‘बुल्ली बाई’ अॅप प्रकरणांत लक्ष्य केल्या गेलेल्या महिला केवळ ‘आवाजी’ आहेत एवढेच नाही, तर त्या सगळ्या ‘मुस्लिम’ही आहेत.
…………………….
जुलै 2021 मध्ये ‘सुल्ली डील्स’ नावाचे एक अॅप चर्चेत आले होते. या अॅपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांचा कथित लिलाव केला जात होता. पुन्हा याचप्रकारचे ‘बुल्ली बाई’ नावाचे अॅप तयार केले गेल्याचा प्रकार नववर्षाच्या सुरुवातीलाच समोर आला. मुस्लिम महिलांच्या टि्वटर अकाऊंटवरून त्यांची माहिती घेऊन त्यांच्या परवानगीशिवाय ती ॲपवर वापरण्यात आली. ट्टिटरवरच्या त्यांच्या फोटोंची छेडछाड करून तेही वापरण्यात आले आणि त्यावरून त्यांचा लिलाव ठरवण्यात आला. प्रत्यक्षात अशा तऱ्हेनं कुठलीही विक्री झाली नसली तरी या प्रकारच्या ॲप्सचा उद्देश ‘बोलत्या’ मुस्लिम महिलांचा अपमान करणं, त्यांचं दमन करणं असा आहे. या अॅपकर्त्यांच्या मानसिकतेची चर्चा करणारा हा लेख.
बोलती हुई औरतें, कितनी खटकती हैं ना… सवालों के तीखे जवाब देती बदले में नुकीले सवाल पूछती कितनी चुभती हैं ना…
सवाल पूछती औरतों को चुप कराने का नहीं कोई बेहतर उपाय कि घसीटो उन्हें चरित्र की अदालत में जहाँ सारे नियम, सभी क़ानून हैं पुरुषों के, पुरुषों द्वारा.. जिनकी आड़ में छुप जाएंगी वो तमाम ऐयारियाँ, नाइंसाफियां जो हमेशा हक़ रही हैं मर्दों का
मुबारक अली यांची ‘बोलती हुई औरतें’ या कवितेल्या ओळी अलिकडच्या एका घटनेतल्या लिहीत्या-बोलत्या, आवाज असणाऱ्या भारतीय मुस्लिम महिलांसाठी दुर्दैवाने अगदी चपखल ठरत आहेत. त्याचं कारण, ‘बुल्ली बाई’ नावाचं ॲप तयार करून त्यावर शंभरेक मुस्लिम महिलांचा ऑनलाईन लिलाव करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सहा महिन्यांपूर्वी अशाच तऱ्हेनं ‘सुल्ली डिल्स’ नावाच्या ॲपद्वारे, हीच मोडस ऑपरेंडी वापरून मुस्लिम महिलांना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्या घटनेचा पाठपुरावा करूनही कोणतीच कायदेशीर कारवाई झाली नव्हती आणि आता पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती घडली. राजकीय-सामाजिक-पत्रकारिता क्षेत्रात स्वत:ला असर्ट करणाऱ्या शंभरेक मुस्लिम महिलांच्या बाबतीत हा हीन प्रकार घडला. त्यांचे फोटो आणि टि्वटर हॅन्डलचा वापर करून त्यांच्यावर बोली लावण्यात आली. हा प्रकार सगळा व्हर्च्युअल असला तरी ॲप तयार करणाऱ्यांची आणि वापरणाऱ्यांची मजल या महिलांच्या विक्रीचा घाट घालण्यापर्यंत गेली. मुख्य म्हणजे ‘बुल्ली बाई’ आणि ‘सुल्ली डील्स’ या दोन्ही ॲपद्वारे लक्ष्य केल्या गेलेल्या सगळ्या महिला ‘भारतीय मुस्लिम’ आहेत हे आवर्जून लक्षात घ्यायला हवं.
या ॲपबाबतचा सगळा प्रकार पत्रकार इस्मत आरा यांच्या एका टि्वटमुळं समोर आला. ‘बुल्ली बाई’ या ॲपवर ‘डील ऑफ द डे’ म्हणून त्यांची विक्री झाल्याचा स्क्रीनशॉट त्यांनी टि्वटरवर शेअर केला होता. या घटनेतल्या मुस्लिम महिलांची माहिती त्यांच्या टि्वटर अकाऊंटच्या प्रोफाईलवरून गोळा केली गेली. त्यांच्या परवानगीशिवाय ती माहिती ॲपवर वापरण्यात आली. ट्टिटरवरच्या त्यांच्या फोटोंची छेडछाड करून ते बुल्ली बाई ॲपवर वापरण्यात आले आणि त्यावरून त्यांचा लिलाव ठरवण्यात आला. प्रत्यक्षात अशा तऱ्हेनं कुठलीही विक्री झाली नसली तरी या प्रकारच्या ॲप्सचा उद्देशच मुस्लिम महिलांचा अपमान करणं, त्यांचं दमन करणं, त्यांच्या मनात भीती उत्पन्न करणं असा आहे.
एखाद्या महिलेला मानसिकदृष्ट्या पंगू करायचं असल्यास, तिची मन:शांती हिरावून घ्यायची असल्यास तिच्या चारित्र्यावर बोट ठेवणं, ‘वेश्या’स्वरूपात तिची मांडणी करणं हे तसं नवं नाही. या शंभर मुस्लिम महिलादेखील प्रवाहासोबत चालणाऱ्यांपैकी नाहीत. त्यांना त्यांची स्वत:ची मतं आहेत. त्यांचं सामाजिक-राजकीय भान जागं आहे. मग त्यांचं मनोबल तोडायचं असेल, त्यांच्या निर्भयतेला चेचायचं असेल तर काय करता येईल? तर त्यांच्या चारित्र्यावर आघात करा! इथे केवळ मुस्लिम महिलांनाच नव्हे तर त्यांच्याआडून संपूर्ण समाजालाही टार्गेट करण्याचा उद्देश आहे. अजूनही आपल्या पारंपरिक विचारसरणीत समाज-समूहाची तथाकथित ‘इज्जत’ ही त्या-त्या समूहांतल्या स्त्रियांच्या चारित्र्यातच दडली आहे असं मानलं जातं. तोच प्रकार या घटनेत आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मुस्लिमद्वेष पसरवण्याचं काम हिंदुत्ववादी गटाकडून होत आहे. मुस्लिमद्वेष आणि मुस्लिम समाजालाच टार्गेट करायचं असेल तर त्या समाजातल्या महिलांवर हल्ला चढवायला हवा आणि विशेषतः ज्यांना स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व आहे अशा महिलांकडे रोख असायला हवा या हेतूने हे प्रकार घडत आहेत. महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच किती पूर्वग्रहाधारित आणि दूषित आहे हे ॲपकर्त्यांच्या बुरसटलेल्या विचारसरणीवरून लक्षात येतं.
मी लेखाच्या सुरूवातीपासून सातत्यानं ‘मुस्लिम’ महिला असा स्पेसिफिक उल्लेख करत आहे, कारण काही हिंदुत्ववादी लोकांनी या घटनेला असणारा धार्मिक आधारच काढून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. उलट हा ‘सगळ्या भारतीय महिलांचा’ प्रश्न आहे अशी भूमिका घेऊन पुन्हा एकदा या घटनेतल्या धार्मिक पैलूचं गांभीर्य कमी केलं जात आहे. ‘हा प्रश्न फक्त मुस्लिम महिलांचा नसून एकूणच महिला वर्गाचा आहे’, ‘कुठल्याही जाती-धर्मातल्या जाणत्या-बोलत्या महिलांच्या चारित्र्यावर ओरखडे ओढून त्यांचं सामाजिक हनन करणं हे घडतंच आलं आहे’ अशी विधानं करून या घटनेचं सुलभीकरण होऊ शकत नाही. या घटनांमध्ये या महिलांचं ‘मुस्लिम’ असणं ही बाब फार महत्त्वाची आहे, ती दुर्लक्षून चालणार नाही. महिलांचे प्रश्न किंवा महिलांबाबतच्या घटनांकडे पाहताना त्या महिलांचं ‘लोकेशन’ही तितकंच महत्त्वाचं असतं. त्यांचं समाजातलं स्थान, त्या कुठल्या जाती-धर्मात लोकेट होतात याकडे कानाडोळा करून त्या-त्या विशिष्ट घटनांना समजून घेता येणार नाही. त्यामुळे याही घटनेकडे ‘महिलां’बाबची निंद्य घटना या एकाच टर्मिनॉलॉजीतून पाहता येणार नाही. तसं केल्यास घटनेच्या मुळाकडे पाठ फिरवल्यासारखं होईल. कुणी कुणाविरूद्ध काय कृती केली आहे वा भूमिका घेतली आहे यातूनच त्या घटनांचं विश्लेषण होऊ शकतं आणि तरच त्या घटनांचे अर्थ नीट लावता येऊ शकतात. त्यामुळे इथे लक्ष्य केल्या गेलेल्या महिला ‘आवाजी’ आहेत यासोबत हेही लक्षात घेतलं पाहिजे की, त्या सगळ्या ‘मुस्लिम’ आहेत. त्यामुळं या घटनेकडं महिलांचे प्रश्न असा एकाच चष्म्यातून पाहता येणार नाही. पितृसत्ताक मानसिकतेबरोबरच इथे दिसणारा उजव्या विचारसरणीच्या लोकांमधला विखार दृष्टीआड कसा करता येईल? आपल्या स्वत:च्याच कृतीचं अवमूल्यन करून समाजमान्य नैतिक पातळीवरून खाली उतरण्याची हिंमत धर्मांधतेतूनच येते.
मुळातच ‘बुल्ली’, ‘सुल्ली’, ‘मुल्ली’ या शब्दांचा प्रयोग मुस्लिम महिलांचा अपमान करण्यासाठी, त्यांची खिल्ली उडवण्यासाठीच करण्यात येतो. स्लॅग भाषेत या शब्दांचा ढोबळ अर्थ ‘विकाऊ’ असा होतो. ॲपकर्त्यांना नेमकं कुणाला टार्गेट करायचं आहे हे ॲप्सच्या नावांवरूनच स्पष्टपणे लक्षात येतं. समाजातल्या नामवंत, प्रभावशाली असणाऱ्या मुस्लिम स्त्रियांना घाबरवणं हा ॲपकर्त्यांचा हेतू उघड आहे. मात्र तो तितकाच नाहीये. त्यामागे धर्मांध पितृसत्ताक मानसिकताही आहे. आणि दुही आणि विखाराला खतपाणी घालणं आणि समाजात असंतोष निर्माण करणं हादेखील हेतू आहे. त्यातूनच मुस्लिमांविरूद्ध ‘सफाई आंदोलन’ राबवण्याचा जाहीर उच्चार होतो. त्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असते. ‘उच्चवर्णीय तेच श्रेष्ठ’ हा विचार पितृसत्ताक मानसिकतेतून बळकट होतो. श्रेष्ठत्वाच्या त्या निकषात मात्र उच्चवर्णीय ‘स्त्री’ला थारा नसतो. पितृसत्ताक मानसिकतेच्या या विचारधारेनुसार मग बहुतांशवेळा सवर्ण वगळता इतर समाजाला हीनदृष्टीनं पाहिलं जातं आणि त्याहून हीनदृष्टीनं त्या समाजातल्या स्त्रियांकडे पाहिलं जातं. त्यांचा विचार केवळ ‘लैंगिक’ दृष्टीतून केला जातो. म्हणूनच तर मुस्लिम पुरूषाचं दानवीकरण करायचं आणि मुस्लिम स्त्रियांकडे ‘उपभोगाची संपत्ती’ म्हणून पाहायचं ही वृत्ती दिसते. विद्वेषाच्या रडारवर असणाऱ्या समाजातल्या स्त्रियांची शरीरं ही शरीरं नसून संपत्ती आहे आणि त्याचा सौदा करण्यात वा त्यांना उपभोगावंसं वाटण्यात काहीच गैर वाटत नाही. शिवाय हे सगळं उजळ माथ्याने, जाहीररित्या करताना कसली भीडदेखील वाटत नाही याचं कारणही हेच की, विशिष्ट गट स्वत:ला श्रेष्ठ आणि वर्चस्ववादी समजत असतात.
तसंही आपल्याकडे भारतीय मुस्लिम महिलांचं एक स्टिरियोटाईप चित्रण आहेच. अभिजात वर्गातल्या उच्चभ्रू स्त्रियांसारख्या त्या भासत नाहीत. मुस्लिम महिलांना किती सोसावं लागतं, त्या कशा पिडीत आहेत, त्यांच्यावर केवळ अन्याय होतो, त्यांना शिक्षण मिळत नाही, त्या बुरख्यात अडकून पडल्या आहेत, त्यांचे नवरे कसे त्यांना सोडून देतात किंवा एकाहून अधिक लग्न करतात याच दृष्टीतून मुस्लिम महिलांकडे पाहिलं जातं आणि मग त्यातूनच तिच्या असहायतेचा फायदा घेऊन तिला शिकार मानण्याची किंवा तिचा कथित तारणहार होण्याची इच्छा मुस्लिमेतर समाजात बळावते. त्यांच्यावर राज्य करणं किंवा त्यांना जिंकणं ही सर्वसामान्य बाबच वाटायला लागते. एकीकडे ‘लवजिहाद’ला विरोध होतो पण मुस्लिम मुलीशी हिंदू मुलांने लग्न केलं तर त्याला मात्र ‘मुस्लिम महिलांची मुक्ती झाली’ असं म्हटलं जातं, तेही यामुळेच. अशी ॲप्सही त्याच विचारांचं अपत्य असतं. ‘स्त्री’ आणि ‘मुस्लिम’ असणं यामुळे जर कुणा भारतीय मुस्लिम महिलेवर हल्ला होत असेल आणि सहा महिन्यांत दोनदा तिच्या अस्तित्वाला बाधा आणली जात असेल तर आपल्या देशातला मुस्लिमद्वेष आणि इस्लामोफोबिया यांचं किती सामान्यीकरण झालं आहे हे उघड आहे. अशा घटनांचा समाचार योग्यवेळी घेतला नाही तर हा वाढत चाललेला मुस्लिमद्वेष कुठल्या थराला जाऊ शकतो याची कल्पना न केलेलीच बरी!