एन . डी . पाटील सम एन . डी  . पाटीलच !

-प्रवीण बर्दापूरकर

एन . डी  . पाटील यांच्यासोबत पूर्ण न केलेल्या पदयात्रेची एका पत्रकाराची ही आठवण .

मच्या पिढीची पत्रकारिता ज्या नेत्यांच्या करिष्म्यावर बहरली त्यात प्रमुख नाव प्रा .  एन . डी  . पाटील यांचं . इंग्रजी सोबतच मराठी वर्तमानपत्रातील बातम्यातही त्यांचा उल्लेख ‘एन  डी’ असा सर्रास केला जात असे .  पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे , १९७७-७८ या यावर्षी मी कोल्हापुरात काही काळ  पडाव टाकलेला होता . तिथल्या एक सायंदैनिकात  मी उमेदवारी करत होतो आणि विलासराव  झुंजार माझे बॉस होतो .  तेव्हापासून एन . डी  . पाटील यांची ओळख . समाजवादी भूमिकेमुळे त्या वर्तुळात असणाऱ्या  माझ्या वावरामुळे आमची ओळख होती . हा माणूस नखशिखांत साधा . डोईवरचे केस मागे वळवलेले , विस्तृत भाल  प्रदेश , जाड भुवया असलेले समोरच्याचा ठाव घेणारे मोठे डोळे , बांधीव देहयष्टी , हजार लोकांच्या गलक्यातही ऐकू येईल असा  कणखर आवाज आणि पॅन्ट -बुश शर्ट अशी साधी वेशभूषा म्हणजे एन . डी . पाटील .  समाजातील  दीन-दुबळे , शेतकरी , तळहातावरचं जीणं जगणाऱ्या सामान्य माणसाचा आवाज आणि कैवारी असणारे हिमालयाच्या उंचीचे आणि तत्वनिष्ठ जे मोजके पुढारी अनुभवता आले त्यात एन . डी  . पाटील आघाडीवर होते .  एन . डी  . पाटील यांची धडाडणारी तोफ एक पत्रकार म्हणून मी  सभागृहात आणि रस्त्यावरही  ऐकली , त्यांची अनेक भाषणं , पत्रकार परिषदा कव्हर केल्या . हिवाळी अधिवेशनाच्या काळात नागपूरच्या हुडहुडी भरवणाऱ्या  थंडीत  मध्यरात्री अर्धा स्वेटर घालून आंदोलकांची काळजी घेणारे , त्यांची गाऱ्हाणी ऐकून गहिवरलेले आणि दुसऱ्या दिवशी सभागृहात त्या समस्यांवर आवाज उठवणारे  एन . डी  . पाटील अनुभवता आले . एकच आठवण सांगतो –

वर्ष बहुदा १९८२ किंवा ८३  असावं ; एन . डी  . तेव्हा विधान परिषदेचे सदस्य होते . पुलोदच्या काळात त्यांनी सहकार मंत्रिपद भूषवलं होतो , त्या नंतरचे हे दिवस . हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला पोहोचण्यासाठी बहुदा अकोल्याहून त्या कडक थंडीत एन . डी  . पाटील यांनी पदयात्रा सुरु केलेली होती . विदर्भातील शेतकरी आणि सामान्य माणसाशी संवाद साधावा हा एक हेतू  त्या पदयात्रेमागे होता ; पुढाऱ्यांनी  लोकांत मिसळण्याचे ते दिवसच होते .

विचारवंत भास्कर लक्ष्मण भोळे यांच्याशी माझे भावबंध लहानपणापासून होते . मी त्यांना कधी अण्णा , तर कधी अण्णासाहेब असं संबोधत असे . आमचे कौटुंबिक आणि दैनंदिन संबंध होते . तेव्हा ते तत्कालीन नागपूर विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक होते . विचारवंत , वक्ता म्हणून तोवर त्यांना मोठी मान्यता मिळालेली होती . त्यावेळी शेतकरी कामगार पक्ष या विषयावर ते पीएच . डी . साठी  संशोधन करत होते आणि मी ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा मुख्य वार्ताहर होतो .  एन . डी  . पाटील यांच्यासोबत पदयात्रेत आपणही सहभागी व्हावं आणि आजच्या भाषेत ‘लाईव्ह’ वृत्तसंकलन  करावं असं मला वाटत होतं ; त्या कल्पनेला भोळे सरांनी  उचलून धरलं . मात्र फार लांब नाही तर कोंढाळी  ते  नागपूर या दरम्यान एक दिवस त्या पदयात्रेत जाण्याचं आम्ही दोघांनी ठरवलं  आणि तसं नियोजन केलं . भोळे सर आहेत म्हटल्यावर एन . डी  . पाटील यांना आनंदच झाला कारण त्या  दोघांची जुनी ओळखही होती शिवाय पदयात्रेत होणाऱ्या गप्पात शेकापविषयी चर्चा होणार होती .

( थोडी अतिरिक्त माहिती- पुढे या संशोधनावर आधारित भास्कर लक्ष्मण भोळे यांचं “ भारतीय शेतकरी कामगार पक्ष – जडणघडण आणि वाटचाल” हे पुस्तक एन . डी  . पाटील यांच्याच हस्ते प्रकाशित झालं . मात्र त्यावेळी भास्कर लक्ष्मण भोळे सर हयात नव्हते… भोळे सरांच्या पत्नी श्रीमती विजया भोळे यांनी यांनी आज बोलतांना  ही माहिती दिली )

कोंढाळी  हे गाव नागपूरपासून सुमारे ५२-५५ किलोमीटर्स अंतरावर आहे आणि हा रस्ता अमरावती-नागपूर महामार्गाचा एक भाग आहे . एन . डी  . पाटील सकाळी नऊ ते दुपारी पांच पर्यंत चालत आणि नंतर आराम करत म्हणून मी आणि भोळे सर माझ्या स्कूटरवरुन  सकाळी सातलाच नागपूरवरून  निघालो . आमची स्कूटर माझ्या एक मित्र नागपूरला पोहोचवणार होता .  आम्ही वेळेत पोहोचलो ; स्कूटर घेऊन मित्र निघून गेला . थंडी बळकट होती .

पदयात्रा सुरु झाली . हातात एक उंच  बांबू , सोबत पाच-सहा ( जास्त लोकांनी पदयात्रेत सहभागी व्हायचं नाही अशा एन . डी  . पाटील यांच्या सक्त  सूचना होत्या .  )  कार्यकर्ते , समोर शंभर-दीडशे मीटर्सवर एक पोलीस जीप ( कारण एन . डी  . पाटील माजी कॅबिनेट मंत्री आणि एक प्रमुख विरोधी पक्ष नेते होते . ) असा तो ताफा होता . त्यात भोळे सर आणि मी सहभागी झालो . गावातून जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लोक उभे होते . त्यातील काही एन . डी  . पाटील यांना हार घालत होते . अधूनमधून घोषणा  दिल्या जात होत्या . कुणी तरी ‘एन . डी  . पाटील यांचा विजय असो ,’ अशी घोषणा दिली. त्याला जोरदार पाठिंबा मिळाला पण , लगेच तशी घोषणा न देण्याची ताकीद एन . डी  . पाटील यांनी दिली . आपल्या जयजयकाराच्या घोषणांना मनाई करणारं नेतृत्व लोकांना प्रथमच अनुभवायला मिळालं .

गाव सुटलं , चमेली रेस्ट हाऊसही मागे पडलं आणि गर्दी चांगल्यापैकी ओसरली . एन . डी  . आणि भोळे यांच्यात गप्पा सुरु झाल्या . सकाळची थंड हवा , रस्त्यावर तुरळक गर्दी आणि ते दोघे गप्पात रंगलेले ; मधूनच रस्त्यालगतच्या शेतातून बाया-माणसं धावत येत . कुणी त्यांच्या गळ्यातला  गमछा , अधूनमधून एखादा शुष्क हार  एन . डी  . यांना घालत . त्यांच्याशी एन . डी  . पाटील संवाद साधत . येणाऱ्या प्रत्येकाशी एन . डी  . पाटील दोन-चार  तरी वाक्य बोलतच असत ; समोरच्याचं  म्हणणं ऐकून घेत  . बोलणं झालं की लगेच झपाझप  पुढे चालायला लागत .

ही जवळ जवळ चाळीस वर्षांपूर्वीची घटना आहे आणि तेव्हाचा एन . डी  . पाटील यांच्यातला जोश लक्षात घ्या ; तरी माझ्या तुलनेत एन . डी  . तब्बल २५ वर्षांनी मोठे होते पण , त्यांच्या गतीशी जुळवून घेणं मला जमेना . मी मागे पडू लागलो . भोळे सरही थकले कारण त्यांना अस्थमा होता . अकरा-साडेअकरा नंतर तर मी चांगलाच मागे पडू लागलो . एन . डी  . पाटील यांच्या ते लक्षात आलं . एका चहाच्या टपरीवर ते थांबले . लगेच लोक गोळा झाले . मी पोहोचल्यावर चहापाणी झालं . एन . डी  . पाटील यांनी थकण्याबदल माझी थोडी गंमतही केली . एव्हाना बारा  वाजत आलेले होते . भोळे आणि मी चालणं  बंद करावं आणि नागपूरला परतावं असं एन . डी  . पाटील यांनी सुचवलं . थोडी ‘हो-ना’ झाली आणि आम्ही एन . डी  . पाटील यांचं म्हणणं मान्य केलं कारण भोळे सरांनाही थकवा जाणवू लागला होता . तेवढ्यात अमरावतीकडून एक बस  येताना दिसली .सामोरं होत एन . डी  . पाटील यांनी हात दाखवला . चालकानं थोडं पुढे जाऊन बस थांबवली . तो व त्याच्या पाठोपाठ वाहकही धावत आला . त्यांनी एन . डी  . पाटील यांना ओळखलं होतं . एन . डी  . पाटील  यांना नमस्कार करुन ते दोघं  अदबीनं उभे राहिले .

बसमध्ये जागा असल्याची खात्री करुन घेत आम्हा दोघांना नागपूरला सोडावं असं एन . डी  . पाटील यांनी सुचवलं . त्यांनी ते मान्य केलं . आम्ही बसमध्ये बसलो . बस नागपूरच्या दिशेनं निघाली आणि आमची पदयात्रा अशा प्रकारे एकदाची संपुष्टात आली . एन . डी  . पाटील यांची कामाची गती ही अशी अतुलनीय होती ; त्या गतीसोबत चालणं सर्वांना कठीणच होतं .

नागपूरला आल्यावर त्या पदयात्रेची  मी एक बातमी दिली . ‘सत्तेत असणाऱ्या  राजकीय पक्षांकडे आता लोकांच्या जगण्यांशी मुद्दे राहिलेले नाहीत…’ असं कांहीसं शीर्षक तेव्हा दिल्याचं आठवतं . बातमीत छायाचित्र म्हणून एन . डी  . पाटील यांचा एक जुना फोटो ( ब्लॉक ) वापरला . त्या  बातमीचं कात्रण जपून ठेवावं असं कांही तेव्हा सुचलं नाही पण , भेटल्यावर आमच्या अर्धवट पदयात्रेची आठवण पुढची कांही वर्ष आम्ही काढत असू . हळूहळू , कालौघात ती  आठवण पुसट  होत गेली ; अलीकडच्या कांही वर्षात तर भेटीही थांबल्या . बातमी समजली अन ती आठवण आता उसळून समोर आली . ती ऐकायला आता एन . डी  . नाहीत…

एन . डी  . पाटील यांच्या सम एन . डी  . पाटीलच ; तसा तळमळीचा नेता आता पुन्हा  होणं शक्यच नाही !

( छायाचित्रे  सौ . स्वाती शिंदे-पवार , विटा , जिल्हा सांगली अलोक जत्राटकर , कोल्हापूर यांच्या सौजन्याने . )

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर – type करा आणि Search वर क्लिक करा.

 

Previous articleचंद्रकांत खोत: ‘पुरुष वेश्या’ ते ‘विवेकानंद’ व्हाया ‘सौंदर्याचा अ‍ॅटम बॉम्ब’ पद्मा चव्हाण!
Next articleबोलती हुई औरतें…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.