कोरोना विषाणू … त्याचे भाऊबंद आणि परिवार

सानिया भालेराव

गेल्या दीड वर्षात कोव्हीड १९ बद्दल मी जिथे जिथे आजवर लिहिलं आहे, बोलले आहे तेव्हा, आता कोरोना विषाणूसोबत आपल्याला राहायला शिकायचं आहे असं विधान कायम करत आले आहे. आपण सर्व जण ज्यांनी कोरोना महामारी अनुभवली आहे, अनुभवतो आहोत… आपले अनुभव, जेनेटिक पूल मध्ये होणारं व्हेरिऐशन, इमोशनल आणि सायकॉलॉजिकल बिहेव्हिअरल चेंज आणि पँडेमिकमुळे एकुणातच बदललेले वैयक्तिक आणि सामाजिक जीवन हा अत्यंत मोठा अभ्यासाचा विषय आहे. येणाऱ्या पिढ्या पुढची काही वर्ष या काळातील वैज्ञानिक रिसर्च, मानसशास्त्रीय जडणघडण, इव्होल्यूशन, इकॉलॉजी, इम्युनॉलॉजी, साथीच्या रोगांचं विज्ञान, बदलणारी टेक्नालॉजी आणि त्यामुळे विस्तारत जाणारं व्हर्चुअल जग, त्याचे जनवसाहतीवर होणारे दूरगामी परिमाण अशा कित्येक विषयांवर अभ्यास करणार आहेत. प्रचंड डेटा प्रोसेस होणार आहे, नवीन अल्गोरिदम, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन संवेदना, नात्यांच्या, जगण्याच्या, माणुसकीच्या नवीन परिभाषा निर्माण होणार आहेत.

तर आता कोरोना विषाणू आणि त्याचे सगळे व्हेरिएन्ट म्हणजे त्याचे बंधू – भगिनी यांना सोबत घेऊन आपल्याला निदान काही वर्ष राहायचं आहे. एक गंमतीचं उदाहरण देते. आपल्या सर्वांना असे काही नातेवाईक असतात बघा जे कारण नसताना आपल्या आयुष्यात नाक खुपसतात, लुडबुड करतात.. जरा काही आपलं चांगलं झालं की त्यांच्या पोटात दुखतं मग ते नवीन रंग बदलून आमचंच किती भारी हे दाखवतात.सतत आमचंच सगळं कसं ग्रेट हे यांना भासवायचं असतं.. मग आपण काय करतो? आपल्याला कटू अनुभव आला की आपण एक अंतर ठेवून राहतो.. आणि मग असे त्रासदायक लोक आपल्याला जिथे जिथे भेटतात तिथे तिथे आपल्याला त्यांना सरळ टाळता येत नसलं तरी आपण भान ठेवून स्वतः एक सेफ अंतर ठेवून वागायला शिकतो..

बस हेच लॉजिक या कोरोना विषाणू आणि त्याच्या भाऊबंदकीमधल्या डेल्टा, ओमिक्रॉन आणि पुढे सुद्धा जे विषाणूचे व्हेरिएन्ट येतील त्यांना लावायचं आहे. आपण यांच्यापासून एक सेफ अंतर ठेवून राहायचं आहे.

१. मास्कचा वापर करणे

२. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणे

३. गरज असेल तरच बाहेर जाणे

४. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणे

५. सर्दी ताप अशी लक्षणं असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे, त्यांनी सांगितलं तर कोरोनासाठीची टेस्ट करणे

६. कोरोना सदृश लक्षण असल्यास स्वतःची आणि आपल्या घरातील लोकांची काळजी घेणे आणि बाहेर न जाणे

७. कोरोनाची टेस्ट केली की पॉझिटिव्हच येते अशा अफवांवर विश्वास न ठेवणे आणि त्या पुढे न पसरवणे

८. ओमिक्रॉन बद्दलच्या बातम्या ऐकून ऐकून उगाचच अकारण भीती न बाळगणे पण काळजी घेत राहणे

९. घरातील वृद्ध आणि लहान व्यक्तींची विशेष काळजी घेणे.

१०. ज्यांना शक्य आहे, जितकं शक्य आहे त्यांनी अकारण बाहेर न भटकणे

११. सगळ्यात महत्वाचं : व्हॅक्सिनचे डोस घेणे ( येऊ घातलेला बूस्टर डोस सुद्धा )

तहान लागल्यावर विहिर खोदायची हा ऍटिट्यूड आपण बदलायला हवा आता. केसेस वाढल्या की बिळात घुसायचं असं आपण करत राहिलो तर आपल्यासाठी अवघड होऊन जाईल परिस्थिती. ढील मिळाली की सुटले लोक.. मास्क नाही, सोशल डिस्टंसिंग नाही, हॉटेलं – दुकानं, बाजार वाहत आहेत दुथडी भरून.. मग ओमिक्रॉन आला.. केसेस वाढल्या.. की पॅनिक सुरु.. हे चक्र आपण आता थांबवूया.. जो वर कोरोनाचा धोका टळत नाही, लहान मुलांचं लसीकरण होत नाही निदान तोवर तरी आपण सर्वांनी फार जबाबदारीने वागायला हवं, नियम पाळायला हवेत.

ओमिक्रॉनची कुंडली ज्यांना जाणून घेण्यात रस आहे त्यांच्यासाठी एक सविस्तर लेख कदाचित लिहीन पण तूर्तास थोडक्यात ओळख करून द्यायची असल्यास WHO च्या टेक्निकल ऍडव्हायजरी ग्रुप ऑन व्हायरस इव्होल्यूशन ( TAG -VE ) या टीमने SARS-CoV-2 B.1.1.529 हा कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएन्ट तपासला साधारण नोव्हेंबर २६ २०२१ च्या दरम्यान. याला नाव देण्यात आलं ग्रीक लेटरचं..ओमिक्रॉन.. हा पठ्ठया स्पेशल ठरला कारण ‘डेल्टा’ विषाणूच्या पुढे जाऊन याने वेड्यासारखं स्प्रेड व्हायला सुरवात केली.. “हा तो नाकात दम आणणारा वळवळ्या लहान भाऊ जो उगाच घरभर काड्या करत राहतो दिवसभर”.. आता जितका रिसर्च झाला आहे त्यानुसार ओमिक्रॉनची स्प्रेडेबिलिलिटी म्हणजे ‘आजार पसरवणायची क्षमता’ ही अधिक असली तरी तूर्तास असं म्हणता येऊ शकतं की फार गंभीर स्वरूपाचा आजार ( सिम्प्टम्स) हा निर्माण करत नाहीये.

आता इथे एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे ती आधी नमूद करते.. ‘तूर्तास’ हा शब्द अत्यंत महत्वाचा. कोरोना बद्दल जे कोणी बोलत आहेत, लिहीत आहे ते कितीही अभ्यासपूर्ण असलं तरीही हाती जितका डेटा आहे त्यावर ते बेतलेलं आहे आणि तुम्ही जर या विषयात ऍक्च्युअल काम करणाऱ्या सायंटिस्ट्सचे रिसर्च पेपर, लेख वाचले तर तुम्हाला लक्षात येईल की ते हेच सांगत आहेत की सध्या ज्या केसेस होत आहेत, केवळ त्या डेटावर बेतलेल्या अभ्यासानुसार आम्ही हे सांगतो आहे. यात ठोस असं काहीही अजून सांगता येणारं नाहीये. म्हणून ओमिक्रॉन वेगाने पसरत असला आणि कमी त्रासदायक असला तरीही हे सध्यापुरतं आहे. कारण या विषाणूची सब लिनिएज B A . १ ही विस्तारत जाते आहे.. उद्या कदाचित डेल्टा आणि ओमिक्रॉन यांचं रिकॉम्बिनेशन होऊन एक नवीन खोडकर, अधिक बंड आणि वस्ताद भाऊ येऊ शकतो.. CITIID (Cambridge Institute for Therapeutic Immunology and Infectious Diseases) मधील क्लिनिकल मायकोबायलॉजीचे प्रोफेसर डॉक्टर गुप्ता यांनी एका विधान केलं आहे की ओमिक्रॉन वेगाने पसरतो आहे पण त्याचा व्हिरुलन्स कमी असणं (व्हिरुलन्स म्हणजे गंभीर नुकसान करण्याची/ आजारी पाडून इजा करण्याची प्रवृत्ती ) ही इव्होल्यूशनरी मिस्टेक असू शकते.. याचा अर्थ ओमिक्रॉन नंतरचा स्ट्रेन अधिक शहाणा होऊ शकतो आणि आपलं अधिक नुकसान करू शकतो. पण या सगळ्या शक्यता आहेत आणि वैज्ञानिक जगात हे थिअरीज मांडणं, चर्चा करणं चालूच राहणार. म्हणून आपण मास्क वापरणे, आपलं सरकार जे नियम घालून देतं आहे ते पाळणे आणि पॅनिक न होता विज्ञाननिष्ठ राहून जगणे हे करायला हवं..

याखेरीज सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेणं आणि आता जो नवा बूस्टर डोस आला आहे त्याचं नोटोफिकेशन आरोग्य सेतू एपवर आलं की तो लशीचा डोस घेणं. कोरोना बाधित रुग्णांचे आकडे घाबरवणारे असले तरीही अजून याला इंडेमिक म्हणून घोषित करण्यात आलं नाहीये सो सध्यातरी हा घरात शिरून बसलेला आणि परत ना जाणारा पाहुणा आहे आपल्यासाठी. व्हॅक्सिनेशन विथ बूस्टर डोस , मास्क, सोशल डिस्टनसिंग हे आपण वर्षभर पाळलं तर हा आपला नातेवाईक बनणार नाही आणि याची कटकट कदाचित आपल्याला आणि पुढच्या पिढयांना आयुष्यभर सहन करावी लागणार नाही.. सजग राहूया, घाबरून न जाता विज्ञाननिष्ठ वर्तन करूया.

या आजाराबद्दल वाचत असतांना WHO, CDC, NIV, ICMR सारख्या ऑफिशियल पोर्टलचा आधार घ्या. कोरोना बद्दल कोणतीही माहिती पुढे शेअर करताना त्याचा सायंटिफिक बेस चेक करून मगच शेअर करा. या लेखामध्ये जे संदर्भ वापरले आहेत त्याच्या लिंक्स देते आहे. या लेखातील माहिती देखील पडताळून पाहा.

1. https://www.who.int/news/item/28-11-2021-update-on-omicron

2. https://www.cdc.gov/…/mathematical-modeling-outbreak.html

3. https://www.unicef.org/…/what-we-know-about-omicron…

4. https://www.thehindu.com/…/milder…/article38177941.ece

5. https://economictimes.indiatimes.com/…/art…/88806759.cms

– [email protected]

(लेखिका नाशिक येथे MET’s Institute of Pharmacy येथे कार्यरत आहेत)

सानिया भालेराव यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –सानिया भालेराव – type करा आणि Search वर क्लिक करा.