचा त्याचा मान त्याच्या अगोदर व नंतर कोणाला मिळत नसतो. साऱ्या महाराष्ट्राला आपलेसे करण्याएवढे त्याचे नेतृत्व सर्वगामी व  सर्वव्यापी होते.

त्याने राज्यात सुरू केलेल्या अनेक योजना राष्ट्रपातळीवर स्वीकारल्या जातात आणि खेड्यातल्या माणसांएवढाच शहरातल्या कामगारांचा आणि गरीब आदिवासींएवढाच तो शहरी मध्यमवर्गीयांना आणि धनवंतांनाही आपला वाटू लागतो. तो शेतकऱ्यांचा पुढारी असतो आणि शहरी माणसांच्याही विश्वासाचा विषय होतो. त्याला समाजकारणात मान्यता मिळते, सांस्कृतिक क्षेत्रात लौकिक प्राप्त होतो आणि त्याचा चाहता वर्ग सर्वक्षेत्रीय असतो… याहून त्याचे मोठे यश राजकारणात राहूनही निर्वैर असण्यात असते. त्याला सर्वच पक्षातून मित्र मिळतात. त्याचे कौतुक एसेम जोशांना असते आणि सेनेच्या ठाकऱ्यांनाही त्याच्याविषयी आपलेपण वाटते. शेकापच्या कृष्णराव धुळुपांशी त्याचे मैत्र असते आणि कॉ.डांग्यांनाही त्याच्याशी आत्मीयतेचे संबंध ठेवावेसे वाटतात. तो काँग्रेसला आपला वाटतो आणि विरोधकांनाही वैरी वाटत नाही…

याहूनही त्याचे मोठे यश एवढी वर्षे राजकारणात राहून आपले चारित्र्य निष्कलंक ठेवण्यातले असते. साऱ्या राजकीय हयातीत त्यांना चिकटू शकेल असा ठपका विरोधी पक्षांना, माध्यमांना किंवा कोणा खुसपटखोराला त्यांच्यावर ठेवता आला नाही. राजकारणात जाताना ते जेवढे साधे आणि स्वच्छ होते तेवढेच त्याचा व जगाचा निरोप घेतानाही ते साधे आणि स्वच्छच राहिले. मधल्या काळाने त्यांना दिलेच असेल एक प्रगल्भ विनम्रपण, हसतमुख माणूसपण, नेता असतानाचे अनुयायीपण आणि अनेकांध्ये एकमेव असतानाही एकमेव न होता अनेकातला एक राहण्याचे निगर्वीपण…

वसंतराव रसिक होते. त्यांना गाणे आवडायचे. चांगल्या सामिष भोजनाचा चवीने आस्वाद घेणे त्यांना सगळ्या धकाधकीत जमायचे. त्यांना आवडणारे आणि आताच्या गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचालाच मिळू शकणारे मासे मुंबईत बोलवून घेणे व ते आपल्या स्नेह्यांना खिलविणे यात त्यांना रस होता. त्यांच्या स्वभावात मैफलीपण होते. हसरे संवाद मनमुरादपणे अनुभवणे हा त्यांच्या विरंगुळ्याचा भाग. चांगली माणसे कलावंत, मूर्तिकार, चित्रकार आणि साहित्यिक यांच्या संपर्काची त्यांना ओढ होती. त्यांना ते सतत प्रोत्साहन देत आणि त्या कौतुकात साधे कोरडेपण नसे, त्याला मदतीची जोड असे. वसंतरावांचे घराणे श्रीमंत होते. सासुरवाडीही धनवंत होती. मात्र त्यांच्या वागण्या बोलण्यात पुढाऱ्याचे सुस्तावलेले सैलपण नव्हते. नेतेपदावर असतानाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला प्रशासकच नेहमी प्रभावी दिसायचा. त्यांचा पोषाख, तोंडात पाईप धरण्याची त्यांची ऐट, बोलण्यातली अधिकाराची जाण आणि हसरी असली तरी डोळ्यातली तीक्ष्ण जरब थेट करडी आणि लष्करी होती. मुंबईत वावरतानाही त्यांच्यातले ‘गहुलीपण’ कायम होते. कष्टातून वर आलेल्या समाजातील तरुणांध्ये दिसणारे त्यांचे ताठपण नंतरच्या सुखासीन आयुष्यातही तसेच होते. त्यामुळे जवळच्यांनाही ते दूरस्थ वाटत आणि त्यांच्या मनात त्यांच्याविषयी एक जरबही असे. ‘मी त्यांना सांगून आलो आहे’ किंवा ‘मी सांगतो तसे ते करणारच’ असे त्यांना गृहीत धरून कोणाला बोलता येत नसे.

वसंतरावांनी महाराष्ट्राची धुरा सांभाळली तेव्हा ते तुटीचे राज्य होते, अन्नधान्याच्या संकटात होते आणि दुष्काळाच्या सावटात होते. मुंबईत असंतोष आणि कामगारांत चळवळ होती. विदर्भात असमाधान आणि मराठवाड्यात विकासाच्या अनुशेषावरून उठलेले वादळ होते. पश्चिम महाराष्ट्राला ‘हा’ मुख्यमंत्री आपल्यावर लादलेला वाटला तर कोकण प्रदेशाला त्याचे दूरचे असणे खटकणारे होते. वसंतरावांनी मुख्यमंत्री पद सोडले तेव्हा राज्याची तूट भरून निघाली होती. अन्नधान्यात स्वयंपूर्णता आली होती. मुंबईतला असंतोष आणि विदर्भातले असमाधान शमले होते, मराठवाड्याच्या अनुशेषावर मात करण्यात यश आले होते आणि कोकणचा त्यांच्याविषयीचा दुरावा मिटला होता…जबाबदारी घेतानाचा व ती सोडतानाचा काळ यातला फरकच नेत्याचे यशापयश निश्चित करीत असतो. त्या गणिताने वसंतरावांचे यश पूर्ण नसले तरी मोठे व अभिनंदनीय होते आणि त्यात त्यांना व महाराष्ट्राला समाधान होते. यशवंतरावांवर त्यांच्या कारकीर्दीच्या आरंभी झाली तशी विषारी टीका त्यांच्यावर झाली नाही आणि कन्नमवारांच्या वाट्याला आलेला अडाणी उपहासही त्यांना सहन करावा लागला नाही. सन्मानपूर्वक स्वीकारलेले मुख्यमंत्रीपद त्यांनी जनतेतला आपला आदर कायम राखूनच नंतरच्या नेत्याकडे सोपविलेले साऱ्यांना दिसले.

असा नेता महाराष्ट्राच्या अध्वर्युपदावर एवढी वर्षे राहिला आणि त्याच्या वर्तमान व भविष्याची वाट त्याने प्रशस्त केली यासाठी त्याला अभिवादन!

(सुरेश द्वादशीवार हे नामवंत लेखक आणि विचारवंत आहेत)

9922928221

सुरेश द्वादशीवार यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –सुरेश द्वादशीवार– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleवसंतराव नाईक: महाराष्ट्राला आकार देणारा द्रष्टा नेता
Next articleविधिमंडळ अधिवेशनाचं ‘तेच ते’…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.