-संदीप सारंग, मुंबई
दिवाळी अंक हे मराठी साहित्य-संस्कृतीचे मनोरम वैशिष्ट्य ! शंभरहून अधिक वर्षांपासून चारशेहून अधिक दिवाळी अंक दर दिवाळीत प्रकाशित होतात. हातोहात विकल्या जाणाऱ्या दिवाळी अंकांच्या या भाऊगर्दीची उत्कृष्ट, चांगले, बरे अशी वर्गवारी करता येईल. यापैकी उत्कृष्ट कॅटेगरीत एक अंक गेल्या नऊ वर्षांपासून वाचकांचे लक्ष वेधून घेत आहे आणि तो म्हणजे “मीडिया वॉच.” नॉस्टॅल्जिया जागविणारा किंवा समकालीन वास्तवाची प्रखर जाणीव करून देणारा किंवा भविष्याचा अचूक वेध घेणारा विषय निवडून (किंवा हे सगळं एकाच अंकात विभागवार मांडून) त्यावर आकर्षक रुपात वाचनीय चर्चा घडवून आणणारा दिवाळी अंक म्हणजे “मीडिया वॉच !” अतिशय कल्पकतेने आणि मेहनतीने हे समीकरण साकारणारा अविनाश दुधे हा “मीडिया वॉच”चा संपादक म्हणजे अवलिया माणूस ! इतरांच्या वृत्तपत्रात पत्रकारिता करत असताना पुढे स्वतःच दिवाळी अंकाच्या आणि विविध पुस्तकांच्या संपादकपदी आरूढ होऊन वाचनसंस्कृती रुजविण्याचे, जाणीवसंपन्न मन घडविण्याचे आणि अंतिमतः प्रगल्भ समाज उभा करण्याचे कार्य ते अगदी निष्ठेने करत आहेत. प्रत्येक दिवाळीत अविनाश दुधे मीडिया वॉचचा अत्यंत हटके असा दिवाळी अंक घेऊन येतात आणि वाचकांना वर्षभर पुरेल इतका आनंद आणि ज्ञान-भान देऊन जातात.
यावर्षीचा अंकही त्याला अपवाद नाही. यावर्षी अंकाचा मुख्य विषय आहे – कर्तृत्ववान माणूस ! गेल्या अर्धशतकात विविध क्षेत्रात ज्यांनी काहीएक ठसा उमटविलेला आहे अशा नऊ माणसांच्या कथा यात आहेत. पत्रकार रवीशकुमार, प्रशांत किशोर, खासदार महुआ मोईत्रा, अमिताभ बच्चन, कपिल शर्मा, अभिनेत्री तब्बू, शायर जॉन आलिया, जी. ए. कुलकर्णी, जयंत पाटील ही ती नऊ माणसं असून या नवरत्नांवरचे लेख अतिशय माहितीपूर्ण झालेले आहेत. “चेहरे आणि मुखवटे” या विभागातले हे सगळेच लेख एकापेक्षा एक सरस उतरल्यामुळे एका अर्थाने हे लेख लिहिणारेही लेखनक्षेत्रातली आजची नवरत्नेच आहेत असेच म्हणावे लागेल !
पत्रकारितेत उमेदीची काही वर्षे घालविली असल्याने निःपक्षपाती भूमिका घेणाऱ्या झुंजार पत्रकाराचे महत्त्व संपादक चांगलेच जाणतात. म्हणूनच अंकातला पहिलाच लेख रवीशकुमार यांच्यावर आहे. श्रीरंजन आवटे यांनी तो लिहिलायही मन:पूत प्रेमाने ! आज लोकशाहीचा चौथा खांब स्वतःच्याच कर्माने आतून कसा कुरतडला गेला आहे याविषयी रवीशकुमार यांनी केलेले जळजळीत भाष्य श्रीरंजन यांनी शब्दात मांडले आहे ते असे- “लोकशाहीची हत्या झालेली आहे आणि या हत्येला माध्यमं जबाबदार आहेत. माध्यमांमधला हा सगळा कोरसचा आवाज म्हणजे लोकशाहीच्या हत्येचं पार्श्वसंगीत आहे. माध्यमांमध्ये जनतेचं प्रतिबिंब नाही. Reporting संपल्यात जमा आहे. एका मालकाप्रति आपली निष्ठा अर्पण करण्यापलीकडे आता काहीही उरलेलं नाही.” रवीशकुमार यांची ही खंत वाचकांना अंतर्मुख केल्याशिवाय आणि तमाम पत्रकारांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडल्याशिवाय राहत नाही.
राजकीय पारडं फिरवणारा किमयागार म्हणून अलीकडे ख्यातकीर्त झालेल्या प्रशांत किशोर यांच्यावर लिहिलेल्या लेखात मुक्ता चैतन्य यांनी प्रशांत किशोर यांची काम करण्याची शैली आणि निवडणुकीची रणनीती आखण्याची पद्धती उलगडून दाखविली आहे. सोशल मीडिया निवडणूक फिरवतो असा सूर आजकाल ऐकू येतो. पण प्रशांत किशोर यांना तसे वाटत नाही. मुक्ता लिहितात, “एसी रूममध्ये बसून निष्कर्ष काढण्यापेक्षा रस्त्यावर उतरून, गावागावात फिरून, माणसांना भेटून, त्यांच्याशी बोलून त्यांना नक्की काय हवंय, त्यांच्या त्रासाचे, आनंदाचे, अपेक्षांचे मुद्दे समजून घेऊन त्या आधारावर डेटा तयार करणं याला प्रशांत किशोर महत्त्व देतात. सामान्य माणसांच्या विचारक्षमतेवर, wisdom वर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे, हा त्यांच्या कामाचा पाया आहे आणि हाच त्यांच्या यशातला महत्त्वाचा घटक आहे.” २०१४ मध्ये मोदी सरकार येण्यात प्रशांत किशोर यांचाही हातभार लागला होता. पण आज तेच प्रशांत किशोर “एक देश एक पक्ष” ही भाजपप्रणीत विचारधारा लोकशाहीसाठी घातक असल्याचे सांगतात. “आजपर्यंतची सरकारं आणि मोदी सरकार यांच्यातला सगळ्यात मोठा फरक म्हणजे मतदानाच्या पलीकडे जाऊन हे लोक मतदारांच्या मानसिक अवकाशावर ताबा मिळवू इच्छितात. त्यांना फक्त तुमचं मत नकोय, तर तुम्ही काय घालता, काय खाता-पिता , काय विचार करता, तुमचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, तुमच्या श्रद्धा आणि धारणा काय आहेत, या सगळ्यावर त्यांना वर्चस्व हवंय आणि हे धोकादायक आहे. त्यांना फक्त देशाचे इलेक्शन जिंकायचे नाही, तर विरोधी पक्षच संपवायचा आहे. हे माझ्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे. प्रोपोगंडा ठिकै, पण गेल्या सत्तर वर्षात काहीच घडलेलं नाहीये, असं म्हणणं भीतीदायक आहे…” प्रशांत किशोर यांचं हे मत सांगताना मुक्ता चैतन्य “२०२४ ची निवडणूक ही चाणक्य (अमित शहा) विरुद्ध रणनीतीकार (प्रशांत किशोर) अशी असणार,” असं भाकीत करतात.
मोदी सरकारवर बेधडक वार करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या तरुण खासदार महुआ मोईत्रा यांचे व्यक्तिचित्र अनुराधा कदम यांनी नेमक्या शब्दांत उभे केले आहे. अमेरिकेतील माऊंट हॉलीयोके कॉलेजमधून economics & mathematics या विषयात पदवी घेतल्यानंतर महुआ न्यूयॉर्कमधील जेपी मॉर्गन चेस या प्रतिष्ठित फायनान्सियल कंपनीमध्ये investment banker म्हणून रुजू झाल्या तेव्हा त्या अवघ्या २३ वर्षांच्या होत्या. पुढच्या पाच वर्षात त्या कंपनीच्या उपाध्यक्ष झाल्या. व्यावसायिक कारकीर्द अतिशय उत्तम सुरू असताना काहीतरी वेगळं करायचं या निश्चयाने महुआ भारतात परतल्या. काही दिवसांतच राजकारणात प्रवेश करून “तेजतर्रार नेता” अशी ओळख त्यांनी मिळविली. २०१९ ला खासदार म्हणून निवडून आल्यानंतर लोकसभेत पहिल्याच दिवशी त्यांनी छाप पाडली आणि देशाचे लक्ष वेधून घेतले. भाजप सरकारविरुद्ध आक्रमक भाषेत मुद्देसूद बोलणारे जे मोजके नेते आज देशात आहेत त्यांच्या पंक्तीत जाऊन बसलेल्या या तरुण-तडफदार नेतृत्वाबद्दलचे कुतूहल शमविणारा हा लेख महत्त्वाचा आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर मिथिला सुभाष यांनी शैलीदार लेख लिहिला आहे. कलावंतानं कसं असावं, ते “असणं” ग्रेसफुली कॅरी करत कसं जगावं, स्वतःला कसं प्रमोट करावं, कुटुंब कसं सांभाळावं, प्रेयसीशी असलेलं नातं कसं जपावं आणि बावजूद सब इसके, आपली प्रतिमा कशी राखून ठेवावी याचा उत्तम वस्तुपाठ म्हणजे अमिताभ, या शब्दांत मिथिला यांनी भारतीय जनमानसावर असलेलं अमिताभ बच्चन नावाचं गारूड चित्रित केलं आहे. डॉन को (शब्दात) पकडना नामुमकीन नहीं है, याची प्रचीती देणारा हा लेख वाचताना मजा येते.
टीव्हीच्या पडद्यावर मनमुराद हसविणाऱ्या कपिल शर्माचे सुरुवातीचे यश, यश डोक्यात गेल्यानंतर आलेले अपयश आणि डोके ठिकाणावर आल्यानंतर पुन्हा मिळालेले अफाट यश हा चढउताराचा प्रवास दाखविणारा लेख अमोल उदगीरकर यांनी लिहिला आहे. कपिलबद्दलची रंजक माहिती त्यातून मिळते.
‘संथ वाहते कृष्णामाई…’ हे जयंत पाटील यांच्यावर विजय चोरमारे यांनी लिहिलेल्या लेखाचे शीर्षक अगदी समर्पक आहे. शांत-धीरोदात्त स्वभावाच्या जयंत पाटलांना ते नेमके लागू पडते. शरद पवार यांच्यानंतर समोरच्या माणसाचं मन लावून ऐकून घेणारा दुसरा कुणी नेता महाराष्ट्राच्या राजकारणात असेल तर ते एकमेव जयंत पाटील आहेत, आजच्या घडीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम अशा पाच नेत्यांची यादी करायची झाली तर त्यात जयंत पाटील यांचे नाव पहिल्या क्रमांकावर घ्यावे लागेल, ही चोरमारे यांची निरीक्षणं महत्त्वाची असून ती राजकारणातल्या लोकांना जवळून ओळखणाऱ्या कुणालाही सहज पटतील.
मराठी वाड्.मयविश्वात जी. ए. कुलकर्णी नावाचा एक उत्तुंग परंतु गूढ कोपरा आहे. त्याने गेल्या दोनतीन पिढ्यांतील वाचकांना अक्षरशः पछाडून टाकले आहे. हेमंत खडके यांनी या जगावेगळ्या लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा छडा लावण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. जीएंची जीवनविषयक दृष्टी बुद्धिवादाच्या पलीकडे जाणारी होती. खडके त्यांच्यावर झालेल्या जीएंच्या प्रभावाविषयी लिहितात, “जीएंच्या कथांनी माझी बुद्धिवादाची चौकट खिळखिळी करून टाकली. तर्कबुद्धी हे जगाच्या आकलनाचे सर्वश्रेष्ठ साधन आहे आणि त्यापेक्षा श्रेष्ठ दुसरे साधन असू शकत नाही, अशा तोऱ्यात तोवर मी जगत होतो. तर्कबुद्धी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ शकते, असा मला विश्वास होता. जीएंच्या कथांनी मला पटवून दिले की, व्यावहारिक जीवनासाठी तर्कबुद्धी आवश्यक असली तरी ती संपूर्ण जीवनाचे आकलन करू शकत नाही. कारण जीवन म्हणजे काही एखादी शास्त्रीय संकल्पना नव्हे की गणितातील एखादे कोडेही नव्हे! जीवन एक अनुभूती आहे. ती केवळ तर्कबुद्धीने जाणायची गोष्ट नसून उत्कट मनाने समग्र व्यक्तिमत्वानिशी अनुभवायची, आस्वादायची आणि जाणायची गोष्ट आहे. मानसशास्त्राच्या परिभाषेत बोलायचे झाले तर, जीवन केवळ बुद्ध्यांकाच्या (I. Q.) आधारे अनुभवता येणारे नाही, तर त्यासाठी भावनांक (E. Q.) , अध्यात्मांक (S. Q.) , सर्जनांक (C. Q.) या सर्वांची मदत घ्यावी लागेल.” जीए आणि त्यांच्या व्यक्तित्वाचे/साहित्याचे बहुपदरी आयाम समजून घ्यायचे असतील तर हा लेख वाचणे अनिवार्य आहे.
कोई मुझ तक पहुंच नहीं पाता, इतना आसान है पता मेरा… अशी अफलातून शायरी लिहिणाऱ्या जॉन एलिया या कलंदर शायराची सानिया भालेराव यांनी करून दिलेली ओळख तितकीच अफलातून आहे. जॉन एलिया हे हिंदी सिनेमासृष्टी गाजविलेल्या कमाल अमरोही यांचे चुलतभाऊ. १९५७ पर्यंत लखनौमधील अमरोहामध्ये राहून मग ते पाकिस्तानमध्ये गेले असले तरी त्यांच्या शायरीतून अमरोहातील गल्ल्यांमधल्या मातीची महक येते. जॉन काळाच्या पुढचे शायर होते. त्यांच्या मृत्यूनंतरच त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली. ज्या पद्धतीने जॉन मुशाफिरी करायचे, शायरी वाचायचे, तो बेदरकारपणा आणि “किसी बात की कोई फिकर नहीं” असा दृष्टिकोन असल्याने जॉन आज तरुण पिढीमध्ये फार लोकप्रिय आहेत. त्यांच्याविषयीचा आवर्जून वाचावा असा हा लेख आहे.
नऊ व्यक्तींविषयीच्या या विभागातील उरलेल्या एका लेखाबद्दल सर्वात शेवटी लिहितो. या अंकात विज्ञान-तंत्रज्ञान, आदिवासी संस्कृती-परंपरा, कथा बायांच्या आणि कविता असे आणखी चार विभाग आहेत.
विज्ञान-तंत्रज्ञान विभागात “कळे न हा चेहरा कुणाचा ?” हा नीलांबरी जोशी यांचा लेख सध्याच्या “स्क्रीन” युगाबद्दलचा आहे. इंटरनेट आणि इंटरनेटवर अवलंबून असलेले फेसबुक, व्हॉट्सॲप इत्यादी सोशल मीडिया या सगळ्यांनी माणसाचे अवघे जगणे एखाद्या व्यसनासारखे कसे पोखरले आहे आणि त्यापासून दूर राहणे कसे आवश्यक आहे याविषयी जागृत करताना नीलांबरी लिहितात, “इंटरनेट हे नवीन प्रकारचे धूम्रपान आहे, असं कॅल न्यूपोर्ट हा ‘डिजिटल मिनिमलिझम’ या पुस्तकाचा लेखक उगीचच म्हणत नाही.. फेसबुक लाईकचं बटन शोधणारा जस्टिन रोझेंटाईन हा आता स्वतःच तयार केलेल्या या लाईकच्या बटनावर टीका करतो. स्वतः कमीत कमी ऑनलाईन असावं, याबाबत दक्ष असतो.” लेखात शेवटी त्यांनी जो इशारा दिला आहे त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. “इंटरनेटचा वापर, त्यातून मिळणारा आनंद वगैरे गोष्टी ठीक असल्या तरी त्या आता मागे पडून आपल्या शारीरिक, मानसिक आरोग्याची किंमत मोजून आपण ते वापरतो आहोत, हे लक्षात घेणं हा त्यातून बाहेर पडायचा पहिला टप्पा असू शकतो. अजूनही वेळ गेलेली नाही.” मोबाईलच्या/कॉम्प्युटरच्या स्क्रीनमधून निघणारी किरणं अहोरात्र डोळ्यांवर झेलणाऱ्या लोकांनी विशेषतः तरुण पिढीने हा लेख वाचायलाच हवा.
मान्सून आणि भारतीय समाज-संस्कृती हा सुनील तांबे यांचा लेख मान्सूनशी निगडित असलेल्या अनेक पारंपारिक पण बहुतेकांना माहीत नसलेल्या गोष्टी सांगतो. आनंद घैसास यांनी त्यांच्या लेखात मंगळावर वस्ती करण्याचे स्वप्न जर पाहायचे असेल तर काय काय करावे लागेल याविषयीची वस्तुस्थिती मांडली आहे. “पृथ्वीवर मानवजातीला आता वास्तव्यासाठी फार काळ राहिलेला नाही. जेमतेम शंभर वर्षे ! त्यानंतर काय, याची तजवीज आताच करावी लागेल, ” या सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या विधानाच्या दिशेने चाललेल्या प्रयत्नांचा रोचक आढावा त्यांनी या लेखात घेतला आहे.
आदिवासी संस्कृती-परंपरा या विभागातील एका लेखात अनिकेत आमटे यांनी आदिवासींच्या आयुष्याला नवे वळण देणाऱ्या हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पाविषयी लिहिले आहे. डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांनी छत्तीसगडमधील बस्तर या भागातील आदिवासी संस्कृतीबद्दल, तिथे वैद्यकीय सेवा बजावताना आलेल्या अनुभवांवर लिहिताना आदिवासींच्या प्रश्नांचे व्यामिश्र स्वरूप स्पष्ट केले आहे. मुकुंद कुळे यांनी महाराष्ट्रातील ठाणे/पालघर जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती आणि लोकसंस्कृती यातल्या आंतरसंबंधाविषयी महत्त्वाची मांडणी केली आहे. आदिवासी संस्कृती समजून घेण्यासाठी हे तिन्ही लेख वाचले पाहिजेत.
कथा बायांच्या या विभागात समीर गायकवाड यांनी लिहिलेली “गिरिजाबाईंची चटका लावणारी कहाणी” कुठल्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ केल्याशिवाय राहणार नाही. नाकासमोर चालणाऱ्या, मध्यमवर्गीय कोशात रमणाऱ्यांना माहीत नसलेलं एक वेगळंच (अधो) विश्व त्यातून समोर येतं, जे खरोखरच चटका लावणारं आहे.
सुलक्षणा वऱ्हाडकर यांचा “जगभरातील मैत्रिणींच्या भन्नाट कथा” हा आगळावेगळा लेख या विभागात वाचायला मिळतो. सुलक्षणा वऱ्हाडकर या “सांस्कृतिक बुद्धिमत्ता” या विषयाच्या संशोधक असून पत्रकारितेच्या निमित्ताने जगभर फिरल्या आहेत. या भ्रमंतीत भेटलेल्या मैत्रिणींच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी/आठवणी त्यांनी त्यांच्या लेखात चितारल्या आहेत. अतिशय माहितीपूर्ण असा हा लेख आहे.
या अंकातला कवितांचा विभागही उत्तम, दर्जेदार कवितांनी सजला आहे.
हे सारे असले तरी या अंकाचा खरा कळस (किंवा U.S.P. म्हणा हवं तर !) म्हणजे “चेहरे आणि मुखवटे” या विभागातला जितेंद्र घाटगे यांनी सिनेअभिनेत्री तब्बू हिच्यावर लिहिलेला “तब्बू … जहर खुबसूरत हैं आप ” हा बेहतरीन जिंदादील लेख ! काय लिहिलाय हा लेख ! तब्बूच्या कायल करणाऱ्या मोहिनीने झपाटून जाऊन एका विलक्षण तंद्रीत जितेंद्र यांनी तिचे व्यक्तिचित्र रेखाटले आहे. जणूकाही तब्बूप्रति त्यांची “प्रेमानंदी टाळी लागली आहे !” काळीज असलेला माणूस खल्लास व्हायला पाहिजे जितेंद्रने लिहिलेलं वाचून ! “तिचं जानलेवा सौंदर्य… एवढी खतरनाक, भयंकर, जहर-सुंदर दिसते की जगभरचं सगळं सौंदर्य एका पारड्यात आणि तुळशीपत्राइतकी अमूल्य तब्बू दुसऱ्या पारड्यात ! तिच्या सगळ्या भूमिकांचा चुरा करून कॅलिडोस्कोपमध्ये टाकल्यास जे काही दिसतं ते केवळ अदभूत आहे. दरवेळेस ती पत्त्यांचा नवा बंगला उभा करते. तो बघून भारावून जाऊन मी तो बघायला जातो आणि ती माझ्याकडे बघून गूढ हसते.. मी ज्या पत्त्यांच्या इमल्यावर स्वप्न रचत असतो त्यावर ती फुंकर मारून तो इमला ढासळून टाकते. दरवेळेस भोवळ आणणारे अभिनयाचे इमले बांधणं मात्र ती सोडत नाही…” शेवटी स्वतः लेखकच लिहितो त्याप्रमाणे तो गोदाकाठी, नाहीतर तब्बूच्या डोहात मरणार बहुतेक !!! असो…
(संदीप सारंग हे नामवंत लेखक व समीक्षक आहेत)
9773289599