चंद्रकांत खोत: ‘पुरुष वेश्या’ ते ‘विवेकानंद’ व्हाया ‘सौंदर्याचा अ‍ॅटम बॉम्ब’ पद्मा चव्हाण!

-मिथिला सुभाष

*******
केवढं ते मोठं लेखाचं नाव! पण खोतांच्या या परिचयाला याहून वेगळं नाव असूच शकत नाही. कारण हे सारे त्यांच्या आयुष्याचे, त्यांच्या लिखाणाचे स्थायीभाव आहेत.

जेव्हा वाचक, चंद्रकांत काकोडकरांच्या नायिकेचे उन्नत उरोज, आरक्त गाल आणि निळ्या फुलांच्या गुलाबी साडीत गुरफटले होते तेव्हा खोतांच्या या चंद्रकांतने त्यांच्या हातात ‘उभयान्वयी अव्यय’ ही कादंबरी दिली. या कादंबरीमुळे माझ्यासारख्या सतरा-अठरा वर्षाच्या मुलीला, पुरुष वेश्या, त्याला गिगेलो म्हणतात, पोरगेच पोरग्यांशी संग करू शकतात वगैरे गोष्टी कळल्या. ‘अमुक पुस्तकं वाचायची नाहीत’ असं घरात सांगितलं की ती मिळवून वाचायचीच हे माझ्याबाबतीत ठरलेलं होतं. ती पुस्तकं मिळवण्यासाठी जीवाचं रान करायची मी. अख्खा काकोडकर असा चोरून मिळवून वाचलाय. असे अनेक वीर आहेत, पण ते आमच्यासारखं वयाच्या पासष्ट्याव्या वर्षीसुद्धा ते मान्य करत नाहीत.

‘उभयान्वयी अव्यय’ माझ्या डोक्यात घट्ट बसली होती. त्यानंतर दोनेक वर्षांनी माझं लग्न झालं. तोपर्यंत चंद्रकांत खोतांच्या ‘विषयांतर’ आणि ‘बिनधास्त’ या आणखी दोन कादंबऱ्या आलेल्या होत्या. आता मला जीवाचं रान करावं लागत नव्हतं. नवरा आणि सासऱ्यांना माझ्या वाचनवेडाचं कौतुक होतं. त्यामुळे हवं ते पुस्तक मी वाचनालयातून आणू शकत होते. त्यामुळे माझी वाचनाची भूक भागत होती, वाढत होती. या काळात मी खोतांच्या सगळ्या प्रकाशित कादंबऱ्या वाचल्या. शिवाय काही दिवाळी अंकात त्यांच्या ‘चिचुंद्री’ वगैरे कादंबऱ्या प्रकाशित झाल्या होत्या. त्याही वाचल्या. सगळ्यांचं समान सूत्र ‘सेक्स’ हेच होतं. मुंबईचं चमत्कारिक आयुष्य.. गिरणगावातलं दाटीवाटीचं जग.. त्यातली वेगवेगळ्या वयोगटाची माणसं आणि त्या सगळ्यांना एकत्र बांधणारा कॉमन फॅक्टर, सेक्स! पण आज मी या लेखात सेक्स या विषयावर लिहिणार नाहीये..

माणूस म्हणून, लेखक म्हणून मी खोतांच्या प्रवासाने थक्क होते. मी अनेक हिंदी, मराठी लेखकांचा, शायरांचा गुपचूप पिच्छा पुरवलाय. मला अतरंगी माणसं आवडतात. बाळबोधांचा मला तीव्रतम कंटाळा येतो. ‘मामाची बायको सुगरण, रोज-रोज पोळी शिकरण’ ही आम जनतेला गोड वाटणारी ओळ मला माझ्या लहानपणीसुद्धा भिकार आणि हास्यास्पद वाटायची. शिकरण बनवण्यात कसला आलाय सुगरणपणा, असं मी म्हंटलं की मग लोकांना मीच अतरंगी वाटायची. त्यामुळे चंद्रकांत खोत हा अतरंगी लेखक माझ्या रडारवर आला. खरं तर मी त्यांना आयुष्यात एकदाही भेटले नाही. पण त्यांच्याबद्दल आकर्षण वाटण्याचं आणखी एक छुपं कारण होतं. त्यांचा आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी असायचा. माझे वडील मला म्हणायचे, या दिवशी जन्माला आलेली माणसं जगावेगळी असतात. मला हे लै भारी वाटायचं. (आज मम्मुटी, राधिका आपटे, नीरजा भनोत या, माझा वाढदिवस शेअर करणाऱ्या सेलिब्रिटीजचं आयुष्य पाहिलं की मला वाटतं, खरंच असं असेल का? किती वेगळे ठरतायत हे लोक! असो.) यातला गंमतीचा भाग सोडला तरी, त्यामुळे खोतांबद्दल जिथे जे मिळेल ते वाचायचं हे ठरलेलं होतं. त्यांचा गोरापान रंग, कोरीव दाढी, डोक्यावर फरकॅप, पठाणी ड्रेस आणि डोळ्यात सुरमा असलेलं रुपडं मला भारी वाटायचं. त्यांना असलेला अत्तराचा षोकही मी ऐकून होते आणि तेही माझ्या आकर्षणाचं एक कारण होतं.

त्या काळात खोत ‘अबकडई’ नावाचा दिवाळी अंक काढायचे. ते सगळे अंक अफलातून असायचे. त्यातल्या एका अंकात त्यांनी अतींद्रिय अनुभवांवर नामवंतांचे लेख घेतले होते. खोतांच्या या अंकात अनेक वरिष्ठ लेखक, कलावंत मंडळी लिहायची. या अतिंद्रीय अंकातही दुर्गाबाई भागवत, मंगेश पाडगावकर, अभिनेत्री रंजना, एक कुठले तरी मोठे न्यायाधीश (गवांदे किंवा लवांदे बहुतेक) या सगळ्यांनी त्यांना आलेल्या अतींद्रिय अनुभवांबद्दल लिहिलं होतं. तो अंक आणि त्या घटना मला आजही स्पष्ट आठवतात.

मी आता हळूहळू माझ्या डोक्यात असलेल्या विषयाकडे येतेय.
मला लहानपणापासून गूढ विद्या, अतींद्रिय गोष्टी, समाधी लावणे, कुंडलिनी, पुनर्जन्म, देव दिसणे अशा प्रकारांमध्ये रस होता. मुलांची कुठलीही जिज्ञासा दाबून टाकायची नाही, अशा मताचे वडील असल्यामुळे ते माझ्या प्रश्नांना उत्तरं द्यायचे. मुळात हे त्यांच्याचकडून माझ्याकडे आले होते. आणि तीन भावंडात फक्त मीच हा गुण उचलेला असल्यामुळे त्यांना माझं जरा कौतुक होतं. ‘या गोष्टी कुठल्याही गुरुशिवाय पुढे नेता येत नाहीत’ हे त्यांनी माझ्या बिंबवले होते. आणि संगीत, साहित्य, उर्दू वगैरेंच्या बाबतीत ते माझे गुरु असले तरी, याबाबतीत माझे किंवा कुणाचे ‘गुरु’ होण्याएवढी काबिलीयत त्यांच्यात नव्हती. ते कसे या नादाने वाहवत गेले होते आणि कशी आपटी खाऊन परत आले हे त्यांनी आम्हाला शेकडो वेळा सांगितलेलं होतं. त्यामुळे आपल्या या धाकट्या मुलीचं गूढ गोष्टींबदलचं वेड तितपतच आहे हे त्यांना माहित होतं. आणि खरंच ते तितपतच होतं.

एकदा मात्र तिसरा डोळा उघडण्यासाठी, रात्री घरातले सगळे झोपल्यावर मी चार आण्याच्या नाण्याने दोन भिवयांच्या मधे एवढं आणि एवढा वेळ घासलं की तिथून रक्त यायला लागलं. माझा तिसरा डोळा उघडला नाहीच, घरातल्या सगळ्यांचे डोळे उघडले आणि वडलांनी अजिबात न रागावता आधी औषधोपचार केले आणि मग त्या भयाण रात्री मला काही गोष्टी समजावून सांगितल्या. “होय, तिसऱ्या डोळ्याची हीच जागा. पण तो असा उघडत नसतो त्यासाठी अनेक वर्षांची तपश्चर्या असावी लागते, वगैरे..!” पुढे ते मला कायम सांगायचे की आपण संसारी माणसं आहोत, तुलाही शिकून, लग्न करून संसाराला लागायचं आहे त्यामुळे हे खूळ डोक्यात ठेऊ नको! पण मी एवढी मोठी नक्कीच झाले होते की मनातल्या काही गोष्टी घरातल्या लोकांना सांगायच्या नाहीत आणि आपल्या पद्धतीने त्यांचा पाठपुरावा घेत राहायचा, हे कळायला लागलं होतं. वाचनवेड भरपूर असल्यामुळे या विषयावरची असंख्य पुस्तकं मी वाचायची. पण अभ्यासात हुशार होते, यथावकाश प्रेमात पडले, लग्न झालं, मुलगी झाली. त्यामुळे दादा निश्चिंत होते आणि माझाही काही हिमालयात वगैरे निघून जाण्याचा इरादा नव्हता. पण या विषयातली ऑथेन्टिक इंग्रजी, मराठी, हिंदी पुस्तकं मी सातत्याने वाचत होते, अजून वाचते.

होय, मी चंद्रकांत खोतांच्या विषयाकडे येणार आहे!

कला आणि अध्यात्माला एका जन्माची मर्यादा नसते. ते पूर्वसंचित म्हणून माणसाच्या सोबत येत असते. म्हणून दोन-तीन वर्षाची मुलं, कुणीही न शिकवता उत्तम तबला वाजवतात… वगैरे.. कुंडलिनी जागृत करण्यासाठी पण जन्मोजन्मी प्रयत्न करावे लागतात.

‘कुंडलिनी’ ही एक निर्गुण, अमूर्त चीज आहे. ‘हे नाक, हे कान’ जसं दाखवता येतं, तशी ‘ही कुंडलिनी’ दाखवता येत नाही. ‘आत्मा’ आणि ‘मन’ या दोघा ‘अदृश्यांची’ ती मोठी बहिण आहे. हवेतला प्राणवायू दिसत नाही पण काही प्रयोगांनी त्याचं अस्तित्व सिद्ध करता येतं, तसंच आत्मा, मन आणि कुंडलिनीचं अस्तित्व देखील सिद्ध करता येतं. याची मला खात्रीच आहे.

माझी काही कुंडलिनी जागृत वगैरे नाही झालेली. मला करायची पण नाही. पण मला किंचित म्हणजे पॉईंट झीरो, झीरो पर्सेंट अध्यात्मात रस असल्यामुळे थोडी माहिती आहे, ती देतेय. हेच कनेक्शन आपल्याला चंद्रकांत खोतांपर्यंत नेणार आहे..

मणका जिथे सुरु होतो, तिथपासून, मेंदूच्या वरच्या भागापर्यंत सात काल्पनिक चक्रे आहेत. खरं तर ती सुईच्या अग्राएवढी पॉईंटस् आहेत, त्यांना मध्यभागी कल्पून त्याभोवती सात चक्रांची कल्पना केलेली आहे. त्यातून कुंडलिनीचा प्रवास होतो. पहिल्या ‘मूलाधार’ चक्रापासून सुरु झालेला प्रवास शेवटच्या ‘सहस्त्रार’ चक्रापर्यंत पोचतो तेव्हा कुंडलिनी जागृत होते. यासाठी एक जन्म पुरत नाही! ज्यांनी मागच्या अनेक जन्मापासूनची तपस्या सोबत आणलेली असते त्यांची कुंडलिनी जागृत होते आणि लोक म्हणतात याची कुंडलिनी पाच मिनिटात जागी झाली. नाही राव, ते सोबत आणलेलं पूर्वसंचित असतं!! असं पूर्वसंचित सोबत आणलेल्यांची कुंडलिनी कसल्याही प्रयत्नांशिवाय जागी झालेली असते/होते!!!

पहिलं मूलाधार चक्र तुलनेने लवकर ‘जागं’ होतं. पण त्यातच मेख आहे. जवळजवळ ‘कुल्ल्यातच’ असलेला हा पॉईंट जागा झाला की कुंडलिनीचा प्रवास दुसऱ्या म्हणजे नाभीत असलेल्या मणिपूर चक्राच्या दिशेने सुरु होतो. या दोन्ही पॉईंटसच्या मधे माणसाचे लैंगिक अवयव असतात. इथे खरी अडथळ्याची शर्यत सुरु होते. साधक त्यात अडकला की तो चित्रविचित्र लैंगिक चाळे करायला लागतो. थोडक्यात त्याचा रजनीश आणि आसाराम बापू होतो. एखादाच त्यातून भानावर येऊन ‘ओशो’ होतो आणि बाकीचे लैंगिकतेत बरबटले जातात. कुठल्याही ऐऱ्यागैऱ्याने कुंडलिनी जागृत करून घेऊ नये म्हणून निसर्गाने (आणि प्रत्येकाच्या नियतीने) घातलेला हा खोडा असतो. बहुतेक त्यात अडकतात आणि भ्रष्ट होतात!

चंद्रकांत खोत यांचं हेच झालं असावं असं मला वाटतं. नंतरच्या काळात त्यांनी जी ‘बिंब-प्रतिबिंब’, ‘संन्याशाची सावली’ साईबाबादी अनेक संतांची चरित्रं लिहिली, त्यातून माझ्या या विचाराला खतपाणी मिळतं. म्हणजे थोडक्यात, त्यांचा ‘आसाराम’ नाही झाला, ‘ओशो’ झाला. पण त्याआधीचं खोतांचं आयुष्य लैगिकदृष्ट्या एवढं खळबळजनक होतं की त्यांचे चाहते तोंडात बोटं घालायचे.. मी पण!

पण त्याआधी त्यांच्या आयुष्यात ‘सौंदर्याचा अॅटम बॉम्ब’ आला. पद्मा चव्हाण! ही बाई ज्यांना माहित आहे, त्यांना काही सांगण्याची गरज नाही आणि ज्यांना माहित नाही त्यांना सांगून काही उपयोग नाही. कारण या बाईचं सौंदर्य, बिनधास्त लहजा आणि तिची जवानी शब्दातीत होती. तिचं नाटक बघत असतांना प्रेक्षकात बसलेला एखादा पुरुष तिथल्या तिथे …. गलितगात्र व्हायचा असं सांगणारे महाभाग मला माहित आहेत. खोतांना पद्मा चव्हाण या बाई कुठे भेटल्या ते मला माहित नाही. पण त्या दोघांचं प्रकरण अक्षरश: मिटक्या मारत वाचावं असं होतं. माझ्याही ते वाचनात आलं होतं पण त्याचे तपशील मी इथे देणार नाही. कारण कोणाच्याही बेडरूममधल्या गोष्टी या कधीही विश्वसनीय नसतात, जोपर्यंत त्या दोघातलं कुणीतरी एक ते सांगत नाही.  फक्त एक मजेशीर गोष्ट सांगते. खोतांच्या सेक्स फोर्सला तोडीस तोड व्हावं म्हणून पद्माबाई रोज शिलाजित खायच्या, म्हणे! आणि ही संथा त्यांना खोतांनीच दिली होती. मी पत्रकारितेत असतांना डोंबिवलीचा एक कुणीतरी ‘अजय’ नावाचा मुलगा वर्तमानपत्राच्या कार्यालयात नाटक-सिनेमांचे प्रेस रिलीज आणून द्यायचा. स्वत:ही कधीतरी काही लिहायचा. मला आत्ता त्याचं पूर्ण नाव आठवत नाहीये. पण हा मुलगा अकाली, म्हणजे तिशी-बत्तीशीत असतांनाच मृत्यू पावला आणि तो एड्स होऊन मेला असं लोक म्हणायचे, मला माहित नाही. हा अजय शेवटची काही वर्षं पद्माबाईंचा सेक्रेटरी होता. आणि ही शिलाजितवाली गोष्ट बाईंनी स्वत: त्याला सांगितली आणि त्याने आम्हा काही मित्रांना सांगितली, म्हणून मला माहित. खोतांना ‘करून करून भागलो आणि देवपूजेला लागलो’ या नावाचं वीस खंडाचं आत्मचरित्र लिहायचं होतं. त्यातले काही भाग जरी त्यांनी लिहिले असते तरी ते निहायत वाचनीय झाले असते हे नक्की.

बारा-पंधरा वर्षांनी बाईंचे आणि खोतांचे बिनसले. बाईंनी खोतांवर फसवणुकीचा खटला भरला. तो तब्बल अकरा वर्षं चालला. त्यानंतर खोत एकदमच बदलले. ‘अबकडई’चा यज्ञ सुरुच होता. ते काम खोत वर्षभर करायचे. मोठमोठ्या नामांकित लेखकांकडून लिहून घ्यायचे, त्यावर संपादकीय संस्कार करायचे. बाईंशी बिनसल्यावर तोच त्यांचा विरंगुळा झाला. आणि त्याच काळात त्यांनी आध्यात्मिक लिखाण सुरु केलं. त्यांच्या ‘बिंब-प्रतिबिंब’ला तुफान यश मिळालं.

‘लिटल मॅगझिन’ चळवळीत अशोक शहाणे, चंद्रकांत पाटील, भालचंद्र नेमाडे, तुळशी परब, जयंत नेरुरकर, भाऊ समर्थ यांच्यासोबत चंद्रकांत खोत असायचे. मला त्याबद्दल फारशी माहिती नाही. खरं सांगायचं तर खोतांच्या साहित्याबद्दल लिहिण्याची माझी ऐपतच नाही. पण एक शहाणासुरता माणूस कुंडलिनीच्या त्या दोन पहिल्या चक्रामध्ये अडकून त्याचं काय होऊ शकतं हे माझ्यापुरतं मला इंटरेस्टिंग वाटतं.

मी वर एके ठिकाणी नमूद केल्यानुसार, कुंडलिनी जागृत करण्याचा आटापिटा प्रत्येकवेळी माणूस करतोच असं नाही. त्याच्या मागच्या अनेक जन्मातून त्याने सोबत आणलेलं संचित आपल्या लेव्हलवर काम करत राहतं.

निष्कर्षावर येते. चंद्रकांत खोतांच्या संपूर्ण प्रवासाकडे पाहिलं तर असं वाटतं त्यांच्या कुंडलिनीने केलेली काहीतरी गडबड असावी ही. बेफाम लैंगिकता असलेली अनेक माणसं असतात. ती तशीच संपतात. ‘बिंब-प्रतिबिंब’ नाही लिहून होत त्यांच्या हातून. आणि ही एकच नाही, अशा अनेक आध्यात्मिक कादंबरी खोतांनी लिहिल्या. त्यांच्या या लिखाणात जुने खोत कुठेच दिसत नाहीत. त्यानंतर ते हिमालयात निघून गेले. काही वर्षांनी परत आले, तेव्हा घरी राहायला गेलेच नाहीत. सात रस्त्याच्या साईबाबांच्या देवळात राहायचे. आणि तिथेच त्यांचा अंत झाला.

माझ्यासाठी हा सगळा जीवनप्रवास अचंबित करणारा आहे. माझा कल थोडा गूढतेकडे असल्यामुळे मी त्यांच्या प्रवासाचा हा अर्थ लावला. असं असेलच असं मी खात्रीने नाही म्हणू शकत आणि असं नसेलच असं कुणीही खात्रीने नाही पटवून देऊ शकत.

(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आहेत)

[email protected]

मिथिला सुभाष यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात – मिथिला सुभाष– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleकोरोना विषाणू … त्याचे भाऊबंद आणि परिवार
Next articleएन . डी . पाटील सम एन . डी  . पाटीलच !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

8 COMMENTS

  1. नामवंत पटकथाकार मिथिला सुभाष यांनी चंद्रकांत खोत यांचे जीवन शैलीवर लिहिलेलं लेख , त्यातील शब्द रचना अप्रतिम आहे…मनाला भावली ….

  2. लेख वेगळ्या विषयावरचा , माहितीपूर्ण आणि वाचनीय आहे पण , नेमका नाही खरं तर बराच विस्कळीत आहे .

    • प्रवीण जी, प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे सर!

  3. अब क ड ई चा दिवाळी अंक अतिशय सुंदर असायचा … त्यातील २ अंक अजूनही संग्रही आहेत . पुन्हा अब क ड ई चे सारे अंक वाचायला मिळाले तर मजा येईल.

    • होय, माझ्याकडे अनेक वर्षं तो विशिष्ट अंक होता, पण कुणीतरी नेला आणि परत दिलाच नाही. मलाही आवडतील सगळे अंक वाचायला..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here